My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरुरत है

सकारात्मकता गमावणारी बुद्धीमत्ता
आधुनिक काळात आपण सर्वजण आपल्या जीवनाची उलथापालथ करुन टाकणाऱ्या संक्रमणावस्थेतून प्रवास करीत आहोत. ही संक्रमणावस्था नव्या भौतिक जगताची तर आहेच परंतू त्यासोबतच नवी वैचारिक आंदोलने निर्माण करणारी देखील आहेत. हे नवे बदल आपल्यापैकी प्रत्येक विचारी मनाला विचार करायला बाध्य करतात. प्रसंगी या नवविचारांना व त्यामधून सामोरे येणाऱ्या बदलांना स्विकारताना आपली ओढताण देखील होत असते. एकंदरीत कमी अधिक प्रमाणात आपण सर्वच एका विशिष्ठ प्रकारची संभ्रमावस्था अनुभवतो आहे. परंतू माणूस हे परमेश्वराने निर्मिलेले एक असे अद्भूत रसायन आहे की कोणत्याही परीस्थितीमधे जगण्याचे वेगवेगळे मार्ग त्याला सापडतात व त्याद्वारे तो आनंद निर्मीती करु शकतो. अर्थात मानवाकडे असणारी ही सकारात्मकतेची क्षमता सर्वांनाच वापरता येते असे नाही. काही वेळा जीवनात अनुभवावी लागणारी संभ्रमावस्था नकारात्मक भुमिका निर्माण करताना आढळते. मानवाकडे असलेल्या अपरीमित बुद्धीमत्तेचा वापर काही मंडळी विविध बाबींमधील सकारात्मकता गमावण्यासाठी करताना दिसतात तेव्हा मात्र आश्चर्य वाटू लागते. एखाद्या विषयातील बुद्धीमत्ता चांगल्या बाबीचा आनंद घेण्यामधील बाधा ठरते असा अनुभव मला नुकताच आला.
नागपूरला माझ्या दोन व्याख्यानांच्या निमीत्ताने जाण्याचा नुकताच योग आला व त्यासोबतच या मुक्कामादरम्यान एक अत्यंत सुरेल व रम्य पहाट मला अनुभवायला मिळाली. निमित्त होते नागपूरच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित ब्रह्मनाद या एका सुरेल कार्यक्रमाचे. शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक द्वय पं. राजन व पं साजन मिश्र यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नागपूरच्या मनाला सुखावून टाकणाऱ्या थंडीत पहाटे सहा वाजता दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या अत्यंत नैसर्गिक व हिरव्यागार परीसरामधे या ब्रह्मनाद कार्यक्रमाचे रेखीव आयोजन करण्यात आले होते. या केंद्राच्या मधोमध असलेल्या एका मोठ्या वृक्षाखाली मंच ठेवण्यात आला होता. त्या समोरच्या हिरव्यागार गवतावर तसेच त्याच्याभोवती गोलाकार छान खुर्च्यांची मांडणी करण्यात आली होती. पहाटेच्या धुंद वातावरणात मंद संगीत सुरु होते ज्यामुळे तो सबंध परीसर पवित्र वाटू लागला होता. लवकरच मनापासून शास्त्रीय संगीताची आवड असलेला श्रोतृवर्ग तेथे उपस्थित झाला आणि त्यांच्या पाठोपाठ दोन्ही पंडीत द्वय राजन व साजन मिश्र यांचे आगमन झाले. प्रसन्न मुद्रेने त्यांनी सर्वांना अभिवादन केले व त्यानंतर त्यांनी त्यांच्या सादरीकरणाच्या दृष्टीने आसन ग्रहण केले. या संपुर्ण रेखीव आयोजनाला साजेश्या अत्यंत गोड व समर्पक संचालनाच्या माध्यमातून सुरेल संगीताच्या सादरीकरणासाठी एक योग्य वातावरण निर्माण झाले. सुर्याची कोवळी किरणे तेथील वृक्षांच्या फांद्यांना छेदून मधून मधून थोडा थोडा भाग उजळून टाकीत होती. तेथील वृक्षवेलींवर पक्षांचे सुरेल कुजन सुरु झाले होते. पक्षांचा तो किलबिलाट जणू त्यांचीही संगीताचे हे दैवी सुर ऐकण्यासाठीची आतुरता दाखवित होता. अश्या संपुर्णपणे प्रसन्न व दैवी क्षणांमधेच पंडीत राजन व साजन मिश्रांनी पहाटे गायल्या जाणाऱ्या अत्यंत गोड अश्या भटीयार रागाचा पहिला सुर छेडला. तो पहिला सुर त्या सबंध वातावरणाला अक्षरशः रोमांचित करुन गेला. इतकी सुरेल व रम्य पहाट माझ्या जीवनात आणल्याबद्दल मी परमेश्वराचे मनोमन शतशः आभार मानले. भटीयार रागाची सुरावट पंडीत द्वयांनी सुरु केली.. एकाचा सुर थांबला की त्यामधूनच दुसऱ्याचा सुर जन्म येऊ लागला.. निवेदिकेने सांगितल्याप्रमाणे - दो जीस्म लेकीन एकही आत्मा- याचा प्रत्यय सुरांच्या प्रत्येक टप्प्यावर येऊ लागला. मारवा थाटातील हा राग अतिशय गोड वाटतो..अश्या रम्य पहाटेच्या वेळी. मध्यम वादी व षड्ज संवादी असे स्वरुप असणाऱ्या या रागाची पंडीतजींनी उकल करणे सुरु केले. मुळात पहाटेच्या ब्रह्मक्षणी ब्रह्मनाद या कार्यक्रमात संपुर्णपणे निसर्गरम्य वातावरणात भटीयार रागाच्या त्या सुरावटीमधे तेथे उपस्थित प्रत्येकजण रममाण झाला होता. कोमल रीषभ व शुद्ध धैवताचा वापर पंडीत द्वय इतक्या प्रभावीपणे करीत होते की ते सुर थेट आत्म्यापर्यंत पोहोचत होते. डोळे मिटून त्या असीम आनंदाच्या सागरामधे सुरांची विविध मौक्तीके कानावर पडत होती आणि खूप खूप शांत वाटत होते. ही सारी सुरांची किमयाच असावी की झाडांवरील पक्षी देखील त्यांचे कुजन थांबवून जणू या दैवी सुरांचा आनंद घेत होते. साधारण एक तास भर भटीयार रागाच्या त्या सुरेल प्रवासामधे तो प्रवास अनंतत्वापर्यंतचा आहे की काय असे वाटू लागले होते. भटीयारच्या सुरांचा तो प्रवास थांबूच नये असे वाटत असतानाच.... तो थांबला. एखाद्या स्वप्नप्रदेशात सुरांच्या लाटांवर स्वार होऊन अलगद व हळुवारपणे आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था अनुभवल्यानंतर डोळे उघडले तेव्हा भटीयार रागाच्या त्या रम्य पहाटे पं. राजन व पं साजन मिश्र यांनी केलेला आविष्कार आनंदाश्रुच्या रुपाने डोळ्यामधून ओघळत होता. टाळ्याही वाजविण्याचे भान उरले नव्हते. मनातल्या मनात क्या बात है, क्या बात है हा घोष सुरु होता.... आनंदाच्या त्या परमोच्च बिंदुवर असतानाच मला माझ्या मागे बसलेल्या एका बुद्धीवान माणसाची काही वाक्ये ऐकायला मिळाली. ती वाक्ये मी व माझ्यासारख्या अनेकांना त्या भटीयार रागाच्या सुरावटीच्या पुर्णत्वाला लाभलेल्या आनंदक्षणांच्या विपरीत होती. निश्चितच ती वाक्ये एका बुद्धीवान, अभ्यासू व बारकाईने निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीची होती. त्या व्यक्तीच्या त्या अफाट बुद्धीमत्तेची त्या क्षणी मात्र मला कीव करावीशी वाटली. 
कोणत्याही बौद्धिक चिकीत्सेच्या पलीकडचे सुख प्राप्त झाल्यावर माझ्या कानावर वाक्ये पडली- राग तसा बरा गायलेत हे मंडळी, परंतू कोमल रीषभ दोन वेळा जरा चढाच लागला. अवरोहाची पद्धत देखील यांनी बदलविली. पारंपारीक पद्धतीने गायलेला भटीयार या माझ्या कानांमधे अजूनही ताजा आहे... या आजच्या भटीयारला त्याची सर नाही. मी ऐकतच होतो कान देऊन कुठे चुकतात ते... बरेच गायक नेहेमी ती चूक करतातच..अजून चांगला होऊ शकला असता राग...- मला एका बाजूने त्या व्यक्तीच्या निरीक्षण क्षमतेचे कौतुक वाटत होते परंतू दुसरीकडे हे जावविले की त्यांच्या आनंद घेण्याच्या प्रक्रीयेमधे मात्र मोठी तृटी राहून गेली होती. शास्त्रीय संगीताचे व्याकरण समजावे व त्याचा अभ्यास असावा ही बाब स्वागतार्ह जरी असली तरी त्या बुद्धीमत्तेच्या वापराने आपण कोणत्याही कलाकृतीचा आनंद न घेता विश्लेषण करुन त्यातील तृटी शोधत राहीलो तर मग ती बुद्धीमत्ता आपल्याला नकारात्मक बनविते आहे असे म्हणावे लागेल. कोणत्याही विषयातील बुद्धीमत्ता ही सर्वसमावेशक असायला हवी अन्यथा ती अफाट बुद्धीमत्ता ग्रहण केलेली व्यक्ती समाजापासून तुटायला लागते. माझ्या मागे बसलेल्या त्या बुद्धीवान व्यक्तीची नेमकी हीच समस्या असावी. त्या व्यक्तीला ती रम्य पहाट, ते दैवी वातावरण, तो पक्षांचा किलबिलाट, ती मनमोहक थंडी, पंडीत द्वयांची ती सुरेल सुरावट, कार्यक्रमाचे देखणे आयोजन, श्रोत्यांचा उत्स्फुर्त सहभाग व प्रतिसाद, या साऱ्या अद्वितीय बाबींकडे लक्ष न जाता केवळ दोन वेळा जरासा चढा लागलेला रीषभच दिसावा... ही नकारात्मकता नाही तर काय आहे? 
मानवाच्या विकासात्मक वाटचालीमधे त्याचा बौद्धिक विकास होणे हे प्रगतीचे लक्षण मानले जाते. परंतू मानव म्हणून जगत असताना त्याला आनंद देखील निर्माण करता आला पाहीजे व त्याचा आस्वाद देखील घेता यावा कारण त्यामुळेच त्याचे मानव असणे सिद्ध होते. परंतू बुद्धीमत्ता जर आनंदप्रक्रीयेमधील अवरोध बनत असेल व केवळ तर्काच्या आणि साचेबंद विचारचौकटींच्याच आधारे मुल्यमापन केले जाणार असेल तर मग माणसाच्या मनाचे यांत्रीकीकरण व्हायला वेळ लागणार नाही. बुद्धीमत्ता ही सर्वांना सामावून घेणारी व सर्वांचा स्विकार करायला लावणारी एक सकारात्मक उर्जा आहे. काही मंडळी मात्र त्याचा वापर स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी करतात व त्यामुळे ती बुद्धीमत्ता सकारात्मकता गमावणारी ठरते. निरपेक्ष बुद्धीमत्ता ही सदैव आनंदनिर्मीतीच्या प्रक्रीयेला पुरकच ठरेल हा प्रयत्न सर्वांकडूनच होणे अपेक्षित आहे. तो प्रयत्न केला की मग एखादी सुरांची रम्य पहाट अलौकीक आनंदक्षणांमधे परावर्तीत होऊ शकते...सुरांच्या जराश्या कमी अधिक लागण्यापलीकडे असलेला संगीताचा अनाहत नाद आपल्याला नादब्रह्माची ओळख पटवून देतो.... तेथे मात्र कोणताही तर्क किंवा चिकीत्सा नसते... असतो तो केवळ निखळ आणि स्वर्गीय आनंद!! 
 


Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.06.21

थोडा है थोडे की जरुरत है @ 10.12.19