My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरुरत है

बी.टी. सरांची आनंद व्याख्या
एखादा वक्ता श्रेष्ठ का असतो? या प्रश्नाची अनेक उत्तरे राहू शकतात. त्याच्या बोलण्याच्या शैलीमुळे, प्रभावी सादरीकरणामुळे, विषयाच्या मांडणीमुळे, अभ्यासपूर्ण विवेचनामुळे किंवा कधी कधी आक्रमकतेमुळे देखील वक्ते व्यासपीठ गाजवीत असतात. परंतू वक्ता खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ठरतो तो वेगवेगळ्या विषयावरील त्याच्या मुलभूत चिंतन प्रक्रीयेमुळे. नवा किंवा वेगळा विचार करण्याची क्षमता असलेला वक्ता आपल्या प्रदीर्घ चिंतनातून आपल्याला जे सांगतो ते केवळ बुद्धीसाठी नसते तर ते आपल्या ह्रदयापर्यंत पोहचून जीवनदर्शक तत्व देखील बनू शकते. सकारात्मक चिंतनाचे पाठबळ असले की श्रेष्ठ दर्जाचा वक्ता वेळेवर देखील फार सुरेख विवेचन करुन संबंधित विषयांचे नवनविन पैलू श्रोत्यांसमोर उलगडून दाखवित जातो व त्या शब्दामृताच्या सरींमधे आपण चींब भिजून तृप्त होतो. अश्याच प्रकारचे विवेचन नुकतेच ऐकण्याचा योग आला.. ते देखील वक्तादशसहस्त्रेषु प्रा. बी. टी. देशमुख सरांकडून..
निमित्त होते अमरावती येथील दै. हिंदुस्थान या वृत्तपत्र समुहाद्वारे काढण्यात आलेल्या दिवाळी अंकाच्या विमोचनाचे...दरवर्षी हा दिवाळी अंक विमोचन समारोह मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या वर्षी देखील नेहमीप्रमाणे आदरणीय प्रा. बी.टी. देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. बी.टी. सरांचे विवेचन हे श्रोत्यांसाठी एक सुरेख विचारपर्वणी असतेच, परंतू या वर्षी बी.टी. सर जे बोलले ते पर्वणीच्याही पलीकडे जाऊन एक सुरेख जीवनदर्शक मार्गदर्शन ठरले. प्रगाढ वाचन व प्रदीर्घ चिंतनाची बैठक लाभलेले बी.टी. सरच असा विचार मांडू शकतात हा विश्वास त्या विवेचनाच्या निमित्ताने दृढ झाला. दै. हिंदुस्थानच्या दिवाळी अंकाच्या लेखकांचे प्रतिनीधीत्व करताना मी माझ्या मनोगतातून सहजच एक मुद्दा उपस्थित केला. पुस्तक स्वरुपात दिवाळी अंक छापणे या बाबीपुढील वेगवेगळ्या आव्हानांचा मी उल्लेख केला ज्यात इलेक्ट्रॉनीक स्वरुपातील फेसबुक, ट्वीटर, व्हॉटस् अॅप इत्यादी बाबींचा समावेश होतो. परंतू त्यावर मात करुन दिवाळी अंक काढला जाणे ही एक मोठी बाब आहे व आता परत एकदा या अती वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनीक माध्यमांपासून कागदांच्या पुस्तकाकडे लोक वळतील असा विश्वास मी व्यक्त केला. माझ्या या बोलण्याचा उल्लेख करुन बी.टी. सरांनी प्रत्यक्ष स्वरुपातील अंक व इलेक्ट्रॉनीक स्वरुपातील अंक या दोन्ही रुपांबद्दल बोलणे सुरु केले. अध्यक्ष म्हणून जे बोलायचे ठरवून आलो होतो ते न बोलता आता याबाबतच बोलतो असे म्हणून सरांनी तो विषय मांडणे सुरु केले.. आणि त्यानंतर जवळपास अर्धा तास त्या सभागृहातील प्रत्येकाला सरांच्या रुपाने एका अत्यंत श्रेष्ठ वक्त्याचा रसाळ वाणीचा पुनःप्रत्यय आला. एरवी बी.टी. सरांना शैक्षणिक किंवा अनुशेषाच्या मुद्द्यांवर बऱ्याच लोकांनी ऐकले आहे परंतू प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या एका महत्वाच्या विषयावर सरांनी केलेले विवेचन ऐकून त्या दिवशी प्रत्येकाला विचारांना चिंतनाची जोड असल्यानंतर वक्त्याकडून काय दिव्यानुभूती मिळू शकते याचा परीचय झाला. अतिशय साध्या भाषेत परंतू मनाला भिडणाऱ्या शब्दांमधे बी.टी. सरांनी आनंदाची एक सुंदर परीभाषा मांडली. 
सुरुवातीला दिवाळी अंकाच्या दोन्ही रुपांबद्दल सांगताना सर म्हणाले, ही दोन्ही रुपे म्हणजे सगूण आणि निर्गूण रुपे आहेत. सगूण रुपाचाही आनंद आहे व निर्गूण रुपाचाही आनंद आहे - तूज सगुण म्हणो की निर्गूण रे, सगूण निर्गूण एक गोविंदू रे- या सारखा तो भाग आहे. मुळात या दोन्ही रुपाचा आनंद जर आपल्याला संजीवन ठरत असेल तर मग कोणतेही रुप नाकारण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण प्रत्येक माणसाच्या मनामधे आनंदाबद्दलची एक विशिष्ट व अनोखी पद्धत असते. साक्षर व विचारी असलेल्या प्रत्येक माणसाला दिवाळी अंकामधील लेखनाचा आनंद मिळू शकतो परंतू एखाद्या निरक्षर माणसाच्या हातात कितीही दर्जेदार साहित्य असलेला दिवाळी अंक दिला तरी देखील त्याला तो अंक आनंद देऊ शकणार नाही कारण त्याची आनंद चौकट वेगळी आहे. याचाच अर्थ आनंदाबद्दल आपल्याला फार ठळकपणे एक बाब सांगता येईल...असे सांगून सरांनी कायम लक्षात राहणारी आनंदाची ती परीभाषा सांगितली जी अद्याप माझ्या व सरांचे विवेचन ऐकलेल्या प्रत्येकाच्या मनात ताजी आहे. ती परीभाषा वर वर बघता सरळ, सोपी वाटते परंतू त्यामधील गर्भीतार्थ चिंतनानंतरच कळू शकतो व तो आपल्यासाठी चांगले जीवन व्यतीत करण्याकरीता पथदर्शक ठरतो.
बी.टी. सर बोलले, जीवनात आनंदी होण्याची प्रक्रीया प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या मनोभुमिकेनुसार व व्यक्तीमत्वानुसार परस्परभिन्न राहू शकते परंतू मिळालेल्या आनंदाची पुनरावृत्ती करण्याची इच्छा व सवय मात्र प्रत्येकाच्या बाबतीत कायमस्वरुपी असते. ही परीभाषा सरांचे भाषण ऐकून बरेच दिवस झाले तरीदेखील मनातच आहे. प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा असतो हे सांगताना सरांनी त्यांच्या तरुण वयात अनुभवलेला बालगंधर्वांचा एक प्रसंग सांगितला. अतिशय उतारवयात बालगंधर्व अमरावतीला आले असता त्यांना अक्षरशः दोन लोकांनी आधार देऊन मंचावर आणले होते. त्यांना एक नाट्यपद गाण्याचा आग्रह झाला..एका नाट्यपदाच्या तीन ओळी कश्याबश्या त्यांनी म्हणल्या..त्यातही एका ओळीमधे त्यांचा सुरेख सूर लागला तेव्हा त्या दोन क्षणासाठी त्या सभागृहातील काही लोकांच्या अंगावर रोमांच उभे राहीले व डोळ्यात अश्रू...हा अतीव आनंद त्याच लोकांना झाला ज्यांनी बालगंधर्वांचा सुवर्णकाळ बघितला होता व त्यांच्या दैवी आवाजात अनेक सुरेल पदे ऐकली होती. अश्या लोकांना त्या तीन ओळींच्या गायनामधूनही अपार आनंद प्राप्त होऊ शकला कारण या आधीही त्यांनी तो आनंद घेतलेला होता व आनंदाची पुनरावृत्ती करणे ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. ज्यांनी बालगंधर्वांची पदे जून्या काळी ऐकली नव्हती किंवा तो काळ बघता आला नव्हता त्यांना तो आनंद त्या प्रमाणात मिळू शकला नाही. आनंदाकडे इतक्या तटस्थपणे बी.टी. सरांनी सांगितलेल्या परीभाषेनुसारच बघता येते.
जीवनातील आनंदाकडे तटस्थपणे बघायला शिकविणारी ही आनंदाची परीभाषा आपल्याला बरेच काही शिकवून जाते. कारण बरेच वेळा समाजात आनंदाचे देखील दडपण निर्माण केले जाते किंवा आनंदांना देखील वेगवेगळ्या चौकटी लावल्या जातात. मुळात आनंद या भावनेला कोणत्याही चौकटीत बंदीस्त करता येत नाही. तो प्राप्त करण्याची प्रक्रीया ही कायमस्वरुपी आयुष्यासोबतच चालणारी समांतर प्रक्रीया आहे. जीवनात काय चांगले किंवा काय वाईट याबद्दलची आपली मते ज्याप्रमाणे तयार होतात त्याच प्रमाणे आनंदाबद्दलच्याही अपेक्षा किंवा विचार तयार होत जातात. त्यानुसारच प्रत्येक व्यक्ती जीवनात आनंदाच्या शोधात असते. समाजमुल्यांची मापदंडे बरेच वेळा आनंद प्रक्रीयेला जोडली जातात व त्यामुळे आनंदामधील स्वच्छंदीपण हरवून जाते. आनंदाचे निखळपण प्रत्येकाला जपता यावे, तसे शक्य झाल्यास मग नंतरच बी.टी. सरांनी सांगितल्याप्रमाणे सगुण व निर्गुणाचे गोविंदरुप आपल्याला कळू शकते. त्या दैवी व शाश्वत आनंदाची पुनरावृत्ती ही चिरंतन समाधानाचा स्रोत बनू शकते. 
या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने धनत्रयोदशीच्या शुभपर्वावर आदरणीय बी.टी. सरांकडून प्राप्त झालेली आनंदव्याख्या ती ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाचाच स्रोत ठरली व त्यांच्याच उक्तीनुसार सरांच्या अभ्यासपूर्ण व चिंतनशील विचारांना मनभरुन ऐकण्याच्या क्षणांची पुनरावृत्ती होण्याची आस मनाला लागून राहीली आहे...कारण आनंद प्राप्त करण्याच्या प्रक्रीयेची पुनरावृत्ती हीच चिरंतन बाब आहे असेच तर बी.टी.सर म्हणाले होते...
 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.06.21

थोडा है थोडे की जरुरत है @ 10.12.19