My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
दिवाळी
वायरलेस रेडीयोवरचा मेसेज सर्वजण ऐकत होते. रात्र झाली असली तरी देखील डोळ्यांना झोप नव्हती. मेसेज ऐकून त्यांना तर काय वाटत असावे याचा अंदाज अनेकांना येऊच शकत नाही. पण त्या समुहात मात्र धक्का किंवा दुःख याच्या पलीकडे निर्माण झालेला निर्विकारपणाच ठळकपणे प्रत्येक चेहेऱ्यावर दिसत होता. बोलण्याची इच्छा कुणाचीही होत नव्हती.. पण वायरलेस रेडीयो वरची बातमी त्यांच्यापैकी कुणालाही हादरवून वगैरे टाकत नव्हती.. रोजच तश्या बातम्या ऐकाव्या लागायच्या त्यामुळे मनात थोडेसे खट्...बस्स यापलीकडे काहीच नाही. बातमी होती- कल पुंछ सेक्टरमे पाकीस्तानी रेंजर्स द्वारा किये गये शेलींगमे सेना के दो जवान शहीद हो गये.. पाकिस्तान की तरफसे किये जाने वाले इन हरकतों का सेना की तरफ से मुँ तोड जवाब दिया जायेगा ऐसा ऐलान सरकार की तरफ से... मेजरने रेडीयो बंद केला.. करड्या आवाजात तो म्हणाला, बॉईज कल पुंछ मे अटॅक हुवा इसका मतलब आज शायद अपने रजौरीमे मुव्हमेंट हो सकती है, अल्टरनेट प्लान लग रहा है.. बी अलर्ट! डोन्ट टेक रीस्क अॅन्ड स्टे कनेक्टेड.. नो एक्स्ट्रा अॅडव्हेंचर.. गॉट इट? असा आदेश देऊन तो बंकरच्या दुसऱ्या बाजुला जाऊन बसला. रेडीयो वरील बातमीमुळे व मेजरच्या सुचनेमुळे बराच वेळ वातावरण तसेच राहीले. जरासे ताणलेले वातावरण निवळावे म्हणून त्या बटालीयन मधला सर्वात तरुण परंतू हरहुन्नरी असलेला किसन पाटील म्हणाला.. अरे यार, उद्या तर दिवाळी आहे ना! क्या बात है यार... गावाकडच्या दिवाळीची मजा काही औरच असते. आपल्याकडे तर पूर्ण पाच दिवसाची दिवाळी असते यार... सुभाषजी, तुमच्या मुंबईला असते काय दिवाळी पाच दिवसाची? नाही! सहजच विचारलं, तुम्हा मुंबईकरांना सारं काही थोडक्यात निपटवण्याची सवय असते. कसं जमते तुम्हाला काही कळत नाही. गणपती देखील दीड, अडीच दिवसाचा... आमच्याकडे तर गणपती बसायच्या आधी पाच दिवस आणि दहा दिवसांनी गणपती उठल्यावरही पाच दिवसापर्यंत आमच्यातला गणपती उतरतच नाही. तुमच्याकडे दिवाळीतही असाच असतो का हो शॉर्टकट?.... बंकरच्या बाहेर सिमेपलीकडून गोळीबारी होण्याचे आवाज येत होते. बंकरच्या बाजूने भारतीय सैन्याकडूनही त्या गोळीबाराचे प्रत्युत्तर दिले जात होते. बंकरमधील ही टीम इमर्जन्सी अटॅकसाठी सज्ज होती. सिमेवर जवळपास युद्धजन्य परिस्थितीच निर्माण झाली होती. देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जात असताना पाकीस्तानी फौजांना जास्तच चेव चढला होता. हल्ले फारच तीव्र झाले होते व भारतीय सेनेकडून चोख प्रत्यूत्तर देण्याचे आदेश होते त्यामुळे युद्धासारखीच स्थिती होती. वेगवेगळ्या हल्ल्यांमधे सिमेपलीकडील सैनिकांप्रमाणे रोज भारतीय सैनिक देखील शहीद होण्याचे प्रमाण वाढले होते. पुंछ व राजौरी या सेक्टरमधे तर जास्तच तीव्रता होती.. अश्या सर्व तणावपूर्ण वातावरणातही बंकरमधे दिवाळीच्या सणांबद्दल चर्चा रंगली होती...सकाळी लक्ष्मीपुजनाचा दिवस होता ना?
लान्स नायक किसन सांगू लागला.. दिवाळीची काय मजा असते राव आमच्या गावात. लक्ष्मीपुजनाचा दिवस म्हणजे तर अभ्यंगस्नानाचा. आमची आज्जी सर्वात पहिल्यांदा उठते. तिची शिस्त घरातील सर्वांना ठाऊक आहे. दिवाळीच्या दिवशी पहाटे तिने आवाज दिला की सर्वजण ताबडतोब उठणार. सर्वांचे ओवाळणे, खास आज्जीने स्वतः कष्टाने बनविलेले उटणे अंगाला लावणे, मग घरातील सर्वांच्या आंघोळी, माय माझी सर्वांची डोकी घासून देणार, त्यानंतर मग परत ओवाळण्याचा कार्यक्रम. लगेच आज्जीचे फर्मान...घरासमोर मस्त फटाके उडवा तोवर स्वयंपाक घरातील तयारी सुरु होते. दिवाळीच्या फाराळाचे बाकी पदार्थ आधीच तयार झालेले असतात परंतू गरम गरम चकल्या व अनारसे हा बेत असतो. मला छान कडक कडक जास्त तळलेले अनारसे आवडतात म्हणून माझी आई माझ्यासाठी तस्सेच तळते. सकाळी साधारण सात वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण मधल्या खोलीमधे एकत्र बसतात व बढीया दिवाळीचा फराळ करतात. त्या दिवसांची गंमतच और असते. गरम गरम चकल्या आई वाढत असते आणि गप्पांसोबत त्या किती खाल्ल्या जातात पत्ताच चालत नाही..त्या गरम चकल्यांची चव अजूनही जिभेवर.....संभालो!! बाजूने कुणीतरी मोठ्ठी आरोळी मारली... काय होतय हे कळलेच नाही..एक मोठ्ठा आवाज झाला...आणि लान्स नायक किसन व किसनची दिवाळीची गोष्ट ऐकणारे दहाही जण बंकरवर अचानकपणे पडलेल्या शेलींगच्या माऱ्यामधे गंभीर जखमी झाले. जवळपास एक हजार डीग्री तापमानाचा एक लोखंडाचा तुकडा वेगाने फिरत किसनच्या बरगड्यांमधे घुसला व त्याचा खांदा आणि फुफुसाचा डावा भाग त्या तुकड्याने चिरुनच टाकला.. भळाभळा रक्त वाहायला लागले..कुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत, कुणाचा हातच कापल्या गेला होता तर कुणाचा गळा... रक्तच रक्त सगळीकडे... अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काहीच करता आले नाही... रेस्क्यू टीम पोहोचली..भयानक शेलींग सुरु असतानाही या सर्व वीरांना उचलून बॅक अप टेन्टस् कडे नेण्यात आले.. चार जवान तेथे पोहोचेपर्यंतच मरण पावले.. लान्सनायक किसनच्या छातीवर त्या मीलीटरी डॉक्टरने एक कापसाचा मोठा बोळा दाबून धरला होता. रक्त थांबतच नव्हते. परंतू किसन जिवंत होता... मरणप्राय वेदना त्याला होत होत्या.. टेन्टमधे पोहोचल्यावर जे सुदैवाने जिवंत होते त्यांच्यावर त्वरीत उपचार सुरु झाले. किसनची जखम बघितल्यावर डॉक्टरच्या तोंडून सहजच निघून गेले.. ओ माय गॉड!!
तसेच म्हणण्याची स्थिती होती..१००० डीग्री तापमानाच्या त्या तुकड्याने किसनच्या डाव्या बाजूच्या फुफुसाचा जवळपास निम्मा भाग अक्षरशः कापून टाकला होता.. फुफुसाच्या आतून तो तुकडा पाठीच्या मणक्यापर्यंत शिरला होता व दुर्दैवाने तेथे रुतून बसला होता. डॉक्टरांच्या स्थितीची गंभीरता लक्षात आली. त्यांनी जुजबी ड्रेसींग केले व काही इंजेक्शन्स दिली परंतू लगेच मिलीटरी बेसला हेलीकॉप्टर तातडीने पाठविण्यासाठी वायरलेस फोन केला. युद्धभूमीवर जमेल तेवढे त्यांनी केले परंतू रक्तस्त्राव थांबत नव्हता.. काय करावे काही सुचेना.. आता एव्हाना उजाडायला लागले होते. किसन जवळपास बेशुद्धावस्थेत होता. डॉक्टर त्याचा हात धरुन बसले होते. इतक्या भयानक जखमेनंतरही जीवंत असलेल्या किसनला ते म्हणाले, किसन यू आर अ ब्रेव्ह सोल्जर.. कीप ऑन फायटींग... हेलीकॉप्टर्स वील बी रीचींग अॅट एनी टाईम... होल्ड ऑन..
सर्वांच्या आंघोळी आटोपून सारे जण मधल्या खोलीत फराळाला बसले होते..किसनच्या आवडीचे कडक कडक तळलेले अनारसे ताटलीत ठेवताना त्याच्या माऊलीचे नेहमीप्रमाणे डोळे पाणावले होते. किसन तिकडे असला तरी सण थोडेच थांबतो... तो साजरा होतोच.. फराळाचा आस्वाद सारेजण घेत होते पण किसनच्या आईच्या घश्याखाली घास उतरेना.. सिमेवर तणाव असल्याने काळजी वाटत होती. पण इतरांसाठी तिला सर्वांमधे सामील व्हावे लागत होते...डोळ्यातल्या अश्रुंना कसेबसे लपवून ती काहीतरी निमित्त काढून तेथून उठून गेली..
किसनला शुद्ध आली.. मरणप्राय वेदना पुन्हा सुरु झाल्या.. तरी देखील तो जरासा हसत डॉक्टरांना तो म्हणाला.. डॉक्टर... आज हमारे घरमे दिवाली होती है..और अभी सब लोग बढीया साथ मे खास दिवाली मे बनाऐं जाने वाला नास्ता कर रहे होंगे.. लेकीन मेरी माँ राह देख रही होगी... उसे कुछ खाया नही जायेगा...इस बार मै दिवाली के लिये जा नही पाया.. और अब शायद कभी जा भी नही पाऊंगा...डॉक्टरांचा हात त्याने घट्ट धरला... त्याला बोलविल्या जात नव्हते.. डॉक्टर त्याला आधार देत म्हणाले ..नो नो किसन, डोन्ट क्वीट... यु हॅव्ह टू फाईट, व्हेरी लिटील टाईम लेफ्ट फॉर हेलीकॉप्टर टू कम.. होल्ड ऑन..त्याचा हात थोपटत डॉक्टर अधीरतेने हेलीकॉप्टरची वाट बघू लागले....
आपल्या रोजच्या जीवनात असे अनेक दिवाळीचे सण साजरे करताना कधीतरी जमल्यास उजेडाची पणती लावताना किसनसारख्या जवानांची आठवण आपल्या मनात यायला हवी व आपले सण निर्धोकपणे साजरे होण्यासाठी त्यांनी केलेल्या व करीत असलेल्या बलीदानाची जाणीव कायम मनात ठेवावी.. त्याच बाबीमुळे आपले संवेदनशील भारतीयत्व सिद्ध होईल... व तीच खरी दिवाळी असेल.
Comments
Post a Comment