My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

सखी
त्या दिवशी वनात रात्री अधिकच गडद काळोख होता. दूरवर हिंस्त्र श्वापदांच्या ओरडण्याचाही आवाज येत होता. वनवासाच्या जीवनाची आता त्या सर्वांना सवय झाली होती. पाच शुर पतींची पत्नी असली तरी देखील तिचे मन रात्रीच्या वेळी त्या घनघोर अरण्यात बावरल्यागत व्हायचे. परंतू आज मात्र पांचाली शांतपणे झोपडीच्या बाहेर टीपूर चांदणे न्याहाळत होती. त्या भयावह अंधारातही आज ती संपूर्णपणे भयमुक्तपणे एका खांबाला टेकून बसली होती. आज तिच्या मनाला भयाचा किंवा नेहेमीच्या अनामिक हुरहुरीचा स्पर्शही नव्हता कारण तिच्या समोर दुसऱ्या खांबाला टेकून तिचा सखा, वासुदेव कृष्ण बसला होता. आज मुद्दाम पांडवांना भेटायला तो आला होता. आता मात्र त्याला ठाऊक होते की त्याच्या सखीला त्याच्याशी बोलायचे होते. धर्मराज, पार्थ व भीम झोपडीत पहुडले होते आणि नकुल व सहदेव दूरवर गस्त देत होते. सख्यासोबत काही वेळ त्या नीरव शांततेत बसल्यावर पांचालीने त्याला एक प्रश्न विचारला...वासुदेवा, माझ्या सख्या, काय हे भोग आमच्या नशीबात आलेत.. किती संकटे, किती अवहेलना, केवढी विटंबना, केवढा अपमान... हे सारे काही कल्पनातीत आहे..परंतू मी हे सारे सहन करु शकले कारण तू माझ्या सोबत होतास...खंबीरपणे. तू, माझा सखा म्हणून कायम माझ्या सन्मानार्थ माझे रक्षण करीत होतास. कसे रे कान्हा आपले नाते? हे नाते मला तुझ्याकडून समजून घ्यायचेय... सांग ना!!
रात्रीच्या त्या शांत प्रहरी घनगंभीर आवाजात कान्हा त्याच्या जीवलग सखीला त्यांच्या नात्याचे महात्म्य सांगू लागला...सखे, काय समजवायचे मी तुला या आपल्या नात्याबद्दल? जगावेगळे नाते आहे हे आपले. सखा-सखी. हे नाते पती पत्नीच्या, भावा बहिणीच्या किंवा मित्र मैत्रीणीच्याही नात्या पलीकडले आहे. सखा-सखी. या नात्याचा आधार आहे विश्वास व निस्सीम प्रेम. प्रेम जे निरपेक्ष नाही तर अपेक्षायुक्त जबाबदारीने भारलेले आहे. परंतू त्या अपेक्षा मनाशी निगडीत आहेत ज्याची पूर्तता करणे हे आपण दोघेही जीवनाचे सार्थक मानतो. असे असले तरीही या नात्यामधील तुझी भुमिका माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे....हे वाक्य ऐकल्यावर कृष्णाचा प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकणारी द्रौपदी क्षणात म्हणाली, असे कसे कान्हा? नाते जर दोघांचे आहे तर मग त्यामधे भुमिकांची तुलना कशी होऊ शकते. किंबहुना करायचीच झाली तर मला सखा म्हणून तू बजावित असलेली भूमिका जास्त श्रेष्ठ वाटते. माझ्यावर कोणतेही संकट आले तर तू त्या प्रसंगी हजर होतास, अपमान आणि विटंबनेने छीन्न झालेल्या माझ्या मनावर प्रेमाची व आस्थेची फुंकर घालायास तूच होतास, माझ्या वेगवेगळ्या अग्नीपरीक्षांच्या वेळी मला मदत करायला तूच होतास, इतकेच काय तर माझ्या स्रीत्वाच्या सन्मानार्थ देखील तूच माझा पाठीराखा बनलास. अपमानाचे शल्य बोचून माझे काळीज विदीर्ण होत असताना मला संयम बाळगणे शिकवायला तूच होतास. माझ्या अपमानाचा सूड घेण्याच्या विचारांचा आधार तूच होतास तर त्याचवेळी वनवासाच्या या काटेरी वाटेवर मनाला व शरीराला होणाऱ्या मी सहन करु शकेन यासाठी लागणारी सहनशक्ती माझ्यात निर्माण करणारा तूच होतास. माझ्या मनातील वेगवेगळ्या संभ्रमांच्या गुंत्यांना सोडविणारा तूच होतास व त्यानंतर लख्ख प्रकाशागत सारे काही स्पष्ट दाखविणारा तूच होतास. माझ्या जीवनातील अतीव दुःखाच्या प्रसंगी किंवा अत्याधिक आनंदाच्या क्षणी मला सर्वात प्रथम तूच आठवतोस. आतापर्यंत तूच होतास आणि पुढेही तूच राहणार आहेस. पुढेही तू राहणार आहेस हे केवळ बोलणे नाही तर तो माझा दुर्दम्य आत्मविश्वास आहे. तो केवळ विश्वास नाही तर ती माझी श्रद्धा आहे, माझ्या निस्सीम भक्तीचे नितांत खरे व पारदर्शी रुप आहे.... तेच तर मी म्हणतोय, सखे! द्रौपदीच्या बोलण्यातील शेवटच्या वाक्याचा धागा पकडीत कान्हा पुढे बोलू लागला..
...माझेही तेच म्हणणे आहे पांचाली. माझ्या असण्यावर जो तुझा अढळ विश्वास आहे त्यामुळेच आपल्या नात्यातील तुझा भूमिका जास्त मोठी व महत्वाची ठरते... द्रौपदीला अजूनही कृष्ण नेमके काय म्हणतोय हे कळले नव्हते. ती म्हणाली, कान्हा तुझ्या या वक्तव्याने नेहेमीप्रमाणे माझ्या मनाचा गोंधळ उडालाय. तुझ्या असण्यावर माझा अतूट विश्वास असणे यामुळे माझी भूमिका श्रेष्ठ कशी? तो विश्वास तुझ्या व्यक्तीत्वामुळे व प्रत्येक प्रसंगी तू माझा पाठीराखा झाल्यामुळे आहे. तुझ्यासारखा सखा असणे ही माझ्या जीवनाची सार्थकता आहे. हे सारे जे काही माझ्या मनात आहे व जे काही मी तुझ्या सहवासात अनुभवते तो सारा तुझ्या विभुतीमत्वाचा प्रभाव आहे व त्यामुळेच माझा सखा म्हणून तुझीच भुमिका सर्वश्रेष्ठ आहे.... पांचालीच्या या विद्वत्ताप्रचूर तर्काचे उत्तर वासुदेवाला, द्रौपदीच्या सख्याला द्यायचे होते.... त्या तर्काला कृष्णाने दिलेले उत्तर म्हणजे मनाच्या एकरुपतेमधून निर्माण होणाऱ्या नात्यांचा खरा अर्थ समजून घेण्याचे आदर्श परीमाण ठरेल असेच होते. एका अत्यंत जगावेगळ्या नात्याच्या अनोखेपणाची उकल करुन सांगताना कान्हा, त्याच्या नेहेमीच्या आश्वासक आवाजात द्रौपदीला सांगत होता...
सखे, ज्या विश्वासाने तू माझ्या तुझ्यासोबत असण्याची ग्वाही देतेस, तो विश्वासच तुला या नात्यामधे एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. मुळात कोणत्याही स्त्रीच्या मनोभुमिकेचा अभ्यास करता हे सर्वश्रुत आहे की तिचा लवकर कुणावरही विश्वास बसत नाही. अतिभावनीक असे स्त्रीच्या मनोभुमिकेचे वर्णन केल्या जात असले तरी समर्पित भावनेने विश्वास टाकताना मात्र ती सर्वार्थाने प्रत्येक बाब तपासूनच विश्वास टाकते. कारण मुळात एखाद्या स्त्रीचा खरा विश्वास म्हणजे सतीचं लेणं असते. तिच्या तेजोमय सत्वाचे ते प्रतिक असते. त्यामुळेच वरकरणी भावनिक वाटणारी स्त्री फार कमी लोकांना तिच्या जीवनात विश्वासपात्र मानते कारण एकदा तिच्या सत्वाने उर्जित झालेला विश्वास बसला की ती मनाने समर्पित होते. अशी निरातीशय समर्पणाची भावना केवळ एका स्त्रीच्याच ठायी राहू शकते. त्यामुळे ज्या समर्पित भावनेने तू माझ्यावर विश्वास टाकलास त्या भावनेमुळे माझी योग्यता वाढलेली आहे. मग ज्याची योग्यता वाढते तो श्रेष्ठ की जो योग्यता वाढवितो तो श्रेष्ठ? तू म्हणालीस त्या प्रमाणे तुझा सखा म्हणून तुझ्या चेहेऱ्यावर कायम हास्य विलसित ठेवणे, तुझ्या मनावर होणाऱ्या आघातांच्यावेळी त्या आघातांना सहन करण्याचे बळ तुला देणे किंवा तुझ्या प्रतिष्ठेसाठी व सन्मानासाठी जगाशी संघर्ष करणे हे सारे मी केले असेलही कदाचित...परंतू ते सारे करण्याचे बळ मला प्राप्त होते तू माझ्यावर टाकलेल्या समर्पित विश्वासामुळे. तुझ्यासारख्या तेजस्वी सतीचा विश्वास संपादन करण्याने माझी योग्यता सिद्ध होते नव्हे माझ्यातील मानवी चेतनेचा तो सर्वात मोठा सन्मान असतो. त्या विश्वासामुळेच तुझा अपमान होत असताना, तुझ्या सतीत्वाची विटंबना होत असताना तुझ्या ह्रुदयातून आर्त हाक केवळ कान्हाच्याच नावाची निघते ही कान्हाची नसून तुझ्या विश्वासाची योग्यता आहे. तुझ्या जीवनातील दुःखातिरेकाच्यावेळी किंवा अत्यानंदाच्या क्षणी तुला सर्वात प्रथम जर माझे स्मरण होत असेल तर, सखे...तो सखा म्हणून माझी योग्यता सिद्ध करणारा क्षण असतो...परंतू तो येऊ शकतो तुझ्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यात तू समर्थपणे जोपासलेल्या माझ्यावरील विश्वासामुळे. हा विश्वास तुझ्यासारखी सत्वशील स्त्री आपल्या मनात मुद्दाम निर्माण करीत नाही तर तिच्या सत्वतेजामुळे तो प्रगट होतो व त्याच्याच अस्तित्वामुळे तू सखी होऊ शकतेस... तुझ्या सखी होण्याने मी सखा होतो..म्हणूनच आपल्या या अनोख्या नात्यात तुझी योग्यता माझ्यापेक्षा जास्त आहे!!.... तुला सर्वजण पांचाली म्हणतात व मला मात्र कृष्णसखा... माझ्या नावाला सखा जोडून तो श्रेष्ठ दर्जा लोक मला प्रदान करतात परंतू ज्या सखीमुळे सखा असण्याला अर्थ आहे त्या तुझ्या नावाला सखी जोडत नाहीत...म्हणूनच मला जगमान्य सखा बनवून स्वतः मात्र अनामिक राहणारी तू, माझी सखीच श्रेष्ठ आहे...
गडद काळोख्या अंधारात कान्हाचे हे शब्द ऐकून पांचाली काहीही बोलली नाही...एक अद्वितीय नाते जगायला मिळण्याची कृतार्थता तिच्या डोळ्यावाटे आनंदाश्रु बनून वाहायला लागली...त्या आनंदाश्रुंचे मोल केवळ एका व्यक्तीला ठाऊक होते... सखीच्या सख्याला!!
 

Comments

  1. Stricha khara vishwas mhanje satich lena asat.khup chan !

    ReplyDelete
  2. येथे पांचाली मी व सखा तू आहेस. जय जय कान्हा

    ReplyDelete
  3. प्रत्येक ठीकानी धावून यायचे बरे

    ReplyDelete
  4. प्रत्येक ठीकानी धावून यायचे बरे

    ReplyDelete
  5. प्रत्येक ठीकानी धावून यायचे बरे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18