My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

आई वडीलांचे छत्र
माझा मित्र विनय व त्याची पत्नी खिन्नपणे बसले होते. फार वाईट वाटले होते त्यांना. मनाला वेदना झाल्यावर त्या कुणाजवळ बोलल्या की दुःख कमी होते म्हणून त्यांनी मला घडलेली घटना विषद केली. अर्थात ते सर्व सांगितल्यावर मी त्यावर काही उपाययोजना करावी, मुलांचे समुपदेशन करावे अशी देखील त्यांची अपेक्षा होती. घडलेला प्रकार मनाला व्यथित करणारा होताच परंतू त्याहीपेक्षा मला तो विचार करायला लावणारा प्रसंग वाटला. काही घटना या घडतात व आपण त्याबाबत बरेचवेळा दुःख किंवा आनंद व्यक्त करुन पुढे मार्गक्रमण करतो. परंतू प्रत्येकवेळी असे करु नये. काही घटनांचे विशेष संदर्भ असतात व त्याबाबत जरासा विचार केला तर आणि विशेषतः प्रसंग वेदनादायी असेल तर त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न देखील करता येऊ शकतात. त्यासाठी वागण्यातले काही बदल, वातावरणात काही सुधारणा केल्यास आपल्याला अपेक्षित असे घडण्याची शक्यता असते. म्हणूनच विनय व वहिनींनी सांगितलेला प्रसंग मला विचार करायला लावणारा वाटला. गोष्ट तशी साधी व नेहमीचीच होती. त्यातल्या त्यात वहिनींना जरा जास्त वाईट वाटले होते. त्या प्रसंगामुळे संस्कारांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यागत त्यांना वाटायला लागले होते. खिन्नपणे त्या म्हणाल्या...
"अविभावोजी, काल माझ्या मुलांचे बोलणे ऐकल्यावर असे वाटू लागले की आपण मुलांसाठी अक्षरशः रक्ताचे पाणी करतोय, त्यांना हव्या त्या सुख सुविधा देतोय, आपल्याला जे जे मिळाले नाही ते सर्व त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय परंतू त्याचे फळ मात्र आपल्याला मुलांच्या चुकीच्या पद्धतीने वागण्यातूनच मिळावे हे काही समजत नाही. आपण कुठे कमी पडलो हेच मला कळेनासे झालेय. बारावी आणि नववीत असलेली ही पोरे अपमानजनक बोलतात आणि काहीही म्हणले तर त्याचा चूकीचाच अर्थ काढतात. सायली तर बारावीला आहे म्हणजे ती केवळ आमचीच जबाबदारी आहे असे वागते. मी तिच्या अभ्यासाच्या, कॉलेजच्या, ट्युशन्सच्या सर्व वेळा पाळते. तिला घरातील कोणतेही काम सांगत नाही. इतकेच काय परंतू तिचे बारावीचे वर्ष आहे म्हणून संधी मिळूनही व माझी तीव्र इच्छा असूनही मी नोकरी देखील केली नाही. इतके सारे करुनही काल एका छोट्याश्या गोष्टीवर मी सायलीला विरोध केला तर मला ती अपमानास्पद बोलली व माझ्यावरचा राग म्हणून काहीही न खाता दिवसभर राहीली. शेवटी मलाच तिची काळजी वाटली म्हणून मी तिला सॉरी म्हणले, तेव्हा कुठे ती जेवली. या प्रसंगानंतर ती शांतपणे झोपली पण मी मात्र रात्रभर तळमळत होती. पालक म्हणून संपूर्ण जबाबदारी पार पाडत असताना हे नशिबी यावे, आपल्या मुलीने आपला अपमान करावा.. हे कसे भावोजी?... पुढे वहिनी बोलू शकल्या नाही.. विनय म्हणाला, यार, जवळपास असाच प्रकार आमच्या पोराचा देखील आहे. तो पण असाच उद्धटपणे बोलतो आणि काही जास्त म्हणले तर घरातून निघून जाईन अश्या धमक्या देतो. भिती वाटते यार, एखाद्या दिवशी असे काही चुकून करुन बसला तर... काही सुचत नाहीये. तूच काहीतरी मार्ग काढ. 
समस्या गंभीर परंतू सध्याच्या काळात अनेक पालकांना भेडसावणारी आहे. मुलांच्या वागण्याच्या तऱ्हांपुढे हतबल झालेले अनेक पालक मला भेटतात. किंबहुना माझ्या 'पालक कार्यशाळेत' तर ७० टक्के पालक याच समस्येने त्रस्त दिसतात. मुळात मुलांना आई वडीलांच्या छत्राची किंमत पटवून देणे गरजेचे आहे आणि ती किंमत पटविण्यासाठी काही बाबी तंत्रशुद्ध पद्धतीने कराव्या लागतात. आई-वडील या अंतर्गत स्रोतासोबतच समुपदेशनासारखे बाह्य परंतू परीणामकारक स्रोत देखील वापरावे लागतात. एकंदरीतच पालकत्व हे नव्या काळात आव्हानच आहे. परंतू याचे शास्त्रशुद्ध नियोजन केल्यास हे आव्हान आनंदाने पेलता येते व आनंदमयी जीवन जगता येते. माझा मित्र व वहिनी यांना कार्यशाळेमधे मी आवश्यक त्या बाबी सांगितल्याच परंतू मी त्या परीवाराशी संबंधित असल्याने त्या दोन्ही मुलांशी बोलायला त्यांच्या घरी गेलो.
समस्या होतीच. कारण गेले काही वर्षे या मुलांच्या पौगंडावस्थेतील प्रवेशाच्या वेळीच त्यांच्या पालकांची भूमिका चुकलेली होती. अर्थात त्यांनी देखील ती बाब जाणून बुजून केली नव्हती, त्यांना ती बाब ठाऊकच नव्हती. पौगंडावस्थेमधे मुला मुलींच्या शरीरात व सोबतच मनात होणाऱ्या विलक्षण चमत्कारिक बदलांना समजून घेणे अनेक पालकांना जमत नाही हा त्यातीलच प्रकार होता. त्या मुलांना मी अनेक बाबी सांगितल्या व त्याद्वारे त्यांना आई वडीलांच्या छत्राची किंमत समजाविली. माझ्या परीचयातील एका काकुंची गोष्ट मात्र मी जेव्हा त्यांना सांगितली, तेव्हा ती पोरे हेलावून गेली.. त्यांना आई वडील असणे किती महत्वाचे आहे हे कळले...
मित्रांनो...मी सांगू लागलो...एकदा माझ्या एका मित्राची आई काही आजारामुळे दवाखान्यात भरती होती. मी त्या काकुंना भेटायला गेलो. काकू जाग्या होत्या. त्यांच्याशी थोडावेळ गप्पा केल्या. तेवढ्यात माझ्या मित्राला काही कामानिमीत्त बाहेर जायचे होते म्हणून त्याने मला काकुंजवळ थांबण्याची विनंती केली. मला अन्य काही विशेष काम नसल्याने मी काकुंजवळ थांबलो. काही वेळाने काकूंना झोपायचे असल्याने मी त्यांना पांघरुण घालून दिले व वाचन करीत बसलो. मधेच माझे काकुंकडे लक्ष गेले तर एक विलक्षण गोष्ट माझ्या ध्यानात आली. काकू झोपताना स्वतःच्या हाताने आपला दंड व खांदा थोपटून घेत होत्या. मला सुरुवातीला वाटले की त्यांना दुखत असावे म्हणून त्या तसे करीत असाव्यात. त्यांची विचारणा करण्यासाठी मी उठून त्यांच्याजवळ गेलो तर काकू शांतपणे झोपल्या होत्या परंतू त्यांच्या हाताचे थोपटणे मात्र सुरु होते. झोप लागली असल्याने मी त्यांना डीस्टर्ब केले नाही. पुढे साधारण दहा मिनीटे त्या दंडावर व खांद्यावर स्वतःच्याच हाताने थोपटत राहील्या. नंतर मात्र थोपटण्याचा वेग कमी झाला व अर्धा तासाने त्या गाढ झोपल्या. मला त्या गोष्टीचे फारच आश्चर्य वाटले. साधारण एक तासाने माझा मित्र परत आला. काकू झोपल्याच होत्या. आम्ही खोलीच्या बाहेर आलो त्यावेळी मी त्याला काकुंच्या त्या स्वतःला थोपटून घेण्याच्या प्रकाराबद्दल विचारले. तुझ्या लक्षात आले का? असे म्हणून त्याने मला त्या बाबीबद्दल सांगितले. त्यांने सांगितलेली बाब छोटीशी होती परंतू ती ऐकताच माझ्या अंगावर शहारा आला. असेही घडू शकते? ती गोष्ट ऐकल्यावर माणसाचे जीवन किती वैविध्यपूर्ण भावविश्वांनी व्यापलेले आहे याचा प्रत्यय आला. माझा मित्र म्हणाला... यार, माझ्या आईचे आई-वडील दोघेही एकाचवेळी देवाघरी गेले आणि त्यावेळी माझी आई केवळ पाच वर्षांची होती. आई वडीलांचे छत्र हरविलेली ती छोटीशी पोर मामाकडे रहायला गेली. मामाकडे मामी फार कजाग होती त्यामुळे या चिमुरडीला खूप त्रास होता. तिला झोप येईना कारण आईची आठवण यायची. ती मामीला म्हणायची, मामी मला जवळ घे, मला थोपट. मला तशी झोप येत नाही. मामी जोरात खेकसली, जास्त नखरे नाही करायचे. हे तुझे लाड मी खपवून घेणार नाही. इतकी तुला आईची आठवण येते तर स्वतःच थोपटून घे स्वतःला.... निमूटपणे त्या पाच वर्षांच्या पोरटीने स्वतःच्या खांद्यावर व दंडावर थोपटणे सुरु केले.. स्वतःच्या हाताला देवाघरी गेलेल्या आईचा हात समजून... तेव्हापासूनची सवय आजतागायत सुरु आहे...ती गोष्ट ऐकून माझे डोळे पाणावले.. निघण्यापूर्वी त्या माऊलीला एकदा बघावे म्हणून खोलीत गेलो तर... कदाचित झोप चाळवल्यामुळे तिचे पुन्हा स्वतःच्या दंडावर थोपटणे सुरु झाले होते... 
आई वडीलांचे छत्र हरविले तर काय होते हे ऐकल्यावर माझ्या समोरची ती दोन पोरे रडवेली झाली. तेवढ्यात समुपदेशनादरम्यान मुद्दाम बाहेर निघून गेलेले त्यांचे आई-बाबा घरी आले. त्यांना बघितल्यावर ही दोन्ही पोरे धावत जाऊन त्यांना बिलगली आणि रडू लागली. विनय व वहिनींना कळेच ना.. काय झालेय ते... त्यांच्या प्रश्नार्थक नजरांना मी एकच उत्तर दिले..एक छान सुरुवात झाली आहे..
 


Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18