My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
ह्युमनोटोपीया
रविवारच्या दिवशी मी जरा दुपारी आराम करायचा ठरविला असतानाच आमचा चिरंजीव देवांग त्याच्यासोबत मी एक सिनेमा बघावा असा हट्ट करायला लागला. मी सुरुवातीला जरा उत्सुक नव्हतो. पण त्याच्या एका वाक्याने मला तो चित्रपट बघण्याची इच्छा झाली. मला त्याच्यासोबत चित्रपट बघण्याचा हट्ट करताना तो म्हणाला, बाबा! हा सिनेमा तुम्हालाही बघण्यासारखा आहे! या वाक्यावर मी चमकलो. मला बघण्यासारखा म्हणजे मोठ्यांना बघण्याचे चित्रपट कसे असतात हे तो समजतो आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमके काय आहे ते बघायलाच हवे म्हणून मी चित्रपट बघायला बसलो. डीस्ने कंपनीचा चित्रपट होता व नाव देखील जरा वेगळे होते.. झुटोपीया. काय असेल या चित्रपटात याचा विचार करीत मी चित्रपट बघणे सुरु केले. देवांगने तो आधी एकदा बघितलेला असल्याने कोणत्या ठिकाणी काय विशेष आहे याबद्दलचे त्याचे समालोचन सुरु होते. सुरुवातीला जरा निरुत्साहानेच बसलेलो मी नकळत त्या चित्रपटात गुंतलो व चित्रपट संपला तेव्हा एक नितातं सुंदर चित्रपट बघितल्याचा आनंद प्राप्त झाला. चित्रपटाच्या नावाला सार्थ ठरविणारा एक अत्यंत कल्पक विचार यात मांडला होता. झुटोपीया म्हणजे झू (प्राणीसंग्रहालय) आणि युटोपीया (आदर्श प्रदेश).
अत्यंत कल्पक असा विषय मांडणाऱ्या या चित्रपटात एक गाव असतं.. झुटोपीया. ते अतिशय आदर्श गाव असतं. आदर्श असे की या गावात सारी जनावरे जसे तृणभक्षी, हिंस्त्र, रानटी, पाळीव पद्धतीची, मवाळ, पक्षी सारे सारे गुण्यागोविंद्याने नांदत असतात. गुण्यागोविंद्याने म्हणजे येथे रानटी प्राण्यांनी आपला हिंस्त्रपणा संपूर्णपणे सोडलेला असतो व ते तृणभक्षी व पक्ष्यांसोबत प्रेमाने रहात असतात. त्यामुळेच हा एक चमत्कार किंवा आदर्शाचा कळस बनलेला असतो व म्हणूनच त्या गावाचे नाव असते झुटोपीया. भांडणे नाही, वादावादी नाही सारे कसे छान छान. अश्या या सुंदर व स्वप्नवत शहरात एक छोटीशी बनी पोलीस अधिकारी म्हणून रुजू होते. सारेच चांगले असल्याने तिला फार कामे नसतातच. तिची नोकरी मज्जेत सुरु असते. परंतू काही लोकांना या गावाचे हे सुख बघवत नाही. काही जनावरांमधेही माणसासारखी लोभी वृत्ती निर्माण होते व स्वतः वरचढ होण्याची क्रूर प्रवृत्ती असलेले काही लोक या झुटोपीयात देखील असतात. ज्या रानटी जनावरांनी आपला हिंस्त्रपणा सोडलेला आहे त्यांच्या मनात तो काही विशिष्ट प्रयोगांद्वारे परत निर्माण करण्याचा कुटील डाव ते रचतात. तसे करुन त्या जनावरांच्या आधारे सर्वांवर अधिपत्य गाजविण्याचा डाव त्यांचा असतो. परंतू छोटीशी बनी व तिचा मित्र एक लांडगा मिळून तो डाव हाणून पाडतात व परत एकदा झुटोपीयाचा आदर्श अबाधित राहतो. हे सारे दाखविताना अतिशय कल्पकतेने सादरीकरण केलेले आहे. या चित्रपटातील चांगला विचार हे मोठ्यांनी चित्रपट बघण्याचे प्रमाण असे माझ्या छोट्याश्या मुलाला म्हणायचे आहे हे कळल्यावर मला समाधान लाभले. चित्रपट संपता संपताच मुलांसोबत याच सारख्या विषयावर एक कल्पना मला सुचली. मी दोन्ही मुलांना बोलाविले व चर्चा सुरु केली. मी त्यांना विचारले की आपण कल्पना करुयात की या चित्रपटातील प्राण्याच्या जागी माणसे असती तर? त्या चित्रपटाचे नाव काय राहीले असते या मुद्द्यापासून रंगतदार चर्चा सुरु झाली. चर्चेअंती चित्रपटाचे नाव आम्ही ठरविले.. ह्युमनोटोपीया!!
नवा चित्रपट बनविण्याची आमची प्रक्रीया सुरु झाली. या चित्रपटाचीही कथा त्याच चित्रपटाप्रमाणे ठेवण्याचे ठरले. ह्युमन म्हणजे मानव आणि युटोपीया म्हणजे आदर्श प्रदेश. मानवांचा आदर्श प्रदेश. मुद्दा क्रमांक १: सर्वांनी गुण्यागोविंद्याने रहायचे. म्हणजे काय करायचे? तर आपल्या देशात वावरत असताना कुणीही एकमेकांच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख करुन एकमेकांवर चिखलफेक करायची नाही किंवा एकमेकांना कमी किंवा जास्त दर्जाचे समजायचे नाही. सर्वांचा दर्जा समान रहायला हवा. पोरांना हे सांगितल्यावर त्यांचे चेहेरे पडले. माझा सहाव्या वर्गातील पोरगा म्हणाला, बाबा हे फार कठीण आहे असे नाही का वाटत? मी म्हणालो का कठीण आहे? आपण असेच वागुया! नाही जमत बाबा, तो म्हणाला. आमच्या वर्गात सुद्धा काही पोरे काही जणांना तुझी जात खराब आहे असे म्हणत होते. सरांनी जेव्हा ऐकले तेव्हा खूप मार पडला...पण ते बोलत होते बाबा..खरोखरीच किती कठीण आहे! सहाव्या वर्गातील मुलांना देखील आपण जातीची व धर्माची लेबले चिटकवितोय..माणसे घडविण्याच्या प्रक्रीयेमधे हा किती मोठा अडसर आहे आणि यामुळे आपल्या देशाच्या विकासाला खिळ बसते आहे हे कळण्याइतपत देखील समज या नव्या काळात आपल्याला येऊ नये याचे मलाच वाईट वाटू लागले...पण तो विचार झटकून मी मुलांना म्हणालो... ते जाऊ द्या आपण बनवित असलेल्या ह्युमनोटोपीया या चित्रपटात लोक तसे वागणार नाहीत.. पुढील मुद्द्याकडे वळूयात..
मुद्दा क्रमांक २: सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे. प्रत्येकामधील हिंस्त्र प्रवृत्ती दूर करावी व सर्वांनी एकमेकांशी प्रेमपूर्वक व सौहार्द पद्धतीनेच वागायचे. कुणीही कुणावर अत्याचार करायचा नाही. कुणीही कुणाला दुखवायचे नाही..इतकेच काय पण हिंसाचाराचा विचारही करायचा नाही..झुटोपीयामधे प्राणी असे करु शकतात मग आपल्याला तर दाखविताच येईल, कारण आपण तर ह्युमनोटोपीया बनवतोय..अत्यंत आनंदात मी आमच्या आनंद प्रोजेक्टचा पुढचा मुद्दा सांगितला...पोरांचे चेहेरे अजून पडले. अरे काय झाले..चिअर अप...काहीतरी जोडा या विचारात..असे काय बसलात? पोरगी म्हणाली, बाबा हे तर त्याहून कठीण आहे. आजच मी वर्तमानपत्रात वाचले की एका अत्यंत क्रूर आतंकवादी संघटनेच्या लोकांनी चाळीस लहान मुलांना बंदुकीचे टारगेट बनवून त्यांच्या एकेका अवयवावर गोळ्या झाडल्या..प्रत्येक लहान लहान मुलांच्या शरीरावर साधारण वीस गोळ्या मारुन मग त्याला शेवटची गोळी डोक्यात घालून ठार मारले. त्या आतंकवादी सेनेमधे सामील झालेल्या नव्या सैनिकांना नेमबाजीचा सराव देण्यासाठी या मुलांना टारगेट म्हणून वापरण्यात आले असे लिहीले आहे.. याच लोकांनी काही दिवसांपूर्वी रेडा कापतात तश्या प्रकारे एका बंधक सैनिकाला अर्धा तास पर्यंत थोडी थोडी मान कापून मारले... मी नखशिखांत हादरलो.. हे काय सांगतेस तू मला? मी माझ्या लेकीवर जवळपास ओरडलोच.. ती जरा बावरून म्हणाली, बाबा तुम्हीच तर मला रोजचे इंग्रजी वृत्तपत्र वाचून अपडेट रहायला सांगितले आहे. या बातम्या जगाच्या बातम्या देणाऱ्या पेजवर नेहेमीच येतात. या तर मी दोनच सांगितल्या... या लोकांसोबत आपण ह्युमनोटोपीया कसा बनवायचा? त्या प्रश्नाचे उत्तर मला देणे जमले नाही... मी परत त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे बाजूला सारुन सकारात्मक मुद्दा विचारार्थ घेण्यास सांगितला..
मुद्दा क्रमांक ३: आपल्या ह्युमनोटोपीया या चित्रपटात सर्वांनी आपल्यासोबतच इतरांचाही संवेदनापूर्ण पद्धतीनेच व सर्वांचाच विचार करायचा जेणे करुन कुणावरही अन्याय होणार नाही. सर्वांना समान वागणूक मिळेल...आता मात्र पोरांनी काहीतरी चांगले जोडावे असे मला वाटत होते.. दोघेही हसत म्हणाले, बाबा दुसऱ्यांना मदत करणारे अनेक लोक आम्हाला माहीत आहेत. मला आनंद झाला.. चला काहीतरी सकारात्मक बोलली पोरे... मी त्यांना विचारले कोण कोण सांगा.. त्यांना घेऊयात चित्रपटात.. पोरगा म्हणाला.. बाबा आमच्या क्लासमधील काही पोरे म्हणत होती की त्यांचे बाबा सध्या रोज बँकेत जातात.. लोकांची मदत करायला.. ते म्हणे अनेकांचे पैसे बदलवून आणून देतात.. त्यासाठी रोज वेगवेगळ्या बँकांच्या रांगांमधे लागतात आणि लोकांची मदत करतात..आपण त्यांना घेऊ आपल्या सिनेमात...
ह्युमनोटोपीया चित्रपट बनविण्यासाठी लागणारे अनेक मुद्दे झुटोपीया चित्रपट पाहून माझ्या मनात आले होते परंतू मुलांना ते पुढील मुद्दे मी सांगितले नाहीत... माझ्या मुलांना सकारात्मकता शिकविण्याचा आटोकाट प्रयत्न प्रत्येक क्षणाला करुनही त्यांच्या आजूबाजूचे जग त्यांना या असल्याच गोष्टी जास्त प्रमाणात दाखवितेय. या गर्दीत मग एखादे प्रकाश आमटे, एखादे शंकरबाबा पापळकर किंवा एखादे अभय बंग यांच्यासारखे दिवे मिणमिणत असतात. आपल्या समाजाला ह्युमनोटोपीया मधे परावर्तीत करण्यासाठी या दिव्यांचे केवळ कौतुक करुन भागणार नाही तर त्या प्रत्येक दिव्याची तेजस्वी ज्योत आपल्यापैकी प्रत्येक विचारी माणसाच्या मनात तेवत ठेवून तातडीने प्रवास सुरु करावा लागेल-- ह्युमनोटोपीया कडे..
Very nice concept. Let us take oath that from today we ourself will try to be a one member for humanotopia. I am very sure and confident that one day we, teachers community people will certainly bring into existance humanotopia, cosmic erergy will bless us for this cause. Let us believe it.
ReplyDelete