My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

दिवाळीची विशेष आवरासावर
या दिवाळीच्या निमित्ताने कोणतेही कार्यक्रम ठरवू नका, मला घराच्या आवरासावरीसाठी मदत हवी आहे असा आदेश मला गृहखात्याकडून प्राप्त झाला व त्यामुळे त्या आदेशाबरहुकूम मी कामावर हजर झालो. एरवी इतरांना कामे सांगून व्यवस्था चालविणे हेच माझे काम असले तरीदेखील या हुकुमासमोर मला माझा नेहेमीचा पवित्रा सोडून भव्य आवरासावर करण्यासाठी सज्ज व्हावे लागले. या असल्या आवरासावरीचे प्रकार सध्या दिवाळीनिमीत्त सर्वच घरांमधून सुरु आहेत. हे काम फारच वेगळ्या प्रकारचे असते. ही कामे करण्याचे कॉपीराईट गृहखात्याकडे असतात. त्यांच्या काही पद्धती वर्षानु वर्षे किंवा पिढ्यान पिढ्या ठरलेल्या असतात. या खास पद्धती खास करुन महिलांच्याच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत केलेल्या असतात. त्याच पद्धतींनुसार आपल्याला ती कामे करावी लागतात. कामकरी वर्गांचे अधिकार देखील पुरुषांच्या पिढ्या हस्तांतरीत करीत असतात. त्यामधे आपण आपल्या विचारानुसार विचार किंवा सल्ले द्यायचे नसतात. निमूटपणे आज्ञांचे पालन करावयाचे असते. उदाहरणच द्यायचे झाले तर अस्मादिकांचेच देता येईल. प्राचार्य म्हणून एखाद्या महाविद्यालयाचे संचालन करणाऱ्या व्यक्तीलाही या आवरासावरीबद्दल काहीही कळत नसते व त्या व्यक्तीलाही कोणताही सल्ला देता येत नाही. दिवाळीच्यावेळी केल्या जाणाऱ्या आवरासावरीचे आणखी एक वेगळे वैशिष्ट्य असते. हे काम सुरु करण्याचा अजेंडा मुळात ठरलेला असतो. तो म्हणजे यावर्षी जास्तीचे सारे सामान बाजूला काढून फेकून द्यायचे व स्पेस निर्माण करायची. जुने सामान फार साचले आहे त्यामुळे या वर्षी हे महत्वाचे काम करायचे. मग तो प्रत्यक्ष आवरासावरीचा दिवस उजाडतो. 
सकाळपासूनच लगबगच सुरु होते. लॅपवरचे सामान खाली काढण्यामधे महत्वाचा रोल करावा लागतो. सामान खाली काढल्यावर जुन्या सामानाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने त्या सामानाची तपासणी करणे सुरु होते. एकेका वस्तूचे मुल्य व उपयोगीता चर्चीली जाते. यामधे खूप सारे साठवून ठेवलेले डबाभर खिळे, जुन्या इलेक्ट्रीक फीटींगच्या कामांमधे उरलेली वायर व काही जुनी बटणे, लोखंडी पाईप किंवा त्याचे तुकडे ठेवलेली एक ॲल्युमिनीयमची पेटी, जुन्या वाकलेल्या हँगर्स, खूप सारे जुने कपडे, शिवण्याच्या पलीकडे गेलेल्या चपला, जुन्या सोफासेटमधून निघालेले फोम, मुलांच्या प्रोजेक्टमधून उरलेल्या थर्माकोलच्या शिट्स, शाई वाळून गेले अनेक स्केचपेन्स, जुन्या वह्यांमधून काढून ठेवलेले वेगवेगळ्या आकारांचे कागद, एखादा संपुर्णपणे खराब झालेला रेडीयो किंवा टेपरेकॉर्डर असल्या एक नाही अनेक गोष्टी दरवर्षी केव्हातरी लागतील या शिर्षकांतर्गत ठेवलेल्या असतात. परंतू या वर्षी मात्र त्यातील किमान अर्ध्या वस्तू अगदी फेकूनच द्यायच्या या संकल्पासह वस्तू बघणे सुरु होतात. वस्तू मी गृहखात्याच्या हातात देतो, ती वस्तू माझ्याकडे बघत असते... मी जाणार रे तुला सोडून असेही म्हणत असते... पण ही वस्तू पुढे कधीतरी कामात येऊ शकते म्हणून पुन्हा माझ्या हातात येते व हसत हसत परत एकदा आपल्या मूळ जागी जाते. अश्याच पद्धतीने जवळपास सगळ्याच वस्तू पुन्हा जैसे थे स्थितीमधे परत आपल्या जागी जातात व आवरासावर सफल होते.  या प्रकारामुळे स्पेस निर्माणच होत नाही व परत साऱ्या वस्तू दाटीवाटीने रचल्या जातात. यामधील पुढचा टप्पा म्हणजे वस्तूंना लकाकी आणण्याचा. रॅकमधील डबे, समया, दिवे, पितळीची भांडी इत्यादी सर्व गोष्टी चमकविल्या जातात, डब्यांवर नवी लेबले लावली जातात, त्यातील खाद्यपदार्थांना परत एकदा उन दाखविणे होते व मग साऱ्या गोष्टी पुन्हा आपल्या जागी जातात. मग नंबर येतो घराच्या प्रत्यक्ष साफसफाईचा. पंखे पुसणे, जाळी जळमटे काढणे, खिडक्यांची तावदाने पुसणे या सर्व बाबी केल्या जातात. त्यानंतर रंग देऊन बरेच दिवस झाले असल्यास घराला रंग देण्याचे काम देखील केले जाते व अश्या प्रकारे दिवाळीच्या सणाच्या सुरुवातीपर्यंत घरातील सगळी आवरासावर संपुन सारे काही लख्ख उजळून जाते. घराच्या या मनापासून केल्या जाणाऱ्या आवरासावरीसोबत एक आणखी उपयुक्त व याहून महत्वाची अशी आवरासावर दिवाळीच्याच निमित्ताने करावी असे मला सहजच वाटून गेले. 
घराच्या आवरासावरीनंतर घर चकाकू लागले की जसे आपल्या मनाला प्रसन्नता लाभते, अगदी तश्शीच प्रसन्नता या एका वेगळ्या प्रकारच्या आवरासावरीमुळे प्राप्त होऊ शकते. परंतू बरेचवेळा घराच्या आवरासावरीसाठी आपल्या व्यस्त जीवनातून सात आठ दिवस मुद्दाम काढणारी मंडळी या वेगळ्या प्रकारच्या आवरासावरीसाठी मात्र वेळच काढीत नाहीत किंवा अशीही आवरासावर करावयाची असते हेच मुळी बरेच वेळा ठाऊक नसते. अत्यंत महत्वाची व आपले माणूसपण खऱ्या अर्थाने सिद्ध करणारी ही असते- नात्यांची आवरासावर.
घरामधील वस्तुंसोबतच घराला खरेखुरे घरपण देणारी त्या घरातील माणसे वस्तुंपेक्षाही महत्वाची असतात. वस्तुंची जशी आपण आवरासावर करतो ना तशी माणसा माणसांमधे असलेल्या नात्यांची देखील दिवाळीच्या महत्वपूर्ण सणाच्या निमीत्ताने आवरासावर करणे गरजेचे असते. पण गंमत अशी आहे की त्या आवरासावरीची पद्धत देखील तश्शीच असते. सर्वप्रथम आपल्याला या नात्यांची आवरासावर करावी लागत असते हे मुळात पटायला हवे. एका छताखाली रहात असताना सर्वांची मते एकसमान असतील असे आपण म्हणूच शकत नाही. म्हणूनच त्या प्रत्येकाच्या मनातील या वैचारिक भिन्नतेमुळे बरेचवेळा विसंवाद निर्माण होतात. काही बाबी अकारण केल्या जात आहेत असे वाटत राहते. परंतू या सर्व बाबींचे देखील बारकाईने अवलोकन करायला हवे. वर्षानु वर्षे स्वभावाचा दोष म्हणून बळजबरीने लादण्यात आलेली मते बाजूला सारण्याची गरज असते. नात्याचे अवलोकन करुन त्यातील नव्या व बदलत्या काळाशी साधर्म्य ठेवणाऱ्याच बाबी पुन्हा त्यांच्या जागी ठेवल्या जाव्या व त्रासदायक बाबी त्वरीत काढून टाकणे हीताचे असते. हे प्रत्येकानेच करायला हवे. एकमेकांच्या स्वभावातील दोष बाजूला करुन चांगले तेव्हडे ठेवावे म्हणजे जागा निर्माण होते ज्याला आधुनिक भाषेत स्पेस असे म्हणतात जी प्रत्येकाला हवी असते. ही स्पेस प्रत्येकाला स्वतःच्या मताप्रमाणे जगण्याची व निर्णयाची संधी देत असते ज्यामुळे प्रत्येकालाच विचार करता येतो व घरामधे कुणाचाही एकाधिकार न रहाता, सर्वांना ते घर आपलेसे वाटू लागते. 
या सोबतच नात्यांना नव्याने एकदा लकाकी आणण्यासाठी त्यांना मधून मधून घासून पुसून घ्यावे लागते. विशेषतः नाती एकमेकांवर ओझी बनू नये याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. यासाठी नात्यांबाबत नव्याने विचार करावा लागतो, त्यामधे विचारांना सामावण्याची क्षमता तपासून बघावी लागते व त्या संबंधी खात्री पटली तर मग जुने लेबल काढून नवे लेबल लावून ते नाते पुढील प्रवासासाठी पक्के करावे लागते. हा प्रकार प्रत्येकच नात्यामधे करणे हे मानसशास्त्रीयदृष्ट्या देखील अतिशय योग्य आहे असे मानले जाते. त्यापुढील प्रकार म्हणजे सारखे सोबत वावरुन प्रत्येकच नात्यामधे गैरसमजाची, अविश्वासाची किंवा मानापमानाची जाळी जळमटे लागली असतात. यामुळे नात्यामधे धुसरता निर्माण होते व शंका कुशंका निर्माण होतात. अश्यावेळी दिवाळीच्या आवरासावरीप्रमाणेच ही सारी जाळी जळमटे काढून टाकावी लागतात व स्वच्छ आणि पारदर्शी संवाद प्रस्थापित करावा. दिवाळीच्या निमीत्ताने सकारात्मक संवादाच्या माध्यमातून नात्यांना चकचकीत करणे महत्वाचेच असते. परंतू जर नात्यांच्या या भिंती जर समज-गैरसमजामुळे जास्तच खराब झाल्या असतील तर मग मात्र सबंध नात्यांना नवा कोरा रंगच द्यायला हवा. बरेचवेळा लोक या रंग देण्याला काही कारणांमुळे पुढे ढकलतात. परंतू त्याने फायदा होत नाही. जर संपुर्ण रंगच नवा दिला तर मात्र नाते देखील घराच्या भिंतीप्रमाणे चमकू शकते व त्यामधे नवा गोडवा व आकर्षण निर्माण होऊ शकते. घराचे घरपण टिकविण्यासाठी ज्याप्रमाणे आपण सामानाची आवरसावर करतो व त्याद्वारे घराला निटनेटके बनवितो, अगदी तस्सेच नात्यांचीही आवरासावर करावी लागते व त्यांना मधून मधून निटनेटके ठेवल्यास त्यांचा टिकण्याचा कालावधी वाढविला जाऊ शकतो.
या दिवाळीच्या निमीत्ताने आपल्याला देखील नात्यांच्या आवरासावरीची बुद्धी परमेश्वर प्रदान करो व त्यांना लकाकी आणून, अनावश्यक बाबी बाजूला सारत प्रत्येकाची स्पेस देऊन, त्यामधून मिळणाऱ्या आनंदासह सर्वजण मिळून हा अंधारावर मात करणारा प्रकाशाचा सण साजरा करुयात... चला तर मग घरच्या सामानाची आवरासावर झाली असेल तर नात्यांच्या आवरासावरीला सुरुवात करुयात?
 

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18