My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

सो व्हॉट
सो व्हॉट हा इंग्रजी भाषेतील उद्गार बरेच वेळा मुक्त विचारसरणीचे द्योतक मानला जातो. मी एखादी कृती करतोय व ती कृती समोरच्या व्यक्तीला त्याच्या मनातील सांस्कृतिक किंवा सामाजिक चौकटीच्या पलीकडची वाटल्याने माझ्या कृतीवर जेव्हा आक्षेप घेतला जातो तेव्हा माझ्या दोन प्रकारच्या प्रतिक्रीया राहू शकतात. एक तर मला तो आक्षेप पटू शकतो व माझी चूक लक्षात आल्यामुळे मी -आय ॲम सॉरी - हा उद्गार काढतो. दुसऱ्या बाजूने माझी कृती मला स्वतःला योग्य वाटते व त्या कृतीबद्दल मी मनापासून समाधानी असेल तर मग केवळ समोरच्या व्यक्तीच्या चौकटीत ती बसत नाही म्हणून मी त्या व्यक्तीचा आक्षेप स्विकारणार नाही व त्या आक्षेपाबाबत - सो व्हॉट- असा उद्गार काढून माझा विरोध नोंदवीन. या -सो व्हॉट- उद्गाराचे एक आणखी वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हा उद्गार काढण्यासाठी आत्मविश्वास लागतो. स्वतःचे स्वतः बद्दल कोणतेही ठाम मत नसलेल्या व दुसऱ्यांच्या विचारांनी आपल्या जीवनाच्या दिशा सहजच बदलविणाऱ्या पापभिरु व्यक्ती असा आत्मविश्वासाने भरलेला उद्गार कधीच काढू शकणार नाही. माझ्या जीवनातील निर्णय माझे आहेत, ते मी माझ्या मेंदुमधे सकारात्मकतेने कार्यरत असलेल्या विचारक्षमतेच्या आधारे घेलेले आहेत, या सर्व निर्णयांच्या चांगल्या किंवा वाईट परीणामांची जबाबदारी संपुर्णपणे घेण्याची धमक माझ्या सशक्त मनामधे आहे अश्या प्रकारे जीवन जगण्याची क्षमता असलेले लोकच सो व्हॉट असा उद्गार काढू शकतात. परंतू आत्मविश्वासू व्यक्तींच्या आत्मविश्वासाच्या हुंकाराचे प्रतिक असलेल्या या -सो व्हॉट- नावाने एक कपड्याचे दुकान असेल यावर आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा विश्वास बसणार नाही. पण असे एक नाही तर अनेक मोठ्या शहरांमधे सो व्हॉट नावाच्या कपड्याच्या दुकानांची एक मोठी साखळी आहे व स्थुल लोकांमधे आत्मविश्वास वृद्धींगत करणारा विचारच या दुकानांच्या स्थापने मागे आहे. 
पुण्यासारख्या शहरात- सो व्हॉट- नावाचे कपड्यांचे दुकान सुरु झालेय. हे साधेसुधे दुकान नसून फारच विशेष ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे आहे. या गरजांसोबतच एक विशिष्ट प्रकारचे मोठे कार्य हे दुकान करीत असते. शरीराने फार स्थुल असलेल्या व्यक्तींसाठी कपडे व आत्मविश्वास निर्माण करणारे हे दुकान विलक्षण व अतिशय कल्पक आहे.
शारिरीक स्थुलता असलेल्या मंडळींना बरेच वेळा लोकांच्या उपहासाला सामोरे जावे लागते. कधी कधी वेगवेगळ्या कारणांनी स्थुलता आलेली असते. काही लोकांमधे पालंकांमधे असलेला स्थुलपणा नैसर्गिकरित्याच आलेला असतो किंवा कधी कधी काही विशिष्ट आजारांमुळे जसे थायरॉईडमुळे देखील लठ्ठपणा वाढतो. जास्त स्थुलपणा चांगला नसतो हा वैद्यकीय सल्ला जरी योग्य असला तरी कधी कधी तो स्वाभाविकपणे असतो व त्यामुळे रक्तदाब वगैरे बाबींचा त्रास असतोच असेही नाही. पण स्थुलते मागचा हा कोणताही विचार लक्षात न घेता अश्या मंडळींची टींगल केली जाते, त्यांच्यावर विनोद केले जातात किंवा बरेच वेळा त्यांच्यासाठी अवघडल्यागत स्थिती होते. अश्या मंडळींना कपडे खरेदी करावयास गेल्यावर फार वेदना सहन कराव्या लागतात. लठ्ठपणामुळे त्यांना साधारण मापाचे कपडे होत नाहीत. कपड्याच्या मापांच्या भाषेत बोलायचे झाल्यास त्यांना डबल एक्सएलपेक्षाही जास्त मोठे कपडे लागतात. अश्या लोकांना कपड्याच्या दुकानातील लोक कधीकधी चांगली वागणूक देत नाहीत. या मंडळींच्या स्थुलपणाकडे टवाळीच्या नजरेतून बघून एखाद्या कोपऱ्यात ठेवलेले एखाद दोन कपडे दाखविले जातात. यामधे चॉईस अजिबात नाही असेही सांगतात व मग या स्थुल मंडळींना त्या उपलब्ध व दुर्लक्षित कपड्यांमधूनच कपडे निवडावे लागतात व मग खिन्नपणे यापुढे कपडे टेलरकडूनच शिवून घ्यावे असे ठरवून ही मंडळी दुकानातून बाहेर पडतात. त्यांनाही फॅशनेबल कपडे घालावेसे वाटतात, त्यांनाही रेडीमेड कपड्यांचा देखणेपणा अनुभवायचा असतो परंतू ती संधीच त्यांना उपलब्ध होत नाही. आपण आवश्यकतेपेक्षा जास्त लठ्ठ आहेत ही बोच अकारणच त्यांच्या मनाला कुरतडत राहते. फार लठ्ठ असू नये हे सांगणे ठिक आहे परंतू ती व्यक्ती लठ्ठ आहे म्हणजे जणू तिने फार मोठा गुन्हा केलाय अश्या पद्धतीने स्थुल व्यक्तींना हिणविल्या जाते. विशेषतः सलाद आणि उकडलेल्या सपक भाज्या खाऊन स्लीम आणि ट्रीम राहीलेल्या लोकांकडून तर बरेच वेळा त्यांच्या स्वतःच्या लहान दिसण्याचे किंवा रोड असण्याचे इतके जास्त कौतुक केले जाते की त्यामुळे स्थुल असलेल्या व्यक्तिंना त्या वर्तनाचा त्रास देखील होतो. या असल्या वागणूकीमुळे या व्यक्तींचा आत्मविश्वास देखील कमी झालेला असतो. त्यांना फार वेगात पळता येत नाही, फार वेगाने कामे करता येत नाही किंवा चढ उतार देखील बेताने करावी लागते परंतू याचा अर्थ त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याइतपत त्यांची टिंगल होत असेल तर ती अत्यंत चुकीची बाब आहे. कपड्यांच्या बाबतीत या सर्व स्थुल लोकांचा आत्मविश्वास वाढविणारे व त्यांना देखील फॅशनेबल कपडे उपलब्ध करुन देणारे दुकान म्हणजे - सो व्हॉट : प्लस साईज स्टोअर.
या दुकानामधे स्थुल लोकांकरीता डबल एक्सएल साईजच्या पुढचे कपड्यांचे सर्व साईज उपलब्ध आहेत. त्यामधे भरपूर चॉईस व रंगसंगती देखील मुद्दाम उपलब्ध केलेली आहे. या दुकानात स्थुल लोकांना मनाप्रमाणे खरेदी करता येते व आपण स्थुल असल्याचे अकारण वैषम्य देखील बाळगावे लागत नाही. आत्मविश्वासाने येथे लोक खरेदी करतात कारण हे दुकानच मुळी स्थुल लोकांसाठी बनलेले आहे. बिनधास्तपणे कपड्यांची ट्रायल घेऊन मोठ्या साईजचे पण फॅशनेबल कपडे खरेदी करण्याचा आनंद स्थुल लोकांना या दुकानात मिळविता येतो व त्यासोबत मिळतो अमुल्य असा आत्मविश्वास. मोठ्या साईजचे कपडे घेऊन दुकानातून बाहेर पडणारा प्रत्येक स्थुल माणूस ती बॅग हातात घेऊन दुकानाच्या पाटीकडे बघून हळूच म्हणून घेतो, हो मी लठ्ठ आहे.. सो व्हॉट?
स्थुलपणा ही काही टिंगल करण्यासारखी बाब नाही. ते काही व्यंग नाही.. किंबहुना कोणत्याही व्यंगाला चिडविणे ही माणुसकीच नाही. एखाद्या मानसिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलाला काही टारगट लोक छळत असतात तेव्हा त्यांच्या माणूसपणाबद्दल शंका उत्पन्न होते. खरे तर सध्या कोणतेही व्यंग असलेल्या बंधु-भगिनींना दिव्यांग म्हटले जाते हा किती कल्पक बदल आहे. परंतू तरीही धडधाकट शरीर असूनही कुजक्या मनोवृत्तीचे लोक या दिव्यांगांबद्दल लंगड्या, आंधळ्या, वेडी, बहिरी किंवा स्थुल लोकांबद्दल लठ्ठी, मोट्या असल्या शब्दांचा प्रयोग करताना दिसतात. आपला लठ्ठपणा स्विकारुन त्याच्याबद्दल वाईट वाटून न्युनगंड निर्माण न होऊ देता, त्याचा वापर सकारात्मकतेने केलेले एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निर्मीती सावंत. स्थुल असूनही त्या स्थुलपणाचा वापर करुन विनोद निर्मीती करायची व त्याद्वारे अनेकांना हसवायचे इतके मोठे कार्य ती अभिनेत्री करते. कारण स्थुलपणा हा काही दोष नाही की ज्यामुळे आत्मविश्वास डळमळीत व्हावा. म्हणूनच या सर्व स्थुल लोकांसाठी त्यांना सर्वांप्रमाणे नव्या प्रकारचे आधुनिक कपडे मिळावे म्हणून व कपडे खरेदी करुन आपल्या स्थुलपणाबद्दल लोकांच्या बदलत्या नजरांना ठामपणे - सो व्हॉट - म्हणण्याची क्षमता व आत्मविश्वास निर्माण करणारे कपड्यांचे दुकान ही किती छान संकल्पना आहे...अश्या कल्पक संकल्पनांचे मनापासून स्वागत करायला हवे व सोबतच मोठमोठ्या प्रतिष्ठानांनी पुढाकार घेऊन अश्या संकल्पनांची उभारणी करण्यास सुरुवात करायला हवी.
   



 

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18