My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
बापालाही मन असतं
मागल्या आठवड्यात माझी स्कुटर सर्विसींग करण्यासाठी मी शोरुमला घेऊन गेलो होतो. लवकर नंबर लागावा म्हणून अगदी सकाळीच मी तेथे पोहोचलो. माझ्यासोबत अजूनही काही मंडळी तेथे स्कुटरच्या सर्विसींग करीता आले होते. परंतू एक व्यक्ती मात्र वेगळ्या कारणासाठी तेथे आली होती. ग्रामीण भागाला शोभेल असा पोशाख, त्याच पद्धतीचे किंचितसे भांबावलेपण, हातात झोरा (ज्याला शहराच्या मराठी भाषेत बॅग असे म्हणतात), तो झोरा हातात घट्ट पकडलेला व चेहेरा जरा चिंताक्रांत अश्या स्वरुपाचा तो माणूस अस्वस्थपणे येरझारा करीत होता. त्याला खरे तर शोरुम मधे काम होते, परंतू तिकडची मंडळी आलेली नसल्याने तो सर्विसींग विभागातच तेथील लोकांशी बोलत बसला होता. शोरुम उघडायला अजून वेळ आहे, तुम्ही खूपच लवकर आले असे त्या लोकांनी त्या माणसाला सांगितले. दादा, वेळ नाही झाला पायजे.. म्हनून पायटीच निंगालो गावाकडून, गाडी लवकरच आली..म्हनून येऊन गेलो.. आज आपलं काम झालं पायजे..आजचा दिवस गाठायचा म्हनून तर सारी धावपळ केली.. आज काम झालंच पायजे...पैशे सारेच घेऊन आलो मी..आता चिंता नाई...ठरल्यासारखं सारं झालं म्हंजे जमलं...अश्या पद्धतीच्या त्या माणसाच्या गप्पा सुरु होत्या. काहीतरी विशेष गोष्ट होती हे माझ्या लक्षात आले. माझी गाडी तपासणाऱ्या माणसाला मी त्याबद्दल विचारले. मला त्याने जी गोष्ट सांगितली ती ऐकून मी माझे काम झाल्यावर त्या झोरावाल्याचे मनापासून अभिनंदन केले. खरोखरीच एखादा संवेदनशील बाप किती छान विचार करु शकतो व त्या विचाराच्या पूर्ततेसाठी किती मेहनत करु शकतो याचे ते एक उत्तम उदाहरण होते. एका बापाच्या मनाची ती संवेदनशीलता बघून मला फार आनंद झाला.
मला त्या माणसाबद्दल व त्याच्या कामाबद्दल त्या सर्विसींग सेंटरच्या माणसाने सांगितले की, तो माणूस गेले आठ दिवस तेथे सारखा येतोय कारण आज त्याला त्याच्या बाराव्या वर्गातील मुलासाठी मोटरसायकल घ्यायची आहे व ती त्या मुलाच्या वाढदिवसाची भेट राहणार आहे. अजून महत्वाची बाब म्हणजे ही भेट त्या मुलासाठी सरप्राईज भेट राहणार आहे. त्या माणसाने त्याच्या मुलाला त्याबाबत काहीही सांगितलेले नाही. संध्याकाळी गाडी तयार झाली की त्या मुलाचा मित्र त्याला घेऊन येणार व त्याला आनंदाचा व आश्चर्याचा धक्का बसेल. आपल्या मुलाला असा आनंद देण्याचे त्या बापाने ठरविले होते. सर्विसींग सेंटरवाला मुलगा त्या माणसाला म्हणाला, काका, तुमचा मुलगा खरोखर नशीबवान आहे. बारावीत असतानाच त्याला वाढदिवसाची एवढी जोरदार भेट मिळून राहीली. त्यावर तो संवेदनशील पिता काय म्हणतो, नाही रे बाबा, पोरगा कायचा नशीबवान, मीच नशीबवान हाये कारन, माझा पोरगा शिकून रायला. मले तर कधीच शाळेत जाता नाई आलं, माय तं सारं आयुष्य तीन एकराच्या जमिनीत काबाड कष्ट ओतण्यात गेलं. त्या तीन एकरातून फार काई भेटत नाई तरी तिथंच राहाव लागते कारन बाकी आपल्याजवळ काईच नाई. पन देवानं पोरगं चांगलं देल्लं. हुशार हाय, अभ्यासही चांगला करतो, नशीबानंच आधार देल्ला मले. आमच्या पुऱ्या परीवारात हाच एक चांगला शिकून रायला. म्हणून आमीच नशीबवान हावो. म्हनून तर त्याच्यासाठी गाडी घेऊन रायलो. पंचविस हजार होते साठलेले, बाकी कर्जाऊ घेतले अन् गाडी घेऊन रायलो पोरासाठी.. त्या माणसाचा एकेक शब्द मला त्याच्या मनात मुलाबद्दल असलेला अभिमान व प्रेम जाणवून देत होता. किती छान क्षण असेल तो जेव्हा त्या मुलाला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अचानक इतके गोड सरप्राईज मिळेल..मोटरसायकल. प्रत्येकच मुलासाठी अशी बाबांकडून मिळणारी मोटरसायकल म्हणजे एक फारच सुखदायक बाब असते. या प्रसंगी तर त्याला अजिबात माहित नसताना त्याला ती मिळणार होती. आपल्या मुलाला खुश करण्यासाठी व तो शिकून सज्ञान व समंजस होणार या आनंदामुळे तो बाप आपल्या पोरासाठी नवी कोरी मोटरसायकल घेणार होता. त्याच्या ऐपतीत नसताना देखील पंचावन्न हजार रुपयांची एक छान व दिमाखदार मोटरसायकल. काचेच्या आत ठेवलेली ती गाडी बघूनच त्याला कृतकृत्य झाल्यागत वाटत होते. आपला पोरगा ही गाडी चालविणार, आज यंध्याकाळी त्याच्या मागे बसून आपण गावाला जाणार अश्या सर्व आनंददायी स्वप्नांना उराशी कवटाळून शोरुम उघडण्याची तो माणूस वाट बघत बसला होता. झोऱ्यामधे बहुदा पैसे असल्याने त्याने तो झोरा घट्ट धरुन ठेवला होता. मी गाडी सर्विसींगसाठी सोपविली व निघताना मुद्दाम त्या माणसाजवळ गेलो. त्याचा हात हातात धरला व त्याचे मनापासून अभिनंदन केले. तुमचा मुलगा खरोखरीच भाग्यवान आहे की तुमच्यासारखे वडील त्याला मिळाले. गाडी सायंकाळी घेऊन जाणार आहात..मी माझी गाडी घ्यायला येईन संध्याकाळी... तेव्हा पेढे पाहीजेत. हसून तो माणूस म्हणाला, वा!वा! साहेब, काऊन नाई, पेढे तर आताच आणून ठेवले आहेत पन, पोराच्या हातून गाडीची पुजा करुन मग वाटीन, संध्याकाळी तुम्हाले नक्की देतो....मी तेथून निघालो.
पुढे दिवसभर महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या कामांमधे माझा दिवस कसा संपला ते कळले नाही. सर्विसींग सेंटरहून मला फोन आल्यावरच गाडीची आठवण आली. मी माझ्या विचारातच शोरुम ला पोहोचलो. कामाच्या गडबडीत मी त्या सकाळी भेटलेल्या माणसाला पार विसरुन गेलो. माझी गाडी मी ताब्यात घेतली व परत निघताना सहजच माझे शोरुमच्या आत लक्ष गेले.. बघतो तर काय! तो सकाळचा माणूस त्या शोरुममधे एका खुर्चीवर बसलेला होता. त्याच्याकडून पेढा घ्यावा जेणेकरुन त्याला बरे वाटेल व एका चांगल्या मनाच्या माणसाला पुन्हा भेटता येईल या हेतूने मी गाडी बाजूला पार्क करुन त्याला भेटायला गेलो. त्याच्या जवळ पोहोचता पोहोचता मात्र मला त्या माणसाचा चेहेरा सकाळी दिसला तसा आनंदी वाटला नाही. तो त्या खुर्चीवर खिन्नपणे बसलेला होता. त्याचा पडलेला चेहेरा बघून नक्कीच काहीतरी झालंय याची मला जाणीव झाली. त्या माणसाच्या अगदी जवळ पोहोचल्यावर मात्र मला त्याच्या डोळ्यात अश्रू देखील दिसले. आता मला राहवेना...मी त्याच्याजवळ खुर्ची घेतली व त्याला काय झाले असे विचारले. काही क्षण त्याने मला ओळखले नाही... पण नंतर त्याच्या लक्षात आले... तो म्हणाला, साहेब सकाळीच तुमाले पेढा देऊन टाकला असता तर बरं झालं असतं..आता तर देताच येणार नाही... मला काहीच कळेना. त्यानंतर त्याने घडलेला प्रसंग मला सांगितल्यावर मी सुन्न झालो...
त्याचा मुलगा ठरल्याप्रमाणे मित्रासोबत शोरुमला आला. आपल्या पोराच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी आतूर झालेल्या त्या बापाला मात्र अत्यंत अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. त्याचा मुलगा ती गाडी बघितल्यावर आनंदी होण्याऐवजी बापावर तेथेच भडकला. त्या गाडीपेक्षा त्याला दुसरी एक सत्तर हजार रुपयांची गाडी पसंद होती. ही गाडी कशी काय निवडली, तुम्हाला काही कळते का, मला विचारायला तर हवे होते, समजत नाही तर जास्तीचा कारभार कशाला केला असे बरेच काही अद्वातद्वा आपल्या बापाला बोलला. ही गाडी घेणे म्हणजे गाढवावर बसल्यासारखे वाटते, लोक मला काय म्हणतील वगैरे बोलून त्याने त्या शोरुम मधे आपल्या वडीलांचा अपमान केला. एवढे करुन तो थांबला नाही तर मला ही गाडी घ्यायची नाही..याचे पैसे परत करुन द्या असे म्हणून आपल्या गरीब बापाला त्या नव्या गाडीसोबत सोडून तो तेथून निघून गेला. शोरुम मधील अनेकांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला परंतू त्याच्यावर त्याचा काही फरक पडला नाही. या प्रसंगामुळे हादरुन गेलेला तो बाप खिन्नपणे पेढ्याचा डबा असलेला आपला झोरा छातीशी कवटाळून बसला होता. शोरुमचे लोक गाडी वेळेवर रद्द झाल्याने पैसे परत करण्यासंबंधी कंपनीशी बोलत होते व त्यांच्या उत्तराची वाट बघत तो बाप डोळ्यातील पराभवाचे अश्रु कुणाला दिसू न देता विमनस्क होऊन बसला होता. काहीही न बोलता केवळ त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी निघालो... मनात विचार एकच होता..
काबाड कष्ट करुन, रक्ताचे पाणी करुन मुलांना मोठे करणाऱ्या बापाला देखील मन असतं, हे त्या असंवेदनशीलतेने वागणाऱ्या तरुणाईच्या प्रतिनीधीला कुणी सांगावे? आपण सांगुयात!
Touching. Do we,as teacher-counsellers fail in our bounden duties ?
ReplyDeleteTouching. Do we,as teacher-counsellers fail in our bounden duties ?
ReplyDeletemulanch vay , alladpanna, yanchya mule asha gosti ghadatat , vachun avi ashru aware nahit yevadhe matra khare
ReplyDeleteहा बाप शिकला नाही. बदलत्या काळा नूसार बापान बदलल पाहीजे.एवढा मोठा निर्णय स्वतः घ्यावा का?
ReplyDeleteहा बाप शिकला नाही. बदलत्या काळा नूसार बापान बदलल पाहीजे.एवढा मोठा निर्णय स्वतः घ्यावा का?
ReplyDelete