My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

थकलेली अंबाबाई
या वर्षी दसऱ्याचा दुसरा म्हणजे मोहरमचा दिवस. जवळपास अकरा दिवसांनंतर मी अंबामातेच्या मंदीरासमोरील रस्त्यावरुन माझ्या महाविद्यालयात निघालो होतो. गेले दहा बारा दिवस हा रस्ता नवरात्रीमधील भक्तांच्या अलोट गर्दीमुळे बंद करण्यात आला होता. दहा दिवस या रस्त्यावर पादचारी भक्तच ये जा करीत होते. वाहनांना परवानगीच नव्हती. संपुर्ण रस्त्याच्या दोन्ही कडेला वेगवेगळी दुकाने, रस्त्याने वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून भक्तगणांच्या स्वागतासाठी मोठमोठ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. रोषणाई करण्यात आली होती. अंबामातेचे मंदीरही रोषणाईने सजविण्यात आले होते. वर्षातून एकदाच नवरात्रीचा सण साजरा केला जात असल्याने संपुर्ण सोहळा दिमाखदार करण्यात आला होता. दिवसभर वेगवेगळ्या गावांवरुन व मूळ अमरावतीचेही अनेक भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत होते. पहाटे पाचला उठून, अनवाणी पाच पाच किलोमीटर चालत, नऊ दिवसांचे कडकडीत उपवास करुन मोठ्या भक्ती भावाने हे दर्शन घेणे सुरु होते. काहींनी तर सलग दहाही दिवस सकाळ संध्याकाळ मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. सकाळच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेज आरतीपर्यंत अंबामाता आपल्या भक्तांना दर्शन देण्यात व्यस्त होती. वेगवेगळे भक्तगण वेगवेगळ्या मागण्यांसाठी, आपल्या व्यथा वेदनांपासून मुक्ती मिळविण्यासाठी, सुख समृद्धी लाभावी म्हणून, कुणाची प्रकृती बरी व्हावी म्हणून, कुणाला पुत्ररत्न प्राप्त व्हावे म्हणून, कुणाचे लग्न जुळावे म्हणून, कुणाचा व्यवसाय नीट चालावा म्हणून, कुणाला पदोन्नती मिळावी म्हणून, कुणाची बदली व्हावी म्हणून, कुणाची रद्द व्हावी म्हणून, कुणाला परीक्षेत मेरीटचे गुण मिळावे म्हणून, कुणाला केवळ उत्तीर्ण होण्यासाठी गुण मिळावे म्हणून, कुणी नवी गाडी खरेदी केली म्हणून, कुणी जमिनीचा सौदा केला म्हणून, कुणाचा मुलगा विचारत नाही म्हणून, कुणाची सासू छळते म्हणून, कुणाला विमानप्रवास करायचा आहे म्हणून, कुणाला भिती वाटते म्हणून, कुणाचे मन खाते म्हणून, कुणाला बळ हवे म्हणून यासारख्या अनेक कारणांसाठी अंबामाते कडे गेले दहा दिवस भक्तांची अक्षरशः रीघ लागली होती. आज मात्र हा सारा परीसर शांत होता. एखादे मोठे वादळ येऊन सारे शांत व्हावे तसा...
मोठाल्या कमानी उकलणे सुरु झाले होते, दुकानांमधील माल गोळा करणे सुरु झाले होते, रोषणाई काढणे सुरु झाले होते व दसऱ्यानंतर मोहरमची सुटी मिळाल्यामुळे सारे भक्तगण गेले दहा दिवस थकून गेल्यामुळे घरी आराम करीत होते. देवळातही शांतता दिसत होती. ती शांतता बघून मी मुद्दाम आज अंबामातेच्या दर्शनासाठी गेलो. मंदिरात तुरळकच लोक होते. दुपारची वेळ. सारे काही शांत शांत होते. अंबामातेसमोर बसलो. शांतपणे डोळे मिटले. मनोमन मातेची आराधना करीत बसलो... तेव्हड्यात आवाज आला, आलास? आज वेळ मिळाली होय तुला? मी दचकलो! कोण बोलले माझ्या लक्षात आले नाही. आवाज मात्र समोरुन गाभाऱ्यातून येत होता. अतिशय थकलेला आवाज होता. माझ्या आसपास कुणीच नव्हते.. माझी भांबावलेली स्थिती बघून मंदीराच्या गर्भगृहातून परत आवाज आला, अरे वेड्या, मी बोलतेय, तुझी अंबामाता. मी म्हणालो, माता बोलतेय? माझी अंबामाता बोलतेय!.... माते! तुझा आवाज इतका क्षीण का येतोय? काय झाले? माता म्हणाली, अरे बाळा, ज्याप्रमाणे माझे भक्तगण थकलेत तशी मी नाही का थकली! तू तर संपुर्ण नवरात्रीच्या काळात आला नाहीस, तुला कसे कळणार? मी म्हणालो, माते! तुझ्याशी संवाद साधायचा होता, शांतपणे तुझ्याजवळ बसून आराधना करावयाची होती म्हणून आज आलो. गेले दहा दिवस तर तुझ्यासमोर दहा सेकंदही थांबता येत नाही. भक्तांचा रेटा थांबूच देत नाही मग संवाद कसा साधायचा? माता म्हणाली, बरे केलेस, आज आलास. जरा बोलता येईल. मी हळूच विचारले, माता, खूप थकलीस का गं, गेल्या काही दिवसांमधे? माता काही वेळ बोलली नाही. नंतर हळू आवाजात ती बोलू लागली. त्या दिवशी मातेने मला जे सांगितले ते फार विलक्षण होते. तो प्रत्येक शब्द मला मातेच्या अस्तित्वाची खरी भूमिका पटवून गेला. किती योग्य आणि मनापासून बोलली अंबामाता. तिचे ते बोल तिच्या प्रत्येक भक्तासाठी होते..अगदी प्रत्येकासाठी. अंबामातेवर आस्था असलेल्या प्रत्येकाने मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवावे असे ते शब्द होते...
माता म्हणाली, मुला मी खरच थकलीय रे! गेल्या दहा दिवसात मला भेटायला आलेल्या अनेक भक्तांनी मला खूप थकविले. पण मला या थकव्याचे काहीच वाटत नाही रे! आता मी काही दिवस आराम करीन कारण माझे भक्तच मला आराम देतील. पण हा थकवा मानसिक आहे रे. माझ्याकडे येणाऱ्या माझ्या असंख्य भक्तांची मने वाचताना, त्यांच्या वेदना समजून घताना मला जो त्रास होतो ना त्यामुळे मी जास्त थकलेय. किती वेगवेगळ्या समस्या आहेत रे माझ्या भक्तांच्या. परंतू तुला सांगते, माझ्या मानसिक थकव्यासारख्या यांच्याही अनेक समस्या मानसिक आहेत. हे सारे गोंधळून गेलेत रे. ज्या मूळतत्वांना जीवनाचा आधार मानून हे सर्व जीवन जगत आलेत तीच तत्वे प्रसंगी सोडून द्यावी लागतात म्हणून गोंधळ उडतो. मनापासून प्रामाणिकपणे कार्य करीत असतानाही केवळ असुयेपोटी त्या कामांमधे खीळ घातली जाते तेव्हा निराशा येऊ लागते. तत्व पाळणाऱ्या मंडळींना अवहेलना सहन करावी लागते व तत्वे ज्यांना माहीतच नाहीत त्यांना हा समाज उजळ माथ्याचे म्हणून स्विकारतो तेव्हा चांगुलपणावरचा विश्वास उडू लागतो. ज्याने मनापासून पाठबळ द्यावे तोच नातेवाईक हिस्से वाटण्यांवरुन हाडवैर करतो तेव्हा प्रेमाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहते. दुर्बल व्यक्ती हेरुन त्याला छळले जाते व बाहुबलींना सलाम करणारे गल्लोगल्ली त्या बाहुबलींच्या पोकळ आधारावर फुशारकी मारत फिरतात तेव्हा कायद्याच्या मर्यादा उघड्या पडतात. भ्रष्ट जीवन जगुनही केवळ पैश्याच्या जोरावर समस्त जनतेला आध्यात्मिकतेचा, नैतिकतेचा व प्रलोभनमुक्त जीवनाचा पाठ सांगणारे दांभिक जेव्हा बोकाळतात तेव्हा माझ्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उभे केले जाते. अश्या प्रकारच्या एक ना अनेक मानसिक विवंचनांनी माझे भक्त गोंधळून गेलेत. त्यामुळेच त्यांची माता म्हणून मला त्यांची फार चिंता वाटू लागली आहे. पण मला काही बाबींची खंत देखील आहे. या नवरात्रीच्या काळात मनोभावे माझी भक्ती करणारे माझे बरेचशे भक्त इतरवेळी मात्र माझ्या अंतरीचा आशिर्वादात्मक व प्रेरणासंपन्न सक्षमतेचा, वाईट परीस्थीतीशी खंबीरपणे लढण्याचा व मनाची दुर्बलता बाजुला सारुन तेजस्वी प्रबलता अंगीकारण्याचा विचार जो मी त्यांच्या ह्रदयी ठेवलेला असतो तो उघडूनही बघत नाहीत. या नऊ दिवसात कडक उपवास करणारे माझे काही भक्त उर्वरीत वर्षभर मनसोक्त मांसाहार करतात, दारु ढोसतात व तामसी वृत्तीने अनेक व्यवहार करतात. मग असे होत असेल तर मी दिलेला विचार मृतप्रायच राहणार आणि मानसिक गोंधळात वाढच होत राहणार. या नवरात्रींमधला सात्विक व समर्पणाचा भाव जर त्यांनी वर्षभर रोजच्या जीवनात माणसा माणसांशी व्यवहार करताना अंगीकारला तर मग या नऊ दिवसात मलाही फार थकवा येणार नाही आणि वर्षभर समाधानी मनःस्थितीचा आनंद मलाही लाभू शकेल... ऐकशील ना रे माझे? हो माते! निश्चितच!! मी हे वाक्य उद्गारलो आणि अचानक मला आपण स्वतःशीच मोठ्याने बोलल्याचे जाणविले. मानवी स्वभावाप्रमाणे आपल्याला असे स्वतःशी वेड्यागत बोलताना कुणी बघितले तर नाही ना याची मी खात्री करुन घेतली. मला बघणारे कुणीही नव्हते....देव्हाऱ्यात बघितले तर काय!!
माझी अंबामाता स्थितप्रज्ञतेने आपल्या जागी विराजमान होती व चेहेऱ्यावर अजीबात थकवा न येऊ देता प्रसन्नपणे भक्तांना मानसिक बळ देण्यासाठी त्यांची वाट बघीत होती. माझेच मन थकले असल्याने मला कदाचित अंबामाता थकल्याचा व थकून बोलल्याचा भास झाला असावा. कारण खऱ्या श्रद्धेतून निर्माण झालेला प्रेरणास्रोत कधीच थकत नसतो... तो स्थितप्रज्ञ असतो. त्यापासून आपल्या जीवनाला समृद्ध करण्याची क्षमता आपल्यालाच बनवावी लागते व ही प्रक्रीया केवळ नवरात्रींच्या नऊ दिवसच नाही तर निरंतर सुरु ठेवावी लागते. श्रद्धेचे व त्यामधून प्राप्त होणाऱ्या आत्मबलाचे खरे स्वरुप, त्या खास देवीच्या म्हणून नसलेल्या दिवशी, अंबामातेनेच नवरात्रीमधे दर्शनालाही न गेलेल्या माझ्यासारख्या भक्ताच्या मनात रुजविले व ते देखील नवरात्री आटोपून गेल्यानंतर....
 

Comments

  1. श्री अंबामाता जशी पॉझीटिव्हली लेखकाच्या अंगात येऊन घुमतेय तशीच सर्व वाचकांच्या देखील अंगात घुमू दे हीच तिच्या चरणी प्रार्थना !!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.06.21

थोडा है थोडे की जरुरत है @ 10.12.19