My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

झुकुगाडीचा आनंद
माझ्या भावाने त्या दिवशी मला सांगितले की, महालक्ष्मी पुजनासाठी तो त्याच्या पत्नी व मुलांसह रेल्वेने येणार आहे व मी त्यांना घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर यावे. मी त्यांना घ्यायला स्टेशनवर जाणारच होतो परंतू मला त्यांच्या या प्रवासाच्या कृतीचे आश्चर्य वाटले. कारण एरवी ते सर्व कारमधे बसून साधारण दोन सव्वा दोन तासात नागपूरहून अमरावतीला त्या घरापासून या घरापर्यंत अगदी आरामात येतात. परंतू तो आरामाचा प्रवास सोडून साधारण एक तास आधी घरुन निघून रेल्वे स्टेशनवर जायचे, त्यानंतर इंटरसीटी गाडीत बसून साधारण अडीच तासाचा प्रवास करायचा व मग रात्री मी त्यांना घरी घेऊन यायचे. या सर्व प्रकारात साधारण कारच्या प्रवासापेक्षा दुप्पट म्हणजे पास तासाचा वेळ जाणार. त्यामुळे मी त्याला सहजच विचारले की कार घेऊन का येत नाहीस. त्याने दिलेले उत्तर मला मजेदार वाटले व त्यामधून आपला देखील विचारप्रवास कसा बदलत चाललाय याची जाणीव झाली. रेल्वेप्रवासाचा हा असा द्राविडी प्राणायाम करण्याचे त्याने यासाठी ठरविले की त्याच्या चार वर्षांच्या मुलाला रेल्वेचे फार कौतुक असून त्याने आतापर्यंत रेल्वे केवळ चित्रांमधे व काहीवेळा कारमधूनच पाहिली होती. जन्मापासून ते पोर रेल्वेमधे बसलेच नव्हते. तसा प्रसंगच नाही आला. एक तर जवळपास सगळेच नातेवाईक हमरस्त्याने जोडलेल्या गावांना राहतात व दुसरी बाब म्हणजे जन्मापासूनच अत्यंत सोयीचा असा कारचा प्रवासच त्याने आपल्या आई वडीलांसोबत केला होता. त्यामुळे रेल्वेत बसण्याचे त्यास प्रचंड कौतुक होते. त्याचे ते कौतुक पुरे करण्यासाठी माझ्या भावाने त्याला रेल्वेचा प्रवास घडविण्याचे मुद्दाम ठरविले. काय खुश झाला तो चिमुरडा. त्याच्या खुश होण्याचे वर्णन माझ्या भावाकडून मी ऐकतच राहीलो.
मुद्दाम त्याला रेल्वे जवळून बघता यावी म्हणून माझ्या भाऊ परीवारासकट जवळपास एक तास आधीच रेल्वे स्टेशन वर पोहोचला. सायंकाळची वेळ असल्याने नागपूर स्टेशन गडबजलेले होते व बऱ्याच गाड्यांचे आवागमन सुरु होते. त्या सर्व गाड्यांना, त्यातील प्रवाशांना हात दाखविणे यासारख्या अनेक बाललीला त्या चिमुरड्याने, अबीरने केल्या. मग इंजीन ड्रायव्हर काकांना टाटा करणे, गार्डच्या डब्यात शिरुन बघणे हे प्रकार देखील झाले. त्यानंतर तो बसणार ती गाडी आली. मुद्दाम खिडकीजवळची जागा घेऊन तो फारच खुश होता. जो कुणी ये - जा करीत होता त्याच्याकडे बघत हसून स्वतःचा रेल्वे गाडीत बसल्याचा आनंद व्यक्त करणे त्याचे सुरु होते. जोराची शिट्टी वाजवून जेव्हा गाडी सुरु झाली तेव्हा तर त्याच्या आनंदाला पार उरला नाही. मस्त टाळ्या वाजवून त्याने आपला आनंद मनसोक्त व्यक्त केला. त्यानंतर त्याने बाबांचे बोट धरुन बऱ्याच डब्यांमधे चक्कर मारली. फिरताना गाडीसोबत तो देखील हलत होता, त्याचाही त्याने मनापासून आनंद घेतला. अमरावतीला येईपर्यंत त्याने रेल्वेतील प्रत्येक क्षण मोठ्या आनंदाने जगला. रेल्वे स्टेशनवर मी दिसल्यावर धावत येऊन मला बिलगला आणि अतिशय आनंदून तो रेल्वेने आल्याचे मला सांगू लागला. त्या पिल्लाचा आव असा होता की त्यानेच जणू गाडी चालवित आणली असावी. परंतू त्या छोट्याश्या रेल्वे प्रवासाने मनापासून खुश झालेला अबीर बघून मला मात्र चटकन माझे बालपण आठविले.
माझ्या किंवा माझ्या पिढीच्या बालपणी मात्र याच्या अगदीच उलट परीस्थिती होती. आम्हाला बसचा किंवा रेल्वेचा प्रवास हा नेहमीचाच होता आणि आम्हाला कौतुक होते कार प्रवासाचे. मला अजूनही आठवते, कधी नव्हे तो एकदा माझ्या लहानपणी कुणी पाहुणे कार घेऊन आमच्या घरी आले होते. घरासमोर भली मोठी कार बघून मी तर फारच आनंदी झालो होतो. त्या कारला टेकून उभे राहताना आमच्या पुऱ्यातील इतर मुलांवर इंप्रेशन पाडण्याची ती योग्य संधी होती. ते वयच तसे होते. कुणीही त्या कारला हात लावू नये व दुरुनच कार बघावी यासाठी आम्ही दोघे भाऊ पहारा देऊ लागलो. काही वेळासाठी का होईना परंतू ती कार आपलीच आहे या थाटात मी वावरु लागलो. माझे सर्व मित्र मंडळी देखील माझ्या त्या कारला टेकून उभे राहण्याने जरा वचकून गेली होती. प्रचंड कुतुहल होते त्या कारचे. पाहुणे निघाले व ते तिवसा येथून अमरावतीला निघाले होते. मला त्याच्या दुसऱ्याच दिवशी बाबा अमरावतीला माझ्या आजोळी सोडणार होते. सहजच ते पाहुणे बोलून गेले की आम्हीच याला घेऊन जातो. आई बाबांनी परवानगी दिली आणि ती परवानगी मिळताच मला झालेला आनंद मी कधीच विसरु शकणार नाही. केवळ पाच मिनीटात माझ्या आईने माझी तयारी करुन दिली व मी माझ्या अत्यंत आवडत्या स्वप्नपूर्तीच्या क्षणांचा आनंद घेत कारमधे बसलो. कारमधे बसल्यावर कुठेही हात लावायचा नसतो असे आईने मला बजाविले होते. कारमधे बसून खिडकीजवळची जागा व जाताना माझ्याकडे कौतुक व आश्चर्याने बघणाऱ्या माझ्या मित्रांना टाटा करीत माझा तो प्रवास सुरु झाला. प्रत्यक्ष कारमधे मी बसलो होतो. माझा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. त्या पाऊण तासाच्या प्रवासात मी प्रत्येक क्षण अक्षरशः आत्ममग्न होऊन जगला. साधारण अडतीस वर्षांपूर्वी मी मिळविलेला आनंद परवा परत अबीरच्या, त्या चार वर्षाच्या निरागस बालकाच्या चेहेऱ्यावर मला बघायला मिळाला..फरक इतकाच होता की मला ज्या गोष्टीचे अप्रुप वाटत नव्हते त्या बाबीचे त्यास प्रचंड अप्रुप निर्माण झाले व ज्या गोष्टी माझ्यासाठी अत्यानंद देणाऱ्या होत्या त्या बाबी अबीरच्या पिढीसाठी मोलाच्या नसून नेहमीच्याच बनल्या आहेत.
गेल्या पस्तीस चाळीस वर्षांमधे पिढी बदलली व सोबत आपल्या सर्वांचे जीवनच बदलले. जुन्या काळी केवळ श्रीमंतांच्या वाटणाऱ्या भौतिक बाबी आता जीवनावश्यक बाबी बनल्यात. कार, फोन, फ्रीज, मिक्सर इत्यादी बाबी सहजच उपलब्ध झालेल्या आहेत व या सर्व भौतिक सुविधांच्या आधारे आरामशीर जीवन जगण्याची सवय आपल्याला व आपल्या पुढच्या पिढीला झालेली आहे. त्यामुळे या लहान मुलांना अतिशय साध्या बाबींचे फार अप्रुप वाटते. अशी अनेक मंडळी माझ्या बघण्यात आहेत की ते किंवा त्यांची मुले बाळे गेल्या दहा वर्षात रेल्वे किंवा बसमधे बसलेले नाहीत. पाचशे किमी परीसरातील त्यांचा प्रवास कारमधेच होतो व त्यापुढील विमानाने. माणसाच्या मेहनत करण्याच्या व त्या माध्यमातून आपली व आपल्या कुटुंबाची आर्थिक व भौतिक स्थिती सुधारण्याची वृत्ती एक चांगली बाजूच मानल्या जाते. आपल्या कुटुंबियांना सारी सुखे प्रदान करणे हे देखील चांगले कर्तव्य पार पाडण्याचे लक्षण आहेच. परंतू यासोबतच कधी कधी कठीण किंवा मनावेगळ्या परिस्थितीमधे सुख शोधण्याची व जुळवून घेण्याची सवय मात्र मुलाबाळांना व आपल्याला ठेवायला हवी. कधी बसचा प्रवास करावा लागला तरीही तो असह्य न होता त्याचा आनंद घेता यावा. रेल्वेत एसीचे आरक्षण मिळाले नाही तरी देखील सामान्य श्रेणीच्या डब्यात खिडकीतून येणारा वारा चेहेऱ्यावर घेत त्या प्रवासाचाही आनंद घेता यावा अश्या प्रकारची मानसिकता असणे गरजेचे आहे. भौतिक सुख सोयींची पूर्तता करीत असताना त्या उपलब्ध नसल्या तरी जीवन थांबल्यागत वाटणार नाही किंबहुना त्याही परिस्थितीतील जीवनाचा मनसोक्त आनंद घेता येईल अशी मानसिकता विकसित करणे गरजेचे आहे. लहान मुलांवर हे संस्कार चांगल्या प्रकारे होऊ शकतात कारण त्यांच्या भौतिक सुख सोयींच्या कल्पना दृढ झालेल्या नसतात. त्यामुळे ठरवून एखाद्या वेळी गर्दीतील बस प्रवास, रेल्वेच्या जनरल बोगीतून प्रवास किंवा सर्वसामान्य स्थितींमधील अनुभव मुलांना घ्यायला लावणे आवश्यक आहे.
त्या दिवशी झुकुगाडीत बसल्याचा आमच्या चार वर्षांच्या अबीरच्या चेहेऱ्यावरचा आनंद एखाद्या मर्सीडीज गाडीत बसून आल्यासारखा होता... अर्थात मर्सीडीज गाडीत बसून आनंदच मिळतो ही देखील आपलीच आधुनिक समजूतच आहे...नाही का? 
 
 

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23