My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

नो म्हणजे नाहीच
एखादी मुलगी जर नो म्हणत असेल तर त्याचा अर्थ नाही असाच होतो. त्याचा अर्थ कुठल्याही प्रकारे हो असा राहू शकत नाही. मुलींच्या कपड्यावरुन त्यांचे चारीत्र्य ठरविण्याची परंपरागत समजूत या नव्या काळात आपण बदलणार आहोत की नाही? मुलीने मित्रासोबत मित्रासारखा व्यवहार केला, त्याच्यासोबत हसून बोलली किंवा त्या गप्पांच्या दरम्यान त्याला स्पर्श केला याचा अर्थ ती शारीरिक सबंधांसाठी तयारच आहे असे समजणे कितपत योग्य आहे? सामाजिक दृष्टीने स्री पुरुष समानता निर्माण झाली असा विश्वास जरी निर्माण झाला तरी देखील तो आभासच आहे कारण चारित्र्याच्या कल्पना पुरुषांसाठी वेगळ्या व स्त्रीयांसाठी वेगळ्याच आहेत. मित्रांमधे वावरणारी, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणारी, बोलताना हातावर टाळी देणारी, तिला आवडतात म्हणून जीन्स वगैरे घालणारी, मित्रांसोबत रात्रीच्या रॉक कन्सर्टला जाणारी, मित्रांसोबत प्रसंगी बीयर पिणारी मुलगी ही वाईट चारित्र्याचीच असते आणि कायम उपलब्ध असते अश्या प्रकारचा या समाजाने करुन ठेवलेला समज अजून किती दिवस आपण ओझे म्हणून सांभाळणार आहोत? बीयर पिणे हे एखाद्या महिलेसाठी चारीत्र्यहनन आहे परंतू पुरुषांसाठी मात्र हेल्थ हायजीन हा भेदभाव का म्हणून? अश्या मोकळेपणाने व स्वतःच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या मुलींना चारित्र्यहीन ठरविण्याचा प्रकार किती दिवस सहन केला जाणार आहे? अश्या खुल्या मनाने वागणाऱ्या मुलींना शारीरिक सबंधांसाठी उपलब्ध आहेत असे मानून त्यांना अपमानित करणाऱ्या युवकाला तिने नो म्हणले.... तरीही त्याने ऐकले नाही व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला... परंतू तिच्या नो चा अर्थ नाही असाच होता, युवर ऑनर.. नो चा अर्थ नाहीच होता.. बायपोलर डीसऑर्डर हा आजार असतानाही केवळ त्या तीन निरपराध मुलींवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी वृद्धापकाळातही कोर्टामधे उभे राहून लढलेल्या खटल्यातील हे अंतीम निवेदन देऊन ॲडव्होकेट दिपक सेहगल जेव्हा खाली बसतात तेव्हा त्या कोर्टातील प्रत्येकजण व तो सेल्युलॉईड वरचा प्रसंग पाहून आपण सर्व प्रेक्षक सुन्न होऊन जातो व मनात वेगवेगळ्या विचारांची श्रुंखला सुरु होते. आपल्याही मनात परंपरागत असलेल्या संकल्पना योग्य की अयोग्य असा विचार सुरु होतो व त्या विचारांमधे असतानाच एका धिरगंभीर आवाजात एका कवितेच्या ओळी आपल्या कानावर पडतात...
जो तुझ से लिपटी बेडियाँ, समझ न इनको वस्त्र तू
ये बेडीयाँ पिघाल के, बनाले इनको शस्त्र तू,
जला के भस्म कर उसे, जो क्रुरता का जाल है,
तू आरती की लौ नही, तू क्रोध की मशाल है
तो धिरगंभीर आवाज असतो महानायक अमिताभ बच्चन यांचा, शब्द असतात तन्वीर गाज़ी यांचे व चित्रपट असतो सुजीत सरकार निर्मित व अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शीत - पिंक...
आजच्या आधुनिक समाजात व सुधारलेल्या सामाजिक स्थितींमधे स्त्री पुरुष समानतेचा आपल्याला अपेक्षित अर्थ व वास्तव यामधील फरक अतिशय ठळकपणे मांडून प्रत्येकाला नव्याने विचार करायला लावणारा, या समानतेच्या वातावरणामुळे स्त्रीयांची बदललेली कृती व त्या कृतीचे परंपरागत पद्धतीनेच केले जाणारे मुल्यमापन आणि परत एकदा स्त्रीयांच्याच माथी लागणारे लांछन या सर्व बाबींबद्दल अतिशय लाऊड अँड क्लीयर संदेश देणारा हा चित्रपट अनेक बाबतीत मैलाचा दगड ठरलाय. अगदी शिर्षकापासूनच ही प्रक्रीया सुरु होते की पिंक म्हणजे गुलाबी रंग हा महिलांशी संबंधित हे कुणी ठरविले पण असे असेल तर त्या पिंक रंगाला कमजोर का समजायचे येथपासून तर स्त्रीयांच्या चारीत्र्याला डागाळण्यासाठी सामाजिक दृष्टीने अस्तित्वात असलेल्या किती प्रकारच्या संकल्पना अस्तित्वात आहेत ज्या वर्षानुवर्षे सांभाळल्या जातात. ज्या बाबींमुळे स्त्रीला सहजच चारित्र्यहीन ठरविले जाते, त्याच बाबी पुरुषांच्या बाबतीत मात्र त्याच्या पुरुषपणाचे लौकिक ठरविणाऱ्या मानल्या जातात. यामुळे समाजाची मानसिकता बदलते आहे की केवळ आभास निर्माण झालाय हा विचार प्रामुख्याने समोर येतो. मैत्रीण दारु पिते म्हणून ती काहीही करण्यासाठी उपलब्ध आहे कारण ती चारित्र्यहीन आहे असा समज मनात बाळगणारा आरोपी त्याच्या बहिणीचा दारु पितानाचा फोटो बघून मात्र चिडून जातो... परंतू हे सारे बोलत असताना त्याने स्वतः देखील दारु पिलेली होती व तरीदेखील त्याचे चारित्र्य मात्र डागाळू शकत नाही याची त्यास खात्री वाटणे ही बाब ठळकपणे या चित्रपटात मांडली आहे.
एका रात्री मोठ्या शहरांमधे नेहेमी होणाऱ्या एका रॉक कॉन्सर्टमधे या तीन मुली जातात व सहजच ओळख झालेल्या तीन मुलांसोबत एका रीसॉर्टमधे जातात. जेवण व ड्रींक ऑफर केले जाते व त्यांच्या मोकळ्या वागण्यामधून त्या तीन मुलांना त्यांच्या चारीत्र्यहीन होण्याची किंवा काहीही करु देण्याची हिंट मिळते. त्या हिंटनुसार त्या तिघींना वेगवेगळ्या कारणांवरुन वेगवेगळ्या खोल्यांमधे नेऊन आपला डाव साधण्याचा प्रयत्न केला जाते परंतू त्यामधे एक घटना घडते व त्यानंतर त्या तीन मुलींच्या जीवनात निर्माण होणारी प्रचंड मोठी उलथापालथ, सीस्टीमद्वारे केले जाणारे वेगवेगळे खेळ, त्यांना अडकवून चारित्र्यहीन सिद्ध करण्यासाठी रचलेला सापळा, त्यामुळे त्यांची होणारी फरपट, व या सर्व त्रासामधून त्यांना सोडविण्यासाठी दिपक सेहगल या वृद्ध वकीलाने या मुलींसोबत राहून दिलेला न्यायालयीन लढा असा या चित्रपटाच्या अत्यंत सक्षम कथेचा प्रवास आहे. परंतू हा प्रवास सेल्युलॉईडवर मांडताना या चित्रपटातील प्रत्येक कलावंताने आपापली भुमिका अक्षरशः मनापासून साकारुन एक अत्यंत रोचक सादरीकरण केलेले आहेच पण त्यासोबत काही महत्वाच्या व सामाजिक दृष्टीने उपयुक्त अश्या बाबी ठळकपणे मांडल्या आहेत. दिपक सेहगलची भुमिका साकारताना अमिताभ बच्चन यांनी मुलींसाठीचे सुरक्षा मॅन्युअल बनवावे हा मुद्दा मांडलाय, ज्यामधून आधुनिक काळात महिलांना आपली चारित्र्यसंपन्नता सिद्ध करण्यासाठी या मॅन्युअल मधील नियम पाळावे लागतील असे व्यंगात्मक पद्धतीने मांडले आहे. मुलींनी रात्री बाहेर फिरु नये, मुलांशी गप्पा मारु नये, मुलांशी बोलताना त्यांना स्पर्श करु नये, चेहेऱ्यावर आवश्यक ती गंभीरता ठेवावी जेणेकरुन त्यांच्या कोणत्याही मोकळ्या वागण्यामधून मुलांना हिंट मिळू नये, त्यांनी कपडे परीधान करताना स्वतःच्या आवडीपेक्षा मुलांच्या उद्दीपीत होण्याचा विचार करावा, तसे काही झाल्यास व त्यामधून त्यांच्यावर अत्याचार झाल्यास जबाबदारी मुलींचीच राहील व सर्वात महत्वाचे म्हणजे या मॅन्युअल द्वारे असेच सांगण्यात यावे की आपल्याला आपल्या मुलांना जर मुलींच्या बाबतीतील गुन्हा करण्यापासून रोखायचे असेल तर हे सर्व नियम मुलींनी काटेकोरपणे पाळावे म्हणजे मुले सुरक्षित राहतील, त्यांच्यावर गुन्हे लागणार नाही.
दिपक सेहगलचा प्रत्येक शब्द आपल्याला विचार करायला लावतो. परंतू या बोलण्यामधे व्यंग जरी असले तरी मुलांना व मुलींनाही यामधे समाजात वावरण्यासंबंधी स्पष्ट संदेश दिला आहे. पण, मी त्या दिवशी त्या मुलांसोबत जायला नको होते हे ओरडून न्यायालयात सांगणारी फलक नावाची मुलगी पुढे विचारते की त्यामुळे मी चारीत्र्यहीन कशी ठरते? किंवा पुर्वांचल राज्यातील आहे म्हणून मला जास्त छेडखानीचा त्रास सहन करावा लागतो हे सांगणारी अँड्रीया किंवा मी नाही म्हणले असताना देखील माझ्यावर जबरदस्ती करु पाहणाऱ्या मुलाच्या डोक्यावर स्वसंरक्षणार्थ बाटली मारणारी मीनल या मुली दोषी कश्या ठरु शकतात हाच प्रश्न महत्वाचा ठरतो. मुलींच्या बाबतीत विचार करताना त्यांचे स्त्रीत्व बाजूला ठेऊन त्यांचे माणुसपण विचारात घ्यायला हवे हाच विचार पिंक चित्रपट स्थापित करतो. चारित्र्य हे दोघांनीही सांभाळण्याची गरज आहे. परंतू एखाद्या स्त्रीच्या नो म्हणण्याचा अर्थ नाही असाच होतो. स्त्री पुरुष समानतेच्या आभासी वास्तवाला समजण्यासाठी हा चित्रपट बघायलाच हवा असा आहे आणि अमिताभ बच्चन यांनी म्हणलेली तन्वीर काझींची कविता ऐकूनच प्रेक्षागृहातून बाहेर पडावे...
तू खुद की खोज मे निकल, तू किस लिये हताश है
तू चल तेरे वजूद की, समय को भी तलाश है...
 

Comments

  1. चांगले प्रबोधन आहे.I LOVE U

    ReplyDelete
  2. चांगले प्रबोधन आहे.I LOVE U

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23