My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

ढोल पथक : एक नवा आयाम
गणपती बाप्पाचा सण अनेक वर्षांपासून आपण साजरा करीत आलो आहोत. लोकमान्यांनी समाजप्रबोधनाच्या व सामाजिक ऐक्याच्या हेतुने सुरु केलेल्या या एका महत्वपूर्ण उपक्रमाला गेल्या शंभर वर्षात वेगवेगळे आयाम प्राप्त होत गेले. स्वातंत्र्योत्तर काळात या उत्सवाचे रुप बदलले ज्यामधे व्याख्यानांच्या जागी आर्केस्ट्रा आला व तोही काळ बराच गाजला. दुरचित्रवाणीचा आपल्या घरात प्रवेश झाला आणि मग या उत्सवामधील कार्यक्रमांचा भाग हळूहळू कमी झाला व गेल्या दोन दशकांमधे भव्य देखावे हे या उत्सवाचे स्वरुप बनले. मोठमोठाले देखावे बनवून लोकांना आनंद देण्याचे कार्य मोठमोठ्या मंडळांनी सुरु केले. स्वाभाविकच या मंडळांमधे त्या निमित्ताने येणारी गर्दी बघून त्यांना राजकीय पाठबळ देखील मिळायला लागले. खरे तर ही एक चांगलीच बाब झाली त्या निमित्ताने हा उत्सव भव्य प्रमाणात साजरा होऊ लागला. रोषणाई, डीजे असले नवे प्रकार देखील यात आले परंतू त्या सोबतच वेगवेगळ्या सांस्कृतिक व सामाजिक देखाव्यांमुळे किंवा मोठमोठाल्या मंदिरांच्या प्रतिकृतींमुळे या उत्सवाला लोकप्रीयतेचा नवा आधार तयार झाला. या माध्यमातून जनसंपर्क वाढवून राजकीय वाटचाल सुदृढ करण्याच्या दृष्टीने देखील प्रयास करणारे मंडळी तयार झाले. शेवटी राजकारणाचा प्रवास हा समाजकारणातूनच व्हावा म्हणजेच प्रगल्भ नेतृत्व तयार होऊ शकते हा आदर्श राजकीय सिद्धांत या निमित्ताने काही प्रमाणात खरा होताना दिसतो हे देखील या बदलत्या उत्सवाचे यश म्हणावे लागेल. या सबंध प्रवासामधे एक बाब मात्र कायम राहिली व ती म्हणजे बाप्पाच्या स्वागतासाठी वाजविले जाणारे ढोल ताशे. अगदी पार स्वातंत्र्यपूर्व काळाचा विचार केला तरी देखील बाप्पाच्या या उत्सवात मोठ्या उत्साहाने वाजविल्या जाणाऱ्या ढोल ताशांचा उल्लेख केल्या गेल्याचे आपल्याला आढळते. मुळात ढोल ताशे हाच एक असा परंपरागत वाद्य प्रकार आहे जो अनेक वर्षांपासून तेव्हड्याच दमाने टिकून आहे. बाकी बरेच वाद्य प्रकार, जसे जुन्या काळी सणासुदीला घरासमोर सनई चौघडे वाजायचे जे आता जवळपास कालबाह्य झालेले आहेत. परंतू ढोल ताशे हा प्रकार मात्र अजूनही टिकून आहे नव्हे त्यामधे आता एक नवा प्रकार घडताना आढळतोय जो मनाला सुखावणारा आहे. हा नवा प्रकार केवळ ढोल ताशे वाजवून उत्साह साजरा करण्यापुरता मर्यादित नाही तर त्याला एक नवा सामाजिक अर्थ देखील प्राप्त होताना दिसतोय, जी एक फारच महत्वाची बाब आहे. हा बदल तसे पाहिले तर छोटासा आहे परंतू त्याचे बारकाईने निरीक्षण केल्यास असे लक्षात येईल की या नव्या प्रकाराच्या संचालनातून एक नवा आधुनिक संदेश आपल्याला प्राप्त होतो आहे ज्याबद्दल गेल्या दशकात अनेक ठिकाणाहून वेगवेगळ्या स्वरुपात विचार मांडले गेले व चर्चा झाल्या. परंतू तोच विचार अश्या प्रकारे प्रत्यक्ष स्वरुपात स्थिरावताना जेव्हा दिसतो तेव्हा जग बदलतंय व चांगल्या प्रकारे बदलतंय हे लक्षात यायला लागते.
साधारणतः दहा वर्षांपूर्वी अचानक अशी स्थिती निर्माण झाली होती की या परंपरागत पद्धतीने चालत आलेल्या ढोल ताश्याच्या प्रकाराला खीळ बसते की काय असे वाटू लागले कारण डीजे नावाचा एक यांत्रीक धांगडधिंग्याचा प्रकार धुडगुस घालू लागला होता. कोणताही समारंभ असो की तेथे डीजे वाजायलाच हवा असा आग्रह दिसू लागला होता. एखाद्या मोठ्या लॉरीवर पंधरा ते वीस मोठे स्पीकर्स लावायचे व त्यावर एक गाणे केवळ तीस सेकंद चालेल अशी अनेक रीदम असणारी गाणी कर्कश आवाजात लावायची व त्या तालावर बेभान होऊन नाचायचे हे त्या डीजे चे स्वरुप असते. या डीजेचे संचालन करणारा एक डीजे मास्टर असतो. त्याचा पोशाख, त्याच्या केसांच्या लटा, त्याच्या हातातील वेगवेगळे बँड्स, त्याचे कानाला हेडफोन लावून केले जाणारे अंगविक्षेप हे सारे प्रकार आवश्यक असतात. तो या डीजे चे संचालन करताना वेगवेगळी गाणी लावतो व सामान्य माणसाच्या कानाला मानविणाऱ्या ध्वनीक्षमतेपेक्षा कितीतरी जास्त मोठ्या आवाजात कानाचे पडदे फाटे पर्यंत हा डीजे वाजविला जातो. नाचणारे तर पूर्ण वेडे झालेले असतात. हा सर्व प्रकार गेल्या काही वर्षांपर्यंत फार मोठ्या प्रमाणात सुरु होता. अंत्ययात्रेलाच तो काय बरे वाटणार नाही म्हणून डीजे वाजत नव्हता अन्यथा एका ठिकाणी तान्ह्या बाळाच्या बारश्याला देखील डीजे लावून बायकांचे नाचणे झाल्याचे माझ्या ऐकीवात आहे. परंतू ते फॅड कमी झाले व परंपरागत ढोल ताश्यांना पुन्हा महत्व प्राप्त झाले. हे महत्व प्राप्त होताना त्यामधे फार मोठी भर पडली ते यासोबत जोडल्या गेलेल्या नव्या विचाराची. तो विचार होता महिला सक्षमीकरणाचा. 
साधारण तीन चार वर्षांपूर्वी अमरावती शहरामधे एका मंडळाच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीच्या जाहीरातीत वैशिष्ट्यांमधे पुण्याच्या ढोल पथकाचा उल्लेख करण्यात आला होता ज्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्या ढोलपथकात असलेला महिलांचा सहभाग असे सांगण्यात आले होते. महिलांनी सहभागी होऊन आतापर्यंत केवळ पुरूषांची मक्तेदारी असलेल्या ढोलपथकासारख्या उपक्रमात घेतलेला सहभाग निश्चितच स्पृहणीय होता. मोठाले ढोल कमरेला बांधून दाण दाण वाजवून त्या पथकाने अमरावतीमधील जवळपास सर्वच चौक दणाणून टाकले होते. कदाचित त्या ढोल पथकाकडूनच प्रेरणा घेऊन की काय पण त्यानंतर वेगवेगळ्या गावांमधे स्वतंत्र ढोल पथके तयार करण्याचा एक वेगळा पण अत्यंत अभिनव प्रकार सुरु झाला. आता तर विदर्भातील जवळपास प्रत्येक महत्वाच्या गावी किमान एक व शहरांमधे तीन किंवा चार स्वतंत्र ढोल पथके तयार झालेली आहेत व त्यामधे महिलांचा सहभाग देखील लक्षणीय आहे. महिला सक्षमीकरणाचे थेट मैदानावर दिसणारे स्वरुप या ढोल ताश्यांच्या रुपाने आपल्याला बघायला मिळते आहे. 
या कामामधे प्रत्येक गावातील नावाजलेल्या मंडळांनी पुढाकार घेऊन ढोलपथके बनविण्याचे ठरविले व पुण्याच्या पावलावर पाऊल टाकून त्या ढोल पथकांमधे महिलांना देखील समाविष्ट करणे सुरु केले. महिलांना संधी व प्रोत्साहन मिळाले तर त्या कोणतीही असाध्य वाटणारी गोष्ट साध्य करुन दाखवितातच. त्यानुसार अनेक महिला या ढोल पथकांमधे सम्मीलीत झाल्या. या सर्व ढोल पथकांचे संचालन कडक शिस्तीत व प्रचंड सरावासोबत केले जाते. उत्सव जवळ आला असेल तर या ढोल पथकांचा रोजचा चार ते पाच तासांचा सराव सुरु असतो. महत्वाचे म्हणजे ढोल ताशे वाजविणे हे वाटते तेव्हडे सोपे काम नाही किंबहुना अतिशय कठीण काम आहे. मुळात जो ढोल ताशे वाजवितो त्याला तालाचे मूळ ज्ञान असणे आवश्यक आहे कारण यामधे वेगवेगळे ताल वाजवावे लागतात. या सोबतच त्या व्यक्तीला लयीचे देखील भान ठेवावे लागते कारण यामधे लयीला फार महत्व आहे. लय बदलत नेणे, सर्वांची समान पद्धतीने बदलणे, ती कमी जास्त केली जाणे हा सर्व किचकट प्रकार साधावा लागतो. या सोबतच यामधे सांघिक भावना जपावी लागते कारण जवळपास शंभर लोक एकावेळी हा प्रकार सादर करीत असतात. पाच ते सहा प्रकारांचे वेगवेगळे ढोल, संदल व वाद्य यात वापरले जातात. कोणत्या वेळी कुणी वाजवायचे, किती वाजवायचे, जोर कसा लावायचा, लय कशी वाढवायची, वाढलेली लय हळू हळू कमी कशी करायची व या सर्व सादरीकरणातून अपेक्षित परीणाम कसा साधायचा हे सारे तंत्र कठोर मेहनतीने साध्य केले जाते. या सर्व मेहनतीमधे महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तयार झालेल्या आहेत. सध्या अशी अनेक मंडळे तयार झालेली असून ही मंडळी दुसऱ्या राज्यांमधेही जाऊन ढोल ताशे वाजविण्याची सुपारी (खास ढोलताशे वाल्यांचा शब्द) घेतात असेही कळते.
सामाजिक दृष्टीने हा किती मोठा सकारात्मक बदल आहे हे तेव्हाच कळायला लागते जेव्हा उणेपुरे पंचेचाळीस किलो वजन असलेली एखादी भगिनी भला मोठा ढोल कमरेला बांधून दोन ते तीन तास रस्त्यावर आपल्या समुहासोबत घाम गाळत जोरदार ढोल वाजविते. बाप्पाच्या उत्सवाच्या निमित्ताने त्यास प्रत्येक गावात प्राप्त झालेला हा नवा सामजिक आयाम बघून बाप्पा या वर्षी खुष होणार हे नक्की. गणपती बाप्पा! मोरया!!
 


Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23