My article published in Hindusthan daily on 13.09.16 under my column थोडा है थोडे की जरूरत है

चांगुलपणाची "अनपेक्षित" किंमत
घटना तशी अगदीच छोटीशी होती परंतू मला जरा आश्चर्यात टाकणारी व पर्यायाने बदलत्या समाजमनाचा विचार करायला लवणारी होती..
माझ्या मुलीच्या फोनमधील सॉफ्टवेअर नादुरुस्त झाले. त्यामुळे फोन बंद पडला. ऑनलाईन केलेली खरेदी असल्याने त्याचा तसा वाली कुणीच नव्हता. परंतू तरी देखील अश्या प्रकारच्या समस्यांना सोडविणारा एक माणूस अमरावती शहरात आहे याचा मला शोध लागला. त्याच्या दुकानात गेल्यावर त्याने एका दिवसात मोबाईल फोन ठीक करुन देतो असे मला सांगितले. नेहेमीप्रमाणे त्या मोबाईल फोन मधील सीम कार्ड व मेमरी कार्ड मी काढून सोबत घेऊन आलो व फोन त्याच्या सुपुर्द करुन दिला. दुसरे दिवशी मी फोन आणण्यासाठी गेलो तेव्हा तो मुळ मालक त्या दुकानात नव्हता परंतू फोन दुरुस्त होऊन तयार होता. त्याच्या दुकानातील त्या सहायकाकडे मी पैसे दिले व फोन घेऊन घरी आलो. घरी आल्यावर त्या फोनमधील सीम कार्ड व मेमरी कार्ड लावण्यासाठी मी फोन उघडला..बघतो ते काय! त्यात एक मेमरी कार्ड लावलेले होते. माझे मेमरी कार्ड माझ्याजवळच असल्याने ते कदाचित त्या दुकानदाराने तपासणीसाठी लावलेले चुकुन त्या फोनमधेच राहीले असणार हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी सामान्यपणे केली जाते अशीच एक कृती केली जी माझ्यामते फार मोठी कृती नसून माझी अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रीया होती. मी त्या दुकानदाराला फोन केला व त्याला झालेला प्रकार सांगितला. त्याला मी सूचित केले की त्याच्याकडील एक मेमरी कार्ड माझ्या मुलीच्या फोनमधे चुकून राहीले आहे व ते मी माझ्याजवळ सुरक्षित ठेवलेले आहे. दुसऱ्या दिवशी मला पहाटेच गावाला जायचे असल्याने मी ते कार्ड त्याच्या पुढील दिवशी आठवणीने आणून देईन. त्या दुकानदाराला मी हे सांगितल्यानंतर त्याच्या प्रतिसादाने मात्र मी चकित झालो..
मी त्याला कार्ड बद्दल माहिती दिल्याबरोबर तो दुकानदार मनापासून आनंदी झाला. त्याने माझे अनेकवेळा आभार मानले. ते कार्ड सापडत नाहीये यामुळे तो चिंतेत होताच. परंतू कार्ड सापडल्याचा त्याला आनंद झालेला मला त्याच्या बोलण्यवरुन जाणवित होता. परंतू कार्ड सापडण्यापेक्षा मी त्याला आपणहून हे सांगितले याचा त्याला जास्त आनंद झाला होता. "सर, मै आपको बता नही सकता की मुझे कितनी खुशी हो रही है, मेरा पाचसौ रुपये का कार्ड आप वापस कर रहे हो, और सबसे बडी बात ये है सर की आपने खुद मुझे फोन करके बताया वरना ऐसा कोई नही करता, सर! मै आपका शुक्रगुजार हूँ, आप मुझे मेरा कार्ड वापस कर रहे हो, आपने मुझे वो आपके सहुलीयत से तीन चार दिन के बाद भी वापस किया तो चलेगा लेकीन मुझे बडा अच्छा लग रहा है की आप जैसे लोग है जो इस तरह से अच्छा बरताव करते है... वगैरे वगैरे" त्याच्या त्या सगळ्या बोलण्यावर मी फार न बोलता "नही, ये कुछ बहोत बडी बात नही है, मै परसों कार्ड वापीस कर दुंगा" असे म्हणून बोलायचे थांबलो. फोन बंद झाल्यावर मात्र मी त्याच्या बोलण्याचा विचार करायला लागलो. खरेच मी केलेली कृती इतकी मोठी होती का? मनातून त्वरित उत्तर आले, अजिबात नाही. खरे तर इतके आभार मिळावे असे मी काहीही केले नव्हते असे मला प्रामाणिकपणे वाटत होते. एक अतिशय साधी कृती ज्यामधे दुसऱ्या कुणाची तरी एक वस्तू चुकून माझ्याकडे आली व ती मी सहजच परत करीत होतो. त्यामुळे त्याचे ते आभार प्रदर्शन बघून मलाच अवघडल्यासारखे झाले होते. आपण न केलेल्या कामाची फारच मोठी पावती मिळाल्यानंतर जसा अवघडलेपणा येतो तसे काहीसे मला झाले होते. दोन दिवसांनी मी त्याला ते कार्ड परत करायला गेल्यावर देखील त्याने मला तश्याच प्रकारे प्रतिक्रीया दिली. त्या दिवशी मात्र मी न राहवून आणि त्याला वाईट वाटले तरी चालेल हे गृहीत धरुन त्याला म्हणालो, "भैय्या, आप जो ये मेरा शुक्रीया अदा कर रहे हो और बार बार मुझे मैने नही की हुई अच्छाई जता रहे हो, ये बात जरा समझ मे नही आ रही है। मै मानता हूँ की आपका कार्ड लौटाके मैने एक अच्छा काम किया है लेकीन आप जिस तरह से शुक्रीया मान रहे हो, ये इतना बडा भी काम नही है। मेरे छोटी अच्छाई की आप मुझे जरा ज्यादाही किमत दे रहे हों। ये बहोतही स्वाभाविक सी प्रतिक्रीया है जो हर कोई देगा, कहीं आप मेरा मजाक तो नही उडा रहे हों?" माझ्या मनात जे होते ते मी त्याला विचारुनच टाकले. त्या माझ्या बोलण्याचे जरा वाईट वाटले असावे परंतू लगेच स्वतःला सावरुन तो मला म्हणाला, "अरे, नही सर! आप मुझे गलत मत समझीये, मै सच्चे दिल से आपके प्रति आभार व्यक्त कर रहा हूँ, सर, मुझे ये काम करते करते ऐसे ऐसे अनुभव आये है जिसमे कई बार मेरा ध्यान नही ये देखकर कार्ड चुरा ले जाना, आपके पास रहा ऐसे कार्ड तो वापस आते ही नही है, काम करवा लेते है और पैसेही नही देते है, या फीर कई बार मै फोन सुधार रहा हूँ लेकीन मैनेही उसे ज्यादा खराब कर दिया ऐसे उलटे इल्जाम मुझपर होते है.. ऐसे कई अनुभव मुझे ग्राहकोंसे आते रहते है.. इसलीये जब कभी, आपने दिया ऐसा अनुभव मिलता है तो मै बहोत ज्यादा खुश हो जाता हूँ.. मैने सच्चे दिल से आपके प्रती आभार प्रकट किया है, आप मुझे गलत न समझे"
त्या दुकानदाराचे म्हणणे ऐकल्यावर मला एका पुस्तकात वाचलेले एक वाक्य आठवले, "आपल्या समाजाचे नुकसान मोजक्या वाईट माणसांच्या वाईंट कृतींपेक्षा मोठ्या प्रमाणातील चांगल्या माणसांच्या निश्क्रीयतेमुळे होते आहे" मी दाखविलेल्या एका अत्यंत छोट्या चांगुलपणाची नको इतकी किंमत जेव्हा मला मिळाली तेव्हा चांगुलपणाची किती किंमत वाढलेली आहे हे देखील जाणविले. समाजपरीवर्तनासाठी मला वाटते यापेक्षा चांगला काळ राहू शकणार नाही. कोणे एके काळी प्रत्येकच जण प्रामाणिकपणे व्यवहार करीत असल्याने त्या प्रामाणिकपणाला देखील किंमत नव्हती. परंतू आता मात्र या काळात आपण केलेल्या छोट्याश्याही चांगल्या कृतीला भरभरुन प्रतिसाद मिळू शकतो कारण ती छोटी कृतीही क्वचित घडते आहे. अश्यावेळी समाजात मोठ्या प्रमाणात वावरत असलेल्या चांगल्या व्यक्तींनी एक एक चांगली कृती जर केली तर वाईट कृतींचा प्रसार करणाऱ्यांना फार वाव उरणारच नाही. व्यवहाराच्या भाषेत बोलायचे झाल्यास चांगुलपणाची अशी किंमत वाढलेली असताना आपण सर्वांनी त्यात व्हॅल्यू अॅडीशन करणे गरजेचे आहे जेणे करुन त्याचा आपल्याला देखील मोठा परतावा मिळेल. सध्या चांगुलपणाच्या शेअर्समधे गुंतवणूक करणे अतिशय फायद्याचे आहे कारण त्यांना फारच मोठी किंमत प्राप्त झालेली आहे. या चांगुलपणाच्या शेअर्समधे जास्तीत जास्त लोकांनी जर गुंतवणूक केली तर सामाजिक सुधारणेचा सेन्सेक्स फार मोठ्या प्रमाणात उंचावेल व तो एकदा उंचावला की मग आपल्याला सर्वांना त्याच्या नफ्याची फळे चाखता येतील. त्यामुळे चांगुलपणाला मोठी किंमत असताना त्यामधे गुंतवणूक करुया!! त्याचा व्यक्तीगत बँक खात्यावर परीणाम होवो न होवो परंतू सामाजिक विकासाच्या व सौहार्दतेच्या बँकेत मात्र भरभरुन नफा दिसणार आहे.
 

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23