My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

पोटचा गोळा
तब्बल चार वर्षांनंतर सुनिलच्या घरात बाळाची चाहुल लागली. घरात येणाऱ्या बाळाच्या लडीवाळ अस्तित्वाच्या स्वप्नांनी सुनिल व त्याच्या पत्नीचे जग व्यापून गेले. अपत्य नसल्याने गेली चार वर्षे त्या दोघांचे क्षणाक्षणाला वाढत जाणारे दुःख आम्हा सर्वांनाच जाणवित होते. वहिनी तर जणू हसणेच विसरली होती. मातृत्व ही स्त्रीची सर्वात मोठी ओळख असते व त्यामुळेच तिला पुर्णत्व प्राप्त होते अश्या विचारांना उराशी बाळगणारी ती असल्याने आपण अपूर्णच आहोत अशी तिला सारखी टोचणी लागलेली असायची. बाळ दत्तक घेऊनही मातृत्व चांगल्या प्रकारे निभावता येतं हे तिच्या शिक्षित बुद्धीमत्तेला पटत होते परंतू त्याने तिच्या भावनिक मनोभुमिकेची समजूत घातली जात नव्हती. वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटस् घेतल्यानंतर मात्र जेव्हा तिला तिच्या पोटच्या गोळ्याची चाहूल लागली तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या बाळाच्या केवळ आगमनाच्या चाहुलीने सुनिल व वहिनीचे जगच बदलून गेले. डॉक्टरांनी जितकी काळजी घ्यायला सांगितली त्यापेक्षा जवळपास दहापट जास्त तिची स्वतःची काळजी घेणे सुरु झाले. सुनिलचे देखील तिच्याकडे पूर्ण लक्ष होते व वहिनी देखील अत्यंत जबाबदारीने वागत होती. गेल्या चार वर्षाच्या काळात हळूहळू दुर्मुख झालेली आमची वहिनी एकदम प्रसन्न दिसू लागली. हसणेच विसरलेली ती, आता खळखळून हसायला लागली आणि काय काय तिचे सुरु झाले ते जेव्हा सुनिलने आम्हाला सांगितले तेव्हा तर एक आई आपल्या पोटच्या गोळ्याच्या अर्थात तिच्या बाळाच्या, तिच्या उदरातील जडण घडणीबाबत किती संवेदनशील असते ते जाणविले. 
आपल्या देहाचा अंश असलेल्या त्या बाळाशी वहिनी रोज गप्पा मारायची - माझ्या बाळा, तुझ्या आगमनाच्या चाहुलीने मी अक्षरशः कृतार्थ झाले आहे. माता म्हणून माझ्या आयुष्याला पुर्णत्व देण्याचे फार मोठे काम तू केले आहेस. तुझ्या आगमनाने मी माझ्या स्त्री जन्माच्या सार्थक क्षणांचा अनुभव घेते आहे. बाळा, आता मी तुझी संपुर्ण काळजी घेणार आहे. माझ्या शरीराचा रोम रोम केवळ तुझ्यासाठी खर्च व्हावा, माझ्या शरीरामधे व मनामधे असणारी सर्व सकारात्मक उर्जा तुझ्या इवल्याश्या प्राणकुपीत स्थापित झालेली आहे. आता त्याचे संवर्धन व रक्षण मी माझ्या संपुर्ण शक्तीनिशी करणार आहे. माझ्या पोटावर हात ठेवल्यावर मला तुझ्या हालचालींचा जो नाद ऐकु येतो त्यामुळे माझे संपुर्ण मन सुरमयी झाल्यागत मला भासतं. त्या नादब्रह्माच्या आनंदलहरी माझ्या सबंध देहाला व आत्म्याला झंकारुन टाकतात. पुढील काही महिने मी या आनंदब्रह्मातच अक्षरशः डुंबून जाणार आहे. नऊ महिन्यांनंतर तू माझ्या शरीरापासून विलग होऊन या जगात जेव्हा तुझा स्वतंत्र पहिला श्वास घेशील तेव्हा कृतार्थ नजरेने तुला बघताना, मी तुझी आई झालेली असेन. माझा अंश तुझ्या रुपाने या विश्वाच्या मानववर्तुळामधे सामील होईल. माझा किंवा माझी तू माझेच रुप असशील. तुझ्या त्या अस्तित्वाचाही विचार माझ्या मनात सदैव येतो. तुला माझ्या शरीरात जपताना तुला पुढील काळातही जपण्याच्या माझ्या योजना तयार झालेल्या आहेत. तुझ्या घरभर रांगण्याने सर्वांची घरात उडणारी तारांबळ मला स्पष्ट दिसतेय. स्वतः टाकलेले तुझे पहिले पाऊल बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रुंचा पहिला अश्रू आताच माझ्या डोळ्यात तरळून गेलाय. शाळेत पहिल्यांदा जाताना तू माझे घट्ट धरलेले बोट मला जाणवून पण झालेय. शाळा संपल्यावर मुलांच्या गर्दीमधे तू लवकर दिसली नाहीस तर माझ्या काळजात होणारे धस्स मला आताच अस्वस्थ करुन गेले आहे. पहिल्यांदा सायकल चालवायला तू शिकशील व तुझ्या सायकलचे कॅरीयर जेव्हा तुझे बाबा सोडून तुला एकटीला पुढे जाऊ देतील आणि मग पुर्णपणे आत्मविश्वासासह सायकलची फेरी मारुन त्या आनंदात तू माझ्या गळ्याला बिलगशील तेव्हा माझ्या ह्रदयाचे ठोके मात्र वाढलेले असतील.. ती ठोक्यांची वाढही मला जाणवून गेली आहे. परगावी शिकायला जेव्हा तू जाशील तेव्हा तुला तुझ्या होस्टेलवर पोहोचायला एक तासही उशीर झाला तर पाणी पाणी होणारे माझे काळीज मी आत्ता या क्षणी अनुभवते आहे. जगरहाटीनुसार तुला आपले घर सोडून तुझ्या पतीच्या घरी जावे लागणार.. आनंदाने सारे विवाह संस्कार पार पडल्यावर मला सोडून जाताना जेव्हा तू माझ्या गळ्यात पडशील तेव्हा माझ्या पोटात पडलेला खड्डा मला आजही जाणवतो..माझ्या हाताला धरुन एक एक पाऊल टाकत तू मोठी होशील आणि पुढे मी म्हातारी होईन. जेव्हा मला चालायला तुझ्या हाताची गरज भासेल तेव्हा मोठ्या आस्थेने तू माझा हात धरशील व तुझ्या आधाराने चालताना मला भरुन पावल्यासारखे वाटेल.. ती कृतार्थतेची भावना मला या क्षणी देखील अनुभवता येते आहे..तुझ्या बाबाला हे सारे सांगितल्यावर त्याने मला वेड्यातच काढले.. पण खरे सांगू बाळा! तो पण असाच सगळा विचार करतो. तुझी माझ्या शरीरातील हालचाल जेव्हा त्याच्याही हाताला जाणविली तेव्हा टचकन पाणी आले होते त्याच्या डोळ्यात.. पण मला कळू दिले नाही. माझ्यासमोर तो प्रॅक्टीकल असल्याचा आव आणतो पण त्याची इमोशनॅलीटी मलाच ठाऊक आहे. त्या दिवशी डॉक्टरांनी जेव्हा तुझे वजन बरेच कमी आहे असे सांगितले तेव्हा तो हादरुन गेला. मी तर रडायलाच लागले. त्या दिवशीपासून तो मला एकही काम करु देत नाही. सारे काही बसल्याजागी मिळू लागलेय मला. मला म्हणतो, राणीसरकार, आमच्याकडून सेवा करुन घ्या !! एक गम्मत सांगू? ही सारी सेवा तुझ्या काळजीपोटी आहे गं बाळा! माझ्यासमोर तुझा बाबा मला खूप धिर देतो..पण मला त्याचे मन कळतेय.. ते देखील तुझ्या काळजीने भित्र्या सशागत झालंय. याचे कारण काय आहे बाळा, ठाऊक आहे? आम्ही दोघेही तुझ्या अस्तित्वासोबत जोडले गेलो आहोत आणि दिवसागणिक तुझ्या आमच्या जिवनात भविष्यातील सहवासाचा विचार करीत असतो. तुझ्या आगमनाने आम्ही जणू आमचे स्वतंत्र अस्तित्व विसरुनच गेलोय व तुझ्या पिटुकल्या पण आमच्यासाठी आमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या अस्तित्वामधे विलीन झालेलो आहोत. - वहिनीच्या या साऱ्या गोष्टी सुनिल नित्य नियमाने आम्हाला सांगायचा. आई-बाप होण्याचा व मुलांच्या अस्तित्वामधे विलीन होऊन सार्थक होण्याचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतलेला असल्याने त्याच्या व वहिनीच्या भावना आम्ही समजू शकत होतो. आता पुढील काही महिने हे सुरु राहणार नव्हे वाढत जाणार असेही आमचा एक मित्र गमतीने म्हणाला होता...तसे खरेच सुरु राहीले.. सुनिल व वहिनीचे बाळाच्या अस्तित्वाबाबत स्वप्ने बघणे सुरु राहीले..बरेच दिवस..पूर्ण नऊ महिने..
..परवा रात्री ११ वाजता सुनिलचा फोन? मी दचकलो.. अवि, हिला दवाखान्यात आणलंय.. काहीतरी प्रॉब्लेम आहे.. लवकर ये! दहाव्या मिनीटाला मी दवाखान्यात पोहोचलो.. वहिनीचे नऊ महिने भरले होते.. एक दोन दिवसात तिला दवाखान्यात आणायचेच होते.. पण अचानक त्रास झाल्याने...तिला तपासल्यावर रात्री १२.३० वाजता मी व सुनिल डॉक्टरांसमोर बसलो होतो.. त्यांचे वाक्य पूर्ण होताच सुनिलचे काय झाले ते सांगणे कठीण आहे.. माझा हात त्याने घट्ट दाबून ठेवला.. जोरात ओरडून रडायचे होते त्याला कदाचित..पण केवळ माझ्या खांद्यावर डोके टेकवून शांत बसला..सुन्न होऊन..डॉक्टर म्हणाले होते...बाळाच्या ह्रदयाचे ठोके लागत नाहीये..बहुदा ते गेलंय.. पहाटे बाकी प्रक्रीया करण्यात आली. वहिनीचा सुटका झाली. अद्याप त्या माऊलीला काहीच ठाऊक नव्हते. दोन तासात ती शुद्धीवर आली व गलीतगात्र झाली असली तरी सर्वप्रथम तिने प्रश्न विचारला - माझे बाळ कुठाय?..डॉक्टर सुनिलला म्हणाले, सुनिल, या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच तिला द्यावे. सुनिलच्या खांद्यावर मी अलगद हात ठेवला. माझ्या स्पर्शातून मला काय म्हणायचे ते त्याला कळले..त्यानंतर मोठ्या धिराने तो वहिनीच्या खोलीकडे गेला... आत जाऊन त्याने दार लावून घेतले. तो गेला त्या दिशेला बघत असताना नकळत त्या दोघांची त्यांच्या बाळाबद्दलची ती सारी स्वप्ने डोळ्यासमोर तरळून गेली पण मग डोळ्यात आलेल्या अश्रुंनी अलगद पुसल्या देखील गेली.
आपले आई-वडील आपल्या अस्तित्वाशी किती तीव्रतेने व संपूर्णपणे बांधले गेलेले असतात हे जर या जगातील प्रत्येक मुलामुलीला कळले तर म्हातारपणी आपल्या जन्मदात्या मातापित्यांना वाऱ्यावर सोडून निघून जाण्याची अवमानजनक कृती कुणी करणार नाही असे वाटते. हे सारे वाचून कळू शकेल? 
 

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23