My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

जीवनाची वाढलेली (पण न कळणारी) किंमत
"सध्याचे हे सारे जे सुरु आहे ना याबद्दल मला विचाराल तर थोडक्यात मी याचा उलगडा करुन देते... झालं असं आहे की सध्या प्रत्येक माणसाच्या जीवनाची किंमत वाढली आहे आणि सोबतच ती त्याला जाणवायलाही लागली आहे. शिक्षणामुळे, बदलत्या वातावरणामुळे, रोज नव्याने उपलब्ध होत असलेल्या संधींमुळे प्रत्येकाला आपल्यातल्या स्वतः ला भेटण्याची संधी मिळते, त्या निमित्ताने आपल्या स्वतःला काय आवडते काय नावडते याबद्दल विचार करता येतो व त्यानुसार जीवनाची दिशा ठरविण्याची मुभा असल्याने हा सगळा स्वतंत्रतेचा आविष्कार बघायला मिळतो. आपल्याच जीवनाची किंमत वाढलेली जेव्हा आपल्याला कळते तेव्हा त्या किंमतीनुसार माणूस वागणे सुरु करतो, ती किंमत जपण्याचाही प्रयत्न करतो आणि वारंवार ती किंमत इतरांच्या मनावर वेगवेगळ्या उपाययोजनांनी ठसविण्याचाही प्रयत्न करतो. आता या सगळ्या प्रकारात गंमत अशी आहे की एका बाजूने माणसाला माणसाची किंमत कळणे व त्यानुसार त्याच्या जीवनाची वाटचाल होणे या दोन्ही बाबी सत्यतेच्या निकषावर एकमेकांना पुरक ठरु शकतात व चांगल्या प्रकरची स्वाभीमानी व्यक्तिमत्वे तयार झालेली आपल्याला दिसतात. पण जर एखाद्या व्यक्तीला आपल्या स्वतःच्या जीवनाची किंमत आवश्यकतेपेक्षा किंवा आहे त्यापेक्षा जास्त जाणवायला लागली तर मात्र घोटाळा होतो. अश्या व्यक्ती आभासी जीवन जगायला लागतात. त्यांना आपल्या जीवनाची फार नसलेली किंमतही येन केन प्रकारे लोकांना भासवावी लागते. असे लोक आपल्या भोवती आपल्याबद्दल चांगले बोलणारे लोक मुद्दाम निर्माण करतात व त्यांच्याकडून स्वतःच्या किंमतीचे गुणगान करुन घेतात. हे असले लोक आभासी जगालाच खरे मानू लागतात व त्यामधून त्यांच्यात एक प्रकारचा खोटा अहंकार जागृत होतो. त्या अहंकाराची त्यांना सवय देखील होते व त्यानंतर त्या अहंकाराला वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या पद्धतींनी जोपासण्याचे कार्य असे लोक करीत असतात. यासोबतच एक आणखी वेगळा प्रकार आपल्याला व्यक्तींच्या वागणूकीचा बघायला मिळतो, तो म्हणजे आपल्या जीवनाची किंमत खरीखरी आहे त्यापेक्षा कायम बरीच कमी आहे असे विनाकारणच भासवीत राहणे. या असल्या प्रकारच्या व्यक्तींचाही समाजातील वावर संभ्रम निर्माण करणारा असतो. या व्यक्तींना स्वतःला सर्व प्रक्रीयेपासून दूर ठेवण्याचा आभास निर्माण करण्यात आनंद मिळत असतो. या असल्या मंडळींच्या वागणूकीमधे बरेचवेळा नकारात्मकता जाणवीत राहते व त्या नकारात्मकतेचा परीणाम त्यांच्या सहवासात वावरत असलेल्या मंडळींवरदेखील होत असतो. समाधानी तेच राहू शकतात व समाधान तेच देऊ देखील शकतात ज्यांना आपल्या स्वतःच्या आयुष्याची योग्य किंमत कळलेली आहे व त्यानुसारच त्यांचे जीवनक्रमण सुरु आहे. जे आहे व जे दाखविले जाते यात जेव्हा कमीतकमी अंतर असते तेव्हाच व्यक्तिमत्वाचा विकास योग्य पद्धतीने झालेला आहे असे आपण समजायला हवे. एकंदरीत जी काही संभ्रमावस्था निर्माण झालेली दिसते आहे ती या दोन टोकाच्या व्यक्तींच्या त्यांच्या आयुष्याची किंमत योग्य पद्धतीने समजून न घेतल्यामुळे झालेली आहे. दुर्दैवाने अश्या संभ्रमित स्थितींमधे वावरणाऱ्या मंडळींची संख्या फार मोठी आहे." जीवनातील सध्या निर्माण झालेल्या विविध समस्यांच्या बाबतीत सहजच रंगलेल्या एका चर्चेमधे माझ्या मित्राच्या ऐंशी वर्षाच्या व जुन्या काळात प्री मॅट्रीक पर्यंत शिक्षण घेतलेल्या एका आजीने व्यक्त केलेले हे मत ऐकून आम्ही सर्वजण अक्षरशः अवाक झालो. मित्राकडे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलो असता सहजच चर्चा सुरु होती. चर्चेमधे प्राध्यापक, डॉक्टर्स, वकील, व्यावसायीक अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे लोक सहभागी होते. माझ्या मित्राची ती आज्जी शांतपणे जरावेळ सगळ्यांचे विचार ऐकत बसली होती. गात्रे थकली असल्याने कोणत्याही कामात हातभार लागू शकत नव्हता म्हणून आज्जी एका कोपऱ्यात आपल्या खुर्चीवर बसून आमच्या या चर्चा ऐकीत होती. अचानक मी काही बोलले तर चालेल का असे विचारुन आज्जीने जे काही सांगितले ते ऐकल्यावर आमच्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या स्वतःची चर्चेच्या निमित्ताने वाढलेली किंमत जरा कमी झाल्यासारखी वाटू लागली. जीवनाचा प्रदीर्घ अनुभव असलेली व या अनुभवांचा आधार स्वतःचे तीव्रतेने जगलेले जीवन अश्या पद्धतीचा मेळ असलेली ती आज्जी काही वाक्यांमधेच सद्यस्थितीमधील समस्यांबाबत प्रभावी भाष्य करुन गेली. या आजीला बोलते ठेवण्यासाठी मी तिला प्रश्न विचारला, "मग आजी तुझ्या जीवनाची किंमत तुला कळली नव्हती का?" आजी हसली. माझ्या प्रश्नातील छोटीशी खोच तिच्या लक्षात आली. माझ्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्या आज्जीने सांगितलेल्या बाबी आम्हा सर्वांना जुन्या व नव्या पिढीचा फरक सहजच समजावून गेल्या.
आज्जी मला म्हणाली, "बेटा, मला माझ्या आयुष्याची, जीवनाची किंमत कळली होती परंतू त्या किंमतीला सामाजिक दृष्टीने मांडण्याची किंवा भासविण्याची परवानगी आयुष्यभर मिळाली नाही. एक स्त्री म्हणून आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता इतरांच्याच आयुष्यासाठी आपल्याला समर्पित व्हायचे आहे हाच विचार लहानपणापासून रुजविण्यात आला होता त्यामुळे माझ्या व माझ्यासारख्या अनेक महिलांची विचाराची मूस तशीच तयार झालेली असल्याने नंतरच्या काळात तर आपल्या जीवनाला किंमत असू शकते हा विचारही मनात येणे बंद झाले होते. परंतू त्यामुळे देखील मी खुश होते. कारण काहीही प्राप्त न करण्याची विरक्ती वयाच्या फार लवकरच्या टप्प्यावर भेटल्यामुळे त्रास फारच कमी होत गेला. आपले आयुष्य पतीच्या जीवनाशी बांधल्या गेलेले असून त्यासोबत येणाऱ्या सर्व कर्तव्यांची पूर्तता करणे हेच आपल्या आयुष्याचे एकमेव साध्य आहे हे ज्या दिवशी मनोमन पटले त्या दिवशी माझ्या आयुष्याच्या किंमतीचा शोध थांबला व मी सुखी झाले." "पण मग आज्जी," मी त्याच मुद्दयावर आज्जीला जरा अडचणीत टाकण्यासाठी विचारले, "याचा अर्थ आता ज्यांना आपल्या जीवनाची किंमत कळली आहे ते दुःखी आहेत असे समजायचे का?" आज्जी गालातल्या गालात हसत म्हणाली, "प्राचार्य, तुम्ही मला शब्दात अडकवू बघताय. मला जे म्हणायचे आहे ते समजून घ्या..."
"...नव्या काळात जीवनाची किंमत समजणे व त्याला अनुसरुन स्वाभीमानाने जगणे यालाच तर खरे जीवन म्हणायचे. परंतू आपल्याला जी कळायला हवी ती शंभर टक्के खरी किंमत कळायला हवी हे माझे म्हणणे आहे. तुम्हा मंडळींना तुमची खरी किंमत कळत नाही व आभासी किंमतीच्या भरवश्यावर तुम्ही खोटे जीवन जगू लागलाय हे माझे म्हणणे आहे. कारण असे नसते तर मग कधी नव्हे ती संभ्रमावस्था, विषण्णता, तणाव, फसवाफसवी या सगळ्या गोष्टींचा अतिरेक नसता झाला ना? हे सारे होतेय याचे कारण तुम्हा मंडळींना जीवनाची खरी किंमत कळलेली नाही." आज्जीच्या मताशी संपुर्णपणे सहमत होऊन मी शेवटचा प्रश्न विचारला, "आज्जी, ही खरी किंमत कशी कळू शकेल?" आज्जीने माझ्या प्रश्नाचे जे उत्तर दिले ते नव्या युगात वावरणाऱ्या आपल्यापैकी प्रत्येकासाठी मार्गदर्शक तत्व ठरु शकते...
आज्जी म्हणाली, "सोप्पंय! त्यासाठी आपल्या विनाकारण व्यस्त बनवून घेतलेल्या आयुष्यातून जरा वेळ काढून एखाद्यावेळी स्वतःच्याच आयुष्यासमोर आरश्यासारखे स्वच्छ होऊन बसून तर बघा... त्या नीतळ पृष्ठभागावर स्वच्छपणे उमटलेल्या आपल्याच प्रतिबिंबाकडे एकदा संपुर्ण प्रामाणिकपणे बघा.. आपल्या जीवनाची खरीखुरी व यथोचित किंमत मनात ठळकपणे उमटेल.. ती प्रतिमा कायम जपून ठेवा.. बघा जीवन किती छान, सोप्पे व आनंदी वाटू लागते" मला  पटकन ओळी आठवल्या,
"जिंदगी के आईने पे जमी गर्द अब साफ करें
    चलो आज खुद से खुद को रुबरु करें।"
शिक्षणाच्या विविध पदव्यांनी स्वतःला समृद्ध मानत असलेल्या आम्हा प्रत्येकाला त्या प्री-मॅट्रीकचे शिक्षण घेतलेल्या आज्जीने जो उपदेश केला तो एकाच कारणामुळे....जीवनाची खरी किंमत तिलाच कळली होती जी पदव्यांमुळे नाही तर सशक्त जीवनानुभवामुळे व विचारक्षमतेमुळेच कळू शकते.
 

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23