My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

वाय + झेड = वायझेड
माझं वय असं आहे की ना धड मला स्वतःला तरुण म्हणविता येत ना धड मध्यवयीन. तरुण म्हणावे तर तरुण लोक करतात त्या गोष्टी मला आगाऊपणाच्या व वाह्यातपणा वाटतात. पण मग सरळ मध्यमवयीन हे बिरुद देखील स्विकारायला मन धजावत नाही कारण एखादी वीशीतली पोरगी काका म्हणते तेव्हा मनात वेदना होतात. काका म्हणण्यापेक्षा लादेन किंवा दाऊद म्हणले तरी चालेल असे त्या पोरीला म्हणावे वाटते. माझं अद्याप लग्न झालेले नाही, लग्न करण्याची इच्छा तर आहे पण मी लग्नासाठी परफेक्ट मटेरीयल नाही असे मला वाटायला लागले आहे. मी नक्की काय करतोय किंवा मला काय करायचंय हेच मला कळत नाहीये.... वायझेड या नव्या मराठी चित्रपटातील तेहेतीस वर्षांचा नायक स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला सांगत असतो. हा नायक स्वतः वाय जनरेशनचा सदस्य आहे. वाय जनरेशन म्हणजे साधारण १९७१ ते १९९५ दरम्यान जन्म झालेली पिढी. या पिढीचे, तिच्या मानसिकतेचे व तिच्या स्वभावगुणांचे हा नायक प्रतिनिधित्व करीत असतो. संपुर्णपणे गोंधळून गेलेला. मोठ्या वयाच्या मित्रांमधे जाण्यास टाळणारा व तरुणांच्या म्हणजेच झेड जनरेशनच्या वेगात भांबावून जाणारा असा हा वाय जनरेशनचा माणूस स्वतःचा शोधच घेऊ शकत नाही. वायझेड या चित्रपटातील नायक ज्या भांबावलेल्या स्थितीचा सामना करतो ती स्थिती वाय जनरेशनचे लोक नेहमीच अनुभवित असतात. झेड जनरेशनशी जुळवून घेता घेता त्यांची पुरेवाट होते.
मी व माझी पत्नी एकदा एका कॉफी शॉपमधे कॉफी पिण्यासाठी गेलो होतो. तेथील वातावरणात आम्ही संपुर्णपणे विपरित होतो. वेगवेगळ्या टेबल खुर्च्यांवर झेड जनरेशन विखुरलेली होती. सर्वांचे आपापल्या ग्रुपमधे काहीना काही परंतू साधारण सारख्याच प्रकारचे वागणे सुरु होते. प्रत्येकाजवळ मोबाईल फोन होते, त्यावर काही ना काही शेअर करणे, सेल्फी काढणे व त्या शेअर करणे, त्यावरील कॉमेंट्स वाचणे त्याच्यावर पुन्हा कॉमेंट्स देणे असा सगळा प्रकार सुरु होता. एका ग्रुपकडे आमचे जरा विशेष लक्ष गेले. त्यामधे एक साधारण पार्ट वन ला असलेली एक मुलगी व चार मुले असा तो ग्रुप होता. ती मुलगी मोकळे केस सोडून,खुर्चीवर पाय वर घेऊन छान निवांत बसली होती. तिच्या सोबतच्या मित्रांनी तिच्या दिसण्याचे फार कौतुक केले असणार त्यामुळे त्या कौतुकाच्या ढगांवर ती अक्षरशः तरंगत होती. सारखे केस सारखे करणे, पाऊट करणे (फोटो काढण्यासाठी ओठांचा विशिष्ट प्रकारचा चंबु करणे याला पाऊट असे म्हणतात, मुद्दाम वाय जनरेशनच्या मंडळींना समजावे म्हणून स्पष्टीकरण) व तिचे चौघेही मित्र तिचे वेगवेगळ्या अँगलने फोटो घेत होते. चार चार फोटो काढणारे मिळाल्यावर तिला तर सेलेब्रीटी झाल्यागत वाटत होते. अचानक मी माझ्या पत्नीला म्हणालो की, जर या फोटोंचा गैरवापर झाला तर किंवा ही रात्री सव्वा नऊच्या सुमारास या चार मुलांसोबत येथे आहे याचा अर्थ होस्टेलवर राहणारी असणार, रात्री होस्टेलवर नीट पोहोचू शकेल की नाही? यासारखे आणखी काही विचार ज्या विचारांनी काळजी वाटू शकते असे आम्हा दोघांच्याही मनात येऊन गेले. त्या विचारांमुळे आम्हाला कॉफीचा आनंद तर घेता आलाच नाही किंबहुना दोघेही त्याच विचारात एकमेकांशी अजिबात न बोलता घरी आलो. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्या सगळ्या विचारांसोबत ते पाचही जण जेव्हा गेले तेव्हा मोटरसायकलवर ती मुलगी दोन मुलांच्या मधे बसून गेली. तिला तसे जाताना बघून तर मन बेचैन झाले. आम्ही दोघेही कमालीचे बेचैन झालो होतो परंतू त्या मुलीच्या चेहेऱ्यावर भयाचा किंवा काळजीचा लवलेशही नव्हता. ती तिच्या मित्रांची कंपनी, त्यांचे फोटो काढणे, त्यांच्या कॉमेंट्स, त्यांची त्या निमित्ताने घडणारी जवळीक, त्यांचे मधून मधून होणारे स्पर्श हे सारे मस्त एन्जॉय करीत होती. तो सगळा प्रकार तिच्यासाठी अत्यंत कॉमन व विश्वास पात्र होता. असेलही. परंतू आपल्या या जगात दररोज घडणाऱ्या अनेक घटना मनात घर करुन राहील्यामुळे या झेड जनरेशनचा हा प्रकार काही केल्या पचनी पडत नव्हता...
....निखळ मैत्रीकडे तूम्ही कायम संशयाच्या नजरेनेच बघाल तर तुम्हाला असेच वाटणार! झेड जनरेशनची दुसरी एक तरुणी मला तावातावाने मी हा प्रसंग सांगितल्यावर समजवायला लागली. तुमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला कायम तुमच्या अनुभवांच्या व विचारकक्षेच्या अनुषंगानेच चौकटी आखायच्या असतात आणि त्या देखील अतिशय बंदिस्त असतात त्यामुळे असले काही तुम्हाला बघवत नाही. अशीही मैत्री राहू शकते नव्हे असतेच. कदाचित तुम्हाला अश्या प्रकारे स्वतंत्र जगता आले नाही त्यामुळे आताची आमची जनरेशन जे करतेय त्याला तुम्ही वावगे ठरवताय. कशावरुन ती चार मुले तिला सांभाळणार नाहीत. ती मुलगी होस्टेलवर राहते पण तिला ते कशावरुन नीट सोडून देणार नाहीत. मित्रांचे जसे फोटो काढले जातात तसेच व त्याच भावनेने ते तिचे फोटो काढीत होते असे का वाटत नाही. तिच्या मैत्रीणी एखाद्यावेळी तिला मदत करणार नाहीत तेव्हडी मदत तिचे चार मित्र तिला करीत असतील नव्हे करतातच. मग या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही का म्हणून चुकीच्या पद्धतीने बघत आहात. ती मुलगी इतकी बिनधास्त होती याचा अर्थ तिला त्या मुलांवर पूर्ण विश्वास होता आणि तिला जर तो वाटत असेल तर मग तूमच्या अस्वस्थ होण्याला काय अर्थ आहे. हा सगळा तुमच्या नकारात्मक व पूर्वग्रहदूषित मानसिकतेचा परीणाम आहे. आम्ही मैत्री करु शकतो, ती सांभाळू शकतो व चांगल्या प्रकारे निभावू देखील शकतो.. तीन पंच मधे अगदी अमिताभ बच्चनला शोभावा असा डायलॉग मला तिने ऐकविला आणि बोलणे थांबविले. यापुढे तिला खरे तर सांगण्यासारखे माझ्याकडे खूप काही होते परंतू तिच्या मतांचा आदर करीत मी विषय थांबविला. मनात मात्र विचार सुरु राहीले.
या जगात अश्या प्रकारे वाय आणि झेड जनरेशन्स कायमच अस्तित्वात असाव्यात बहुदा. फक्त या वाय आणि झेड मधले कधी नव्हे ते वाढलेले अंतर मात्र धोक्याची घंटा आहे. सुरुवातीच्या काळातही दोन पिढ्यांमधे मतमतांतरे असायची परंतू बऱ्याच बाबतीत एकमत व्हायचे. परंतू आता मात्र या वाय आणि झेड पिढ्या जणू वेगवेगळ्या जगात वावरताहेत असेच वाटू लागले आहे. दिवसेंदिवस हे अंतर वाढते आहे. शिक्षण क्षेत्रात वावरायचे असल्याने या नव्या झेड जनरेशनच्या आवडीच्या जवळपास सर्वच गोष्टी माहीती करुन घेणे मला क्रमप्राप्त आहे. त्यानुसार तंत्रज्ञानाच्या सर्व नव्या बाबींची माहीती करुन घेणे सुरु असते, सोबतच या सर्व प्रकारांमधे सहभागी होऊन काही प्रमाणात हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न देखील केला जातो. अन्यथा बरेच वेळा तर हे झेडस् कोणती भाषा बोलता ते देखील कळत नाही. माझा त्याचाही अभ्यास बऱ्यापैकी सुरु असतो. परंतू तरी देखील जगाचा थोडा जास्त अनुभव म्हणून काही गोष्टी पटतच नाहीत व त्यामुळे कधीकधी धास्ती वाटायला लागते. केवळ मोबाईल वापरु दिला जात नाही म्हणून महाविद्यालयातून नाव काढण्यासाठी अर्ज केलेल्या सहा विद्यार्थिनींना बरेच वेळा समजावूनही त्यांचे मोबाईलचे वेड मी दूर करु शकलो नाही तेव्हा मात्र त्या झेड व माझ्या वाय जनरेशनमधे पडलेली मोठ्ठी दरी मला स्पष्ट दिसू लागली.
या वाय आणि झेड मधील अंतर जमेल तेव्हडे कमी करणे हे आता एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सगळ्या झेड्सनी व सगळ्या वायस् नी प्रयत्न करण्याची गरज आहे. अश्या प्रकारे दोघांच्याही परस्पर सामंज्यस्यातून वायझेड होण्याची नितांत आवश्यकता आहे. येत्या काळात असे वायझेड झाल्यास अनेक समस्यांचे आपोआप निराकरण झालेले असेल. चला तर मग वायझेड करण्याच्या दृष्टीने प्रयास करुयात... 
 

  

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23