My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

स्वच्छ व पारदर्शी
दोन वर्षांपूर्वी नागपूरच्या एका महाविद्यालयामधे मला प्राध्यापक पदाच्या मुलाखती घेण्यासाठी विषयतज्ञ म्हणून बोलाविण्यात आले होते. उच्चशिक्षण प्रक्रीयेमधे मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांपैकी हे एक महाविद्यालय आहे. मला त्या महाविद्यालयात विषयतज्ञ म्हणून मुलाखतींकरीता जाण्याची बरेच वेळा संधी मिळाली. प्रत्येकवेळी मला तेथे जाणविलेली स्वच्छ व पारदर्शी प्रक्रीया मनाला सुखावून जाते. दोन वर्षापूर्वी एका प्रक्रीयेत सहभागी झाल्याचे व त्यावेळी केलेल्या कर्तव्याचे फलीत मला नुकतेच अनुभवायला मिळाले. मी सहभागी झालेल्या प्रक्रीयेचा दोन वर्षांनतरचा परीणाम माझ्यासारख्या शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला फारच आनंद व समाधान देणारा होता. त्या आनंदाला कारणीभूत ठरलेली त्या महाविद्यालयाच्या प्राचार्य मॅडमने नुकतीच दिलेली उत्स्फुर्त प्रतिक्रीया फारच मोलाची होती. चांगले काम केल्याची अशी पावती आपल्याला बरेचवेळा आणखी चांगले कार्य करण्याची नवी उमेद देऊन जाते. मला माझ्या छोट्याश्या परंतू प्रमाणिकपणे केलेल्या कामाचा आनंद तर होत होताच परंतू ती प्रक्रीया राबविणाऱ्या त्या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाबद्दल माझ्या मनातील आदर दुणावून गेला. आजही ती प्रक्रीया माझ्या डोळ्यासमोर ठळकपणे उभी राहते.
वरीष्ठ महाविद्यालयामधे इंग्रजी विभागात पूर्णवेळ प्राध्यापकाची नियुक्ती करण्यासाठी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या नियमानुसार दोन विषयतज्ञ अन्य विद्यापीठातील मान्यताप्राप्त शिक्षक असावे म्हणून मला पाचारण करण्यात आले होते. त्यापूर्वी अनेक ठिकाणी मुलाखती घेण्याचा अनुभव गाठीशी असल्याने संमिश्र स्वरुपाची मानसिकता घेऊनच मी तेथे पोहोचलो. मुलाखतीसाठी संपुर्ण समिती मुलाखत कक्षामधे स्थानापन्न झाल्यावर प्राचार्यांनी संस्थेच्या व मुलाखत समितीच्या अध्यक्षांशी सर्वांचा परीचय करुन दिला. संस्थेच्या अध्यक्षांनी सर्वांचे अभिवादन केले व एक छोटेसे पण अतिशय प्रभावी संबोधन केले. ते म्हणाले - आपण सर्व तज्ञ मंडळी आमच्या महाविद्यालयात आलेले आहात व आपल्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या भरवश्यावरच आम्ही आमच्या परीवारामधे दोन नव्या सदस्यांना सामावून घेणार आहोत. अत्यंत उच्च शैक्षणिक व नितीमुल्यांची परंपरा असलेल्या या महाविद्यालयात त्या परंपरेला शोभणाऱ्या व आपल्या शैक्षणिक कार्याप्रती संपुर्ण समर्पण देऊ शकणाऱ्या बुद्धीमान व्यक्ती आपण निवडाव्या अशी मी आपल्याला विनंती करीत आहे. आपण तज्ञ आहात व आपल्या निवड क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सर्व कसोट्या चोखपणे लावून आपण निवड करावी व आपल्या निवडीमधे मी किंवा माझे व्यवस्थापन कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही या करीता मी आपणा सर्वांना आश्वस्त करीत आहे. आपला सर्वानुमते झालेला निर्णय अंतिम राहील याबद्दल आपण निश्चिंत रहावे. या स्वच्छ व पारदर्शी प्रक्रीयेमधे सम्मीलित होताना आपण तशी प्रार्थनारुपी प्रतिज्ञा करुयात... हा सबंध प्रकार माझ्यासाठी व माझ्यासोबतच्या अन्य विषयतज्ञांसाठीही फारच आश्चर्यकारक होता. ज्या प्रकारे त्या अध्यक्षांनी संबोधन केले व त्यानंतर ज्या प्रकारे ती प्रतिज्ञा म्हणल्या गेली त्यामुळे आपण एक अत्यंत महत्वाचे कार्य करणार आहोत व त्या कार्यामधील आपल्या मताचा सन्मान केला जाणार आहे ही भावना आम्हाला मनापासून सुखावून गेली. ती प्रतिज्ञा देखील त्या संबोधनाला पुरक अशी होती. आम्ही शिक्षक निवडीचे कार्य अत्यंत मनापासून व निःपक्षपातीपणे करु, केवळ बुद्धिमत्ता व शैक्षणिक गुणवत्ता यांस प्रमाण मानून आम्ही आमच्या जबाबदारीचे निर्वहन करु. शिक्षण हे पवित्र व ईश्वरी कार्य असल्याने या प्रक्रीयेत दोन नवे शिक्षक जोडीत असताना ही संपुर्ण प्रक्रीया पारदर्शीपणे पार पाडू अश्या आशयाची ती प्रतिज्ञा होती. सर्वांनी त्या प्रतिज्ञेचे उच्चारण केल्यानंतर प्रक्रीया सुरु करण्यात आली. अध्यक्षांनी सुरुवातीलाच इतकी स्वच्छ भूमिका मांडल्यामुळे आम्ही सर्व विषयतज्ञांनी मनापासून मुलाखती घेतल्या. प्राध्यापकासाठी लागणाऱ्या सर्व बाबी जसे, विषयज्ञान, अध्यापनाच्या पद्धती, कल्पकता, तंत्रज्ञानाची हाताळणी, शिक्षण क्षेत्राबद्दलची भूमिका, अवांतर वाचन, सामाजिक सहभाग यासारख्या अनेक मुद्द्यांवर सविस्तर विचारणा करुन मुलाखती घेतल्या. समितीचे अध्यक्ष सर्वात शेवटी एक दोन प्रश्न विचारीत होते व प्रत्येक उमेदवाराला आवर्जून मुलाखत झाल्यावर थांबण्यास सांगत होते. निकाल लगेच जाहीर होईल याकरीता. दोन जागांकरीता आम्ही जवळपास सोळा पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. फार प्रामाणिकपणे प्रक्रीया केल्यामुळे जवळपास चार साडे चार तास लागले. मुलाखती आटोपल्याबरोबर अध्यक्षांनी सर्व समिती सदस्यांकरीता चहापानाची व्यवस्था करावयास सांगितली. मुलाखत कक्षाचे दार बंद करण्यात आले. परत एकदा त्यांनी आम्हा सर्व विषयतज्ञांना विनंती केली की आम्ही निवडीच्या दृष्टीने चर्चा करुन सर्वानूमते पसंतीक्रम द्यावा. प्रक्रीयेची आवश्यकता व पदाचा अधिकार म्हणून मी त्या अध्यक्षांना त्यांचे मत विचारले. त्यांनी अत्यंत नम्रपणे कोणतेही मत देण्यास नकार दिला. हा संपुर्णपणे विषयतज्ञांच्या अखत्यारीतील भाग असल्याने आमच्या व्यवस्थापनापैकी कुणीही या प्रक्रीयेत बोलणार नाही असे त्यांनी परत एकदा सांगितले. साधारण दहा मिनीटात आम्ही आमचा निर्णय कळविला. आम्ही निवड केलेल्या दोन उमेदवारांची नावे आम्ही त्यांना दिली. त्यांनी प्राचार्यांना सूचना दिल्या. आम्हाला चहापानाची विनंती करताना ते म्हणाले की दहा मिनिटात आपण चहापान आटोपू, तोपर्यंत आपण निवडलेल्या उमेदवारांची नेमणूक पत्रे तयार होत आहेत. मला आपल्या सारख्या तज्ञांच्या व विद्यापिठाने ठरवून दिलेल्या समितीसमोरच या आमच्या परीवारात नव्याने प्रवेशित होणाऱ्या उमेदवारांना नेमणूकपत्रे द्यायची आहेत. आणि त्यांनी त्यांचे शब्द अक्षरशः खरे ठरविले. निवड प्रक्रीयेच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी झाल्याबरोबर त्यांनी आमच्या समोर त्या नव्या शिक्षकांना त्यांची नेमणूक पत्रे दिली व त्यांचे परीवारात स्वागत केले.अश्या प्रकारे निवड प्रक्रीया खऱ्या अर्थाने पूर्ण केली. हे सारे बघून मला व त्या समितीत कार्य करणाऱ्या प्रत्येक विषयतज्ञाला कृतार्थ झाल्यागत वाटले. विशेषतः ज्यांची निवड झाली होती ती दोघे तर या असल्या स्वच्छ व पारदर्शी प्रक्रीयेमधून निवड झाल्याने भांबावून गेली होती. ती दोघेही बिचारी रडूच लागली. आम्ही सर्वच त्यांचा आनंद समजू शकत होतो कारण कदाचित नोकरी मिळविण्याच्या प्रक्रीयेमधे असलेल्या भिषण समस्या त्यांना आमच्यापेक्षा जास्त ठाऊक होत्या. केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आधारे त्यांची निवड आम्ही केली होती याचा आम्हालाही आनंद होता. विषयतज्ञ म्हणून विषयज्ञानाचा व अनुभवाचा जो सन्मान तेथे झाला होता तो मनाला प्रसन्न करणारा होता. पण याही पुढे जाऊन या निर्णयाचे परीणाम दोन वर्षांनंतर जेव्हा प्राचार्यांनी सांगितले तेव्हा मात्र खरोखरीच त्या सबंध स्वच्छ व पारदर्शी प्रक्रीयेत सहभागी झाल्याबद्दल अभिमान वाटू लागला.
काही दिवसांपूर्वी परत एकदा मुलाखतींच्याच निमित्ताने त्याच महाविद्यालयात गेलो असता प्राचार्य मॅडम मला बघून म्हणाल्या, सर! आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. दोन वर्षांपूर्वी आपण विषयतज्ञांच्या चमुसोबत ज्या दोन लोकांना निवडून दिलेत ती दोघे इतके छान काम करीत आहेत की आमच्या महाविद्यालयासाठी व इंग्रजी विभागासाठी ती दोघे एक मिळकत बनली आहेत. ते ज्या समर्पणाने कार्य करीत आहेत ते बघून शिक्षकाने प्रामाणिकपणे कार्य केल्यास तो प्रचंड परीवर्तन घडवून आणू शकतो यावर विश्वास बसतो. धन्यवाद सर, परत एकदा आम्हाला चांगले लोक निवडून द्या. मी त्यांना म्हणालो, मॅडम, आपण ज्या पारदर्शीपणे प्रक्रीया करुन शिक्षक नेमता त्यानंतर कुणीही शिक्षक अश्याच प्रकारे कार्य करेल कारण तुम्ही त्याच्या गुणवत्तेवर विश्वास दाखविल्याने त्यांना तो विश्वास सार्थ ठरवावाच लागतो..ते नैतिक बंधन आहे जे तो सांभाळेलच. हीच आदर्श प्रक्रीया आहे. इतक्या आदर्श प्रक्रीयेत मला समाविष्ट करुन आपण माझा सन्मान करीत आहात, मीच आपला आभारी आहे...ज्या शिक्षकाच्या अध्यापनामुळे त्याच्या सेवेच्या काळात जवळपास पंचेवीस ते तीस बॅचेस घडणार आहेत व समृद्ध होणार आहेत त्याच्या निवडीची प्रक्रीया इतकीच स्वच्छ व पारदर्शी असायला हवी.
अर्थात या संदर्भात अनेकांची मत मतांतरे असू शकतात. यामधे व्यावहारिकता, शैक्षणिक प्रक्रीया राबविण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य, शासनाकडून होणारी तुटपुंजी मदत, शिक्षण व व्यावहारिकतेचा ताळमेळ असल्या अनेक मुद्द्यांच्या आधारे ही आदर्श प्रक्रीया राबविणे अशक्यप्राय आहे असे सांगितल्या जाऊ शकते. ते खरेही असू शकते. परंतू समाजनिर्मितीच्या प्रक्रीयेमधील शिक्षक या सर्वात महत्वाच्या घटकाची निवड करताना व विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांचे भवितव्य त्याच्या हाती सोपविताना गुणवत्ता हाच एकमेव निकष मानणारी व त्याचे पालन करणारी प्रक्रीयाच आदर्श आहे याबाबत कुणाचेही दुमत असू शकणार नाही.
 
 

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23