My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

संवेदनशील मन
आठव्या वर्गात गेलेल्या त्या लहानग्याचे आजोबा त्याला उन्हाळ्यात सोडून गेले. गेले अनेक दिवस त्याचे आजोबा आजारी होते. एक दुर्धर आजार झाला होता त्यांना. त्या आजारामुळे त्यांना फार त्रास व्हायचा. बरेच वेळा दवाखान्यात न्यावे लागायचे. आजारामुळे आजोबा कायम घरीच असायचे व या लहानग्याला त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची खूप सवय झाली होती. शाळेतून आल्यावर आजोबांशी शाळेतील गंमती जमती बद्दल गप्पा मारणे, रात्री आजोबांसोबत बसून त्यांच्याकडून गोष्टी ऐकणे, आजोबा पलंगावरच असल्याने त्यांना काही लागले तर बघणे, शाळेत जाताना आजोबांना मस्तपैकी बाय आबा म्हणून जाणे असा त्याचा दिनक्रम होता. आजारी असले तरी आजोबा आपल्या घरातील महत्वाची व्यक्ती आहेत हे त्याला सतत जाणवायचे. याचे कारण घरातील सर्व जण आजोबांची खूप काळजी घ्यायचे. विशेषतः या बाळाचे आई वडील त्यांना फार जपायचे. आपल्या आजोबांसाठी आपले आई वडील कसे झटतात हे तो पोरगा बघत असायचा. आजोबांचे पाय चेपून देणे, आजोबांना दवाखान्यात नेणे, त्यांची औषधे आणणे, त्यांच्याजवळ दवाखान्यात बसून राहणे, त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करुन खाऊ घालणे, त्यांची सेवा करणे हे सारे आपले आई-वडील करीत आहेत हे त्याला न सांगता केवळ निरीक्षणातून कळत होते. आपल्या आई वडीलांची काळजी घ्यावी हा संस्कार त्याला आपोआपच त्याच्या आईच्या व वडीलांच्या वागण्यातून मिळत होता. म्हणूनच त्याचेही आजोबांसोबत वागणे छानच होते. या सर्व रोजच्या वागण्यातून मिळणाऱ्या संस्कारांमधूनच सहजगत्या त्या लहानग्याचे एक खूप छान संवेदनशील मन तयार होत होते. त्याच्यावर हे संस्कार करण्यासाठी त्याची आई वेगळे परीश्रम घेत नव्हती. आजारी सासऱ्यांची मनापासून सेवा करुन ती तिचे कर्तव्य पूर्ण करीत होती..ते देखील आनंदाने. त्या मुलाचे वडील आपल्या वडीलांना प्रसंगी अक्षरशः उचलून दवाखान्यात नेत होते, आंघोळ घालून देत होते. आपले वडील त्यांच्या वडीलांची करीत असलेली सेवा तो मुलगा बघत होता व ती चित्रे त्याच्या मनःपटलावर कोरली जात होती. अश्या प्रकारच्या सहज व प्रेमाने केल्या जाणाऱ्या कृतींनी काय कमाल होऊ शकते हे मात्र त्या मुलाच्या बाबतीत घडलेल्या एका छोट्या व महत्वाच्या प्रसंगावरुन ठळकपणे लक्षात आले. संस्कार कसे केल्या जातात व त्यामधून सहजतेने एक संवेदनशील मन कसे तयार होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण ठरु शकेल.
उन्हाळ्यात त्या मुलाचे आजोबा गेले. त्या आजाराने त्यांना पूर्णपणे आपल्या कवेत घेऊन त्यांची इहलोकीची यात्रा संपविली. आजोबा गेल्याचे त्या मुलाला फार वाईट वाटले परंतू त्या प्रसंगाच्या निमित्ताने घरी आलेल्या पाहुणे मंडळींच्या मुलांसोबत तो खेळांमधे रमला. दुःख विसरता येणे हे मुलांच्या निरागस मनाला मिळालेले वरदानच असते. ते पटकन विसरुन मूळ पदावर येतात. वय वाढल्यावरच गोष्टी विसरणे  जड जाते. सर्व विधी आटोपल्यावर घरातील सर्वच जण आपापल्या कामाला लागले. भा. रा. तांबेंच्या  - सगे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील - नुसार इतरांचे जीवन पुन्हा सुरु झाले. स्वाभाविकच होते ते. हा लहानगा देखील आपल्या विश्वात रमला. शाळा सुरु होण्याचा दिवस उजाडला. नवा वर्ग, नवी पुस्तके, नवी बसण्याची जागा या सर्व नवलाईच्या गोष्टींमधे गुंग होऊन तो शाळेसाठी तय्यार झाला. आईसोबत शाळेत जायचे म्हणून गडी खुश होता. आज शाळेत पहीला बेंच पकडायचा म्हणून लवकर चलण्याचा त्याने आईच्या मागे तगादा लावला होता. शेवटी त्याच्या आग्रहाखातर त्याची आई त्याला घेऊन निघाली. आईच्या मागे गाडीवर बसला.. आई गाडी सुरु करणार तेवढ्यात आईला तो म्हणाला, आई थांब मी आत्ता येतो. त्याची आई वैतागली, तुझे ना शेवटपर्यंत काही ना काही सुरु असते रे! धावत तो घरामधे गेला, जाताना बुट पण काढले. त्याच्या आईला कुतुहल वाटले म्हणून ती देखील त्याच्या मागे गेली. तो मुलगा थेट आजोबांच्या खोलीत गेला.. आणि तिथे तो काय करतोय हे बघण्यासाठी त्याची आई पोहोचली... बघते तर काय? त्या माऊलीने जे बघितले, ते बघितल्यावर टचकन् तिच्या डोळ्यात पाणी आले. त्या क्षणाला कृतकृत्य झाल्यागत तिला वाटले. मुलांवर बळजबरीने संस्कार करण्याची कोणतीही प्रक्रीया न करता वागणूक चांगली ठेवून देखील संस्कार कसे करता येऊ शकतात याचा प्रत्यय तिला आला होता. आपल्या इवल्याश्या मुलाची ती इवलीशी कृती तिला समाधान देऊन गेली. त्या मुलाने जे काही केले ते बघून जगातील कोणत्याही माऊलीला आपल्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल अभिमानच वाटेल. पाणावलेल्या डोळ्याने ती माऊली आपल्या बाळाकडे बघत राहीली..अचानक जाणवून गेले..मुलगा मोठा नि शहाणा झाला. काय केले होते त्या मुलाने असे...
तो मुलगा बुट काढून आपल्या आजोबांच्या खोलीत गेला. आपल्या आजोबांच्या फोटोला त्याने मनोभावे नमस्कार केला. आजोबा ज्या पलंगावर झोपायचे त्या उशीवर दोनच क्षण डोके टेकविले. आजोबांच्या चेहेऱ्यावरुन जसा हात फिरवायचा तसा त्या उशीवरुन हात फिरविला आणि हळूच म्हणाला, बाय आबा!! त्या इवल्याश्या पोराने किती छान संवेदनशीलता दाखविली होती त्या छोट्याश्या कृतीतून!! हा प्रसंग ऐकूनच मला इतके बरे वाटले.. त्या लहानग्याच्या आईला तो प्रसंग प्रत्यक्ष अनुभवताना किती आनंद झाला असणार!! संस्कारांची अशी फलश्रुती होण्यासही नशीब लागते अर्थात त्यासाठी आपल्यालाही प्रत्यक्ष वागणूकीतून प्रयत्न करावे लागतात.
सध्या आपल्या घरामधील लहान व नव्या पिढीला हेच हवे आहे. सर्वांचेच जीवनमान उंचावल्यामुळे मुलांना जवळपास कोणतेच पालक आर्थिक चणचण जाणवू देत नाहीत. मुलांना त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणे सर्वच गोष्टी उपलब्ध असतात. बदलत्या काळात आवश्यकता आहे ती त्यांच्यात एक अत्यंत प्रामाणिक व संवेदनशील मन तयार करण्याची. मुलांच्या आजुबाजूचे जग बघता ते दिवसेंदिवस व्यावहारिक होत जाते आहे. पैसा ही जगातील सर्वश्रेष्ठ बाब आहे व तो असेल तर सारे काही करता येईल अश्या प्रकारचा भांडवलशाही विचार समाजात दृढ होऊ लागला आहे. अश्या परिस्थितीत मुलांना संवेदनशील बनविणे हे एक आव्हानच आहे. बरेचवेळा आपल्या आई वडीलांचाही सन्मान न ठेवता त्यांना वाटेल तसे बोलून, त्यांच्यावर इतर लोकांसमोर ओरडून अपमान करणारे मुले-मुली दिसतात. आपल्या आई वडीलांना आपल्या जगातील काहीही कळत नाही व त्यामूळे त्यांचा पाणउतारा करुन स्वतःचे महत्व स्थापित करण्याची विचित्र वृत्ती युवा वर्गामधे बळावते आहे. पौगंडावस्थेत मुलांचे मुडस् सांभाळायचे असतात हे मान्य आहे व मानसशास्त्राचा अभ्यासक असल्याने त्याची कारणे देखील मला मान्य आहेत. परंतू याचा अर्थ आपले म्हणणे रेटण्यासाठी आपल्या आई-वडीलांना, आजोबा-आजीला कस्पटासमान समजून वाटेल तशी वागणूक देणे हे कोणत्याही सुसंस्कारांच्या चौकटीत बसत नाही. अर्थात असल्या वागणूकींना चांगल्या वागण्याची उदाहरणे निर्माण करुनच सुधारल्या जाऊ शकेल. यासाठी घरातील ज्येष्ठ पिढ्यांनी वागणूकीचे व कृतींचे चांगले संदर्भ आखायला हवे. कायम टिकात्मक न राहता व छोट्या छोट्या गोष्टींवरुन एकमेकांना धारेवर धरुन त्यात समाधान न मानता, समजुतदारीने एकमेकांना समजून घेण्याची प्रणाली राबविल्या जावी. कामावरुन थकून आलेल्या आपल्या मुलाला/सुनेला घरातील आजोबांनी/आजीने, तक्रारींचा पाढा न वाचता, तूम्ही थकलात का? चहा करुन देऊ? असा आपुलकीचा प्रश्न विचारावा. तसेच दिवसभर घरी बसून वयस्कर मंडळींना कदाचित कंटाळा आला असेल तर त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांच्यासोबत वेळ घालविणे किंवा त्यांना बाहेर नेणे अश्या पद्धतीच्या कृती पुढच्या पिढीने केल्या तर नकळत घरातील तिसरी पिढी त्याचे निरीक्षण, अवलोकन व त्यानंतर अनुसरण करेल व याच प्रकारे आपल्याही घरात संवेदनशील मने तयार होतील. शेवटी माणसाचे खरे मुल्यमापन तो माणसासारखा संवेदनशीलतेने कसा वागतो व आजुबाजूच्या माणसांचा अपमान न करता प्रेमाने कसा वागवितो यावरच होत असते ना?
 


Comments

  1. Wa avi chan lekh. Naki saglikade are zale tar Kiti Chan hoil

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23