My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

करीयर
या वर्षीही बारावीचा निकाल लागल्यावर सर्व जागरुक पालक आपापल्या मुलामुलींच्या करीयर प्लॅनींगच्या दृष्टीने विचार करु लागले. मुलाला किंवा मुलीला कोणत्या विद्याशाखेमधे प्रवेश द्यायचा यासंबंधी चर्चा सुरू झाल्या. अश्याच एका चर्चेमधे मला सहभागी व्हावे लागले होते. त्या चर्चेमधे त्या मुला-मुलींच्या समुहाला मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या विद्याशाखांचे जसे कला शाखा, वाणिज्य शाखा व विज्ञान शाखा याचे प्रतिनिधी आलेले होते. मला या सर्व चर्चेवर अंतिम मत प्रदर्शित करण्यासाठी बोलाविले होते. मी त्या सभेचा अध्यक्ष असल्याने सर्वांची मते ऐकल्यानंतर माझे मत मांडायचे होते. वेगवेगळ्या विद्याशाखांच्या प्रतिनिधींनी जी मते मांडली ती ऐकल्यावर मी अक्षरशः चकित झालो. शिक्षणाचे समाजातील महत्व व त्याचा समाजनिर्मितीमधील सहभाग ज्या मूळ हेतूने आखण्यात आला होता त्यापासून अगदी वेगळ्या दिशेला आपण निघालो असल्याची जाणीव मला झाली. गेल्या काही वर्षांमधे स्पर्धा या भयानक प्रकाराच्या आड आपण शिक्षणाचे मूळ संदर्भ बदलवून टाकले व त्याला आता एका वेगळ्याच स्वरुपात राबविणे सुरु झाले आहे. या विविध विद्याशाखांच्या प्रतिनिधींनी आपापली मते सादर केल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचे पालक देखील खुश झाले व चर्चासत्र आयोजित केल्याचे सार्थक झाल्यागत त्यांना वाटले. सर्वप्रथम विज्ञान विद्याशाखेचे नवे महत्व मला व सर्व उपस्थितांना कळले.
विज्ञान विद्याशाखेच्या प्रतिनिधीने विज्ञान या विषयाशी संबंधीत कोणकोणते अभ्यासक्रम निवडले जाऊ शकतात याचा उहापोह केला. सर्वप्रथम अभियांत्रीकी शिक्षण घेता येऊ शकते. त्यामधे विविध पर्याय उपलब्ध आहेत. आयआयटी सारख्या संस्थांमधे गेलात तर परदेशात नोकरी लागेल व चांगले पॅकेज मिळेल, भारतातीलही नामांकित कंपन्या आयआयटी मधेच सर्वात प्रथम जातात व अतिशय चांगली पॅकेजेस देतात. अभियांत्रीकी सोबतच आजकाल नव्याने सुरु झालेले विज्ञान स्नातक मधील अभ्यासक्रम जसे बायोटेक्नॉलॉजी, पेट्रोकेमीकल हे देखील चांगली नोकरी मिळवून देतात. या अभ्यासक्रमांमधे पदव्युत्तर प्रशिक्षण देखील उपलब्ध आहे व त्यामधून आणखी चांगल्या जागी नोकरी लागू शकते. या सोबतच आजकाल फार्मास्युटीकल क्षेत्रामधेदेखील चांगले अभ्यासक्रम आहेत ज्यामुळे मोठमोठ्या शहरांमधे प्लेसमेंट प्राप्त होऊ शकते. त्यामधेही चांगला पगार देतात. विज्ञानाच्या क्षेत्रामधे आजकाल चांगली मागणी आहे. सर्वात जास्त नोकरीच्या संधी तेथेच उपलब्ध होतात. या माध्यामातूनच परदेशातही जाता येते. तशी संधी मिळाल्यास आयुष्याचे सोने होते. कमाईच कमाई. यानंतर वाणिज्य शाखेची प्रतिनीधी बोलायला लागली.
विज्ञान जमत नसेल तर वाणिज्य अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या हा काळ गेला. आता वाणिज्य शाखेलाही फार महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक ठिकाणी आर्थिक व्यवहार संगणकाच्या व आधुनिक सॉफ्टवेअर्सच्या माध्यामातूनच केले जातात. विमा कंपन्या देखील सारे व्यवहार अत्याधुनिक पद्धतीनेच करतात. त्यामुळे वाणिज्य शाखेचे प्रशिक्षण घेतल्यावर नेकरी पक्की असते. अनेक छोट्या मोठ्या प्रतिष्ठानांमधे कर्मचारी हवे असतात. त्यातल्या त्यात वाणिज्य शाखेचा अभ्यास जर इंग्रजी माध्यमातून केला असेल तर मग दहा हजार रुपयाची नोकरी तर नक्की मिळते. याशिवाय त्यातूनच पुढे एमबीए किंवा सीए या सारखे कोर्सेस करुन तर पैसाच पैसा मिळू शकतो. एखादा चांगला सीए लाखो रुपये कमावतो केवळ वाणिज्य शाखेच्या अभ्यासावर. यासोबतच ज्यांना फार मोठे स्वप्न नाहीत त्यांना देखील वेगवेगळ्या नोकरींच्या संधी वाणिज्य शाखाच देते. अगदी शाळा महाविद्यालयांमधे देखील अकाऊन्टट हवाच असतो. त्याच्या शिवाय चालूच शकत नाही. एकंदरीत काय की वाणिज्य शाखेचे हे वैशिष्ट्य आहे की या अभ्यासक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुवतीनुसार त्याला नोकर मिळण्याची खात्री राहते. पगार कमी अधिक राहू शकतो परंतू आपल्या पायावर उभे राहण्यास ही शाखा निश्चित मदत करते. याचे प्रमुख कारण म्हणजे सध्या आपल्या देशात लोकांची आर्थिक समज वाढायला लागली आहे, लोक गुंतवणुकीचे विविध पर्याय शोधत आहेत. अश्यावेळी वाणिज्य शाखा शिकलेला व्यक्ती स्वतःचा स्वतंत्र असा गुंतवणुक सल्लागार म्हणून व्यवसाय देखील सुरु करु शकतो. लोक आजकाल गुंतवणुक करुन घेण्यासाठीही चांगले पैसे देतात. अश्या प्रकारचा चांगला गुंतवणुक सल्लागार महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपये कमावू शकतो. स्वतःचा व्यवसाय करुन अशी कमाई होणे हा देखील एक चांगला पर्याय राहू शकतो. त्यामुळे वाणिज्य शाखेचा विचार करावा. यानंतर मी स्वतः कला शाखेचा विद्यार्थी व अध्यापक असल्याने कला शाखेचा प्रतिनीधी काय बोलतो याबद्दल मला जास्त कुतुहल होते. आधीच्या दोन्ही शाखांच्या प्रतिनीधींनी माझा चांगलाच भ्रमनिरास केला होता. त्यामुळे निदान कला शाखेवाला तरी मला किंवा या समाजमनाला अपेक्षित वर्णन करेल अशी अपेक्षा होती.
कला शाखेवाला प्रतिनीधी म्हणाला की बरेच वेळा कुठेच प्रवेश न मिळालेल्या कमजोर विद्यार्थ्यांची शाखा म्हणजे कला शाखा असे समजले जात असे. परंतू आता चित्र पालटायला लागले आहे. आता बारावी किंवा दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्क्याहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे वळण्याचा कल निर्माण झाला आहे. याला कारण असे की लवकरात कवकर नोकरी मिळवून देणाऱ्या नव्या नव्या कोर्सेसची उपलब्धता. सध्या कला शाखेचा अभ्यास करुन स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्या परीक्षा पास केल्या की सरळ नोकरी, ती देखील शासकीय नोकरी. याशिवाय इंग्रजी भाषेचा अभ्यास करणाऱ्यांना पुढे जवाहरलाल नेहरु विद्यापीठ किंवा हैद्राबाद येथील भाषा विद्यापीठ येथे वेगवेगळ्या परदेशी भाषांचे अभ्यासक्रम अभ्यासण्याची संधी प्राप्त होते. त्यामधून अगदी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून चांगल्या मोठ्या पदावरच्या नोकऱ्या मिळू शकतात. हे काहीही झाले नाही तरीही कला शाखेतील वेगवेगळे विषय जसे इंग्रजी, संगीत किंवा संस्कृत याचा अभ्यास करुन शिकवण्या घेता येतात. सहज पैसा मिळतो. करीयर कला शाखेच्या माध्यमातूनही तयार होऊ शकते. अश्या प्रकारे तीन्ही विद्याशाखेच्या प्रतिनिधींनी आपआपल्या शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर कश्या प्रकारे करीयर तयार होऊ शकते हे सांगितले. शिक्षणाची व्यावहारिकच बाजू या तिन्ही प्रतिनिधींनी व्यवस्थित समजावून सांगितली. कारण गेल्या काही वर्षांमधे 'स्पर्धा' या शब्दाचा आधार घेऊन हीच बाजू आपल्या मनावर ठसविली जात आहे. त्यामुळेच गुणपत्रीकेवर उमटणारे गुण हेच शिक्षणाचे मापक बनले आहे. या विविध अभ्यासक्रमांचा प्रत्यक्ष जीवन जगताना काय उपयोग होऊ शकतो व त्या माध्यमातून व्यक्तिमत्वावर कसा परीणाम होऊ शकतो हे आपण जवळपास विसरुन गेलो आहे.
विज्ञान शाखा ही माणसाला तर्कनिष्ठ बनविते. आयुष्यात सामोरी येणाऱ्या अनेक कठीण प्रसंगांमधे ही तर्कनिष्ठता योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करीत असते. विज्ञान माणसाला चौकस बनविते व या वृत्तीमुळे आपण सतत वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करीत असतो. विज्ञानाचा अभ्यासक्रम आपल्याला विचाराने व कृतीनेही स्वयंपूर्ण बनवितो. वाणिज्य शाखा आपल्याला जीवनात अनुसरण्याचे योग्य अर्थकारण शिकविते. आयुष्याच्या मिळकतीचे योग्य नियोजन, त्याचे योग्य मार्गाने संवर्धन अश्या बाबी शिकायला मिळतात. वाणिज्य शाखेच्या अभ्यासाने आयुष्याच्या जमाखर्चाचा योग्य ताळमेळ लागतो व ते विस्कळीत न होता साचेबंध होते. कला शाखा ही तर आयुष्य आनंदाने जगायला शिकविते. आयुष्याची सुंदर बाजू कश्या प्रकारे बघायची, त्या सुंदरतेला आपल्या रोजच्या जीवनात सकारात्मकतेने कसे सामावून घ्यायचे व त्या सकारात्मकतेचे वर्तुळ वाढवून त्यात इतरांना देखील कश्या प्रकारे सामील करुन घ्यायचे याबाबतचे संस्कार कला शाखा करीत असते. आपल्या जीवनावर वेगवेगळे संस्कार करुन जीवन समृद्ध करणाऱ्या या विविध विद्याशाखांची ही खरी महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. त्यातूनच खरे करीयर अर्थात माणूस घडणार आहे. अन्यथा शिक्षणाबद्दल - केवळ पैसे मिळविण्याची क्षमता निर्माण करणाऱ्या व्यवस्था - अशी भूमिका तयार झाल्यास शिक्षणाचा खरा हेतू कसा साध्य होईल?
 

Comments

  1. Excellent article which provides right perspective of education
    Thx atul

    ReplyDelete
  2. Excellent article which provides right perspective of education
    Thx atul

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23