My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

गुरु प्रतिष्ठा
आपल्या देशातील कुणालाही गुरु महात्म्य समजावून सांगावे लागत नाही कारण गुरु शिष्य परंपरांच्या आधारेच या देशाच्या विचार क्षमतेचा व क्रीयाशीलतेचा आधार तयार झालेला आहे. प्राचीन काळात तर गुरु शिष्य परंपरा ही सर्वात थोर अशी व्यवस्था मानली जायची. या प्रक्रीयेमधील केंद्रस्थानी असलेला गुरु सर्वश्रेष्ठ मानल्या जायचा व गुरुचे स्थान समाजामधे अतिशय उच्च दर्जाचे होते. अत्यंत विद्वान असणारे हे गुरु सामाजिक व राजकीय व्यवस्थांमधेही आपले महत्व टिकवून होते. राजाच्या दरबारात राजाने आपल्या सिंहासनावर गुरुला बसवून त्याचा सन्मान करणे यापेक्षाही महत्वाचे म्हणजे राज्य कारभारातील महत्वाच्या निर्णयांमधे गुरुचे मत ग्राह्य धरले जायचे. त्यांच्या निरपेक्ष वृत्तीचा व तटस्थ निर्णय क्षमतेचा समाजाला फायदाच व्हायचा. निर्णय प्रक्रीयेमधे गुरुंना स्थान दिल्यामुळे समाजात गुरुंकडे बघण्याची दृष्टी सन्मानाची व आदराची होती. गुरुंना सर्वश्रेष्ठ मानून त्यांच्या ज्ञानाच्या आधारे आपल्या जीवनाचा सकल विकास होतो ही बाब सर्वदूर स्विकारल्या गेल्यामुळे गुरुंना कायमच आपल्या समाजात उच्च दर्जा प्राप्त झाला होता. गुरु या पदाचे नामोल्लेख जरी काळानुरुप बदलत गेले असले तरी अगदी आता आता पर्यंत गुरुमहात्म्य आपल्या मनामधे स्थापित होतेच. आधुनिक सहस्त्रकाच्या पहिल्या दहा वर्षात मात्र या सर्व भुमिकांमधे कमालीचा बदल झालेला दिसतो. ज्या गुरुकुलांची जागा शाळा किंवा महाविद्यालयांनी घेतली त्यामधे आधुनिक बदल खूप मोठ्या प्रमाणात झाले परंतू गुरुकुलाचे सत्व मात्र हरविल्यागत झाले आहे. गुरुकुलांमधे विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी जात असत व त्यांचे गुरु पूर्ण समर्पित होऊन त्या विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा दाखवित असत. आता मात्र स्थिती पूर्णपणे पालटली आहे. शिक्षणाच्या समांतर व्यवस्था निर्माण झाल्या आहेत जेथे गुण कसे नि किती प्राप्त करायचे या बाबत प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या आजुबाजुला स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की व्यक्तीमत्व विकास म्हणजे चांगले गुण मिळवून चांगल्या कोर्सला प्रवेश व त्या आधारे चांगल्या पॅकेजची नोकरी हे सरळ सोपे समिकरण बनले आहे. शाळा किंवा महाविद्यालयांमधे विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडत असते हा अनेकांच्या दृष्टीने भूतकाळ झालेला आहे. परंतू या सर्व बदलत्या व्यवस्थांमुळे व वैचारिक बदलांमुळे शिक्षकाचे गुरु महात्म्य पार लयास गेलेले आहे. त्याची प्रतिष्ठा तर फार दूरची बाब आहे, त्याचा वारंवार अपमान देखील केला जातो. त्याच्या न्याय मागण्यांसाठी त्याने संविधानिक आंदोलन केले तरीदेखील त्याला जनसमर्थन मिळत नाही. याऊलट, विविध माध्यमे व समाजातील लोक या गुरुंवर तुटून पडतात व कधीकधी या टिकेचा स्तर इतका ढासळतो की - मास्तरांना कशाला हवेत एवढाले पगार? त्यांना तर ****** मारायला हवेत - अश्या पद्धतीच्या प्रतिक्रीया सोशल मिडीयावर उमटतात व लाखो लोक त्याला लाईक करतात. शिक्षकी पेशात असताना आपल्याबद्दल अश्या प्रकारच्या प्रतिक्रीया समाजातून, विशेषतः तरुण मंडळींकडून दिल्या जात असताना प्रचंड वेदना होतात. पण मग आपल्या गुरुनेच शिकविलेली तटस्थता अंगिकारुन या सर्व बदलाचा विचार सुरु होतो. दोष कुणाचा? या मूळ मुद्द्यापासून विचार प्रक्रीयेला सुरुवात होते. 
गुरुंची ही अशी दशा होण्यामागे सर्वात महत्वाचा वाटा गुरुंचाच असला तरी देखील तो या समाजात निर्माण झालेल्या एका विष वर्तुळाचा भाग आहे. हे विष वर्तुळ तोडण्याची क्षमता देखील त्या गुरुमधेच आहे. परंतू अद्याप त्याचे प्रयत्न थिटे पडत आहेत. या विष वर्तुळात शिक्षण व्यवस्था, पालक, राज्यकर्ते, विद्यार्थी, समाजिक अवस्था, स्पर्धा व शिक्षक असे सारे सामील आहेत. या सर्वांच्या बदलत्या भूमिकांमुळे ही अवस्था निर्माण झाली. शिक्षण व्यवस्थांमधील बदल हे अत्यंत कूर्मगतीने पुढे सरकत असल्याने त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचे प्रशिक्षण प्राप्त व्हायला हवे ते होताना दिसत नाही. हे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकांजवळ केवळ ज्ञानसंपन्नता असून चालत नाही तर तो व्यवस्थांमधील आर्थिक निकषांवर खरा ठरणे जास्त महत्वाचे आहे. असल्या निकषांची पूर्तता करुन पवित्र अश्या शिक्षकी पेशात प्रवेश केल्यावर त्याची समर्पणाची वृत्ती कशी राहू शकेल हा लाख मोलाचा प्रश्न आहे. अश्या प्रकारे नियुक्त झालेल्या शिक्षकाकडून अपेक्षित कार्य न झाल्यामुळे पालकांची निराशा होते. अर्थात त्यांच्याही मुला मुलींकडूनच्या अपेक्षा बदलल्यामुळे त्या अपेक्षांची पूर्तता शाळेत किंवा महाविद्यालयात करणे कठीण असते. पालकांना आपल्या मुला-मुलींचे इंग्रजी बोलणारे पोपट बनवायचे असतात. गणित जमत नाही म्हणून ते देखील संपुर्णपणे पाठ करुन जाणारे विद्यार्थी कसे तयार करायचे. परंतू पालक देखील आपल्या मुला-मुलींचे मुल्यमापन केवळ गुणांच्याच आधारे करीत असतात. मुलांचे वागणे बोलणे कसे आहे, त्यांना समाजिक भान आलंय का यासारख्या बाबी त्यांच्याही विचारात नसतात. दीड लक्ष रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने फी भरलेल्या कोचींग सेंटरमधे बसून त्या मुलाला किंवा मुलीला सामाजक व्यवस्था लक्षातच येणार नाहीत. महाविद्यालयात मात्र बाबांनी दिलेली सत्तर हजार रुपयांची गाडी घेऊन येणाऱ्या मुलीच्या बाजुला चार किलोमीटरहून पायदळ महाविद्यालयात येणारी विद्यार्थिनी बसली तरच सामाजिक संवेदना निर्माण होऊ शकतील. परंतू त्याची गरज पालकांना वाटत नाही. राज्यकर्त्यांकडूनही शिक्षकांना योग्य तो सन्मान मिळत नाही कारण कंत्राटी पद्धतीने कार्य करणाऱ्या शिक्षकाला कधीकधी एखाद्या अशिक्षित मजूराच्या मेहनतान्याच्या अर्धेही मानधन मिळत नाही. त्याची आर्थिक व चरीतार्थाची बाजू इतकी कमकुवत असेल तर त्याने समर्पण कसे करायचे? हा महत्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांची देखील भुमिका या सर्व बदलांमुळे बदललेली दिसते. शिक्षकांचा जो मान व आदर किमान माझ्या पिढीच्या मनात आहे तो पार लयाला गेला आहे. शिक्षकाला मित्र समजून त्याच्या खांद्यावर हात टाकणारे विद्यार्थी हल्ली मोठ्या प्रमाणात आढळतात. गुरुचा एकेरी उल्लेख करुन त्यांच्यावर केलेले अश्लाघ्य विनोद व्हॉट्स अॅपवर एकमेकांना शेअर करताना आपण आपल्या गुरुचा अपमान करतोय याचेही भान आज उरलेले नाही. विशेष म्हणजे याबाबत कुणालाच काही वाटेनासे झालेय. हे सारे वेदनादायी चित्र हतबल होऊन बघणारा आजचा गुरु देखील यासाठी जबाबदार आहे.
गुरुने स्वतःचे महात्म्य टिकविण्यासाठीचे प्रयत्न जवळपास थांबवून दिलेले आहेत. नाही म्हणायला काही प्रमाणिक मंडळी सचोटीने अजूनही प्रयत्नरत आहेत व त्यांच्या परीश्रमांमुळे व्यवस्था सुरु आहे. परंतू ते प्रयत्न तोकडे पडू लागलेत कारण सर्व गुरुंचे हवे तसे समर्पण उरलेले नाही. नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांना ज्या आधुनिक विचारांची व व्यवस्थांची गरज आहे तेथे शिक्षक कमी पडतोय. अद्याप अनेक शिक्षकांना साधा संगणक देखील हाताळता येत नाही. त्यांनी तंत्रज्ञानाचा स्विकार केलेला नाही जेव्हा की त्यांच्या वर्गातील विद्यार्थी या बाबतीत बरेच पुढे निघून गेलेत. शिक्षकाला पटेल तसे त्याने केवळ शिकवित राहणे असा अत्यंत रटाळ प्रकार आता मुलांना रुचणारच नाही. शिक्षक केवळ माहिती देणार असतील तर मुलांना शिक्षकापेक्षा गुगल जवळचे वाटायला लागते. नाविन्यपूर्ण उपक्रम व शिक्षण पद्धती केवळ शिक्षकच निर्माण करु शकतो. परंतू तो शिक्षकी पेशा सोबत प्लॉटचा व्यवसाय, विम्याची एजन्सी, गुण मिळवून देणाऱ्या कोचींग क्लासची नोकरी या प्रकारच्या कामात अडकला असेल तर तो नाविन्यपूर्ण निर्मिती कशी करणार हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. शिक्षण क्षेत्रातील या विष वर्तुळाच्या प्रत्येक घटकाला बदलण्याची नितांत गरज आहे कारण समाजाचे भवितव्य ज्यांच्या प्रगतीशील विचारांवर अवलंबून असते त्यांना गुरु म्हणतात.
गुरुंकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा असतात. त्यामुळे हा बदल घडवून आणण्यासाठी गुरुंनी सकारात्मक पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासोबतच या प्रक्रीयेतील प्रत्येक घटकाने या व्यवस्थेचे महत्व लक्षात घेऊन योग्य तो वैचारिक बदल करण्याचीही आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक गुरुने आपले महात्म्य टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत कल्पक व मुल्यधिष्टीत विचार प्रसरीत करायला हवा त्याचप्रमाणे त्या विचाराचे सामाजिक दृष्टीने महत्व जाणून समाजातील सर्व घटकांकडून त्याचा योग्य तो सन्मान केला जावा. एखाद्या गुरुचा अजाणतेपणी देखील अपमान घडत असेल तर त्याची बोच जाणवून त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जावी. कारण गुरु हे पद कुण्या एका व्यक्तीशी निगडीत बाब नाही तर ती एक समाज सुधारण्याची उज्वल व दैदिप्यमान परंपरा आहे जिचे जतन करणे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.


 

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23