My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

अदरकवाली चाय
पावसाचे चिंब ओले दिवस..पावसाच्या आगमनाने पायथ्यापासून तो माथ्यापर्यंत हिरवागार झालेला अभेद्य रायगड.. रायगडावरचे ते सुंदर टुमदार रेस्ट हाऊस..त्या रेस्ट हाऊसच्या समोर टाकलेल्या दोन खुर्च्या..त्यावर बसलेले दोन मित्र..पाऊस पडून गेल्याने आता धुक्याचा अंमल सुरु झालेला..वातावरणात रागडावर सुटणाऱ्या भन्नाट वाऱ्यामुळे बोचरा पण सुखद गारवा..दोन्ही मित्रांचा आवडता कवी गुलज़ार आणि त्याच्या कवितांचे वाचन..त्यामधील भन्नाट कवीकल्पना दोघांनाही कळल्यामुळे व मनाला भिडल्यामुळे एकाच वेळी निघालेले - क्या बात है यार!..एखाद्या कवितेच्या वाचनानंतर अचानक विचारांमधे गर्क होऊन रायगडाच्या त्या विलोभनीय शांततेशी एकरुप होण्याचा प्रयत्न..त्या शांततेचा गुंजारव अनुभवण्याचा प्रयत्न..अचानक मेहंदी हसनची आठवण..मित्राच्या आग्रहाखातर रंजीश ही सही चे गायन..त्याच्या - माना के महोब्बत का छुपाना है महोब्बत, चुपकेसे किसी रोज़ जताने के लिये आ - या ओळीला दिली जाणारी एकत्रीत दाद..जिवलग मैत्री असल्याने संवादाचे विषय सारखेच..गप्पांच्या ओघात मग रागडावरील त्या सायंकाळी महाराजांचेही स्मरण..मग बाबासाहेब पुरंदरे व शिवकल्याण राजाची आठवण.. लताबाईंनी गायलेले -गुणी बाळ असा, जागसी कारे वाया - या गाण्यातील - अपरात्रीचा प्रहर लोटला बाई म्हणताना लताबाईंनी कातर आवाजात लावलेला तो नेमका स्वर..दोन्ही मित्रांना एकाचवेळी सापडतो..मनापासून होणाऱ्या गप्पांची गाडी अलगद वपुंच्या पुस्तकांपाशी थबकते.. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकविणारे वपु..मित्राला त्यांची वाक्ये पाठ असतात.. त्याच्या तोंडून त्या वाक्यांचा आस्वाद..वपुंच्या पाठोपाठ दोन्ही मित्रांच्या अभ्यासाच्या वेळेचा कॉमन मित्र जॉन किट्स तयारच असतो..त्याच्या ग्रेशीयन अर्न नावाच्या कवितेला घेऊन..Heard melodies are sweet, but those unheard are sweeter..या ओळींसोबत दोघांनाही आठवणींच्या पडद्यांना ओलांडून थेट महाविद्यालयीन जिवनापर्यंत घेऊन जाणारा तो सुखद वारा..आनंदाचा तो सुवर्णकाळ व त्याच्याशी जोडल्या गेलेल्या अनेक सुरेल आठवणी..आठवणींची ती गोड उतरण व त्यातील सुंदर क्षण..परत वर्गात शिकत असताना आवडत्या प्राध्यापकांनी किट्स शिकविताना त्याच्या त्या ओळीची म.पां. भावे यांच्या - गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा- या ओळीशी केलेली तुलना..झपाटून जाऊन ग्रंथालयात मराठी व इंग्रजी कविंच्या कवितांमधील साम्यस्थळे शोधण्याची ती धडपड..आठवणींचे पडदे बाजूला सारताना व त्यात गुंग होताना रायगडावर सबंध परीसर व्यापून टाकणारे धुके..ते धुके बघताच दोन्ही मित्रांना गुलज़ारच्या इजाजत ची आठवण.. त्यामधे रेखा व नसीरवर अश्याच धुक्यात चित्रीत केलेले - कतरा कतरा मिलती है - त्याचवेळी धुक्याआडून रायगडाच्या बाजूच्या पर्वताआड गेलेले व अकारणच खिन्न करुन गेलेले सूर्यबिंब..त्याच्या जाण्याने दोन्ही मित्रांना आठवलेला सायंकाळचा पूर्वी थाटातील अत्यंत गोड राग पुरीया धनाश्री.. लगेच सोबतच्या एमपीथ्री प्लेयरवर छोटे स्पिकर लावून ऐकलेली उस्ताद रशीद खान यांची - पायलीयाँ झनकार - ही सुरेल बंदीश.. हा सारा आनंद भरभरुन घेत असतानाच..रायगडावरील देशमुखांच्या खानावळीतील एक छोटा मुलगा स्वतःहूनच एक गंमत घेऊन येतो.. अदरकवाली गरमा गरम चाय.. अश्या रमणीय वातावरणात यापेक्षा सुख काय मिळावे.. हुडहुडी भरविणारा रागडावरील तो सायंकाळचा गारवा..रशीद खानचा पुरीया धनाश्री व हाताच्या ओंजळीत गरम कप धरुन एकेक घोट आनंदाने घेत खऱ्या अर्थाने एन्जॉय केलेली ती - अदरकवाली चाय. ती रायगडावर जशी भेटली तशी पुढेही भेटत राहीली..
पांढरकवड्याहून त्या दिवशी निघायला जरा उशीरच झाला होता. पावसाचे वातावरण होते.. पण महाविद्यालयाच्या कामासाठी अमरावतीला परतणे आवश्यक होते.. थोड्या वेळातच पाऊस सुरु झाला..जोडमोहा आले की थांबू या विचारात भर पावसात रस्त्याचा अंदाज घेत घेत मी गाडी चालवू लागलो..पावसाचा जोर वाढला.. विजा देखील कडाडू लागल्या.. समोरचे काहीच दिसेनासे झाले कारण पाऊस धो धो पडत होता. शेवटी सोबतच्या मित्राने मला जरा थांबुया असे सांगितले. कुढे थांबावे असा विचार सुरु असतानाच रस्त्याच्या कडेला एक टपरीवजा दुकान दिसले. गाडी त्या दुकानालगत उभी करुन आम्ही उतरलो. चहाची टपरी होती पण तेथे बाहेर कुणीच दिसत नव्हते. झोपडीच्या आत डोकावलो तर एक आजी खाटेवर झोपली होती व एक मुलगा गरम कापडाने तिचे पाय चोळत होता. चौकशी केल्यावर कळले की ती म्हातारी त्याची आई होती व तिला शेतात पावसात काम केल्याने थंडी भरली होती. आईला उबदार वाटावे म्हणून तो चुलीवर तवा गरम करुन त्यावर फडके गरम करुन त्याने आईचे पाय शेकत होता. माझ्या मित्राला जरा शंका आली. त्याच्या आईची हुडहुडी कमी होत नव्हती व तश्या परीस्थितीत तिची तब्येत जास्त बिघडण्याची शक्यता वाटत होती. आम्ही यवतमाळ मार्गेच निघालो होतो त्यामुळे त्या मुलाला सहजच विचारले की आई ला जर दवाखान्यात न्यायचे असेल तर आम्ही मदत करु शकतो. त्याने नकार दिला. तो म्हणाला, नाही साहेब मी तिला उद्या घेऊन जाईन..आता तिला बरे वाटेल, मी तुम्हाला मस्त चाय बनवून देतो. तुम्ही चहासाठीच थांबले ना? त्याच्या त्या चुलीवर त्याने चहा बनवायला ठेवला. पोरगा ऐकत नाही म्हणल्यावर आम्ही त्या आजीबाईंना विचारुन बघितले की दवाखान्यात चलायचे आहे का? आजीबाईंनी देखील तेच उत्तर दिले, नाही..तुम्हाला कशाला त्रास? माझा पोरगा मला नेईन. माझा पोरगा माझी काळजी घेतो चांगली. चहाची टपरी चालवतो पण खूप चालते, मेहनती आहे तो त्यामुळे देव चांगलंच करतो. चहा घ्या साहेब, अदरकवाली चाय.. मुसळधार पावसात त्या झोपडीवजा चहाच्या दुकानात आम्ही दोघेही त्या स्वाभिमानी आई व लेकाकडे बघत त्या -अदरकवाली चाय- चा आस्वाद घेत राहीलो.
नागपूरला एका मोठ्या रुग्णालयाच्या बाहेर आम्ही काही जण उभे होतो. प्रत्येकजण गंभीर होता. एक महत्वाचा निर्णय घ्यायचा होता. काकांना डेंग्यू होऊन त्यांची अवस्था गंभीर झाली होती. गेले अठरा दिवस त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरु होता..डॉक्टर मंडळींनी सर्व प्रकारचे प्रयत्न करुन बघितले. अखेर अठरा दिवसांच्या परीश्रमांनंतर त्यांनी त्यांचे प्रयत्न संपल्याचे घोषित केले. काकांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांचे जवळपास सर्व अवयव निकामी झाले होते. व्हेंटीलेटरवर त्यांना कितीही दिवस ठेवता येणार होते परंतू तब्येत सुधारणार नाही असे डॉक्टरांनी अंतिम सुतोवाच केले व आम्हाला एक निर्णय घ्यायला सांगितला. व्हेंटीलेटर काढायचे की नाही? ते काढल्यावर काकांचे आयुष्य केवळ अर्धा तासांचे राहील हे देखील नक्की होते. आम्ही सर्व तेथे उभे होतो. तो निर्णय करण्यासाठी. एक ज्येष्ठ नातेवाईक आम्हा तरुण मंडळींना व्यावहारिक निर्णय कसा घेण्याची गरज आहे हे सांगत होते. काकांनाही या सर्व गोष्टींचा त्रास होत असणार व त्यामुळे आपण त्यांची सुटका करायला हवी वगैरे नेहमीची वाक्ये बोलल्या जात होती. खरे तर निर्णय झाला होता.. तो केवळ सर्वांनी मिळून योग्य ठरवायचे उरले होते. याबाबत मावशीलाही मी समजावतो अशी जबाबदारी त्यांनी घेतली. आम्ही सर्वजण मिळून एकमेकांचा न बोललेला होकार पक्का करण्याच्या विचारात असतानाच..बाजूच्या दुकानातून आवाज आला.. दादा, अदरकवाली चाय पिऊन घ्या बरे वाटेल. सर्वांनाच चहाची गरज होती. सर्वांनी होकार दर्शविला.. काही क्षणातच -अदरकवाली चाय- च्या शेवटच्या घोटासोबतच आम्ही सर्वांनी त्या निर्णयाला देखील होकार दिला व माझा मावसभाऊ डॉक्टरांना व्यावहारिक निर्णय सांगण्यासाठी चालू लागला. दुसरीकडे एक जण अंत्यसंस्काराच्या सामानाची तजविज करायला निघाला..अदरकवाली चाय हातात होती आणि या दोन दिशेला गेलेल्या दोघांना मी बघतच राहिलो..
अदरकवाली चाय - जवळपास तीच होती, बदलली होती ती माझी स्थिती व त्या स्थितीवर माझे नियंत्रण नव्हते. माणसाला वेगवेगळ्या परीस्थितीमधे परमेश्वर आणून ठेवतो. प्राप्त परीस्थितीला धैर्याने सामोरे जाणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य असते. व्यावहारिकता आपल्याला हेच शिकविते..पण खरे सांगू? या प्रत्येक प्रसंगामधे मला ती - अदरकवाली चाय - वेगवेगळीच वाटली कारण तिचा संबंध केवळ तिच्या चवीशी नसून मनाशी देखील आहे! मनाची स्थिती मात्र बदलत राहते !!
  

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23