My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

तिचे गणित कसे सुटावे?
महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्य करीत असताना विविध प्रकारच्या विद्यार्थिनींची भेट होते. बरेच वेळा त्यांच्याशी संवाद साधताना वेगवेगळ्या समस्या समोर येतात. शिक्षण क्षेत्रामधे अनेक वर्षांपासून वेगवेगळे बदल होत असताना देखील अजूनही खूप बदल करावे लागणार असे प्रत्येक समस्येगणिक वाटून जाते. परंतू हे बदल फार हळूवारपणे व बरेचवेळा व्यावहारिक विचारकक्षेच्या बाहेरील ठरतात त्यामुळे त्याचे अपेक्षित परीणाम जाणवायला बराच काळ लागतो. तोपर्यंत नव्या बदलांची वेळ झालेली असते. परंतू या सर्व प्रकारांमधे अनेकवेळा विद्यार्थ्यांचे फार नुकसान होते. त्यांच्या विकासाला पोषक असे वातावरण निर्माणच होत नाही किंबहुना फार मोठ्या प्रमाणात कुचंबणा सहन करावी लागते. कधीकधी या बदलांबाबत पोटतिडीकीने बोलले देखील जाते परंतू व्यवस्था या बदलांचा स्विकार लवकर करीत नाही व त्यामुळे लहान लहान समस्या एखाद्या विद्यार्थ्यासाठी जीवनाचा जटील प्रश्न बनून जातात. एक अशीच छोटी परंतू एक छोटेसे जीवन जवळपास उध्वस्त करणारी समस्या घेऊन एक आई तिच्या लेकीला घेऊन माझ्याकडे आली. महाविद्यालयात प्रवेशांचे दिवस असल्याने पालकांची बरीच गर्दी असते. या गर्दीपैकीच ती मुलगी व तिची आई असावी असा माझ्या अंदाज असल्याने मी माझे ठराविक उत्तर तयार करुन बसलो होतो. परंतू या आईने मला थोडा जास्त वेळ आहे का असा प्रश्न विचारला. अनेक पालक भेटीसाठी वाट बघत असल्याने मी त्यांना फार वेळ देऊ शकणार नाही असे सांगितले. त्यावर तुम्हाला किमान अर्धा तास मोकळा असेल तेव्हा येऊ असे मला त्यांनी सांगितले. दुपारच्या सत्रात आपण भेटा असे सांगितल्यावर ती आई व तिची मुलगी निघून गेले. या एका मिनीटाच्या भेटीत त्या मुलीकडे बघितल्यावर मला तिच्या चेहेऱ्यावर एका वेगळ्या प्रकारच्या खिन्नतेची गर्द छाया दिसली. का कुणास ठाऊक पण मला अकारणच कसेतरी वाटून गेले. कामाच्या व्यापात मी त्या दोघींना विसरलो. दुपारी चार वाजताच्या सुमारास त्या दोघी परत मला भेटायला आल्या. आता मात्र मला वेळ होता आणि मला त्या मुलीच्या चेहेऱ्यावरील खिन्नतेचे रहस्य देखील जाणून घ्यायचे होते. माझ्यासमोर बसून तिच्या आईने मला पुढील वीस मिनीटे जे काही सांगितले ते ऐकून मी अक्षरशः हादरुन गेलो. एक अतिशय छोटी बाब एखाद्या मुलीचे जीवन उध्वस्त होण्यापर्यंत मोठी होऊ शकते ही कल्पनाच मला करवत नव्हती. परंतू जे काही मी ऐकले ते सारे खरे होते. शिक्षण प्रणालीत विचारवंतांनी सुचविलेले बदल राबविण्यास विलंब लावणाऱ्या व्यवस्थे पायी त्या इवल्याश्या जीवाची अक्षरशः परवड चाललेली होती.
काही वर्षांपूर्वी लखनौ येथे एका अखिल भारतीय परीषदेमधे मी सहभागी झालो असता त्या परीषदेमधे ख्यातनाम कवी गुलज़ार यांना आमंत्रीत करण्यात आले होते. इंग्रजी विषयाची ती परीषद होती. कविता व साहित्य या संबंधी अत्यंत मार्मिक विचार गुलज़ार साहेबांनी आपल्या बीज भाषणातून मांडले. साहित्य व कला ही माणसाच्या जीवनाला कशी समृद्ध करते व जीवन सकारात्मकतेने जगण्याचा खरा मंत्र साहित्यातूनच मिळू शकतो हा विचार त्यांनी प्रामुख्याने मांडला. परंतू त्यांच्या बीजभाषणाचा शेवट करताना मात्र त्यांनी एक वेगळाच विषय मांडला. ते म्हणाले की लहान मुलांना शिक्षण देताना त्यांना मुक्तपणे त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याची मुभा द्यायला हवी. आपण त्या लहान मुलाला दहाव्या वर्गापर्यंत सर्व विषय शिकण्याचे बंधन करतो व त्यामुळे बरेचवेळा मुलांना जमत नसलेल्या विषयांच्या ओझ्याखाली दबून जावे लागते. एक प्रकारे मुलांना त्यांचे नावडते विषय अभ्यासायला लावून आपण त्यांची पिळवणूकच करीत असतो.. त्यांना चिरडतच असतो. शासनाने किंवा शासनामधील संवेदनशील लोकांनी याबाबत त्वरित विचार करण्याची गरज आहे असा विचार त्यांनी मांडला. पुढे जाऊन ते असेही म्हणाले की या संदर्भात त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील धुरीणांना पत्र लिहीली आहेत व हे सर्व महनीय मंडळी माझे बोलणे मनावर घेतील असा विश्वास वाटतो. फार महत्वाचा विचार गुलज़ार साहेबांनी मांडला होता. आम्ही सर्वांनी त्यांच्या या विचाराला टाळ्या वाजवून समर्थन दिले. नेहमीप्रमाणे परीषद संपली. गुलज़ार साहेबांचा तो महत्वाचा विचार त्याच सभागृहात विरला. पण त्या विचाराची तिव्रता व दहावीपर्यंत सर्व विषयांच्या सक्तीची झळ पोहोचलेली माझी एक लहान बहिण त्या दिवशी खिन्नपणे खाली मान घालून माझ्या कक्षात उभी होती व तिची आई कळवळून तिची कहाणी सांगत होती. तिची संपुर्ण कहाणी तिच्या आईच्या तोंडून मला कळत असताना मी त्या पोरीला वारंवार बसायला सांगितल्यावरही अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी केवळ मान हलवून ती मला नकार देत राहीली. तिच्या अपयशाबद्दल तिची आई सांगत असताना तिला बिचारीला बसवतही नव्हते. काय अवस्था झाली असेल तिच्या मनाची...
तीन वर्षांपूर्वी तिने माझ्या महाविद्यालयात अकरावी कला शाखेला प्रवेश घेतला होता. त्या वर्षीपासून दहावीमधे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या आधारे अकराव्या वर्गात प्रवेश देण्याचा नवा नियम सुरु झाला होता. विज्ञानाचे विषय जमत नसल्याने व विशेषतः दहावीत गणितामधे अनुत्तिर्ण झाल्याने तिने अकरावी कला शाखेत प्रवेश घेतला होता. हिवाळी परीक्षेत तिला दहावीच्या गणित विषयाची परीक्षा परत द्यायची होती. त्यानंतरच तिचा अकरावीचा प्रवेश निश्चित होणार होता. तिने भरपूर तयारी केली परंतू परत तिला अपयश आले. गणितात ती उत्तीर्ण होऊ शकली नाही. परिणामतः तिचे वर्ष वाया गेले. त्यानंतर तिने परत त्या पुढील वर्षीच्या उन्हाळी परीक्षेत प्रयत्न केला.. तो देखील असफल ठरला. तिच्या आईला काय करावे कळत नव्हते. एक जागरुक पालक असल्याने तिच्या आईने तिला विशेष शिकवणी लावून दिली, वेगवेगळ्या शिक्षकांना भेटली, आपल्या मुलीला कसेही करुन दहावी पास करण्याचा तिचा प्रयत्न होता. पण काही केल्या त्या मुलीला यश मिळतच नव्हते. तब्बल तीन वर्षांमधे सहा परीक्षा देऊनही तिला गणितात उत्तीर्ण होता आले नव्हते. तिची आई सांगत होती - हिचे काय करावे हे मला कळत नाही सर.. मला काहीच सुचत नाही.. गणितामधे हिचे डोकेच चालत नाही..माझे सारे प्रयत्न थकले आहेत..आता तर तीन वर्षात हिचा भाऊ हिच्या बरोबरीत आला आहे.. त्याला देखील बहिणीची लाज वाटायला लागली आहे..हिला आता पुढे शिकवायचे नाही असेच ठरविले आहे मी.. सर, आता हिची टीसी देऊन टाका..हिच्यासमोर हे सारे सांगायला मला काहिच वाटत नाही.. तिला बोलून बोलून मी थकली.. मी समजावून सांगितले, प्रेमाने सांगितले, रागावली.. पण ही आता या सर्व गोष्टींच्या पलीकडे गेलेली आहे असेच मला वाटते.. हे सारे ऐकत असताना त्या मुलीसमोर तिच्या आईने हे सर्व बोलू नये असे मला सारखे वाटत होते. परंतू तिची आई माझे ऐकायला तयार नव्हती.. तिला येथेच राहू द्या सर, हे मी तिला शंभराहून अधिकवेळा सांगून झाले आहे.. आता हिला शिकविण्यात अर्थच नाही.. एक साधा गणित विषय इतक्या प्रयत्नात तिला उत्तीर्ण करता येत नाही..हिची टीसी द्या सर..खिन्नपणे ती पोर हे सारे ऐकत राहीली. रडवेली होऊन बसायला नकार देत राहीली. माझ्या खूप समजाविल्यानंतरही आग्रहाने तिची आई तिची टीसी काढून तिला घेऊन गेली.
शिक्षण हे माणसाचे विचार मुक्त बनविते व मुक्त विचारांमधूनच नवनिर्मिती होऊ शकते अशी सर्वमान्यता आहे. परंतू आपल्या आवडीनुसार विषय निवडण्याची मुक्तता लहानपणापासूनच मुलांना दिल्यास त्यांच्या ठायी असलेल्या मुलभूत आवडी निवडीनुसार त्यांना विकसित करता येऊ शकेल हा विचार अनेक विचारवंतांनी मांडला आहे. परंतू या विचाराची अंमलबजावणी करणे अद्यापही आपल्याला शक्य झाले नाही. विद्यार्थ्यांच्या जीवनाला विकसित करणाऱ्या शिक्षणासारख्या अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात झपाट्याने बदल करण्याची आवश्यकता असताना देखील संथगीने केल्या जाणाऱ्या प्रक्रीया किती दिवस विद्यार्थ्यांची कुचंबणा करीत राहणार हे कळत नाही. स्वतःवरच रागावून खिन्न मनाने माझ्याकडे शेवटचा हतबलतेचा कटाक्ष टाकून माझी ती लहान बहिण निघून गेली.. पण जाताना काहीही न बोलता एक मात्र सांगून गेली.. शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनो! माझे हे गणित तुम्हीच सोडवून द्या!! 
चला आपण सर्वजण मिळून तिचे गणित सोडवूया!!
 


Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18