My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
कल्पक आनंदाची शीग
परमेश्वराने मानवाला एक अत्यंत कल्पक व क्रियाशील मेंदू प्रदान करुन या धरतीतलावर पाठविलेले आहे. त्यामुळे केवळ पंचेंद्रीयाच्या माध्यमांतून मिळणाऱ्या आनंदांच्या पलीकडे जाऊन आत्मीक समाधानाचा मार्ग त्याला शोधता येतो. ही मानवीय कल्पकता प्रत्येक मानवामधे उपजतच असते परंतू त्याचा वापर करणे किंवा न करणे ही बाब मात्र प्रत्येक व्यक्तीनिहाय बदलत जाते. कल्पकतेने जीवनाच्या प्रत्येक छोट्या छोट्या क्षणांना आनंदक्षणांमधे परावर्तीत करायचे की वेगवेगळ्या समस्यांना कवटाळून बेचैन रहायचे हा देखील व्यक्तीपरत्वे बदलत जातो. ज्यांना जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त असतो त्यांना जीवनात आनंद प्राप्त करण्यासाठी फार मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाही. त्यांना आनंद निर्माण करणारे क्षणच निर्माण करता येत असतात. पैसा हे आनंद प्राप्त करण्याचे साधन आहे अशी मान्यता असलेल्या मंडळींना जो आनंद प्राप्त होतो तो तदर्थ असतो कारण त्या आनंदाचे मोल त्यांनी खर्च केलेल्या पैश्याच्या प्रमाणात बघण्याची त्यांना सवय असते. त्यामुळे जास्त पैसा व जास्त आनंद या सूत्रानुसार त्यांची पैसा खर्च करण्याची व तो कमावण्याची क्षमता वाढत जाते. माणसाच्या क्षमतेच्या पलीकडे पैसा लागायला लागला की मग आपसुकच तो भ्रष्टाचाराकडे वळायला लागतो. परंतू ज्यांना आनंद ही मनाच्या तृप्ततेची अवस्था आहे हे कळतं त्यांना मात्र अनेक छोट्या छोट्या घटनांमधूनही आनंद निर्माण करता येतो. आपल्या मुलाच्या वाढदिवशी तोच तो पणा टाळून त्याला त्या दिवशी भरभरुन आनंद देण्यासाठी व तो आनंद टीपून घेण्यासाठी एका माऊलीने वापरलेली एक कल्पक आनंद कल्पना मला आठवली. नेहमीच्या आनंदामधे तिने टाकलेली ती कल्पक शीग फारच मोहक होती.
तिच्या पिल्लाचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी आपण मोठी पार्टी करुयात...असे करुयात वगैरे मागण्या मुलाने आधीच जाहीर केल्या होत्या. काही कारणामुळे त्यावर्षी त्या माऊलीला तिच्या मुलाचा वाढदिवस तो म्हणतो त्या प्रमाणे साजरा करता येणार नव्हता. वाढत्या वयातील मुलांना आजकाल समजावणे कठीण व्हायला लागले आहे हे आपण सर्वजण कबुल करतो. परंतू ती त्या प्रकारातील नव्हती. नव्या काळात मुलांची विचारप्रक्रीया बदललेली असली तरी बरेच वेळा आपण त्यांना समजविण्यासाठी जुन्याच पद्धती वापरतो व त्यामुळे यश मिळत नाही हे तिचे म्हणणे होते. नव्या मुलांना आपले म्हणणे पटविण्यासाठी नव्या कल्पना शोधण्याची गरज आहे व त्यानुसारच तिनेही आपल्या मुलाला नाराज न करता त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. गोष्ट अतिशय छोटी योजीली होती परंतू कल्पक मनातून त्याचा उगम झालेला असल्याने त्या मुलाचा तो दिवस अक्षरशः नाचत बागडत पार पडला. त्य कल्पनेमुळे त्याला पार्टी आयोजित झाली नाही याचे दुःख देखील झाले नाही व त्याचा वाढदिवस त्याने मनसोक्तपणे साजरा केला.
वाढदिवसाच्या दिवशी शाळेतील मित्र मैत्रीणींना देण्यासाठी चॉकलेटचे पॅकेट त्याच्या बॅगमधे ठेवताना त्याने आईला विचारले की आई आज पार्टी निश्चित आहे ना? तिने त्याला जवळ घेतले, प्रेमाने त्याच्या चेहेऱ्यावरुन हात फिरविला व त्याला सांगितले की, बेटा आज मी तुला त्या तुझ्या नेहमीच्या पार्टीपेक्षाही मोठे सरप्राईज देणार आहे. ते तुला शाळेतून परत आल्यावर मिळेल. आईने सरप्राईज म्हणल्यावर ते पोर खुश झालं व बागडत बागडंत शाळेत गेलं. शाळेत त्याने वाढदिवस साजरा केला पण लक्ष मात्र संध्याकाळी घरी गेल्यानंतर आईकडून मिळणाऱ्या सरप्राईज कडेच लागलेले होते. काय असेल सरप्राईज? त्याची आई अफलातून आयडीया शोधून काढते आणि त्याला खूप आनंद देते हे त्याला ठाऊक होते. आनंदाच्या भरात त्याने आपल्या काही जवळच्या मित्रांनाही या सरप्राईज बद्दल सांगून टाकले. मित्रांना तो म्हणाला, मला खूप मज्जा येणार आहे आज कारण माझी आई खूप ढासूँ आयडीया काढते, माझी आई ग्रेट आहे. आपली आई आपल्याला आनंद देण्यासाठी कल्पक योजना करीत असते हे त्या चिमुरड्याला कळलेले होते. शाळा संपण्याची वेळ झाली. सरप्राईजबद्दलची त्याची उत्सुकता ताणली गेली होती. त्या दिवशीचा तो शेवटचा गणिताचा तास कधी एकदाचा संपतो असे त्याला झाले होते. शाळा सुटली. पळत पळतच त्याने शाळेचे द्वार गाठले. त्याची आई गोड हसत त्याची वाट बघत होती. आई!! माझे सरप्राईज कुठाय? त्याच्या त्या उत्सुकतेला अजून जरा ताणण्यासाठी ती त्याला म्हणाली की आपण घरी जाऊ, तेथे तुझे सरप्राईज तुझी वाट बघते आहे. चल मग पट्कन घरी!! टुणकन उडी मारुन तो आईच्या मागे बसला. गाडी घरी येईपर्यंत देखील धीर टिकविणे त्याला शक्य झाले नव्हते. घरी गेल्यावर मात्र त्याला शांत राहणे शक्यच नव्हते. आता मात्र त्याच्या माऊलीची परीक्षा होती. नेहमीच्या पार्टीमधे जेवढा आनंद त्याला मिळायचा त्यापेक्षा जास्त आनंद त्याला मिळवून द्यायचा होता. हातपाय धुवून ते पोर सरप्राईज बघण्यासाठी सज्ज झालं.
अतिशय आनंदाने त्याच्या माऊलीने त्याला जवळ घेतले, त्याचा लाड केला. तिचा पोरगा त्या दिवशी तेरा वर्षांचा झाला होता. त्याचा लाडोबा करुन झाल्यावर आता मात्र त्याला थांबविणे शक्य नव्हते. तिने त्याला जवळ घेतले व ती त्याला म्हणाली, बेटा आता मी तुला सरप्राईज सांगते. आज तू तेरा वर्षांचा झालास म्हणून तुला आज तेरा गीफ्टस् मिळणार आहेत. तेरा गीफ्टस्? त्याचे डोळे लकाकले. कुठाय या गिफ्टस्, मला दाखव, लवकर दाखव.. काय काय आहे? तिने त्याला शांत केले. ती पुढे म्हणाली, हे बघ तुला तेरा गिफ्टस् मिळणार आहेत परंतू त्या तुला शोधून काढायच्या आहेत. मी तुझ्या सोबत राहीन. या सर्व गिफ्टस् मी आपल्या घरात वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या आहेत. त्या तुला शोधायच्या आहेत. त्यासाठी तुला पार्टीचा जितका वेळ असतो तेवढे दोन तास मिळणार आहेत. आपल्याला गिफ्टस् शोधायच्या म्हणल्यावर तो पोरगा खुश झाला. याहू म्हणून तो लागलीच शोधाशोध करायला लागला. त्याची माऊली हातात फोन घेऊन त्याच्या मागोमाग जायला लागली. एका अफलातून कल्पनेतून निर्माण झालेला खेळ सुरु झाला. काही वेळातच त्याला पहिले गिफ्ट सापडले! नवा कंपासबॉक्स!! हातात तो घेऊन त्याने उडीच मारली. त्याच्या कल्पक माऊलीने तो क्षण मोबाईलमधे टिपला. पुढची शोधाशोध सुरु झाली. जवळपास पंधरा मिनीटाच्या अंतराने एकएक गीफ्ट मिळत गेले... त्या चिमुरड्याचा आनंद वाढत गेला... माऊलीच्या मोबाईलमधे नवनवीन आनंद क्षण साठत गेले. प्रत्येकवेळी गिफ्ट सापडल्यावर पोराच्या चेहेऱ्यावर खुलून दिसणारा आनंद बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळत होते. साधारण दोन तासाच्या वर हा आनंदशोध सुरु होता. तेवढ्या वेळात त्या पोराने सर्व गिफ्टस् शोधून काढल्या. त्याला धमाल मज्जा आली. त्याला हव्या असलेल्या सगळ्या व त्याने शोधलेल्या गोष्टी कवेत घेऊन घरातील सर्वांना त्याने त्या दाखविल्या व सर्वांना तो सांगत होता, या सगळ्या गिफ्टस् मी शोधल्या..तेरा गिफ्टस्.. मी तेरा वर्षांचा झाले म्हणून.. माझ्या आईने मला दिल्या...पण मी त्या शोधल्या... मिळण्यापेक्षा शोधल्याचा आनंद जास्त होता व ती आनंदाची शीग त्याच्या आईने तिच्या अतिशय कल्पक मनाने टाकलेली होती. ती एक छोटीशी पण कल्पक शीग त्या मुलाला अप्रतिम आनंदाचे दोन तास देऊन गेली. मुलाच्या चेहेऱ्यावरचा तो निखळ आनंद बघून त्या माऊलीला अगदी आकाश ठेंगणे झाल्यागत वाटले. तिच्या कल्पक मनाने परत एकदा कमाल करुन तिच्या पोराच्या आयुष्यात मज्जा आणली होती.
आनंद घेण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करीतच असतो परंतू त्याच त्या प्रकारे आनंद घेतल्याने त्याचाही कंटाळा येऊ शकतो. यासाठी प्रत्येकवेळी आपल्या व आपल्या सभोवतालच्या लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करताना जमल्यास आनंदाची एक कल्पक शीग टाकावी. ती छोटीशी असली तरी भरपूर मोठा आनंद निर्माण करु शकते. शेवटी आपल्या स्नेहीजनांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यापेक्षा मोठा आनंद तो काय राहू शकतो?
खूप छान लेख सर ,शीर्षकही आवडलै. पैशाला सुख मानून मुलांनाही तेच चुकीचे संस्कार देणारेपालक बघतांनाकाळजी वाटते.मुब्ईला असताना काही लहान मुलांच्या गप्पा ऐकल्या .सुटीत सिंगापूर ,पँरीसला जाण्याविषयी ५-६वर्षाची मुले बोलत होती.ती मुले आपल्या सारख्यांच्या घरातली हौती. लैखाबद्दल पुन्हा अभिनंदन!
ReplyDeleteव्वा... सर खरचं मिळाल्यापेक्षा शोधल्याचा आनंद अप्रतिम असतो...आम्हाला हा कल्पक आनंद दिल्या बद्दल तुमचे अप्रतिम आभार सर..मजा आ गया..
ReplyDelete