My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

सुटका
सकाळचा व्यायाम आणि फिरणे आटोपून मी निवांत वर्तमानपत्र वाचत बसलो असताना अंगणातून आईने आवाज दिला - अवि, हे बघ काय झालंय!! मी लगेच बाहेर जाऊन बघितले तर मला एक अत्यंत ह्रदयद्रावक दृष्य बघायला मिळाले. आमच्या घराच्या बाहेर इलेक्ट्रीकचे मीटर आहे व त्याला झाकण्यासाठी एक अॅल्युमिनीयमचा बॉक्स बनविला आहे. त्या बॉक्समधे काही दिवसांपासून एक छोट्या पक्षिणीने घरटे बनविले होते. त्यात दोन छोटी पिल्ले देखील होती. नुकते त्यांचे डोळे उघडले होते. त्या डब्याला असलेल्या गॅपमधून ती पक्षीण येणे जाणे करुन आपल्या पिलांना जेवण भरवायची. त्या दिवशी त्या डब्याच्या झाकणामधून बाहेर पडताना त्याच्या दरवाज्याच्या भेगेमधे त्या पक्षीणीचा पाय अडकला. पाय अडकल्यावर तेथून निघण्याच्या नादात तिने जी धावपळ केली त्यामुळे तिचा पाय वाईट पद्धतीने जखमी झाला व त्या अर्धवट तुटलेल्या पायाच्या जोरावर ती त्या झाकणाला लटकलेली होती. मी जेव्हा तिला बघितले तेव्हा त्या अडकलेल्या परिस्थितीतून सुटका करुन घेण्याच्या तिच्या क्षमता संपलेल्या होत्या. मी जवळ गेल्यावर तिने पुन्हा तडफड करण्याचा प्रयत्न केला. माणसांचा हिंस्त्रपणा सर्वांनाच माहीत असल्याने तिने माझ्यावर विश्वास ठेवण्याचे कारण नव्हते. तिचे ते तडफडणे बघून तिची पिल्ले केविलवाणे होऊन केवळ ओरडत होते. एक क्षण काय करावे मला कळेना. पण तिची तडफडदेखील बघवत नव्हती. सुरुवातीला मी एक प्लेट घेऊन त्या पक्षिणीला त्यावर आधार दिला. छोट्याश्या तुटलेल्या पायाच्या आधारे शरीराचे वजन पेलवून ती थकली होती. तिच्या शरीराला आधार मिळाल्यावर ती शांत झाली. तिचे डोळे उघडे होते.. तडफडीमुळे श्वास मात्र जोराजोरात सुरु होता. दोन मिनीटे मी तिला त्याच स्थितीमधे ठेवले व तिच्या त्या अवघडलेल्या स्थितीचे अवलोकन केले. फार वाईट स्थिती झाली होती त्या पक्षीणीची. त्या डब्याच्या झाकणाला असलेल्या धारेमुळे तिचा पाय पूर्ण कापल्या गेला होता. बोटे व त्याला लागून असलेला भाग व उर्वरीत शरीर यामधे एक छोटेसे हाडच शिल्लक होते. तिने सुटकेसाठी केलेल्या तडफडीमुळे घासून घासून तो पाय रक्तबंबाळ झाला होता. एकंदरीत तिच्या परीस्थितीचा अंदाज घेता त्या पायासोबत तिला राहणे कठीण होते. तिने इतकी तडफड का केली याचाही अंदाज मला आला. ती तशी लटकलेली बघितल्यावर एक मांजर लगेच सावध होऊन तिचा फडशा पाडण्याच्या बेतात होती. पुढे त्या पक्षिणीचे काय करायचे, तिची कशी सुटका करायची हा विचार सुरु होता..चांगलाच पेच होता.. तिला त्या परिस्थितीत सोडता येत नव्हते, तिचा पाय पूर्ण निकामी झाला होता, तिला त्या लोंबकळणाऱ्या पायासोबत ठेवताही येत नव्हते व त्वरीत सुटका करणे गरजेचे होते अन्यथा तिचा तसाच प्राण जाण्याची शक्यता होती. काय करावे या विवंचनेत असताना मी माझ्या मुलाला घरातून कात्री आणायला लावली. मी काय करतोय याचा अंदाज येईपर्यंत घरातील सगळेच मंडळी नाही असे करु नका म्हणून सांगायला लागले. त्यांचे तसे म्हणणे यासाठी सुरु झाले कारण मी त्या पक्षिणीचा पाय कापण्याचा निर्णय घेतला. तिच्या पायाचा खालचा भाग कापून टाकल्याखेरीज तिची सुटका होऊ शकत नव्हती याबाबत मी ठाम होतो. पण असे तोडून टाकणे सोपे नसते. सर्वांनी मला विरोध केला. त्यांच्या बोलण्यावरुन मी थोडा वेळ थांबलो देखील.. लोक काय म्हणतात याचा आपल्या अनेक निर्णयांवर परीणाम होत असतो. परंतू मला मनोमन असे वाटत होते की या पक्षिणीच्या पंखांमधे इतकी क्षमता आहे की तुटलेल्या पायामुळे तिचे काही अडणार नाही.. ती परत एकदा नव्याने आयुष्य जगू शकेल कारण तिच्या पिल्लांना तिची गरज आहे. डाव्या हातात घेतलेल्या प्लेटमधे ती पक्षिण निपचित पडली होती. जगण्याची आशा कदाचित तिने सोडली असणार. माझ्या उजव्या हातात कात्री होती व समोर तिचा जवळपास तुटलेला व रक्ताळलेला पाय होता... असे काही करु नको असे सांगणारे आवाज होते.. आणि दोनच क्षण विचार करुन मी... सटकन् त्या पक्षिणीचा पाय कापला.. आणि त्यानंतर जे घडले ते बघून आम्ही सर्वच आनंदित झालो.. पाय कापल्या क्षणी, होते नव्हते तेवढे बळ वापरुन ती पक्षीण क्षणार्धात भुर्रकन् उडाली व समोरच्या झाडावर जाऊन बसली. पाय तुटका होता तरी तिला काहीच अडचण गेली नाही. त्यानंतर पुढील काही दिवस ती पक्षीण अगदी सहजच नेहमीप्रमाणे आपल्या पिलांसाठी खायला घेऊन यायची. त्या डब्यामधे शिरताना तिला जरा त्रास व्हायचा परंतू तिने ते सहजच जमविले. पाय तुटलेला असला तरी तिचे काम अडले नाही कारण तिच्या पंखांमधील बळावर तिचा विश्वास होता व त्या विश्वासाच्या जोरावर तिचे जीवन पुन्हा सुरळीत सुरु झाले. अडकून गेलेल्या पायामुळे ती असहाय झालेली होती. त्या पायाचे अडकणेही खरेतर नकळत झाले होते. असा पाय कापताना वेदना झाल्याच असणार. परंतू तो पाय कापून टाकल्यामुळे तिची झालेली सुटका ही त्या अडकून पडलेल्या वेदनांपेक्षा कितीतरी सुखावह होती.
त्या पक्षिणीप्रमाणेच अडकलेली स्थिती बरेच वेळा माणसांच्या जगातही झालेली आपल्याला दिसते. काही नाती ही लोकआग्रहास्तव व लोकइच्छांमुळे तयार झालेली असतात. नाते जोडून घ्या, त्याला लागणारे प्रेम आपोआप निर्माण होईल ही भारतीय परंपरेमधली एक महत्वाची व पूर्वापार चालत आलेली संकल्पना आहे. परंतू बरेचवेळा अपेक्षित प्रेम निर्माण होईल या आशेवर आयुष्याची अनेक वर्षे निघून जातात. कर्तव्यांची पूर्तता करता करता आपल्या इच्छा आकांक्षांचा बळी देत देत व त्याला - समर्पण - नावाच्या शब्दाचे वेष्टण लावून अनेक मानवरुपी पक्षी व पक्षिणी आतून तुटलेल्या परंतू लौकिकार्थाने सांभाळाव्या लागणाऱ्या नात्यांसोबत लटकत असतात. असल्या नात्यांमधे काही तर जीवाचा छळ किंवा हिंसा देखील सहन करतात. वर्षानु वर्षे. कुणाला सांगितले तर काय होईल? पालकांना कशाला उगाच त्रास! तोडणे सोपे असते पण जोडणे अतिशय कठीण या सारख्या विचारांची पारंपारिक श्रुंखला असतेच.. आणखी जास्त आवळून टाकायला. अशीच एक मानवरुपी पक्षिण आपल्या आई वडीलांना त्रास होऊ नये म्हणून अनेक वर्षे अश्याच लटकलेल्या नात्याच्या जाचामधे तडफडत होती. विवाहपश्चात जवळपास बारा वर्षे म्हणजे एका तपाहून अधिक काळ तिने ते तडफडणे सहन केले. स्वतःचा अडकलेला पाय तिला कापता येत नव्हता व इतरांना आपल्यामुळे त्रास होईल ही चिंता करीत तिने कुणालाच तो पाय कापू दिला नाही.. केवळ रक्तबंबाळ होत राहीली. परंतू तडफडण्याची व त्रास सहन कण्याची देखील एक क्षमता असते. जेव्हा तिच्या लक्षात आले की आता तिची ती क्षमता संपुष्टात येत आहे तेव्हा मात्र आई-वडीलांच्या नावाने तिने जिवाच्या आकांताने हाक मारली. आई वडील त्वरीत तिच्या मदतीला गेले व त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन तिचा त्या अत्यंत क्लेशदायी नात्यामधे अडकलेला पाय कापून मोकळा केला व तिच्या पंखातील बळ गोळा करुन दिले. ती आता उडण्यासाठी नवे आकाश शोधतेय.. अत्यंत आनंदाने.
या मानवरुपी पक्षिणीला ती शेवटची आरोळी मारता आली म्हणून तिला नवे आकाश मिळू शकले पण ज्यांना आरोळी देखील मारता येत नाही त्यांचे काय? त्यांच्या जीवलगांनी याबाबतीत लक्ष ठेवायला हवे. घरघूती हिंसाचार हा नव्या काळात फार मोठ्या प्रमाणात वाढलेला प्रकार आहे. मोठ्या प्रमाणात स्त्रीयांच्या पण काही प्रमाणात पुरुषांच्या बाबतीतही तो घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. आपण ज्यांना आपले जीवलग समजतो त्यांच्या जीवनात अश्या प्रकारे त्रासदायक ठरणाऱ्या नात्यांचा पाय कापून त्यांची सुटका करण्याची गरज भासल्यास त्यांना आवश्यक ते मानसिक बळ पुरविणे आपले कर्तव्यच आहे. शेवटी आपल्या जवळच्यांची काळजी घेणे त्यालाच म्हणतात ना?
 

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18