My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
मुस्कुराने के कर्ज
अनेक वर्षांनंतर मीराला तब्बल दहा दिवसांची सुटी मिळणार होती. दहा दिवस ती त्या घरापासून दूर, घरातील माणसांपासून दूर एकटी आणि एकटी राहणार होती. जेथे ती जाणार होती तेथे कुणीही तिच्या परीचयाचे नव्हते. तेथेही जास्तीत जास्त वेळ एकटे राहण्यात व स्वतःशी संवाद साधण्यात जाणार होता. तसे बघितले तर आयुष्यात पहिल्यांदाच ती अश्याप्रकारे सर्वकाही सोडून जाणार होती. त्या शिबीराचे पत्रक जेव्हा तिच्या हातात आले तेव्हा त्यातील दोन शब्दांनी तिच्या मनाला स्पर्श केला.. ते शब्द होते - शोध स्वतःचा. खरोखरीच घरच्या जबाबदारींचे निर्वहन करता करता मीरा स्वतःला हरवून गेली होती. त्यामुळेच तिने त्या शिबीराला जाण्याचा निर्णय घरी जाहीर केला. तो निर्णय ऐकल्यावर तिला अपेक्षित तीव्र प्रतिक्रीया उमटल्याच. कारण त्या घराला चालविणारी व घरातील प्रत्येकाच्या जीवनाचा आधार असलेली मीरा दहा दिवस नसणार ही कल्पनाच कुणाला करवत नव्हती. तरुण अल्लड वयातील तारुण्यसुलभ भावनांसोबत जीवनाची जबाबदारी मीरावर कधी येऊन पडली हे तिला कळलेच नाही. पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्यावर लगेचच बँकेची परीक्षा देऊन मीरा नोकरीला लागली. त्या बँकेमधे नोकरीला लागणारी सर्वात लहान मुलगी म्हणून तिला गौरविण्यात आले. नोकरी लागण्याचे पेढे सर्वांना मोठ्या आनंदाने देताना ही नोकरीच तिला भविष्यात बंदिस्त करुन टाकणार आहे हे उण्यापुऱ्या एकवीस वर्षांच्या मीरेला कळलेच नव्हते. नोकरीचे पहिले वर्ष अत्यंत आनंदात गेले. आता हिचे लग्न लवकरच करावे लागेल असा विचारही आई वडीलांच्या मनात येऊ लागला आणि अचानक काळाच्या चक्राने पुढील चरण सुरु केले.
एका खाजगी नोकरीत असलेल्या मीराच्या वडीलांना अर्धांगवायूचा झटका आला व कामावरच ते धारातीर्थी कोसळले. त्या कोसळण्यासोबतच त्यांची नोकरी व त्यामधून असलेला आर्थिक आधार संपला. ते अंथरुणाला खिळले ते कायमचे. मीराचा मोठा भाऊ व्यसनाधीन झाल्यामुळे घर सोडून कुठेतरी निघून गेला तो कायमचा. लहान भावाचे शिक्षण सुरु होते. याचवेळी लवकरच आपले लग्न होईल व आपला संसार सुरु होईल अशी स्वप्ने बघत असलेल्या मीराला एके दिवशी आईचे वाक्य कानावर पडले. तिची आई शेजारच्या काकूंना रडत रडत सांगत होती, या अश्या परीस्थितीत तर आम्हाला भीकच मागावी लागली असती रस्त्यावर बसून पण देवाने कृपा केली आहे आणि एक कमावती पोरगी आमच्या पाठीशी आहे. आता ती असल्याने आम्हाला आमचे जीवन जगता येईल. आता सध्या इच्छा असूनही तिच्या लग्नाचा विचार करता येत नाही. आपल्या संसाराची स्वप्ने त्या वाक्यागणीक पूर्णपणे मनातून काढून मीराने त्या घरासाठी स्वतःला समर्पीत करायचे ठरविले. तेथून सुरु झाली मीराची एक वेगळी जीवन कहाणी.
घरातील प्रत्येकजण मीरावरच अवलंबून राहू लागला. लहान भावाची फी, बाबांची औषधे, संपुर्ण घरखर्च, घराचे भाडे, आईच्या देवदर्शनाची सहल, भावाची वाढदिवसाची पार्टी यासारख्या सर्व खर्चांची पूर्तता केवळ मीराची जबाबदारी बनली. हा सारा खर्च वजा जाता तिच्याजवळ स्वतःसाठी काहीच पैसे उरत नव्हते. सुरुवातीला तिच्याकडे पैसे मागताना घरच्यांना जरा संकोच व्हायचा परंतू पुढे पुढे ही सारी जबाबदारी केवळ मीराचीच आहे हा समज सर्वांचा झाल्याने आपापल्या सर्व गरजा तिच्या पगारातून पूर्ण करणे सहजच होऊ लागले. नाही म्हणायला आई कधीकधी पोरीच्या समर्पणाचे कौतुक करायची पण तिलाही या सर्व बाबींचा सवय झालीच होती. वर्षे पुढे पुढे जायला लागली. मीराचा भाऊ नोकरीला परगावी लागला परंतू त्याच्या फ्लॅटसाठी त्याला पैसे गोळा करावे लागणार आहेत त्यामुळे तो पैसे पाठवू शकणार नाही असे आईनेच मीराला सांगितले. त्यासोबतच तो लग्नदेखील करणार आहे ही बातमीही तिला मिळाली. मुलाच्या लग्नामधे काय काय खरेदी करावी लागेल याची यादी आपल्या मुलीच्या हातात देताना मुलीच्या लग्नाचा विचार तिच्या आईच्या डोक्यातून निघून गेला होता. याउलट माझ्या मुलीने घरासाठी जो त्याग केला त्याची तोड जगात नाही असे ती सर्वांना सांगत होती. भावाच्या लग्नानंतरही त्याला त्याच्या संसाराची जबाबदारी असल्याने मीराचा हा संसार सुरुच राहीला. रहाडगाडग्याप्रमाणे सुरु असलेल्या तिच्या आयुष्यात हे शिबीर म्हणजे एखाद्या स्वप्नजगताप्रमाणेच होते. शिबीरात जाण्याच्या तिच्या निर्णयाचा मूक विरोध आई वडीलांनी दर्शविला व भावाने मेसेज पाठवून स्पष्टपणे कळविला. परंतू कुणाचाही विचार न करता त्या शिबीराला मीरा निघून गेली. आयुष्यात पहिल्यांदा.
ते शिबीर म्हणजे मीरासाठी एक आनंदसोहळाच होता. सर्व अपरीचित लोकांमधे जास्तीत जास्त वेळ एकटे राहून ती खरे तर स्वतःचा शोध घेत होती. मोबाईल फोन बंदी असल्याने बाह्य जगताशी संबंध नव्हता. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या त्या आश्रमामधे मीरा आनंदाने न्हाऊन निघत होती. आश्रमाच्या बाजूने असलेल्या समुद्रकिनारी भल्या पहाटे ती जाऊन बसायची. किनाऱ्यावरचा वारा अंगअंग रोमांचित करायचा. मऊशार वाळूवर अनवाणी चालत, सागराच्या लाटांचे तुषार अंगावर घेत निसर्गाचे ते सुरेल रुप ती मनात वसवायची. वाळूवर अनेकवेळा आपलेच नाव लिहून त्याकडे बघायची. एखाद्या लाटेने ते नाव पुसले गेले की अकारणच खिन्न व्हायची. सायंकाळी त्याच किनाऱ्यावर छान गाणी म्हणायची. फार गोड आवाज होता मीराचा..परंतू घरी गाण्याच्या सरावासाठी वेळच मिळत नसल्याने व बाबांना गाण्याचा त्रास होत असल्याने तीचे गाणे बंद झाले होते. त्या सागर किनाऱ्यावर हळूवार आवाजात मीरा गात होती..जिथे सागरा, धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते..वाट पहाते. खरंच मी चांगले गाऊ शकते. आता घरी गेल्यावर गाण्याचा सराव करायचाच. घरी गेल्यावर मी स्वतःला वेळ द्यायला हवा. मलाही चांगले दिसण्याचा अधिकार आहे... पाण्यावर पडलेल्या स्वतःच्या प्रतिबींबाकडे बघून मीरा काहीतरी मनापासून ठरवीत होती. त्या निसर्गरम्य वातावरणात आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्यात याची तीव्रतेने जाणीव तिला झाली. पण आता हे सारे आपण करायचेच हा निर्धार तिने केला...
शिबीर संपले. परतीच्या प्रवासात रेल्वेच्या खिडकीतून येणारी थंडगार हवा चेहेऱ्यावर घेत जीवनात आता करण्याच्या खूप साऱ्या गोष्टींची मीरा उजळणी करीत बसली होती. आठवण आली म्हणून तिने मोबाईल सुरु केला.. बघते तो काय? लहान भावाचे पन्नासाहून अधिक मेसेज आले होते. बाबांची तब्येत बिघडली, त्यांना दोन दिवस दवाखान्यात ठेवावे लागले..मीरा तेथे नसल्याने त्याला सुटी घ्यावी लागली.. त्यात आई पाणी भरताना पडली.. तिचा पाय दुखावला आहे.. तीन दिवस झाले घरी खानावळीतूनच डबा बोलवावा लागतो आहे.. त्या खानावळवाल्याचेही पैसे द्यावे लागतील..मला आता फार येता येणार नाही..तू घरी असली म्हणजे मी निश्चिंतपणे राहू शकतो.. तू नसली की मला तिकडचाच विचार करावा लागतो.. तू लवकर परत ये.. अशी घर सोडून जात नको जाऊ.. तरी मी तुला सांगत होतो.. तिथे जाऊ नको म्हणून..घरचे सगळेच तुझ्यावर अवलंबून आहे..तुला कळत कसे नाही..वगैरे वगैरे...
तू काळजी करु नको. मी पोहोचतेच आहे आणि सर्व सांभाळते. यापुढे नाही जाणार...कुठेही. असा मेसेज भावाला तिने पाठविला आणि शांतपणे निसर्गरम्य दृष्यांचे रंगीबेरंगी जग दाखविणारी ती खिडकी मीराने शांतपणे बंद करुन घेतली. कुणाच्यातरी रेडीयोवर गाणे सुरु होते..गुलजारचे शब्द..
जीने के लिये, सोचा ही नही, दर्द सम्भालने होंगे।
मुस्कुरायें तो, मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे ।।
दहा दिवस मनसोक्तपणे जगून, स्वतःतील सुंदर बाबींचा स्वतःला साक्षात्कार घडवून, मनमुरादपणे हसण्याचे कर्ज फिटविण्यासाठी मीरा सिद्ध झाली. आयुष्यात सुख दुःख आयुष्यात येतच असतात पण मीरा सारखीला सुखाने हसण्याचेही कर्ज फेडावे लागावे ही नियतीची अजबच तऱ्हा आहे. अश्या मीरेच्या या अंतस्थ वेदना आपल्याला समजून घेता आल्या तर आपण काहीतरी करु शकू. ती सहसंवेदना आपल्याला आपल्या मनात जागविता येईल?

Comments
Post a Comment