My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

प्रोफेशनॅलीझम
चांगली नोकरी, भरपूर पगार तसेच सर्व सुखे दाराशी लोळण घालीत असलेल्या माझ्या एका मित्राच्या तोंडचे एक वाक्य ऐकून मी अचानक चमकलो. अनेक दिवसांनंतर आम्ही कनिष्ठ महाविद्यालयात सोबत शिकणारे बरेच मित्र मैत्रीणी एकमेकांना भेटलो होतो. साधारण असल्या कार्यक्रमांमधे सर्वात आधी एकमेकांचा नव्याने परीचय करुन देण्याची पद्धत असते. त्यानुसारच प्रत्येकजण आपला परीचय देत होता. सर्वसाधारणपणे सर्वांनी आपल्या परीवाराचा परीचय, नोकरीबाबतची माहिती व अन्य काही महत्वाच्या घडामोडी असा ढाचा अवलंबीला होता. सुनिलने मात्र स्वतःचा परीचय देताना त्याला मिळत असलेल्या पॅकेजपासून सुरुवात केली. तो कसा अत्यंत यशस्वी व श्रीमंत आहे हे सांगण्याचा व भासविण्याचा भरपूर प्रयत्न त्याने केला. एव्हडे बोलून तो थांबला नाही तर पुढे त्याने तो यशस्वी कसा झाला याचा मंत्र देखील आम्हा सर्वांना सांगितला. त्याबाबतच बोलता बोलता तो बोललेल्या एका वाक्याने मी जरा विचारात पडलो. तो म्हणाला माझ्या यशाचा एकच मंत्र आहे.. प्रोफेशनॅलीझम. माझे प्रत्येक काम, प्रत्येक विचार, प्रत्येक नाते प्रोफेशनलच असते, मी कधीही त्यात भावनांची सरमिसळ होऊच देत नाही. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण कॅल्क्युलेटेड असतो व त्याचा रीझल्ट तुम्ही सर्वजण बघता आहात. आपल्या ग्रुपमधे मी सर्वात यशस्वी आहे. त्याचे बोलणे संपल्यावर सर्वांनी टाळ्या वाजविल्या पण प्रत्येकच जण त्याच्या बोलण्याने बेचैन झाला होता. प्रत्येक क्षण व प्रत्येक नाते प्रोफेशनल कसे राहू शकते? जेवणाच्या वेळी मी सुनिलशी बोलताना तोच मुद्दा छेडला. त्याच्या त्या प्रोफेशनल जगण्याबाबत त्याने जे काही सांगितले त्याने मी अक्षरशः थक्क झालो. देवाने माणूस म्हणून जन्म दिल्यानंतर माणसाच्या प्रकृती व प्रवृत्तीनुरुप न वागता एखादा माणूस यंत्राप्रमाणे जीवन कसे जगू शकतो याचे उदाहरण म्हणजे सुनिल होय. सुनीलने जे काही सांगितले त्याचा व त्याला आयुष्यात मिळालेल्या यशाचा संबंध जोडत असताना एक दुवा मात्र निखळलेला मला जाणविला. पण त्याबाबत विचारणा करण्याआधी मी सुनिलला बोलता केला.
सुनिल म्हणाला, माझे इंजिनिअरींग झाल्यावर मी ठरविले होते की आपल्याला प्रचंड पैसा मिळवायचा आहे कारण पैसा हे या जगातील यशाचे प्रमाण आहे. त्याचवेळी मी माझ्या जीवनाला पुर्णतः प्रोफेशनली जगण्याचे ठरविले. प्रत्येक गोष्ट कॅलक्युलेटेडच करायची. त्याप्रमाणे आखणी सुरु केली. साधारण एक वर्ष लागले मला स्वतःला या पद्धतीने तयार करायला. पण त्यानंतर मात्र मी मागे वळून बघितले नाही. मला फायदा करुन देणारे लोक हेरले. त्यांच्याशी ठरवून संबंध प्रस्थापित केले. कुणाला कोणत्या दिवशी फोन करायचा हे देखील मी प्लॅन केलेले असते. लोकांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना बरोबर बुके पाठविणे अश्या अनेक गोष्टी ठरवून केल्या. लग्न करताना देखील मी भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतला नाही. माझ्या प्रोफेशनल जीवनाला मॅच होणारी पत्नी मला मिळाली. सोबतच तिच्या वडीलांचा मला नोकरीव्यतिरीक्त बीझीनेस उभारण्यामधे भरपूर पाठींबा मिळाला. माझी पत्नी एकुलती एक लेक असल्याचा भविष्यातील फायदा आहेच. कंपनीमधेही मी अश्याच प्रकारे माझे प्रोफेशनल संबंध निर्माण केलेले आहेत. सरळ सरळ हिशोब असतो यार! माझ्याकडून समोरच्याला फायदा करुन घ्यायचा असतो आणि मी देखील त्याचा मला काय उपयोग आहे हा विचार करीत असतो. अॅज सिंपल ॲज इट इज. त्या देण्याघेण्यापुरतेच संबंध निर्माण करायचे आणि काम आटोपले की तो त्याच्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने. विनाकारण भावनिक गुंतणूक वगैरे प्रकार मी मानतच नाही. तो सारा वेडेपणा आहे. या भावनांच्या आधारे लोकांना स्वतःचे नुकसान करुन घेताना मी बघितलेले आहे. पोट भरायला आणि जीवनातील सर्वोत्तम सुख सुविधा मिळविण्यासाठी पैसाच कामाचा असतो. ज्यांना तो मिळविता येत नाही ते लोक मग आहे त्यात समाधान किंवा पुढील जन्मासाठी संचित वगैरे अतार्किक बाबी बोलत राहतात. मला सांगा, मी ज्या सुविधा उपभोगतो त्यासाठी मी भावना वगैरे बाबींना तिलांजली दिली तरी काहीच फरक पडत नाही. मी विमानातून बिझीनेस क्लासने प्रवास करतो. उन्हाळ्याच्या आपल्या देशातील मरणप्राय गरमीला सोडून दोन महिने मस्त युरोपात किंवा अमेरीकेत असतो. माझी मुले मोठ्या मोठ्या बोर्डींग स्कुल मधे शिकतात. त्यांना सर्वोत्तम शिक्षण मी देतो. त्यांना देखील अगदी पाचव्या वर्गापासून मी स्वतंत्र बनविले आहे. विनाकारणच भावनिक होऊन आपल्याच जवळ त्यांना ठेवा आणि गुंतवून घ्या हे मला पटतच नाही. त्यांनाही अश्याचप्रकारे तयार केलेले आहे की ते माझ्याच सारखे होतील. अन्यथा लोक मुलांना मोठे होईपर्यंतही दूर जाऊ देत नाही. मुलांची आबाळ होते वगैरे गोष्टी सांगितल्या जातात. असे काही नसते. मुलांना स्वतंत्रपणे जितक्या लवकर जगू दिले तितके ते सक्षम होतात. भावनांच्या खेळात जर त्यांना अडकवले तर ते पांगळे बनतात. माझ्या मुलांना तुम्ही भेटलात तर त्यांना इतक्या कमी वयात आलेली समज तुम्हा सर्वांना थक्क करेल. त्यांना आलेला मॅनरीझम हा पुढील आयुष्यात अतिशय कामाचा आहे. अगदी माझ्या कारमधे माझ्या सोबत बसताना माझी मुले सभ्यतेनेच बसतात. गोंधळ अजिबात नाही. तुम्हाला ऐकून जरा आश्चर्य वाटेल पण कुणाला कोणती भेटवस्तू द्यायची, कोणत्या कार्यक्रमात जायचे, तेथे कोणते विषय बोलायचे, कुणाशी बोलायचे, कोणते कपडे परीधान करुन जायचे, मी कुणासोबत बोलायचे, माझ्या पत्नीने कुणासोबत बोलायचे, मुलांनी कुणासोबत ओळखी करुन घ्यायच्या हे देखील माझे ठरलेले असते. अमरावतीत असलेल्या मित्र मंडळींना मी जे म्हणतो आहे ते पटले नसणार पण शेवटी आयुष्यात यशस्वी होणे महत्वाचे आहे. आज माझ्याजवळ सर्वकाही आहे. आमच्या मित्राचे विचार ऐकून आम्ही खरोखरीच विचारात पडलो. इतक्या टोकाचा प्रोफेशनॅलीझम आयुष्यात बाळगणारा व्यक्ती आम्ही जवळपास पहिल्यांदाच बघत होतो. त्याचे सर्व ऐकल्यावर मी त्याच्या या प्रवासातील निखळलेल्या दुव्यासंबंधी त्याला विचारले. तो प्रश्न ऐकल्यावर मात्र आतापर्यंतचा त्याच्या बोलण्यातला आत्मविश्वास अचानक कमी झाला. त्याच्या चेहेऱ्यावर मला जरा खिन्नता जाणविली. त्या विषयाबाबत बोलताना तो सहजच खरे बोलून गेला.
मी त्याला विचारले की या संपुर्ण यशाच्या चढत्या आलेखात आम्ही सोडून तुझे कोण कोण मित्र मंडळी आहेत. हे विचारल्याबरोबर तो खिन्नपणे म्हणाला, ती एक समस्या आहे. शाळा सोडल्यानंतर मला कायमस्वरुपी कुणी मित्रच नाहीत. काही काळ असतात पण मग का कोण जाणे मैत्री संपुष्टात येते व मित्र मला सोडून जातात. हे का होते ते मात्र मला कळत नाही. क्षणभरच त्याच्या चेहेऱ्यावरची खिन्नता सर्वांना जाणविली पण लगेच स्वतःला सावरुन प्रोफेशनली तो म्हणाला की मी त्याचा फार विचार करीत नाही. मला मिळालेल्या यशासमोर मी जेव्हा मित्र नसण्याचा विचार करतो तेव्हा मला तो महत्वाचा वाटत नाही. 
आमच्या गेटटुगेदरच्या शेवटच्या टप्प्यात जीवनात यशस्वी झाल्याबद्दल सुनिलचा आम्ही सर्वांनी सत्कार केला. त्याच्या सत्कारासाठी आम्ही सर्वांनी टाळ्या वाजविल्या. परंतू त्या टाळ्या आम्ही वाजविल्या एका जीवंत, भावनिक व संवेदनापूर्ण माणसाचे संपूर्णपणे प्रोफेशनल, व्यावहारिक व कॅलक्युलेटेड यंत्रामधे परीवर्तन झाल्याबद्दल... जीवाला जीव देणाऱ्या मित्रांची किंमत न समजता, मुलांचे बालपण हिरावून त्यांना वेळेपूर्वीच समजूतदार बनवून, जीवनाच्या आनंदक्षणांमधील निरागसता पूर्णपणे गमावून, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कोणतातरी फायदा होण्याच्याच दृष्टीने करुन निव्वळ प्रोफेशनॅलीझमच्या आधारे आमच्या मित्राने मिळविलेल्या यशाला यश म्हणावे का? हा प्रश्न मात्र फार सतावतो आहे. कुणाला देता येईल का याचे उत्तर?



Comments

  1. Very good thoughts Avinash nice writing I like it

    ReplyDelete
  2. केवढा आकांत भवती
    जिंकण्यची होड ही
    हारतांना हासणारी माणसे गेली कुठे
    कवी बबन सराडकरांच्या ओळी आठवल्या
    यशाच्या धुंदीत माणूस हरवत चालला आहे . नेमके वास्तव व्यक्त केलेत सर ! छान लेख ,आवडला.

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख सर... जीवनाच्या या धावपळीत नेमकं यश कशाला म्हणायचं हा फार मोठा प्रश्न आहे...आजुबाजुचं वातावरण.. त्यामुळे नेमकी यशाची परिभाषा बदलत चालली आहे... आणि ज्या Professionalism वर तुमच्या मित्राने भर दिला तो दिवसेंदिवस वाढत आहे... यश मिळविताना त्यात सहभागी वाटसरू तुमच्या सोबत शेवटपर्यंत असले पाहिजे.. आणि तेचं खरं यश.. ते तुम्ही इतक्या सहजपणे स्पष्ट केलं त्याबद्दल तुमचं खुप खुप अभिनंदन..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18