My article published in Hindusthan daily today uner my column थोडा है थोडे की जरूरत है
वडील नावाचे छत..
होळीचा दिवस. सुधाकर आपल्या मुलाला घेऊन बाजारामधे गेला. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळमाती असली तरी ती होळीच्या दिवशी संध्याकाळपासूनच अनेकांच्या अंगात येत असते. त्यामुळे बाजारात तोबा गर्दी होती. भाजी आणण्यासाठी मुलाला त्या बाजारात फिरविण्यापेक्षा त्याला कुठेतरी बसवून द्यावे व आपण भरभर भाजी घेऊन यावी असा विचार सुधाकरने केला. त्याच्या कार्यालयात येणाऱ्या एका फळ विक्रेत्याजवळ एका छोट्या स्टुलवर त्याने त्याच्या चार वर्षांच्या मुलाला, राजूला बसविले. त्याच्या हातात फुटाण्याचा पुडा देऊन सुधाकर बाजारहाट करायला निघाला. त्या फळ विक्रेत्यानेही त्याला जायला सांगितले - साब, आप जाईये, हम बच्चे का खयाल रखेंगे. सुधाकर बाजाराच्या आत पोहोचत नाही तोच नेमका विद्युत पुरवठा खंडीत झाला. बाजारात गर्दी, लोकांची धावपळ आणि त्यात सगळीकडे अंधार झाला. लवकर लवकर भाजी घेऊन घरी जाऊया असा विचार त्याच्या मनात आला. नेहमीप्रमाणे सावकाश प्रत्येक भाजी नीट बघून, निवडून आणण्याची त्याची नेहेमीची सवय त्याने बाजूला ठेवली आणि पटापट भाजी विकत घेतली. मनात कुठेतरी राजूचा विचार होताच. लहानसे पोर तेथे बसून वाट बघत असेल असे त्याला वाटले. अर्थात ओळखीच्या माणसाजवळ ठेवले असल्याने चिंता नव्हती. घाई केली तरीही आठवडाभराची भाजी घ्यायला त्याला साधारण अर्धा तास लागलाच. तोवर पूर्ण अंधार पडला होता. जागोजागी दुकानदारांनी टेंभे पेटविले होते पण तरीही फार काही दिसत नव्हते. बाजारातून बाहेर पडून त्याने तडक त्या फळवाल्याची गाडी गाठली आणि राजूला म्हणाला, चला बेटा, घरी जाऊ. घरी आई... त्याचे वाक्य पूर्ण होता होताच त्याच्या लक्षात आले की स्टूलवर राजू नाही. फळाच्या गाडीजवळ बरीच गर्दी होती, लोक खरेदी करीत होते. सुधाकरने जोरात गाडीवाल्याला विचारले, राजू कहाँ है? गाडीवाला दचकला व घाबरत म्हणाला, साब यहीं तो था, अभी तो मैने उससे बात की.. सुधाकरच्या काही क्षणातच लक्षात आले की फार मोठी गडबड झालेली आहे. ग्राहकांच्या गर्दीमुळे या फळवाल्याचे लक्ष राहीले नाही आणि मुळातच एका जागी फार वेळ स्वस्थ न बसणारा त्याचा मुलगा त्या गर्दीत हरविला आहे. पायाखालची जमीन सरकावी असे त्यास झाले. रात्रीचे आठ वाजलेले.. विद्युत पुरवठा नसल्याने सगळीकडे अंधार, धुळमातीच्या आधला दिवस असल्याने सगळीकडे माणसेच माणसे.. या असल्या महाकाय गर्दीत त्याचा चार वर्षांचा पोरगा हरविला होता. पायातील सर्व बळ जाऊन सुधाकर त्या स्टुलवर बसला... काय करावे त्याला काहीच सुचेना.
काही क्षणांनंतर सुधाकर भानावर आला तेव्हा तो फळ विक्रेता त्याला पाणी देत होता. त्याने आपली गाडी बंद केली होती व तो त्याला आर्जवीत होता.. साब, बहोत बडी गलती हो गयी, हम उसे ढुंडते है, बच्चा मिल जाएगा.. तत्क्षणी सुधाकर पूर्ण भानावर आला.. बसून चालणार नव्हते. त्याने फळविक्रेता व त्याची दोन मुले सोबतीला घेऊन राजूचा शोध सुरु केला. चार दिशेने ते चौघेही निघाले. सगळीकडे अंधार असल्याने फार काही दिसत नव्हते. शिवाय गर्दी फार होती त्यामुळे त्यांनी राजूच्या नावाने जोरजोरात हाका मारणे सुरु केले. परंतू राजू गवसतच नव्हता. बाजारातील जवळपास प्रत्येक दुकानामधे जाऊन सुधाकरने राजूची चौकशी केली. जवळपास तो एक तासभर राजूच्या नावाने ओरडत होता. एव्हाना ओरडून ओरडून त्याचा घसा सुकून गेला होता. तोंडातून आवाज फुटणे बंद झाले. राजू सापडण्याची आशा धूसर व्हायला लागल्यामुळे नकळत त्याच्या डोळ्यातून पाणी ओघळायला लागले. राजू जर सापडलाच नाही तर? मनाला हादरवून टाकणारा विचार होता तो.. त्याला त्याच्या पत्नीचे, नंदिनीचे शब्द आठविले.. आज तुम्ही त्याला सोबत नेऊ नका. बाजारात फार गर्दी असते, आणि शिवाय होळी असल्याने खूप लोक दारु वगैरे पिलेले असतात त्यामुळे याला आज घरीच ठेवा. त्या बाजाराच्या गर्दीत माझे पोर हरविले तर? नंदिनीचे शब्द अक्षरशः खरे ठरले होते. रात्रीचे साडेनऊ झाले होते. बाजारातील गर्दी आता जरा ओसरायला लागली होती. जागोजागी पेटलेल्या त्या टेंभ्यांच्या आड असलेल्या काळोखात सुधाकरचे पोर दिसेनासे झाले होते. डोळ्यातून अश्रू वाहत असताना आणि तोंडातून आवाज येणे बंद झाले असताना सुधाकर एका ठिकाणी थकून चक्क जमिनीवरच बसला. तो फळ विक्रेता देखील त्याच्या बाजूने रडत बसला होता. साब मुझे माफ कर दो एव्हडेच तो म्हणत होता. त्याची दोन्ही मुले देखील रडत बाजूला बसली. सर्व बाजार शोधून आली होती ती दोघे परंतू राजूचा पत्ता नव्हता. एव्हाना बऱ्याच दुकानदारांना या घटनेची माहिती मिळाली होती. सुधाकर तसे मोठे प्रस्थ असल्याने आता बरेच लोक गोळा झाले होते. सर्वचजण हळहळत होते. सुधाकरला तर काय करावे हे सुचतच नव्हते. राजूशिवाय घरी जाऊन नंदिनीला काय सांगू याचा विचारही आला तर त्याच्या मनाला कापरे भरत होते. एव्हड्यात कुणीतरी बाजाराच्या पलीकडे असलेल्या दुकानांमधे बघुया म्हणून सूचना केली. तो एक आशेचा किरण होता. सुधाकर ताडकन उठला. तो भाग बघायचा राहिला हे लक्षात आल्यावर तो त्या दिशेने धावतच सुटला. तो फळविक्रेता आपल्या मुलांसह त्याच्यामागे धावत सुटला. मांस विक्रेत्यांची ती सारी दुकाने होती. कधीही मांस न खाणाऱ्या किंवा त्या दुकानांकडे न फिरकणाऱ्या सुधाकरने तेथील प्रत्येक दुकानात आतमधे जाऊन जाऊन राजूला शोधले पण तरीही राजू सापडला नाही. आता मात्र सुधाकरचा धीर संपुर्णपणे खचला. आता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करणे याखेरीज काहीच उपाय नव्हता. पूर्ण बाजार ओलांडून तो मुख्य रस्त्यावर आला. त्या रस्त्यावरील दुकानांकडे बघताना त्याच्या लक्षात आले की ही दुकाने देखील शोधायची राहीली आहेत. गेले दोन तास चाललेल्या आशा निराशेच्या खेळातील तो आणखी एक आशेचा किरण होता. परत धावाधाव सुरु झाली... घसा खरवडून राजूला हाका मारणे सुरु झाले आणि अचानक एका किराण्याच्या मोठ्या दुकानाजवळ सुधाकर थबकला...त्या दुकानात एका साखरेच्या पोत्यावर बसून राजू मस्तपैकी साखर खात बसलेला होता...त्याला बघून सुधाकर अक्षरशः राजूसारखा रडायला लागला. राजूला घट्ट ह्रदयाशी धरुन त्याला काय वाटले असेल याची कल्पना एक बापच करु शकतो. हा प्रसंग आम्हाला सांगताना देखील सुधाकरच्या डोळ्यात पाणी होते. बापाचे ह्रदय असेच असते. प्रसंगी कठोर वागत असले तरीही वडीलांचे आपल्या जीवनातील अस्तित्व शब्दातीत असते.
आज हा प्रसंग कसा काय लिहीला गेला ते कळले नाही. वडीलांच्या भूमिकेबद्दल आणि आधाराबद्दल विचार करता करता बरेच वर्षांपूर्वी ऐकलेला हा प्रसंग मनात आला. माझ्या मनात लिखाण करताना माझ्या वडीलांबद्दलचे विचार होते..तीव्रतेने त्यांची आठवण येत होती... बरेचवेळा आईच्या आणि वडीलांच्या प्रेमाची तुलना केली जाते. खरे तर अशी तुलना होऊ शकत नाही. आईचे तर आपण अविभाज्य घटक असतो पण वडीलांनी आपल्याभोवती जे सुरक्षिततेचे कवच उभारलेले असते ते आपल्याला जगण्याचे बळ देते. वडील म्हणजे आपल्या डोक्यावरचे छत असते. परंतू कधीकधी हे छत आपल्याला सोडून जाते. मोकळ्या आकाशाखाली आपण पोरके होऊन भकासपणे उभे राहतो. आकाशाच्या पलीकडल्या जगात गेलेल्या आपल्या वडीलांना हाक मारण्याचा प्रयत्न करतो.. वडील नावाचे ते छत हरविल्यामुळे आपल्याला अचानक निराधार वाटू लागते..अश्यावेळी अश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत असतानाच एक आवाज अंतर्मनात उमटतो.. घाबरु नकोस..मी तुझ्या जवळच आहे, मी तुझ्यातच सामावलेला आहे, तू माझाच अंश आहेस, मी तुझ्या रुपाने अजूनही आहे.. वडीलांचा तो आपल्या मनात उठणारा आश्वासक आवाज ऐकल्यावर जगण्याचे बळ येते.
दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (५ एप्रील २०१४) माझ्याही डोक्यावरचे वडीलरुपी छत अचानक हरविले...मी पोरका झालो.. पण माझ्या अंतर्मनात उठणारा त्यांचा आवाज जगण्याचे बळ देतो.. वडील आपल्याला कधीच सोडून जात नाहीत.. ते कायम आपल्याजवळच असतात. त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी वडीलच व्हावे लागते हे मात्र तितकेच खरे..

Comments
Post a Comment