My article published in Hindusthan daily under my column थोडा है थोडे की जरूरत है
आंदोलन
दहा वर्षांपूर्वीची गोष्ट... सकाळी साधारण पाच वाजता दवाखान्याच्या त्या बाकड्यावर झोपलेल्या मनोहरला नर्स उठवायला आली. पहाटे पहाटे त्याला गाढ झोप लागली होती. रात्री अंदाजे तीन वाजेपर्यंत तो जागाच होता. त्याची आई दवाखान्यात क्रीटीकल केअर युनीटला भरती होती. रात्री दोन तीन वेळा तो आईला बघून आला होता. आईचे असे रुप त्याला बघवत नव्हते. वेगवेगळ्या नळ्या लागलेल्या, वेगवेगळी यंत्रे लागलेली. अचानकच आईला त्रास झाला आणि दवाखान्यात भरती करावे लागले. इतक्या सकाळी डॉक्टरांनी बोलाविले म्हणल्यावर मनोहर जरा काळजीत पडला होता. त्या विशेष कक्षामधे तो गेला तेव्हा डॉक्टर आईच्या बेडजवळ उभे राहून तिला तपासत होते. चेहेरा गंभीर होता. मनोहर आईच्या बेडपर्यंत पोहोचल्यावर डॉक्टरांनी आईची तब्येत अजून खालावल्याचे त्यांनी त्यांस सांगितले. तेथील यंत्रांवरची वेगवेगळी रीडींग त्यांनी मनोहरला दाखवून आईच्या तब्येतीच्या स्थितीबद्दल अवगत केले. खरे तर मनोहरला त्यातील काहीच कळले नाही. डॉक्टरांचे शेवटचे एकच वाक्य त्याला नीट ऐकू आले, यांना आता नागपूरला हलविल्याशिवाय पर्याय नाही. त्वरीत आईला नागपूरला नेण्याचा त्याने निर्णय घेतला. आम्हा काही जवळच्या मित्रांना फोन केले व साधारण एक तासाने सर्व आपातकालीन सुविधा असलेल्या एका रुग्णवाहीकेतून मनोहर, त्याचे मामा, त्याचा चुलतभाऊ आणि एक डॉक्टर आईला घेऊन नागपूरच्या दिशेने सुसाट वेगाने रवाना झाले. त्यावेळी अमरावतीहून नागपूरला जायला बराच वेळ लागायचा कारण साधाच रस्ता होता. तिवसा गाव पार करुन रुग्णवाहिका पुढे निघाली. तळेगाव या गावाआधी वर्धा नदीवर एक जूना पूल त्याकाळी होता. रुग्णवाहिका त्या पुलावर जेमतेम पोहोचली की ड्रायव्हरच्या लक्षात आले समोर पूर्णपणे वाहतूक थांबलेली आहे. सदर रस्ता महामार्ग क्र. ६ असल्याने या मार्गावर खूप वाहतूक असते. रुग्णवाहिका पुलावर थांबलेली होती. त्यासमोर जवळपास पाचशेहून अधिक वाहने अडकलेली होती. मनोहर व त्या ड्रायव्हरने रुग्णवाहिकेच्या खाली उतरुन नेमके काय झाले आहे याचा बरेच अंतर चालत जाऊन अंदाज घेतला. नेमके काय झाले आहे हे जाणून परत येईपर्यंत त्या पुलावर अडकलेल्या रुग्णवाहिकेच्या मागेदेखील पाचशेहून अधिक वाहने दाटीदाटीने थांबलेली होती. मनोहरने परत येऊन रुग्णवाहिकेतील डॉक्टरांना सांगितले की समोरच्या गावात पाणी मिळत नाही म्हणून लोकांनी चक्काजाम आंदोलन केले आहे व रुग्णवाहिका पुलावर अडकून पडल्यामुळे थांबावे लागेल. त्याक्षणी डॉक्टरांनी गंभिरतेने मनोहरला सांगितले की त्याच्या आईजवळ फार वेळ नाही. त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती करणे अत्यावश्यक आहे. रुग्णवाहीकेचा ड्रायव्हर देखील त्याक्षणी काहीच करु शकत नव्हता. गाडी पुलावर अनेक वाहनांमधे अडकली होती. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन मनोहर व त्याचा चुलतभाऊ आंदोलनाच्या जागी अक्षरशः धावत निघाले. तेथे पोहोचल्यावर त्यांना पाणी प्रश्नावर रस्त्यावर चाललेले ते उग्र आंदोलन बघायला मिळाले.
साधारण हजार लोकांच्या समुहाने पाण्यासाठी चक्काजाम आंदोलन चालविले होते. रस्ता बंद करण्यासाठी त्यांनी चक्क एक ट्रक रस्त्यावर आडवा लावून त्याला आगच लावून दिली होती. वाहतूक पूर्णपणे बंद. ते सर्व लोक अत्यंत उग्रपणे घोषणा देत होते. पोलीसांचा ताफा होता परंतू हजारपेक्षा जास्त लोकांना सांभाळण्याइतपत नव्हता. मनोहरने धावत जाऊन सर्वप्रथम त्याठिकाणी तैनात पोलीस अधिकाऱ्यास परीस्थितीचे गांभिर्य सांगितले परंतू या लोकांना आवरणे कठीण आहे कारण रुग्णवाहीका काढायची म्हणजे समोरची सारी वाहने सोडावी लागतील आणि त्यासाठी हे लोक तयार होणार नाही असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. आंदोलक फारच भडकलेले होते. तरीदेखील त्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कुणाशीतरी आपण बोलून बघू असा विचार त्या अधिकाऱ्याने मांडला. एक एक क्षण मनोहरसाठी आणि त्याच्या आईसाठी महत्वाचा होता...आंदोलनातील एका माणसाला बाजूला बोलावून मनोहरने त्यांस परिस्थिती समजावून सांगितली. मनोहरने रडत रडत अक्षरशः त्याचे पायच धरले. काही वेळानंतर त्या माणसाला मनोहरची दया आली व त्याने चर्चा करतो असे आश्वासन दिले आणि तो त्या गर्दीत गडप झाला. घोषणा, ट्रकला लावलेल्या आगीमुळे सर्वत्र पसरलेला धूर या सर्व कोलाहलामधे त्या गर्दीकडे हताश होऊन मनोहर बघत राहिला. साधारण पंधरा मिनीटांनी तो माणूस सोबत तीन चार कार्यकर्त्यांना घेऊन आला. अक्षरशः देवदूतच वाटला तो मनोहरला. मनोहरने हात जोडून परत एकदा आईची परीस्थिती समजावून सांगितली. मनोहरचे म्हणणे त्यांना पटले व त्यांनी रुग्णवाहीकेसमोरील दहा गाड्यांना पुढे काढून रुग्णवाहीकेसाठी वाट काढून देण्याचे त्यांनी कबूल केले. मनोहरच्या जीवात जीव आला. रुग्णवाहीका जरा पुढे निघाली...पण तेव्हड्यात.. केवळ दहा वाहनांना परवानगी दिली असताना त्यामागच्या एका ट्रकवाल्याने या स्थितीचा फायदा घेत जोरात ट्रक पुढे काढण्याचा प्रयत्न केला. ते बघताच आधीच आंदोलनाच्या मुडमधे असलेला जमाव अचानक हिंस्त्र झाला. त्यांनी त्या ट्रकवर तुफान दगडफेक सुरु केली. जमावच तो. त्यासोबत त्यांनी उरलेल्या सर्व वाहनांवर देखील दडगफेक सुरु केली. अाता कोनालेच जाऊ नाई द्याचं, मारा साऱ्याईले अश्या आरोळ्या ठोकीत त्या जमावातील काही लोकांनी उत्पात माजविणे सुरु केले. यामुळे ड्रायव्हरला रुग्णवाहिका परत जोराने मागे पुलावर घ्यावी लागली. आता मात्र त्या जमावाने हिंसक रुप धारण केले. आंदोलनाच्या नेत्यांचे देखील त्यावरील नियंत्रण संपले होते. आतापर्यंत शांतपणे उभे असलेले पोलीस दल अचानक कार्यान्वित झाले. त्यांनी जमावावर तफान लाठीचार्ज सुरु केला. सोबतच अश्रुधराचा वापर देखील करण्यात आला. हे बघताच आंदोलकांकडूनही परत एकदा दगडफेक सुरु झाली. गोंधळाचे वातारवरण तयार झाले.... मनोहरच्या आईची परिस्थिती मात्र खालावत होती. हतबल होऊन मनोहर रडू रागला. काय करावे त्याला काहीच सुचेना. साधारण दिड तासांपासून त्यांची रुग्णवाहीका त्या ठिकाणी अडकली होती. पुढे तासभर तोच प्रकार सुरु राहीला. पोलीसांनी केलेल्या बळाच्या वापरामुळे जमाव पांगला आणि तीन तासांनंतर वाहतूक सुरु झाली. त्यानंतर मात्र पोलीसांनी रुग्णवाहीकेला वाट मिळवून दिली.. सुसाट वेगाने रुग्णवाहिका नागपूरला एका मोठ्या रुग्णालयात पोहोचली. नागपूरच्या आमच्या मित्रांनी तेथील व्यवस्था केलेलीच होती. तातडीने मनोहरच्या आईला आयसीयू मधे नेण्यात आले...
...साधारण दहा मिनीटानी डॉक्टर बाहेर आले व त्यांनी मनोहरच्या खांद्यावर हात ठेवून एकच वाक्य उच्चारले, आय अॅम सॉरी. एक तास जरी मिळाला असता तरीही आम्ही त्यांना वाचवू शकलो असतो. तुम्हाला पोहोचायला उशीर झाला...साधारण तीन तासांनी सर्व प्रक्रीया आटोपून त्याच रुग्णवाहीकेतून आईचे शव घेऊन मनोहर परत अमरावतीकडे निघाला. रडून रडून थकून गेलेला मनोहर शांतपणे समोर बसला होता. डोक्यात केवळ डॉक्टरांचे तेच शब्द होते.. एक तास उशीर... अचानक गाडी थांबली..
त्याने बाहेर बघितले तर तेच आंदोलनाचे ठिकाण व परत गाड्या थांबलेल्या होत्या. पण यावेळी तेथे रस्त्यावर ढोलताशे वाजत होते. लोक फटाके फोडत होते, नाचत होते. थांबलेल्या प्रत्येक गाडीतील सर्वांना पेढे दिले जात होते. पेढे देणारा सांगत होता... आंदोलन यशस्वी झाले, आमच्या गावाला आता पाणी मिळणार... खिडकीतून मनोहरच्या हातावरही त्याने पेढा ठेवला. खरे तर आता गाडी थांबण्याचे काहीच वाटत नव्हते. परंतू तेव्हड्यात चार पाच कार्यकर्ते आले व रुग्णवाहिकेला पुढे काढा, थांबवू नका असे सांगण्यात आले... सर्वांनी तत्परतेने वाट मिळवून दिली.. रुग्णवाहिका पुढे निघाल्यावर सर्वांनी जोरात घोषणा दिली... भारत माता की जय...
लोकशाही प्रक्रीयेमधे न्याय्य मागण्यांसाठी आंदोलने करणे हा एक सक्षम मार्ग आहे. परंतू आधुनिक काळात या आंदोलनांमधून मोठ्या प्रमाणात हिंसा व सार्वजनिक संपत्तीची नासधूस हेच प्रामुख्याने घडताना दिसते. जितका उत्पात जास्त तितकी आंदोलनाला प्रसिद्धी हे नवे सूत्र असल्याने आंदोलनाचे नेते देखील बरेचवेळा या गोष्टींना खतपाणी घालताना दिसतात. ही असली हिंसक आंदोलने आपल्या देशाला व समाजाला परवडणारी नाहीत कारण काही भिषण समस्या आपल्या दाराशी येऊन ठाकलेल्या आहेत ज्याचा मुकाबला आपल्याला एकत्रीतपणे केल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या देशाजवळ असलेली ही प्रचंड लोकशक्ती सकारात्मकतेने वापरणे आपण शिकायला नको का?

'मना घडवी.. संस्कार!'..पण ते झाले नाही तर काय irretrivable प्रमाद होतात हातून, ते यातून दिसले.
ReplyDelete'मना घडवी.. संस्कार!'..पण ते झाले नाही तर काय irretrivable प्रमाद होतात हातून, ते यातून दिसले.
ReplyDeleteआन्दोलन जानदोलन होते आणि "कधी मोर्चा काढला नाही अन सम्पही केला नाही "असेच निरपराध लोक बळी पडतात .
ReplyDeleteGreat article
ReplyDeleteGreat article
ReplyDelete