My article published in Hindusthan daily today under थोडा है थोडे की जरूरत है

प्रजासत्ताक दिन..एक नवा प्रवास
आज आपण सर्वजण आपल्या लाडक्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. प्रजेची सत्ता असलेला अर्थात जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश, जगातील सर्वात जास्त विविधता असलेला आपला देश, जगातील कदाचित सर्वात जास्त संवेदनशील असलेला आपला देश आज दिल्लीच्या राजपथावर नजर ठेऊन आहे जेथे आपल्या देशाच्या सर्व शक्तीस्थळांचे दर्शन घडणार आहे. दिल्ली येथील राजपथावरील गणतंत्र दिवसाचे पथसंचलन बघताना आपल्या देशाबद्दलचा अभिमान दुणावतो. राजपथावर खाडखाड कवायत करीत जाणारी ती पथके, सैन्यदलातील आधुनिक शस्त्रास्त्रांचे भव्य दर्शन, वेगवेगळ्या राज्यांच्या कलासंस्कृतींचे दर्शन घडविणारे चित्ररथ, पुरुषांच्या बरोबरीने कवायत करणारे महिलांचे पथक, शौर्य गाजविलेल्या लहान मुलांचे पथक, महाविद्यालयांमधून प्रशिक्षण घेत असलेल्या राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे पथक इत्यादी सर्व बाबी बघताना आपल्या देशाच्या मजबूत, अभेद्य आणि एकसंघ प्रजासत्ताकाचा मनोमन अभिमान वाटायला लागतो. परंतू प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दाखविली जाणारी ही एकसंघतेची क्षमता केवळ २६ जानेवारी या दिवसापुरती मर्यादित राहते की काय अशी शंका बरेच वेळा आपल्या मनात निर्माण करणाऱ्या अनेक घटना वारंवार आपल्या आसपास घडताना दिसतात. त्या बरेचवेळा आपल्याला खिन्नही करतात. परंतू आजच्या प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने या संघराज्याची एकसंध असण्याची ताकद आजच्या दिवसापासून रोज पाळल्या जाणाऱ्या प्रवासामधे परावर्तीत करण्याचा विचार सुरु व्हायला हवा ही आपल्या देशाची सर्वात महत्वाची मागणी आहे. आपल्या देशासमोर उभ्या ठाकलेल्या एका भिषण समस्येच्या पार्श्वभूमीवर हा विचार सर्वच सुजाण नागरिकांनी करणे गरजेचे आहे. हे वाद विनाकारणच आहेत - असा विचार मनात आणीत असलेल्या सर्व घटनांना आता आपण सर्वांनी मिळून थांबवायला हवे. या देशाच्या संवेदनशील वृत्तीला या नव्या प्रवासाकडे वळविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. कारण आपल्या समोरील समस्या ही आपला वर्तमान आणि भविष्य अंधःकारमय करु शकते इतकी मोठी आहे.
२६ जानेवारी रोजी आपण आपला प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना त्याच्या तयारीचे वर्णन विविध वृत्तवाहिन्यांवरुन देणे सुरु आहे. आपल्या सबंध देशात या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. सबंध देशभरात तगडी सुरक्षाव्यवस्था उभारण्यात आली आहे. देशाच्या राजधानीचे, नवी दिल्लीचे अभेद्य किल्ल्यात रुपांतर करण्यात आले आहे. जागोजागी कडक सुरक्षा प्रबंध करण्यात आले आहेत. दिल्लीच्या प्रत्येक कोपऱ्यावर बारीक नजर ठेवली जाणार आहे. ज्या राजपथावर आपण आपल्या शक्तीस्थळांचे दर्शन घडविणार आहोत त्या राजपथाला तिहेरी सुरक्षाकवच देण्यात आले आहे. हा संपुर्ण परीसर एन एस जी कमांडोजच्या बारीक निगराणी खाली आहे. यासोबतच या परीसराच्या चारही बाजूने विमानरोधी क्षेपणास्त्रे बसविण्यात आलेली आहे. हा संपुर्ण परीसर वायुसेनेची प्रात्यक्षिक करणारी विमाने वगळता नो फ्लाय झोन बनविण्यात आला आहे. दिल्ली पोलीस, सिमा सुरक्षा बल, केंद्रीय सुरक्षा बल, एन एस जी कमांडोज आणि पहिल्यांदा सीआयए च्या विविध तुकड्यांनी ही सुरक्षा व्यवस्था राबविली जाणार आहे. या गणतंत्र दिवसाचे पथसंचलन बघण्यासाठी येणाऱ्या या देशाच्या प्रत्येक नागरिकाची, विद्यार्थ्यांची कसून चौकशी व तपासणी केली जाणार आहे व त्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार व वारंवार समिक्षा केली जात आहे. आपलाच प्रजासत्ताक दिन परंतू तो साजरा करण्याच्या समारंभ इतक्या सुरक्षा व्यवस्था उभा करुन आपणाला साजरा करावा लागत आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास एका भयंकर भयाच्या वातावरणात आपण प्रजासत्ताक असल्याचा आनंद साजरा केल्याचा देखावाच करतो आहे. हा संपुर्ण समारंभ बिनधोक साजरा होईपर्यंत सुरक्षा व्यवस्थेचा प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक जवान, प्रत्येक सैनिक, प्रत्येक कमांडो आपल्या प्राणाची पर्वा न करता डोळ्यात तेल घालून निगराणी करणार आहे. आपल्या स्वतंत्र देशात इतक्या मोठ्या भयाच्या सावटाखाली जर आपल्याला आपले राष्ट्रीय सण साजरे करावे लागत असतील तर आपल्या देशासमोर एक अतिशय भिषण समस्या उभी ठाकली आहे आणि या समस्येचा मुकाबला करण्यासाठी आता आपल्या एकसंघतेचा नवा प्रवास करण्याची नितांत आवश्यकता आहे. या प्रवासात आपल्या समाजात असलेल्या काही सवयी तातडीने बदलविण्याची गरज आहे.
संघराज्य म्हणून एकसंघतेचा गौरव करीत असताना अजूनही आपण आपल्या समाजातील जातीव्यवस्थांच्या विषारी विळख्यातून बाहेर पडायला तयार नाही. किंबहुना सोशल मिडीयावरील नव्या पिढीचे विचार कधीकधी मती गुंग करतात. इतिहासाचे चुकीचे किंवा सोयीचे संदर्भ गोळा करुन आणि इतिहासतज्ञ असल्याचा आव आणीत जातींमधे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तरुण मंडळी करतात तेव्हा निराश वाटायला लागते. तरुणांनी या असल्या जातीपातींमधील तेढ निर्माण करणाऱ्या षडयंत्रांना बळी पडून त्या विषारी विचारांचा प्रसार करणे ही बाब अतिशय घातक आहे. या असल्या विचारांच्या प्रसारासाठी फेसबुक, व्हॉट्स अॅप यासारख्या सोशल मिडीयाच्या साधनांचा वापर केला जाते व त्याद्वारे वेगवेगळ्या जातीचे तरुण तरुणी परस्परविरोधी गरळ ओकायला लागतात आणि आपल्या समाजातील दुभंगतेचे विकृत दर्शन घडवितात. या असल्या प्रकारांमुळे हळूहळू आपल्या समाजामधे परत एकदा परस्परांबद्दल विद्वेषाची भावना निर्माण होते आहे याची जाणीव असे लेखन करणाऱ्या मंडळींना होत नाही. यामधूनच सामाजिक एकोपा प्रस्थापित करीत असलेल्या काही चांगल्या प्रयत्नांना देखील खिळ बसायला लागली आहे. खरे तर असल्या विचारांना कोणतेही उत्तर न देता संपुर्णपणे दुर्लक्षित केले जावे, अश्या विचारांना प्रसारित करणाऱ्याला अनफ्रेंड करावे किंवा ग्रुपमधून दूर करावे. त्यांच्या विकृत विचारांनी संतापून जाऊन काहीही लिहीण्यापेक्षा हा एक चांगला मार्ग आहे जेणेकरुन त्यांना ते करीत असलेल्या वाईट व सामाजिक हिताच्या विरोधातील कृतीबद्दल पश्चाताप होऊ शकेल. खरे तर या प्रजासत्ताकाच्या पावन पर्वावर राष्ट्राचा व राष्ट्राच्या विकासाचा अभिमानात्मक विचार करताना एक विचार नवा प्रवास म्हणून स्विकारायला हवा तो म्हणजे - एकसंघतेचा विचार.
एकसंधता हा मूळ विचारच आपणा सर्वांना येणाऱ्या काळात आपल्या देशाकडे वक्रदृष्टी ठेऊन बसलेल्या अतिरेकी संकटाचा सामना करण्यासाठी बळ देणार आहे. आपण सर्वांनी सर्व प्रकारची विविधता जपून अंतिमतः एकत्रीत राहणे यातच आपले व आपल्या येणाऱ्या पिढीचे भले आहे. आपण जर अशा क्षुल्लक व कालबाह्य बाबींवरुन अजुनही विद्वेषाचे बळी ठरत असू आणि ते विष प्रसारित करत असू तर नव्या पिढीला आपण चुकीच्या दिशेने नेण्याचे पातक करीत आहोत असेच म्हणावे लागेल. याचे महत्वाचे कारण म्हणजे दहशतवाद्यांनी पेरलेला एखादा बॉम्ब फुटल्यानंतर त्यामधे जातींनुसार लोक मरत नाहीत तर भारतीय माणसांचे शरीर छिन्नविछिन्न होते. एखाद्या आतंकवाद्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या गोळ्या जात बघून घाव करीत नाहीत तर त्या गोळ्यांसरशी भारतीय परीवार उध्वस्त होतात. मुंबईला सीएसटी वर झालेल्या गोळीबारात सांडलेले रक्त कुण्या विशिष्ट जातीच्या लोकांचे नव्हते तर या देशाच्या अस्मितेवर झालेल्या क्रुर हल्ल्याचा तो रक्तलांछीत डाग होता जो संपुर्ण भारतीय मनावर उमटला. देशाच्या अस्मितेवर, स्वातंत्र्यावर तसेच अखंडतेवर विविध बाजुने असुरक्षेचे काळे ढग गोळा होत असताना या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व बाबी सोडून केवळ भारतीय या विशेषणाला संलग्नित राहून एकत्र येण्याचे आपल्याला ठरविता येईल? चलो! इतना तो हमारे देश के लिये करते है यारों...





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18