My article published in hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

छुटे हुए लम्हे
तो म्हणाला होता -  या एक जानेवारीला आपण नक्की भेटायचे. एक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस. मराठी वर्षाचा नाही पण तरीही महत्वाचा दिवस कारण आपण इंग्रजी कॅलेंडरनुसारच आपले जीवन जगतो. मराठी कॅलेंडरचे सर्व महिनेही पाठ नसतात. पण एक जानेवारीला तो दिवस साजरा करण्याऐवजी काही मंडळी विनाकारणच आंग्ल आंग्ल म्हणून ओरडतात. जाऊ दे! आपल्यासाठी हा महत्वाचा दिवस आहे. नव वर्षाची सुरुवात.. आज आपल्याला दोन मिनीटे का होईना भेटायचे आहेच. वर्षाच्या पहिल्या दिवसाची ही भेट मला वर्षभर आनंद देत राहणार आहे. त्या दोन मिनीटाच्या भेटीत काही बोलणे होणार नाही.. परंतू तुझ्या माझ्या प्रेमाला शब्दांची गरज कुठे आहे? आपण तर केवळ डोळ्यांनी बोलतो. डोळ्यांनी एकमेकांच्या मनाचा वेध घेता येतो इतकी एकरुपता आपल्या नात्यात आहे. मला तुला या एक तारखेला भेटून डोळ्यांनीच सांगायचे आहे की तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहेस आणि प्रेमाचा खरा अर्थ मला तुझ्या प्रेमाच्या उत्कटतेवरुनच कळला आहे. खरोखरीच असे तुटून प्रेम करता यावे आणि त्या प्रेमासाठी तुझ्यासारखी सखी मिळावी यापेक्षा भाग्य ते काय? पण हे सारे मला तुला जाणवून द्यायचे आहे पुसटश्या शेकहँडच्या स्पर्शातून. तो हलकासा स्पर्श आणि त्या स्पर्शातून कळणारी प्रेमाची तीव्र पण गोड भावना...हे सारे भावबंध त्या भेटीतून मला मिळवायचे आहेत. वर्षभर आपण भेटत राहूच सखे पण वर्षाच्या पहिल्या दिवशीची ही भेट आणि ते क्षण फार महत्वाचे का आहेत, सांगू? ती भेट मला आनंद देणार आहे वर्षभराचा, ती भेट मला सुख देणार आहे अपरीमित.. ती भेट मला बळ देणार आहे वर्षभर येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि ती भेट माझ्यासाठी ठरणार... अविस्मरणीय कारण त्या दोन मिनीटाच्या भेटीचा सुगंध दरवळत राहणार वर्षभर..माझ्यासवे. मग भेटशील ना मला? ती म्हणाली- हो नक्कीच.
इतक्या सुरेख व मनःस्वी भावनांचा आधार असणारी ही भेट व्हायलाच हवी असे आपल्याला निश्चितच वाटत असेल पण घडले काही निराळेच. ती आपल्या कर्तव्यांची पूर्तता करण्यात गुंतून पडली ज्यामुळे तिला दोन मिनीटांसाठीही त्या वर्तुळातून बाहेर पडता आले नाही आणि तो वाट बघत राहीला.. आणि एक जानेवारी उलटून गेली. ते क्षण जे कदाचित त्या दोघांनाही सारख्याच प्रमाणात व प्रेमाने ओथंबलेल्या मनाने जगायचे होते..परंतू ते क्षण निसटले. कधीही परत न येण्यासाठी. एक जानेवारी ही तारीख पुन्हा येणार होती परंतू या वर्षीच्या एक जानेवारी या तारखेचा तो दिवस मात्र निसटला. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात थोडेसे मागे डोकावल्यास असे लक्षात येते की असे निसटून गेलेले क्षण एक दोन नाहीत तर अश्या क्षणांची मालीका असते. मानवाचे प्राण्यांपासूनचे वेगळेपणच कदाचित या क्षणांच्या निर्मीतीच्या मागे असलेल्या मनामुळे आहे. आयुष्यात विविध रंगांची व आकांक्षांची स्वप्ने बघणे ही केवळ मानवप्रवृत्ती आहे. केवळ मनावालाच स्वप्ने पडतात व त्या स्वप्नांमधूनच त्याच्या मनात विविध प्रकारच्या आकांक्षा निर्माण होतात. या आकांक्षांची पूर्तता करणे हे त्याचे जीवनध्येय असते. परंतू बरेच वेळा फार मोठ्या जीवनध्येयासोबत असे छोटे छोटे आनंदक्षण देखील माणसाचे आयुष्य समाधानी व प्रफुल्लीत करतात. अर्थात आकांक्षापूर्तीच्या या प्रवासामधे दोन वेगवेगळे मत प्रवाह समाजात असतात. एक मतप्रवाह या आकांक्षांना बंदीस्त करुन त्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचा विचार मांडतो. या मतप्रवाहात आकांक्षा व इच्छा हेच मुळी दुःखाचे मूळ आहे असे सांगितले जाते व त्यामुळे जितक्या आकांक्षा अधिक तेव्हडे दुःख देखील अधिक असे सूत्र या विचारांना पुरस्कृत करीत असलेल्या मंडळींनी मांडलेले असते. मानवाच्या आयुष्यात जितक्या आकांक्षा कमी तेव्हडे त्याचे आयुष्य सुखी होते कारण अश्या प्रकारच्या मानसिकतेमधे अपेक्षाभंगाचे दुःख रहात नाही. अनेक लोकांना हा विचार पटतो. परंतू यापेक्षा वेगळा मतप्रवाह देखील आपल्या समाजामधे अस्तित्वात आहे. तो म्हणजे - जिंदगी ना मिलेगी दोबारा - या विचारांचा मतप्रवाह.
या प्रकारच्या वैचारिक प्रक्रीयेमधे मानवाला एकच आयुष्य मिळाले आहे व त्यामुळे भरपूर स्वप्ने बघावी व त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मनापासून प्रयत्न करावे कारण प्रयत्न केल्याशिवाय ती स्वप्ने पूर्ण करताच येणार नाहीत. विशेषतः सध्या च्या आधुनिक काळात बरेच लोक या मतप्रवाहाला अनुसरुन जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतात. या विविध व रमणीय स्वप्नक्षणांना प्रत्यक्ष जीवनात जगण्याची धडपड, त्यासाठी केलेले प्रयत्न आणि धाडस हेच जीवनाला खरा अर्थ प्राप्त करुन देतात असे या मंडळींचे म्हणणे आहे. आपल्या जीवनाच्या आपणच ठरविलेल्या घट्ट चौकटी दिवसागणीक समाज, नाती व परंपरा या नावाखाली आणखी घट्ट करीत जगत राहण्यापेक्षा मुक्तपणे जीवनाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत, नवनविन आश्चर्ये व साहसे पर पाडीत जगणे हेच खरे जीवन आहे असे या मंडळींचे मत असते. या प्रकारच्या मंडळींच्या आयुष्यातही काही क्षण सूटून गेलेले असतातच परंतू ती संख्या तुलनेने कमी असते.
क्षण निसटून जाणे ही मात्र मानवाच्या जीवनासोबत चालणारी निरंतर प्रक्रीया आहे. वेगवेगळ्या कारणांनी हे क्षण निसटत राहतात. कधी कर्तव्यांची पूर्तता, कधी समाजाचे दडपण, कधी परंपरांची बांधिलकी, कधी आपल्या मनाचा भिडस्तपणा, कधी अकारण निर्माण झालेले भय किंवा कधी तर होकार कसा द्यावा हे न सूचणे असल्या कारणांनीही फार मोलाचे व जीवनाचा उत्कृष्ट आनंद देणारे क्षण आपण गमावलेले असतात. त्या क्षणांचा आनंद देण्याची सारी योजना कदाचित परमेश्वराने बनविलेली असते परंतू ऐनवेळी काहीतरी कारण घडतं आणि... ते क्षण निसटतात. यामधे कधी एक जानेवारीची भेट असते, कधी ढोलताश्याच्या नादावर नाचायचे असते, कधी पावसामधे चिंब भिजायचे असते, कधी मोठ्याने गाणे म्हणायचे असते, कधी फॅशनेबल कपडे घालायचे असतात, कधी पॅराशुटच्या सहाय्याने उंच उडायचे असते, कधी एखाद्या इको पॉईंटवरुन आवडत्या व्यक्तीला हाक मारुन त्याचे प्रतिध्वनी ऐकायचे असतात, कधी समुद्रकिनारी वाळूवर आपल्याच पाऊलखूणांना लाटांनी मिटताना बघायचे असते, कधी घनदाट जंगलामधे गुलज़ारने वर्णन केलेली - वाँदी में गुंजती हुयी खामोशीयाँ असतात....हे असले अनेक क्षण निसटलेले असतात. परंतू हे क्षण निसटले तरीही माणसाचे जीवन थांबत नाही. ते पुढे चालत राहते.. तात्यासाहेब शिरवाडकर म्हणतात त्याप्रमाणे छिन्न विच्छीन्न झालेल्या स्वप्नांच्या काचेसमान तुकड्यांवर चालून रक्तबंबाळ होत नव्या स्वप्नांच्या दिशेने अग्रेसर होतो तो खरा माणूस. खरोखरीच निसटून गेलेल्या अनेक सुंदर क्षणांसाठी आयुष्य थांबत नाहीच पण...
निसटून गेलेल्या या क्षणांना आपण विसरुही शकत नाही हेही तितकेच खरे. आणि मग कधीतरी एखाद्या शांत निरव सायंकाळी या क्षणांची गर्दी मनात दाटून येते. हे सारे क्षण जगता आले असते तर किती छान झाले असते असेही वाटून मन अकारणच खिन्न होते... त्यावेळी असे वाटते...
छुटे हुए उन लम्होको दिल मे रखा है अब तक ।
न जाने उनकी अनछुई महक रुलाऐगी हमे कब तक ।
जी न पाये उन लम्होको जींदगीमे हम फीर भी ।
भूल न पाऐंगे उन्हे साँस चलती रहें जब तक ।।
आपल्या आयुष्यात असल्या अनेक क्षणांच्या आकांक्षांना निर्माणच होऊ द्यायचे नाही की या आकांक्षांना प्रयत्नांचे पंख लावून विविध गोड क्षणांना जगण्याचा प्रयत्न करायचा हा प्रत्येकाचा स्वतंत्र दृष्टीकोन आहे. 






 

Comments

  1. अगदी खरं आहे सर... पुन्हा एकदा विचारात पडलो आहे... आठवणीत रममाण आहे...

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18