My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
तुफानाची तेजःपुंज शोकांतिका
कुणी घर देतं का घर? एका तुफानाला कुणी घर देतं का घर? आयुष्याच्या चौरसावर सारं काही गमावून बसलेले असहाय नटसम्राट गणपतराव बेलवलकर विचारीत असतात हा प्रश्न आणि त्या प्रश्नाचा प्रत्येक शब्द व त्या प्रत्येक शब्दासोबत निर्माण होणारी वेदना आपले काळीज खोलवर जाळीत जाते. गणपतरावांची ही आर्त हाक आपल्या डोळ्याच्या कडा पाणावते व त्यासोबतच आपण सामील होतो एका शोकान्तिकेच्या प्रवासात. नटसम्राट - आणखी एक नाटक चित्रपट रुपाने आपल्यासमोर अवतरलंय. काही महिन्यांपूर्वी सुरांची कट्यार चित्रपटाच्या रुपाने सुबोध भावेंनी आपल्या ह्रदयात वसविली. आता महेश मांजरेकरांनी नटसम्राटची शोकान्तिका आपल्या अनुभवाला आणली, भव्य सेल्युलॉईडवर. नाटकाच्या रंगमंचाला असलेल्या मर्यादा येथे नाहीत, सेटची देखील ठराविक चौकट नाही. सोबत आपल्या दमदार अभिनयांनी व्यक्तिरेखा जिवंत करुन त्यात प्राण ओतणारे दिग्गज कलाकार यात आहेत. मुळात वि.वा. शिरवाडकरांच्या भाषेचा बाजही जवळपास तसाच जोपासला आहे त्यामुळे नटसम्राट हा चित्रपट बघणे म्हणजे अभिजात साहित्य, दर्जेदार अभिनय आणि अप्रतिम दिग्दर्शन याच्या त्रिवेणी संगमाचा लाभ घेण्यासारखे आहे. गाजलेल्या नाटकांना चित्रपटांमधे परावर्तीत करण्याच्या या प्रयोगांबद्दल काही नाट्य रसिकांची व रंगकर्मींची नाराजी देखील आहे. काहींना हे नाटकांचे अवमुल्यनही वाटते. परंतू या प्रयोगांमुळे साहित्य व नाट्य क्षेत्रातील या अजरामर कलाकृती आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचल्या नव्हे तरुणाईला या कलाकृतींनी वेड लावले आहे. ज्याप्रमाणे कट्यार ची गाणी तरुणांच्या मोबाईलमधील प्ले-लीस्ट मधे पोहोचली त्याचप्रमाणे तात्यासाहेबांचे नटसम्राटमधील जबरदस्त संवादही त्यांच्या तोंडी येतील व त्या निमित्ताने लखलखित मराठी भाषेचे तेजःपुंज रुप त्यांना अनुभवता येईल यात शंका नाही. या एका कारणासाठी या असल्या प्रयोगांना स्विकारायला हवे असे वाटते. कट्यार प्रमाणेच नटसम्राट हा देखील एक अत्यंत यशस्वी प्रयोग ठरला आहे. कलात्मकतेच्या सर्वच कसोट्या हा चित्रपट पार करतो आणि चित्रपट बघून प्रेक्षागृहाच्या बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला सुन्न करुन टाकतो. त्या सर्वांना बघून अॅरीस्टॉटलच्या पोएटीक्स मधील शोकांतिकेचे तत्व पूर्ण होताना आढळते.
थोर ग्रीक तत्वज्ञ अॅरीस्टॉटलने त्याच्या पोएटीक्स या ग्रंथामधे शोकांतिकेच्या सुत्रांचे वर्णन केले आहे. यामधे त्याच्या मते भय व करुणा या दोन भावनांना प्रेक्षकांच्या मनात उद्दीपित करणारी कलाकृती म्हणजे खरी शोकांतिका. श्रेष्ठ इंग्रजी नाटककार विलीयम शेक्सपीयर यानेदेखील त्याच्या शोकांतिका लिहीताना या सूत्रास आधार मानलेच होते. त्याच्या किंग लीयर, हॅम्लेट, मॅकबेथ किंवा ऑथेल्लो या शोकांतिकांच्या मागे हेच मूळ तत्व होते. शेक्सपीयरच्या किंग लियरचा आधार घेऊनच तात्यासाहेबांनी नटसम्राटचे लेखन केले. या नाटकांचे संदर्भदेखील यात येतात. परंतू तो केवळ आधार, उर्वरित सारे काही तात्यासाहेबांच्या लेखणीतून निर्माण झालेले हे मराठी भाषेतील अमूर्त शब्दशिल्प आहे ज्याचा प्रत्येक कण अन् कण आपल्याला रोमांचित करुन टाकतो आणि आपण त्या दर्जेदार मराठी भाषेच्या प्रभावाने थक्क होऊन जातो. तात्यासाहेबांचे प्रत्येक वाक्य हे मराठी भाषेच्या प्रभावी सौंदर्याचा आविष्कार ठरते म्हणूनच मूळ नाटकातील गाजलेले संवाद या चित्रपटातही जसेच्या तसे वापरुन मांजरेकरांनी यथोचित न्याय दिला आहे व मूळ संहिताही बऱ्याच अंशी जतन केली आहे. अर्थात ही शोकांतिका ज्यावेळी लिहील्या गेली त्यापेक्षा आता समाज खूप बदललेला असल्याने त्या काळी नटसम्राट बेलवलकरांना मिळालेला प्रेक्षकांचा आधार तेव्हड्या प्रमाणात मिळणार नाही असे वाटते.
नाटकामधे वर्णन केलेला काळ व त्या काळानुसार बेलवलकरांचे रांगडे वागणे कथावस्तूत चपखल शोभून दिसायचे. परंतू आता मात्र नव्या पिढीचे तरुण मंडळी बेलवकरांवर त्यांच्या मुलीने चोरीचा आळ घेणे याचे समर्थन कराणार नाही परंतू त्यांच्या दारु पिऊन बरळण्याबाबत किंवा नातीला शिव्या शिकविण्याबाबत बेलवलकरांच्या सुनेचा पक्ष घेतील अशी स्थिती आहे. जुन्या काळातही बेलवलकरांचे वागणे त्यांच्या सुनेला पटले नव्हते आताच्या काळात तर अजिबातच पटणार नाही. नव्या युगात सफाईदारपणे वागणे व बोलणे याला महत्व प्राप्त झाल्याने, तसेच माणसाचे त्याच्या वेशभुषेवरुन व भाषेवरुन मुल्य ठरविल्या जाणाऱ्या जगात बेलवलकरांची शिव्यांची लाखोळी वाहणारी भाषा, दारु निशिद्ध न मानून तिचा मनसोक्त आस्वाद घेण्याची पद्धत आणि रंगमंचावरील अनभिषिक्त सम्राट असल्याने वागण्याची बेदरकार वृत्ती या सगळ्या बाबी नव्या चौकटीत बसत नाहीत किंवा नकोश्या होतात. म्हणूनच बेलवलकरांच्या या आधुनिक जगात सादर होणाऱ्या शोकांतिकेला त्या प्रमाणात करुणा व भयाची साथ लाभताना दिसत नाही. किंबहुना बेलवलकरांच्या अश्या वागण्यामुळे शेवटी असेच होणार असाही संदर्भ निघेल. असे घडणे अत्यंत स्वाभाविक आहे कारण तात्यासाहेबांची संहिता तिच आहे परंतू त्याचा अनुभव घेणारा समाज बदललाय. कट्यार या चित्रपटात असे झाले नाही कारण त्या कथावस्तूत प्रेक्षक स्वतःला शोधत नाही. त्याचा निखळ आनंद घेतात. येथे मात्र अजाणतेपणी प्रेक्षक त्या कलाकृतीशी स्वतःला जोडतो आणि म्हणूनच आपले मत बनवितो. अर्थात अॅरीस्टाॅटलच्या तत्वानुसार आवश्यक असलेले दोन भाव करुणा व भय याच्या निर्मितीचे प्रमाण जरी कमी असले तरीही ही कलाकृती प्रत्येकाच्याच मनापर्यंत पोहोचते.
नटसम्राट ही चित्रपटरुपी कलाकृती आपल्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात महत्वाची भुमिका आहे ती शब्दांची...तात्यासाहेबांच्या भाषेची. त्या अलंकारीक परंतू ह्रदयाला भिडणाऱ्या भाषेच्या श्रवणामुळे आपले कान तृप्त होतात. म्हणूनच हा चित्रपट फार काळजीपूर्वक व एकाग्रचित्ताने बघावा लागतो. या सामर्थ्यशाली भाषेला जोड मिळाली आहे ती सामर्थ्यशाली अभिनयाची. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांनी तर कमाल केली आहे. नटसम्राट बेलवलकर या विलक्षण व्यक्तिरेखेचे सर्व बारकावे आणि त्यांच्या स्वभावाचे सर्व पैलू अत्यंत ताकदीने नाना पाटेकरांनी सादर केले आहेत. काही प्रसंगी तर बेलवलकरांची अगतिकता आणि परत स्वभिमानाने पेटून उठणे या दोन्ही परस्परविरोधी भावना त्यांनी इतक्या तीव्रतेनी दाखविल्या आहेत की डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात. हे अश्रू मात्र जुन्यासोबत नव्याही पिढीच्या लोकांच्या डोळ्यात तरळून जातात. चित्रपट संपताना एका नटसम्राटाचा करुण पण स्वाभीमानाने झालेला अंत मन हेलावून टाकतो. तो अंत आपल्या थेट मनाला भिडतो कारण तो तुफानाचा अंत असतो.
नटसम्राट गणपत रामचंद्र बेलवलकर म्हणजे एक तुफान..रंगभूमीवरील एक लखलखते तेजोवलय..आपल्या अभिनयाने अनेक रसिकांना तृप्त करुन सोडलेला एक श्रेष्ठ नट. म्हणूनच त्या श्रेष्ठतेसोबतच प्राप्त झालेला स्वतःच्या कर्तृत्वाबद्दलचा सार्थ अभिमान त्यांच्या प्रत्येक कृतीत जाणवितो. त्यांचे जीवन म्हणजे एक झंझावात... बघणाऱ्या प्रत्येकाला थक्क व स्तब्ध करणारा आवेग... परंतू हेच तुफान जेव्हा जगाच्या व्यावहारिक टोचण्यांनी असहाय होतं... हतबल होतं... तेव्ह त्याची ती असहायता भिषण वाटते... पण त्याही परीस्थितीत परत उसळी मारुन ते तुफान उभं राहतं.. परत एकदा आपल्या लखलखीत तेजाची चुणुक दाखवितं... आणि मग....शांत होतं...तो चित्रपटाचा शेवट आपण बराच काळ विसरु शकत नाही. कलासादरीकरणाचा मनापासून आस्वाद घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ती एक अविस्मरणीय पर्वणीच ठरते. हा आनंद प्रत्येक कलारसिक माणसाने व मराठी भाषेवर प्रेम करीत असलेल्या प्रत्येकाने जरुर घ्यावा असाच आहे.

Excellent review.
ReplyDeleteExcellent review.
ReplyDelete