My article published in Hindusthan daily under my column थोडा है थोडे की जरूरत है
हे का? नि.. हे कसे?
हे का? नि... हे कसे? या प्रश्नार्थक शब्दांनी सुरु होणारे आपल्या देशाबद्दलचे अनेक प्रश्न मी गेल्या आठवड्यात ऐकले. त्यांची जमेल तेव्हडी उत्तरे मी दिली. काही वेळेला मला काहीच बोलता आले नाही म्हणून मी सफाईदारपणे विषयांतर केले. प्रश्न साधारणपणे असे होते.. या बैलांच्या शिंगांना रंग का लावतात? त्यांना त्या केमीकलचा त्रास नाही का होत? या गायी रस्त्यावर मोकळ्या का फिरत आहेत? मोटरसायकलवर चार लोक व समोर लहान मुलगा का बसला आहे? याने त्यांचा जीव धोक्यात नाही पडत का? पोलीस दिसत नाहीत, ते कुठे गेले? अपार्टमेंटच्या जाहिरातीवर बी एच के लिहीलेले आहे म्हणजे काय? तीळगुळ कसा बनवितात? गाड्या इतक्या जोरात हॉर्नस् का वाजवित आहेत? शाळेच्या एका वर्गात इतकी मोठी विद्यार्थी संख्या का आहे? हायवे वर गाडी रॉंग साईड ने कशी काय आली? सीट बेल्ट आवश्यक नाही का? कापूस कसा पिकवितात? येथे लोकांना इतकी कमी मजूरी का दिली जाते? शेतकरी का आत्महत्या करीत आहेत? तपोवन सारख्या संस्थांचे काम कसे चालते? त्यांना पैसा कसा प्राप्त होतो? महाविद्यालयाच्या मुली शारीरिकदृष्ट्या इतक्या कमजोर का वाटत आहेत? भारतात कोणत्या प्रकारचे संगीत ऐकले जाते? असहिष्णूतेचा वाद भारतात का सुरु आहे? भारतात कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात? येथे गावातून वाहत असलेल्या नदीचे पाणी इतके घाण का आहे? कचरा कुठे टाकला जातो? त्याची प्रक्रीया कुठे करतात? गावात लोक शौच्यास बाहेर का बसतात? या आणि असल्या अनेक प्रश्नांना मला सामोरे जावे लागले. या प्रश्नांपैकी किती प्रश्नांना उत्तरे देताना माझी भंबेरी उडाली असणार हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. हे सारे प्रश्न मला स्विडन देशातून खास मला व माझ्या परीवाराला भेटण्यासाठी आलेल्या कार्ल हॅकीनसन व इंगर हॅकीनसन या जोडप्याने सतत चार दिवस विचारले. वय वर्षे अनुक्रमे ६८ व ६४ असलेल्या या तरुण आजी आजोबांनी अत्यंत खाजगी स्वरुपाच्या या दौऱ्यामधेही टिकवून ठेवलेली चौकसवृत्ती बघून मी थक्क झालो.
२००९ साली मी रोटरी इंटरनॅशनलच्या एक कार्यक्रमांतर्गत स्वीडन या देशाच्या अभ्यास दौऱ्यावर एक महिन्यासाठी गेलो होतो. तेथील कार्लस्टाड नावाच्या गावात मला या कार्ल-इंगर या दांपत्यासोबत त्यांच्या घरी पाच दिवस राहण्याचे सौभाग्य प्राप्त झाले होते. त्यावेळी मिळालेल्या सहवासामुळे व त्यामधून निर्माण झालेल्या स्नेहामुळे यावर्षी या दोघांनी त्यांच्या भारत दौऱ्यामधे खास अमरावतीसाठी चार दिवस ठेवले व मोठा प्रवास करुन हे दोघे माझ्या घरी आले. खरे तर हा पूर्णपणे खाजगी स्वरुपाचा दौरा होता, परंतू त्याही दौऱ्यात काहीतरी नवीन शिकायला मिळावे, नवनविन गोष्टी कळाव्या आणि त्यांचा दौरा केवळ मनोरंजक न राहता नव्या बाबींचा अभ्यास असावा ही त्यांची इच्छा आम्हा सर्वांना चकित करुन गेली. आपल्या देशाबद्दल व येथील विविध गोष्टींबाबत ठरवून आपण विचार करीत नसतो परंतू या निमित्ताने मला देखील तो विचार करता आला. प्रवास करण्याची त्यांची ही पद्धत आपल्यापेक्षा फारच वेगळी आहे.
प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सीस बेकन याने त्याच्या Of Travel नावाच्या निबंधा मधे असे लिहीले आहे की Travel, in the younger sort, is a part of education, in the elder, a part of experience. प्रवास करण्याचे दोनच हेतू बेकन याने सांगितले आहेत व तेच कदाचित या लोकांना माहित असावे. जमेल तेव्हड्या नविन गोष्टी जाणून घ्यायच्या व त्याबाबत व्यवस्थित टिपण ठेवायचे ही पद्धत वयाच्या साठीनंतरही त्यांनी जोपासली आहे. ज्या ज्या ठिकाणी भेट दिली तेथील वेगवेगळ्या लोकांची नावे त्यांनी लिहून घेतली, त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व महत्वाच्या गोष्टी विचारल्या व सोबतच त्या गोष्टी त्यांच्या देशात कश्या आहेत हे आम्ही न विचारताच सांगितले. त्यामुळे दोन्ही देशाचा तौलनिक विचार आपोआपच करता आला. यामधूनच काही गोष्टी या भारतातही कश्या चांगल्या आहेत हे त्यांच्याकडून ऐकल्यावर मनापासून समाधान झाले.
भारतीय शाळांमधे असलेली शिस्त त्यांना फारच भावली आणि यामुळे शैक्षणिक प्रक्रीया चांगल्या प्रकारे होताना त्यांना जाणविले. युरोपीय देशांमधे शाळांमधून विद्यार्थ्यांचे अनिर्बंध वागणे ही एक मोठी समस्या असल्याचे त्यांच्याकडून कळले. विद्यार्थी वर्गात शिक्षकाचा सन्मान करीत नाहीत किंबहूना बरेच वेळा विद्यार्थ्यांकडून वारंवार अपमानित झाल्याने शाळा सोडून जाणारे शिक्षक बरेच आहेत असेही त्यांनी सांगितले. भारतीय शाळेत असलेली शिस्त बघून त्यांना मनापासून आनंद झाला. यासोबतच एकत्रीत कुटुंब पद्धतीमुळे भारतीय लोकांमधे असलेली आपुलकीची भावना देखील त्यांना फार आवडली. त्यांच्या देशात अस्तित्वात असलेले व्यक्तिस्वातंत्र्य त्यांना टोकाच्या स्वतंत्रपणाचा विचार करायला लावते व त्यामुळे माणसे आत्मकेंद्री होतात हे देखील त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. त्यामधूनच निर्माण होणारी एकटेपणाची भावना ही त्यांच्यापुढील एक मोठी समस्या आहे हे त्यांच्यासोबतच्या चर्चांमधून जाणविले. एकंदरीत त्यांचा प्रवास म्हणजे आनंद घेऊन रिलॅक्स होण्यासोबतच नविन बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न होता याची मला जाणिव झाली. नकळत मी बरेचवेळा आपण करीत असलेल्या प्रवासाची तुलना त्यांच्या प्रवासाशी करु लागलो.
आपले प्रवास म्हणजे बरेच प्रचंड सामान सोबत घेऊन जमेल त्या ठिकाणी त्यात भर टाकून केलेले ओझेवाहू प्रवास असतात. वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी हा आपल्या प्रवासांचा मूळ हेतू असतो. अगदी आठ दिवसाच्या प्रवासासाठी गेल्यानंतरही मोठमोठ्या बॅग्ज घेऊन आपण फिरत असतो. कोणत्याही गावात गेल्यानंतर तेथील ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व असलेल्या गोष्टींपेक्षा मार्केट बाबत चौकशी पहिल्यांदा आपण करतो. वयस्कर मंडळी तर सोडाच पण तरुण मंडळी देखील याच प्रकारच्या भावना ठेवून प्रवास करीत असतात. त्यात आता भर पडली आहे ती सेल्फी प्रकाराची. त्यामुळे कोणत्याही स्मारकाचे, जागेचे अभ्यासात्मक मूल्य न तपासता त्या ठिकाणची सेल्फी महत्वाची ठरायला लागली आहे. प्रवासाला जाऊन आल्यानंतर फार मोजके लोक त्यामधील अभ्यासात्मक बाजू सांगत असतात. जास्तीत जास्त परगावाहून काय विकत आणले हेच दाखविताना आढळतात. काही मोजक्या उल्लेखनीय बाबी विकत घेण्यासही हरकत नसते, परंतू तेच ध्येय ठेऊन केलेले प्रवास फार फलदायी ठरत नाहीत.
कार्ल आणि इंगर यांच्या प्रवासाच्या निमित्ताने मला या मंडळींच्या चौकस बुद्धीचा परीचय झाला आणि प्रवास हा आनंदासोबतच ज्ञानवर्धक राहू शकतो हा अनुभव घेता आला. विशेष म्हणजे एका वेगळ्या देशात राहणाऱ्या या दांपत्यासोबत अविस्मरणीय स्नेह उत्पन्न झाला. नागपूरच्या विमानतळावर त्यांचे स्वागत केल्यावर मला माझ्या बाजूला उभ्या असलेल्या एका माणसाने त्यांच्या बद्दल विचारले होते तेव्हा मी त्यांचा परीचय देताना माझे - स्विडीश पालक- असा उल्लेख केला होता. कोलखासच्या अतिथी गृहामधे मी त्यांना घेऊन गेलो असता तेथे भारताच्या अभ्यास दौऱ्यावर आलेल्या आॅस्ट्रीया देशातील दोन मुली भेटल्या. त्यांनी कार्ल व इंगरला माझ्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी माझा परीचय देताना आमचा - भारतीय मुलगा - असा करुन दिला. माणसाची खरी ओळख माणूस हीच असते, बाकी - जात धर्म पंथ भाषा - या सगळ्या बाबी त्या ओळखीतून निर्माण झालेल्या प्रेमापुढे क्षुल्लक ठरतात हेच खरे.

Nice article
ReplyDelete