दै. हिंदुस्थानच्या दिवाळी अंकात प्रकाशित माझा लेख "मामाचं हरवलेलं पत्र"
मामाचं हरविलेलं पत्र
साधारण तीस वर्षांपूर्वीचे एक चित्र: उन्हाळा जवळ यायला लागला की सर्वप्रथम जाणीव व्हायची ती म्हणजे परीक्षेची. परीक्षा आली की प्रत्येकाला तिचा ताण यायचाच. परंतू तो ताण घालविण्यासाठी आई-बाबांकडे एक छान गम्मत होती. ती गम्मत म्हणजे एक सुंदर स्वप्न. मुलगा किंवा मुलगी अभ्यासाचा कंटाळा करायला लागली की आई म्हणायची, "बाळ आता छान अभ्यास करुन घे, मग परीक्षा आटोपल्यावर तुला मामाच्या गावाला जायचंय ना? मामाचं पत्र आलंय आणि त्याने आपल्याला बोलावलंय" हे वाक्य म्हणजे जणूकाही शब्दरुपी अमृत वर्षाच असायची. परीक्षेच्या धाकाने सश्यागत झालेलं मन त्या स्वप्नातील पूर्ण होणाऱ्या अनेक गोष्टींच्या केवळ आभासांनी पक्षागत उडायला लागायचं. परीक्षेचा तो अभ्यासाचा कालावधी त्या स्वप्नपूर्तीच्या विचारांनीच संपून जायचा आणि लगेच सारे भाऊ बहिण थेट पोहोचायचे आपल्या आजोळी. हे सारे तेथे पोहोचल्यानंतर तर काय गम्मत. एका शब्दात वर्णन करायचे झाल्यास केवळ धमाल. कमी अधिक वयाची किमान दहा पोरे असायची. भल्या पहाटे उठणे, गावामधे त्या काळी नदी असायची आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यातही ती वाहती असायची. नदीवर पोहायला नव्हे डुंबायला जाणे हा पहीला उपक्रम असायचा. पोहून पोहून दमल्यावर भूक लागायची मग आजीच्या किंवा मामीच्या हातच्या पोह्यांवर ताव मारायचा. त्यानंतर वेगवेगळे खेळ. मुलांमधेच वेगवेगळे गट पडायचे. मग कुठे मंदीर बांधणे तर कुठे महाल बनविणे यासारखे उद्योग चालायचे. जेवण झाल्यावर मुले उन्हात जाऊ नये म्हणून पत्त्यांचे डाव चालायचे. त्यातल्या त्यात सर्वांना आवडणारा व सर्वांना एकत्रीत खेळविणारा सत्ती लावणीचा खेळ तर फारच रंगायचा. दुपारची झोप तर लागायचीच नाही. पत्ते खेळून झाले की मग गाण्याच्या भेंड्या चालायच्या. मुलांसोबत अगदी आजी-आजोबा देखील सामील व्हायचे. हे सारेच करावे लागायचे कारण हजार चॅनलवाले केबल कनेक्शन त्यावेळी नव्हते. सायंकाळ झाली की अत्यंत आवडीचा खेळ म्हणजे टॅक्सी सायकल भाड्याने आणून तिची रपेट. काय आनंद मिळायचा त्यात! सायकल चालवून दमले की घरी आल्यावर सर्वांचे एकत्रीतपणे शुंभंकरोती, अथर्वशिर्ष यासारखे मंत्रोच्चार चालायचे. रात्री जेवण झाल्यावर गच्चीवर आधीच टाकलेल्या व थंडगार झालेल्या गाद्यांवर आजीला किंवा मामाला मधे झोपवून त्याच्याकडून छान छान गोष्टी ऐकल्या जायच्या. एकतीस खांबांची गोष्ट. रोज एका खांबातून अप्सरा बाहेर पडायची आणि ती एक छान गोष्ट सांगायची. गोष्ट ऐकताना मधेच टीपूर चांदण्याचा आनंद घेणे ही देखील पर्वणी होती. मग मामा रंगात यायचा आणि आकाशातील नक्षत्रे, सप्तर्षी, ध्रूव तारा इत्यादी बाबींबद्दल माहिती मिळायची. ती माहिती ऐकता ऐकताच मुलांची सेना पेंगायची आणि मग गाढ झोपायची. असा सगळा तुफान आनंदी दिनक्रम चालायचा. या सर्व दिनक्रमात एक महत्वाचा आणि खूपच आवडीचा खेळ खेळला जायचा तो म्हणजे "मामाचे पत्र". मुलांच्या समुहाभोवती एक मुलगा हातात रुमाल घेऊन फिरणार आणि म्हणत जाणार, "मामाचं पत्र हरवलं" बाकी सगळे म्हणणार, "तेच आम्हाला सापडलं" आणि तो रुमाल कुणाच्यातरी मागे अजाणतेपणी टाकणार. मग ज्याच्या मागे तो टाकला त्याला कळले नाही तर त्याला बत्ती पडणार आणि मग तो दाम देणार. फार मजा यायची तो खेळ खेळताना. त्याचे कारण त्या खेळात मामाच्या पत्राचा उल्लेख व्हायचा आणि त्या पत्रामुळेच आपल्याला एकत्रीत आजोळी येता आले अशी मनाची समजूत असायची. तीस वर्षांपूर्वी अश्याच एका खेळात मामाचं पत्र हरवलं परंतू ते आजपर्यंत नाही सापडलं...त्याचा शोध चालू आहे कारण तीस वर्षांनंतरचे चित्र संपुर्णपणे बदलले आहे.
तीस वर्षांनंतरचे आजचे चित्र: उन्हाळ्याची सुटी लागायच्या आधीच मुलाच्या सुटीच्या काळातील व्यस्ततेची व्यवस्था झालेली असते. महिनाभर कुणाकडे जाऊन सहजच रहायचे ही संकल्पनाच तशी कालबाह्य झाली आहे. शाळा सुरु असताना मुलांना करीयरचा विचार असल्याने मामाच्या गावाला जाण्याची स्वप्ने पडतच नाहीत. वेगवेगळ्या परीक्षा, त्यांची तयारी, शाळेच्या परीक्षा वेगळ्या, त्यांची वेगळी तयारी या सगळ्या प्रकारांमधे मुले व्यस्त असतात. खेळाच्या मैदानांवरही जातात तर सहज म्हणून नाहीच. तेथेही कोणतीतरी चँम्पीयनशीप असते म्हणूनच जातात. सकाळपासून रात्रीपर्यंत या सर्व अपेक्षांच्या ओझ्यामुळे व त्यांची पूर्तता करण्याच्या थकव्यामुळे रात्री झोपलेल्या मुलांचे चेहेरे फार केविलवाणे दिसतात. परंतू बऱ्याच आई-बाबांना असले चेहेरे दिसतच नाही, तर त्यांना मुलांच्या गळ्यात मेडल लटकवलेलेच दिसते. अश्या लहानग्यांची उन्हाळ्याची सुटी देखील बांधलेली असते. परीक्षा संपल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच वेगवेगळ्या समर कँम्पमधे मुलांची रवानगी होते. त्या कँम्पमधे त्यांना पूर्णवेळ बांधले जाते. त्यामुळे मामाकडे जाणे वगैरेसाठी वेळच नाही. संपुर्णवेळ यशस्वी होण्याच्या स्पर्धेमधे या लहानग्यांना जखडून ठेवण्याची पद्धत सध्या रुढ झाली आहे. सोबतच मामाचा गावही बदललेला आहे. त्या गावाचे देखील आता शहर झालंय. नदीमधील पाणी आटून त्याला गावातील सांडपाण्यामुळे गटाराचे रुप आलेले आहे. पाण्याची देखील टंचाई इतकी आहे की पाहुणे महिनाभर राहूच शकत नाहीत. मामाला देखील बदलत्या काळात महिनाभर दहा बारा लोक ठेऊन घेणे, त्यांना गुंतवून ठेवणे इत्यादी बाबींसाठी वेळ नाही. तो देखील आपल्या कामात गुंतला आहे. त्यामुळे त्यानेही पत्र पाठविणे बंद केले आहे. अश्या प्रकारे ते तीस वर्षांपूर्वी हरविलेले मामाचे पत्र अद्याप सापडत नाही.
समाजाची आधुनिक पद्धतीने रचना करताना मुळात समाज हा माणसांचा आहे व माणसाचे माणसाशी बांधले जाणे यामुळेच समाज निर्मित होत असतो ही संकल्पना बदलायला लागली आहे. नव्या जगात संवादाची साधने वाढली तरी देखील अर्थपूर्ण संवाद संपला आहे. स्पर्धेचे नाव देऊन लहान मुलांचे बालपण हरवून, त्यातील स्वच्छंदी मोकळेपणा हिरावून त्याला वेगवेगळ्या व्यवस्थांमधे करकचून बांधून टाकणे ही नवी पद्धत सुरु झालीय. अगदी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्या बाळाला स्पर्धेच्या जंजाळात टाकून होरपळून काढले जात आहे. त्याच्या जीवनातील सहजता काढून टाकून त्याला लहानपणापासूनच प्रोफेशनल व व्यवहारी बनविण्याची मोठी घाई या नव्या व आधुनिक कुटुंब व्यवस्थेला झालीय असे दिसते. त्यामुळे परीक्षांच्या नादात अगदी महत्वाचा असा महालक्षम्यांचा सण देखील टाळला जातो. इतकेच काय पण आजीचे निधन झाल्यानंतर बोर्डींग स्कुलमधे शिकत असलेल्या नातीला साधे बोलाविले देखील जात नाही कारण त्या शाळेतून ठरलेल्या वेळेच्या व्यतीरिक्त सुटीच मिळत नाही. आजीच्या निधनानंतरही सुटी न देणारी शाळा कितीही चांगले व उच्च दर्जाचे शिक्षण देत असली तरी देखील मला त्या शाळेमधे शिकविल्या जाणाऱ्या मुल्यांबाबत शंका आहे. कदाचित भविष्यात खूप मोठे पॅकेज मिळविण्याची क्षमता त्या शाळेतील शिक्षण देत असेलही परंतू माणूस म्हणून जगण्याची क्षमता निर्माण करण्यात ती शाळा कमी पडतेय हे निश्चित. या सर्व आधुनिक व्यवस्थांमधे मुले हुशार होत आहेत पण त्यांच्यामधे एक प्रकारचा कोरडेपणा येतो आहे. हा कोरडेपणा आपल्या भारतीय समाजव्यवस्थेला परवडणारा नाही. कारण आपला समाज हा मुल्यांची जपणूक करणारा व भावनाप्रधान समाज आहे. आपण बुद्धी प्रामाण्यापेक्षा भावनेला महत्व देणारे लोक आहोत. भावनाशील असणे हे आपल्या रक्तात आहे. वर्षानुवर्षे अश्याच पद्धतीने आपण जगत आलो आहे व त्यामुळेच कदाचित जगात कुठेही न दिसणारा भावनिक एकोपा आपल्याला भारतीय समाजव्यवस्थेमधे बघायला मिळतो. ही भावनिकता आपले शक्तीस्थान आहे. यामुळेच आपण आपले स्वतंत्र व प्रबळ अस्तित्व टिकवून आहोत. परंतू सध्या आधुनिकतेच्या नावाखाली व स्पर्धांचा धाक दाखवून मुलांना व्यवहारी बनविण्याची जी प्रक्रीया सुरु आहे त्यामुळे या भारतीय समाजव्यवस्थेचा भावनिक आधार धोक्यात येतो आहे. आपण सर्वांनी एकत्रीतपणे तोच तीस वर्षांपूर्वीचा जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, ओलावा परत एकदा आठविण्याची गरज आहे.
आता कदाचित आपल्याला अगदी तश्याच प्रकारे ते सारे क्षण जगता येणार नाहीत. परंतू काही प्रमाणात मुलांच्या जडण घडणीमधे नैसर्गिकता आपण निश्चित आणू शकतो. ही नैसर्गिकता त्यांना त्यांच्यातील माणूसपणाची जाणीव करुन देणारी असेल. एक महिना मामाच्या गावाला जरी जाता आले नाही तरी मामाच्या गावाला जाण्याची ओढ त्याच्या मनात कशी टिकेल याचा विचार निश्चितच करता येईल. सुट्यांमधे वेगवेगळ्या शिबीरांच्या कचाट्यात त्यांना पूर्णवेळ न देता काही काळ त्यांना आपल्या आप्तेष्टांच्या भेटीला नेता आले तर फार बरे होईल. तेथे त्यांची त्यांच्या चुलत किंवा मावस किंवा मामे भावंडांची भेट होईल. एकमेकांबद्दल जाणून घेता येईल व मग जमले तर पुन्हा एकदा सगळी छोटी भावंडे गोल रिंगण करुन बसतील. एक जण परत एकदा रुमाल घेऊन त्या रिंगणाभोवती गोल गोल फिरायला लागेल आणि म्हणेल, "मामाचं पत्र हरवलं" आणि उरलेली सर्व भावंडे जोरात म्हणतील, "तेच आम्ही पुन्हा मिळविलं".
- डॉ. अविनाश भास्कर मोहरील / ९४२३१२३९०६

अविनाश सर.. तुमचे पुन्हा एकदा आभार.. मामाचं पत्र च्या विषयाने का होईना आम्हाला तुम्ही नात्याची ही वीण घट्ट करण्यासाठी विचार करायला भाग पाडले आणि नात्यातलं आपलेपण, प्रेम, जिव्हाळा यात ओलावा टिकवून ठेवण ही हरवत चाललेली, नजरेआड झ।लेली गोष्ट शोधून दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद..
ReplyDeleteधन्यवाद रोशन, तुझ्यासारखे विचारी मित्र असले की वेगवेगळे विषय सुचत राहतात आणि त्या निमित्ताने नवा संवाद सुरु होतो... छान वाटले तुझी प्रतिक्रीया वाचून..शुभेच्छा.
Delete