My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

दिवाळीची सुटी...कुणाची?
"चला, आता शाळेला सुट्टी लागणार. जरा निवांत मिळेल. सारखे रोज तेच तेच. सकाळी उठा , धावपळ करा. शाळेची तयारी... ती देखील साधीसुधी नाही. केव्हडाली ती स्कूल बॅग...धावत धावत निघा, केव्हडे ते होमवर्क. शाळेचे वेगळे, ट्युशनचे वेगळे. सोबतच वेगवेगळे प्रोजेक्ट करा. हे सारे प्रोजेक्ट शाळेच्या वेळात होतच नाहीत. किती मेहनत करावी लागते. त्यात दर महिन्याला परीक्षा असतेच. चांगला नंबर यायलाच हवा. आता दोन दिवसानी दहा दिवस मस्त आराम मिळू शकेल. शाळेला सुटी लागली की छान वाटते. मोकळा वेळ मिळतो. जरा वाचन वगैरे करता येईल..." ही सारी वाक्ये शाळेच्या व पर्यायाने अभ्यासाच्या अती व्यस्त कार्यक्रमाला कंटाळून सुटीचा आनंद घेऊ इच्छीणाऱ्या शाळकरी मुलांचीच राहू शकतात असा आपला समज राहू शकतो. परंतू ही सारी वाक्ये मी शाळकरी मुलांच्या तोंडून नव्हे तर त्यांच्या शाळेच्या आणि अभ्यासाशी पूर्णपणे बांधल्या गेलेल्या मुलांच्या आयांकडून ऐकली आहेत..
रोज सकाळी प्रभातफेरी आटोपून मी घरी येत असतो आणि त्याचवेळी लहान शाळकरी मुले शाळेत जात असतात. नेहमी दिसणारे एक चित्र मला विचारात टाकते. साधारण चौथ्या वर्गातील दोन मुले शाळेचा गणवेश घालून निघालेले असतात. त्यांच्या हाती दोन वेगवेळ्या प्रकारच्या टीफीनची बॅग असते. त्यांची मुळ पुस्तकांची बॅग मात्र त्यांच्या आयांनी खांद्यावर घेतली असते. माऊल्याच त्या. त्यांना आपल्या मुलांचे खांदे त्या स्कुल बॅग्जच्या वजनाने मोडून जातील अशी भिती वाटते. त्यामुळे बस थांब्या पर्यंत त्याच आपल्या मुलांचे ओझे वाहतात. अशाच या दोन माऊल्यांची वरील वाक्ये माझ्या कानावर पडली. मी विचार करीत राहीलो की ही शाळा मुलांची आहे की त्यांच्या आयांची?
सध्याच्या आधुनिक शाळांनी खरोखरीच मुलांच्या आयांना परत एकदा नव्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा आनंद देण्याचे काम केले आहे व निरंतर करीत आहेत. मुलांच्या शाळा व त्यांचे अभ्यास सांभाळणे ही एक नवी व जवळपास सर्वात महत्वाची जबाबदारी सध्या मातांना पार पाडावी लागत आहे. या सर्व माता स्वतः जेव्हा शाळेत शिकत होत्या तेव्हा जितक्या अभ्यासाबाबत जागरूक नव्हत्या तेव्हड्या आता आपल्या मुलाबाळांच्या अभ्यासाच्या बाबतीत आहेत. मुलांच्या अभ्यासक्रमाबाबत त्यांना अपडेट रहावे लागते. परीक्षांची वेळापत्रके सांभाळावी लागतात. मुलांकडून अभ्यास करुन घेणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. त्यासोबतच मुलांच्या ट्युशन्स असतात. त्यांच्या वेळी त्यांना सोडून देणे, घ्यायला जाणे ही दळणवळणाची जबाबदारी देखील त्यांचीच असते. हा सगळा अभ्यासाचा व परीक्षांचा रगाडा कमी असतो की काय तर सोबत वेगवेगळे प्रोजेक्ट करायचे असतात. हे प्रोजेक्ट तर बरेच वेळा अक्षरशः आयांसाठीच असतात. त्यांच्या शालेय जीवनामधे अश्या प्रकारच्या प्रोजेक्ट करण्या च्या व्यवस्था नव्हत्या त्यामूळे त्यांचे त्यावेळी राहीलेले कार्य आता मुलांच्या शाळांकरवी पूर्ण करुन घेतले जाते. एकंदरीत या सर्व नव्या व आधुनिक शिक्षण प्रक्रीयेमधे मुला-मुलींच्या आया म्हणजे प्रत्यक्ष शाळेत प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थिनीच असतात. या सर्व प्रकारातून बरेच वेळा बाबा सुटलेले असतात किंवा त्यांनी स्वतःला सोडवून घेतलेले असते. परंतू आयांची मात्र या सर्व प्रकारात प्रचंड गुंतणूक असते. मुलांच्या मित्रांचे फोन नंबर त्यांना ठाऊक असतात. गृहपाठा संबंधी त्या चर्चा करतात, बरेच वेळा तर दिवसभराच्या धावपळीमुळे थकून गेलेल्या पोराचा किंवा पोरीचा एव्हडासा झालेला चेहेरा बघून आया त्यांना झोपायला सांगतात व पुढल्या दिवशी मुलांना शिक्षा होऊ नये म्हणून  त्यांचे गृहपाठ देखील लिहून देतात. बदललेल्या वातावरणात शिक्षण मुक्त व सहज होण्यापेक्षा जास्तीत जास्त अवघड, दिखाऊ व बोजड होत चालले आहे असेच वाटते. या शाळांमधे असे का केले जाते याचे कारण देखील मजेदार आहे.
सध्या या नव्या प्रणालीमधे शाळांना शिक्षण देण्याच्या प्रक्रीयेसोबत एक नवा प्रकार करावा लागतो तो म्हणजे मार्केटींग. काही शाळांमधे तर चक्क मार्केटींग मॅनेजर नेमलेले आहेत. एखाद्या प्रॉडक्टचे जसे मार्केटींग केले जाते तश्याच प्रकारे नव्हे कधी कधी त्याच्याही पेक्षा आक्रमकपणे शाळांची जाहीरात केली जाते. मोठमोठे बॅनर्स लावले जातात. याचे कारण या क्षेत्रात आता प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. मोठ्या शहरांमधे साधारण सहा महिन्याला एक नवी शाळा उघडली जात आहे. त्यातील बहुतांश आंतरराष्ट्रीय शाळा आहेत. गावाच्या बाहेर या शाळांनी अत्यंत देखण्या इमारती उभारल्या आहेत. स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आपापल्या शाळेच्या अभ्याक्रमासंबंधी, प्रोजेक्टस् संबंधी, विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसंबंधी तीव्रतेने सांगितले जाते. शाळेत असतानाच मुलाचे करीयर कश्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय राहू शकते याबाबत पालकांच्या मनावर वेगवेगळ्या गोष्टी बिंबविल्या जातात. आजकालचे पालक देखील त्याकडेच धाव घेतात नव्हे आजूबाजूच्या वातावरणामुळे बरेच वेळा पर्यायच उरत नाही. या सर्व शाळांमधील किंवा सरकारी शाळांमधीलही पालक हे अभ्यास व व्यस्ततेतचे ओझे स्विकारतात व आपल्या पाल्यास देखील स्विकारायला लावतात कारण त्यांना आपल्या पाल्यास सर्वच बाबतीत तरबेज असणारे एक पूर्ण पॅकेज बनवायचे असते. शाळांना माहित असलेल्या या पालकांच्या मानसिकतेमुळेच खरी गडबड झालेली आहे. 
पालकांना सध्या आपल्या घरच्या मुलाला किंवा मुलीला सुपरहिरोच बनवायचे आहे. त्याला सगळेच आले पाहिजे व सगळ्या बाबतीत त्यांने बक्षिसे प्राप्त केलीच पाहीजे ही जिद्द आहे. अभ्यास निट करुन चांगली ग्रेड मिळालीच पाहीजे, ट्युशनमधेही अव्वल राहायलाच पाहीजे, स्नेहसम्मेलनात भाग घेतलाच पाहिजे, तेथेही काही ना काही बक्षिस मिळविलेच पाहीजे, खेळामधेही त्याचे प्राविण्य दिसायला हवेच, सोबतच संगीतामधे त्याची रुची निर्माण व्हायलाच हवी, त्याने वाचनही केलेच पाहीजे, वक्तृत्व स्पर्धांमधे भाग घ्यायलाच हवा...वगैरे वगैरे. ही यादी बरीच मोठी आहे. या सर्व बाबींमुळे तो एव्हडासा जीव एकच भाव चेहेऱ्यावर घेऊन फिरत असतो..केविलवाणा. एकंदरीत पालकांना जे हवे आहे ते शाळा देत आहेत व शाळा जे देत आहेत त्याची पालकांना सवय लागली आहे. या दुष्टचक्रामुळे मात्र त्या लहानग्यांसाठी शिक्षण ही एक सहजतेने केली जाणारी आनंददायी प्रक्रीया न राहता एक भलेमोठे ओझे बनले आहे. या प्रकाराचा कुठेतरी गांभिर्याने विचार व्हायला हवा असे वाटते. निदान शिक्षित व विचारी पालकांनी याचा विचार करुन त्यांच्या पाल्यांच्या शाळा व्यवस्थापनाला या बाबी कळवायला हव्यात व सोबतच आपली स्वतःची मानसिकता बदलायला हवी. मुळात शिक्षणाबद्दलची -व्यर्थ आणि उत्पादनहीन प्रक्रीया - ही भूमिका शासनाने बदलायला हवी. तज्ञांना (व्यवहारी व जमिनीवर राहणारे) एकत्रीत आणून ही सारी व्यवस्था बदलविण्याची नितांत गरज आहे.
...आपल्या मुलांच्या शाळांना लागणारी सुटी जणू काही आपल्यालाच लागत आहे असा आनंद व्यक्त करणाऱ्या त्या आयांचा तो आनंद जास्त वेळ टिकला नाही. या दोघींच्या या वाक्यांना ऐकल्यावर याच प्रक्रीयेतील तिसरी आई त्यांना म्हणाली, जास्त आनंदी होऊ नका. मुलांना दिवाळीच्या दिवसांमधे करण्यासाठी खूप सारे हॉलीडे होमवर्क देण्यात आलेले आहे. दिवाळीच्या सुटीत ते पूर्ण करुन घ्यायचे आहे. त्यामधे बराच वेळ जाणार आहे. हे वाक्य ऐकल्याबरोबर, काही क्षणापूर्वी मुलांना लागणारी सुटी आपलीच सुटी समजून खूश झालेल्या त्या दोन्ही आया हॉलीडे होमवर्क काय आहे हे समजून घ्यायला लागल्या आणि काही क्षणापूर्वी त्यांच्या चेहेऱ्यावर झळकणारा आनंद होमवर्कच्या (मुलांच्या) काळजीमधे परावर्तीत झाला.





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18