Article published in Hindusthan Daily under my column थोडा है थोडे की जरूरत है about कट्यार काळजात घुसली

सूर निरागस हो...
सुबोध भावेचा नितांत सुंदर चित्रपट -कट्यार काळजात घुसली - बघण्याचा नुकताच योग आला. अभिजात शास्त्रीय संगीताच्या भक्कम पायावर उभा असलेला हा चित्रपट प्रत्येकाला भरभरुन आनंद देतो. सुरांची ताकद काय असते, संगीतकला ही किती श्रेष्ठ दर्जाची कला आहे आणि सुरांचे पावित्र्य टिकविण्यासाठी माणसाला मनाचे पावित्र्य जपावे लागते हे या चित्रपटातून ठळकपणे मांडले आहे. परंतू अभिजात शास्त्रीय संगीताची ताकद हा चित्रपट बघण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला जाणविते. हे अभिजात शास्त्रीय संगीत कळत असो अथवा नसो, त्याचा परीणाम प्रत्येकाच्या मनावर झालेला जाणवितो. त्यामुळेच एरवी शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटांमधे काही लोक आरडाओरड करतात किंवा विचित्र कॉमेंट्स करतात. परंतू येथे असे काही होत नाही. संपुर्ण चित्रपट वेगवेगळ्या चिजांनी, बंदीशींनी, आलापांनी, नाट्यपदांनी नटलेला आहे परंतू त्याचे सादरीकरण व सुरांची ताकद इतकी जबरदस्त आहे की प्रत्येकजण भारावून चित्रपट बघत राहतो आणि त्या सुरांच्या वर्षावामधे चिंब भिजून निघतो. चित्रपटातील पंडीतजींच्या निरागस सुरांनी जणू मूळ सा पासून सुरु झालेला हा चित्रपट त्यांच्या शिष्याच्या निरागस सुरांच्या षड्जावर थांबून एक संपुर्ण संगीतमय वर्तुळ पूर्ण करतो. कथेनुसार यात मग मुरक्या, बोलताना, खटके, मुर्छना, मींड व गमक देखील आहेत. पण प्रारंभ आणि शेवट हा मात्र एखाद्या बड्या ख्याल गायनाप्रमाणे पवित्र षड्ज पासून शुद्ध षड्ज पर्यंत निरागसच आहे. केवळ सुरांची ताकद दाखविण्यापेक्षा सुरांच्या निरागसतेचा आविष्कार हा चित्रपट घडवून देतो. या संपूर्ण संगीत वर्तुळामधे जणू काही आपण आपले आयुष्यच अनुभवतो. ते देखील बालसुलभ निरागसते पासून सुरु होते आणि सर्वसंगपरीत्यागाच्या निरागसतेवर संपते. खरोखरीच निरागसता हा माणसाच्या जीवनाचा मूलाधार आहे परंतू माणसाला ती निरागसता बालवय सरल्यानंतर जपता येत नाही.
निरागसता मग ती सुरांची असो अथवा विचारांची किंवा माणसाच्या जीवनाची...मोहकच असते. याचे महत्वाचे कारण निरागसता हे परमेश्वराच्या चिरंतन अस्तित्वाचे मूर्त रुप असते. ती पावलोपावली आपल्याला जाणवावी म्हणून निसर्गाच्या विविध रुपांमधून त्या अनादी अनंत शक्तीने निर्माण करुन ठेवलेली आहे. त्या निरागसतेचे अस्तित्व जर आपल्याला जाणविले आणि त्याचा परीणाम जर आपल्या मनाला स्पर्शीला तर त्या निरागसतेचा वास आपल्याही ठायी होऊ शकतो. ती निरागसता ग्रीष्माने तापून निघालेल्या धरणीची तृषा भागविणाऱ्या मृग नक्षत्रातील पहिल्या मृगधारांमधे आहे, तीच निरागस भावना एखाद्या शेतात शेतकरी बंधू भगिनींच्या कष्टाने उभ्या ठाकलेल्या भरगच्च पीकामधे आहे. तीच भावना नुकत्या जन्मलेल्या गायीच्या कोकराच्या बागडण्यामधे आहे, तर एखाद्या नदीकाठच्या मंदीरामधे भल्या पहाटे देवालयातील मुर्तीरुप परमेश्वराशी आपल्या सुरांनी एकरुप होणाऱ्या बैराग्याच्या एकताऱ्यातही आहे.ती पहाटेच्या पक्षांच्या कुजनातही आहे, तीच निरागसता प्रचंड उंचीवरुन कोसळणाऱ्या धबधब्यातही आहे व विस्तीर्ण परसरलेल्या व शांतपणे वाहणाऱ्या नदीच्या पात्रातही आहे. हीच निरागस भावना निसर्गातून कधी कधी काही निवडक माणसांमधेही आलेली दिसते. परीस्थितीने गांजून गेलेल्या व मरणासन्न स्थितीमधे पडलेल्या एखाद्या माडीया गोंड रुग्णाचा हात त्याला जीवनदान देण्यासाठी पकडलेल्या डॉ. प्रकाश आमटेंच्या चेहेऱ्यावर जशी ती दिसते तशीच आपल्या वझ्झर येथील अनाथालयातील अंध व अनाथ गांधारी नावाच्या मुलीने गाणे म्हणून दाखविल्यावर कर्मयोगी शंकरबाबा पापळकरांच्या चेहेऱ्यावरही दिसते. तीच निरागसता जेव्हा शेगावहून गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला जायला निघते तेव्हा त्या पालखीला मनोभावे निरोप देणाऱ्या निस्वार्थी तपस्वी शिवशंकरभाऊ पाटलांच्या चेहेऱ्यावर दिसते, तर त्याच निरागसतेचे दर्शन बेरोजगार आदीवासी युवक युवतींना बांबुकलेचे प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनविणाऱ्या लवाद्याच्या सुनिल व निरुपमा देशपांडेंच्या चेहेऱ्यावरही दिसते. निसर्गातील कणाकणात निवास करणारी निरागसता असो किंवा काही निष्काम कर्मयोग्यांच्या कर्मांमधून जाणविणारी निरागसता असो, ही परमेश्वराने माणसाच्या जीवनमुल्यांच्या संरक्षणासाठी योजीलेली श्रेष्ठ मापके आहेत. परंतू जीवन जगत असताना सामान्यतः आपण त्याकडे दुर्लक्ष केलेले असते कारण आपल्याला बावळट न राहता स्मार्ट बनायचे असते. नव्या बदलत्या व्यावहारिक जगात या निरागसतेला नवा समनार्थी शब्द प्राप्त झाला आहे, तो म्हणजे बावळटपणा. 
आपल्या जगाने व्यावहारिकता स्विकारली आणि निरागसतेला पार दूर लोटून दिले. बनावटी आयुष्य हाच जवळपास प्रत्येकाच्या जीवनाचा आधार बनलेला आहे. बालपणाची काहीच वर्षे ओलांडल्यावर या बनावटीपणाचे प्रशिक्षण दिले जाते. बरेच वेळा त्याची अपरीहार्यतादेखील सांगितली जाते. ते बोलणे खरेही असते. परंतू हे बनावटीपण आता जवळपास प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. चेहेरा आणि मन यांचा संबंधच उरलेला नाही. खोटा आदर, खोटे हास्य, खोटा आविर्भाव, खोटे प्रेम, या सगळ्या यशस्वी जीवनाच्या आवश्यक बाबी मानल्या जाऊ लागल्या. माझा फायदा किती याच एकमेव तत्वावर नात्यांची देखील निर्मिती व्हायला लागली. प्रत्येकच क्षेत्रात याचा शिरकाव झाला. त्यामुळे तांत्रीकदृष्ट्या नात्यांची संख्या वाढली (जी फेसबुक व व्हॉट्स अॅप वरुन मोजली जाते) परंतू त्या नात्यांची लांबी मात्र फार राहीलेली नाही. कट्यार... या चित्रपटाचा आधार असलेल्या पवित्र संगीत क्षेत्रातही या सर्व बाबींचा शिरकाव झालेला दिसतो. इर्षा, मत्सर, दुजाभाव, आढ्यता, खोटी स्तुती या बाबींना निरामय सुरांच्या क्षेत्रात खरे तर प्रवेशही असायला नको परंतू ते श्रेष्ठ व निरामय संगीत क्षेत्रदेखील याच सर्व बाबींनी व्यापलेले दिसते. म्हणूनच कदाचित अपवाद वगळता या संगीत क्षेत्रातील सुरश्रेष्ठता दिवसेंदिवस कमी होऊन त्याची जागा चढाओढीने घ्यायला सुरूवात झाली आहे. म्हणूनच प्रामाणिकपणे सुरांच्या निरागसतेला साक्षी ठेऊन सादर करण्यात आलेला हा सुबोध भावेचा चित्रपट मनाला अक्षरशः भिडतो.
चित्रपटामधे खरे तर दिग्गज गायकांनी गायलेल्या वेगवेगळ्या चीजांचे, बंदीशींचे, आलापीचे मन तृप्त करणारे उत्तम सादरीकरण आहे. परंतू चित्रपटाचा प्रवास सुरांच्या निरागसतेवर आधारीत असल्याने त्यामधील पावित्र्य अजिबात कमी होत नाही. या निरागसतेचा पगडा संपुर्ण चित्रपटावर इतका जास्त आहे व दिग्दर्शक सुबोध भावेने तो इतक्या ताकदीने जपलाय की सचिन पिळगावकरांची खलनायकी भूमिका देखील आपल्याला मोहित करते. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम, प्रत्येक दृष्य, प्रत्येक संवाद या त्या निरागसतेच्या वर्तुळाचा एक सशक्त भाग असल्याने आपण भारावून जातो. तसे बघितल्यास कट्यार काळजात घुसली हे अजरामर संगीत नाटक अनेकांनी बघितले आहे. जुन्या पिढीच्या लोकांनी तर या नाटकाचा तो अभूतपूर्व काळ अनुभवलेला आहेच परंतू संगीत नाट्य चळवळ जीवंत ठेवण्यासाठी मनापासून प्रयास करीत असलेल्या काही तरुण कलावंतांनी हे नाटक नव्या काळातील रसीकांसाठी देखील उपलब्ध करुन दिले. परंतू नाटकाच्या रंगमंचावरुन सेल्युलॉईडवर हे महानाट्य साकारलेले बघणे ही सध्याच्या पिढीची एक मोठी उपलब्धी आहे. कारण अभिजात शास्त्रीय संगीत अश्याप्रकारे खिळवून ठेऊ शकते नव्हे आत्मानंदाचा साक्षात्कार घडवू शकते हे सामान्याती सामान्य प्रेक्षकाला मनापासून पटवून देणारी ही कलाकृती आहे. हे सारे घडते ते - सूर निरागस हो- मुळेच. 
सुरांची सच्ची निरागसता अनुभवण्यासाठी, अभिजात शास्त्रीय संगीताच्या दर्जेदार सादरीकरणाच्या निखळ आस्वादासाठी, कथेनुरुप सादर झालेल्या अप्रतीम अभिनयासाठी, मनाला सुखावणाऱ्या प्रत्येक फोटोजेनीक फ्रेमसाठी, सुबोध भावेच्या व त्याच्या संपुर्ण टीम च्या जीवापाड मेहनतीसाठी, या मेहनतीमधून साकार झालेल्या एका अजरामर कलाकृतीच्या पुनर्निर्माणाच्या अद्वितीय आनंदासाठी, आपल्या आयुष्यातील जवळपास संपलेल्या निरागसतेच्या पुनःसाक्षात्कारासाठी हा चित्रपट परीवारासकट बघायला हवा. आपल्या घरी मोठ्या होत असलेल्या पिढीला खरीखूरी निरागसता आपण जगून दाखवू शकत नसलो तरीही या चित्रपटरुपी कट्यार...मधील सुरांची निरागसता किती परीणामकारक राहू शकते हे तर दाखवू शकतो. कदाचित तीच या नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरु शकेल..
                                                                                      -डॉ. अविनाश भास्कर मोहरील / ९४२३१२३९०६

 






Comments

  1. अविनाश, अप्रतिम लिखाण. जसा हा चित्रानुभव प्रेक्षकांना खिळवून अंतर्मुख करतांनाच आत्मानंद अनुभवून देतो, अगदी तस्साच अनुभव आपला आजचा लेख देवून गेला. शतशः प्रणाम

    ReplyDelete
  2. Thanks a lot. I am touched by your praising words. This is all due to your love and support. Be there always

    ReplyDelete
  3. Dr Avinash,
    I carefully read your articles under the serial
    "Thoda Hai Thodeki Jarurat Hai" The title itself is most meaningful and the text of each article compels one to contemplate on the message that is hidden in it.
    Kudos. Please continue
    Our good wishes are always with you.

    ReplyDelete
  4. Dr Avinash,
    I carefully read your articles under the serial
    "Thoda Hai Thodeki Jarurat Hai" The title itself is most meaningful and the text of each article compels one to contemplate on the message that is hidden in it.
    Kudos. Please continue
    Our good wishes are always with you.

    ReplyDelete
  5. Bhai, jabardast article. Every paragraph is meaningful!! Thanks. Vivek.

    ReplyDelete
  6. Thanks Sureshmama and Vivek. Your support makes me think more and more about varied subjects and explore the beauty of it...Hearty thanks

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18