Article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

सामर्थ्य या संवादास दे...
दोन पिढ्यांमधील संवाद हे कधी सुसंवाद तर कधी विसंवाद असतात. हा नियम कोणत्याही ठराविक पिढ्यांच्या जोडीला लागू पडतो असे नाही. प्रत्येकच दोन पिढ्यांमधे हा प्रकार आढळतो. फरक पडतो तो केवळ विषयांचा, गरजांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा. बाकी विचारांचे वेगळेपण हे स्वाभाविकपणे राहतेच. असाच एका बाप व लेकी मधला पत्ररुपी संवाद मला वाचायला मिळाला. हे दोन्हीही संवाद एकमेकांना दिलेली उत्तरे नाहीत तर स्वतंत्र मते आहेत. मी या पत्रांचा वाचक म्हणून या दोन्हीही मतांच्या मधे उभा राहून माझे मत तपासून घेतोय.
लेकीचा पत्ररुपी संवाद: बाबा, तुम्ही मला जरा समजून घ्यावे असे मला वाटते. मी आत मोठी झालेय हे प्रथम तुम्ही तुमच्या मनाला पटवायला हवे. मी आता अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. बाबा मला सोळावं वर्ष लागलंय. आता मला काही निर्णय माझ्या मनाने घेऊ द्या ना. मला ठाऊक आहे की तुम्हाला माझी फार काळजी वाटते आणि मला हे देखील ठाऊक आहे की ही काळजी तुमच्या माझ्यावरील प्रेमामुळेच निर्माण होत असते. पण बाबा, मला आता तुमचे काळजी करणे बंधन वाटायला लागले आहे. मला तुम्ही मोबाईल फोन देणार नाही असे सांगितले आहे. बाबा, माझ्या सगळ्या मैत्रीणींकडे मोबाईल फोन आहेत. त्या सर्वजणी व्हॉट्स अॅप वापरतात. त्यावर त्यांनी खूप छान ग्रुप बनविला आहे. त्या ग्रुपवर त्यांच्या खूप गंमती जमती सुरु असतात. मी जेव्हा त्यांना भेटते तेव्हा मला आता एकटे वाटायला लागले आहे. त्या सर्व जणी वेगवेगळ्या पोस्ट बद्दल बोलत असतात, जोक्स शेअर करतात पण मी मात्र वेड्या सारखी त्यांच्या गोष्टी ऐकत राहते कारण मला त्यातील काहिच माहित नाही. त्या सर्व मैत्रीणी फेसबुकवरही आहेत. आमच्या काही मित्रांशी त्या चॅटींग करतात. बाबा, थोडे मोकळे बोलते..मलाही चॅटींग करावे वाटते. मलाही असे वाटते की माझे मित्र असावे. मला तसे वाटतंय बाबा आणि मी माझ्या मनातील भाव लपविणार नाही. त्या दिवशी तुम्ही तुमच्या मित्राला सांगत होतात की तुम्ही मला व्हॉट्स ॲप किंवा फेसबुक वापरु देत नाही आणि हेच तुमचे माझ्यावरील चांगले संस्कार आहेत. फेसबुकवरुन काय काय चालते हे देखील तुम्ही सांगत होतात. बाबा मला त्या दिवशी खूप वाईट वाटले. माझे संस्कारक्षम असणे किंवा नसणे हे तुम्ही केवळ मोबाईलच्या वापरावरुन ठरविले. बाबा मी तुमची मुलगी आहे आणि त्यामुळे मी कसे वागले पाहिजे याचे मला पूर्ण भान आहे आणि राहीलही. परंतू तुमच्या मनातील काळजीपोटी मी अनेक बाबींपासून दूर जात आहे व त्यामुळे मला माझ्यात कमतरता आहे असे वाटू लागले आहे. मैत्रीणी पार्टीसाठी जातात. त्या पिझ्झा खायला जातात, मज्जा करतात पण मला मात्र तुम्ही जाऊ देत नाही. कधी कधी तुमची पैश्यांची अडचण असते हे देखील मला ठाऊक आहे परंतू त्याही पेक्षा जास्त काळजी तुम्हाला अशी आहे की मी बिघडेन. मी या बाबतीत तुम्हाला कसा विश्वास देऊ हे मला कळत नाही. परंतू मला तुमच्या काळजीची सुरक्षित चौकट फार मोठी वाटू लागली आहे. मला माझे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावेसे वाटत आहे. तुम्हाला वाटत असेल की मी केवळ अकरावीत आहे आणि स्वातंत्र्याच्या गोष्टी करीत आहे. पण बाबा मला माझ्या मैत्रीणींसारखे जगायचे आहे. मस्ती करायची आहे. त्यांच्यासारखे मोकळेपणाने वागायचे आहे आणि त्या वागण्यातील झगमगाट अनुभवायचा आहे. बाबा, तुमच्या सात्विक जगण्याच्या व्याख्या मला बंदिस्त जीवनाच्या व्याख्या वाटू लागल्या आहेत. बाबा, मला मुक्तपणे झेपावायचे आहे. हे क्षण माझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाहीत. मला समजून घ्या. बाबा हे सारे मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणून एका कागदाचा आधार घेऊन तुमच्यापर्यंत माझे मन पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. हे सारे वाचून तुमच्या मनाला वेदना होणार आहेत परंतू माझ्या मनाची घुसमट मी कुणाला सांगणार? तुम्हालाच ना?
बापाचा पत्ररुपी संवाद: बेटा, बघता बघता तू अकराव्या वर्गात गेलीस. साधारण पंधरा वर्षांपूर्वी एका दवाखान्यातील नर्सने तुला माझ्या हातात दिले आणि त्यानेळी जगातील सर्वोच्च आनंद मला प्राप्त झाला. तुला हातात घेताना मला - माझाच अंश माझ्याकडे परत आलाय - हे बापाला मिळणारे सर्वोच्च सुख मिळाले होते. तो प्रसंग आठवला की मी त्या प्रसंगाच्या भावनांशी बांधला जातो व त्यामुळे मला तू मोठी झाली यावर विश्वासच बसत नाही. पण तू मोठी झालीस. परंतू अजून तुला हे जग कळलेले नाही. तुझ्या आजुबाजुच्या वातावरणाचा अभ्यास मला जेव्हडा आहे तेव्हडा तुला अजून झालेला नाही. सध्याच्या या जगात झपाट्याने बदलत जाणारे वातावरण मला तुझ्याबाबतीत काळजीत पाडते. मी तुला मोबाईल फोन दिलेला नाही कारण त्याच्या माध्यमातून एका विचित्र चक्रामधे तू अडकणार आहेस जे चक्र चक्रव्युहाप्रमाणे आत घेतं पण बाहेर पडू देत नाही. तुला भविष्यात एका निश्चित ध्येयाला गाठायचे आहे व त्या मार्गामधील व्हॉट्स ॲप व फेसबुक ही सर्वात घातक व्यवधाने आहेत. तू ते वापरीत नाहीस याचा मला अभिमान वाटतो व मी त्याबद्दल माझ्या मित्रमंडळींना या तुझ्या संस्कारित वागण्याचे दाखले देत असतो. बेटा मला तुझ्या या वागण्याचा व तू राखलेल्या संयमाचा अभिमान आहे. मोबाईल वरुन अश्लील मेसेजेस पसरविणाऱ्या एका रॅकेटमधे माझ्या मित्राची तुझ्याच वयाची मुलगी सापडली तेव्हा त्याचा चेहेरा मला बघवत नव्हता. पण तू तशी शक्यताही निर्माण होऊ देत नाहीस कारण तू मोबाईलच वापरत नाहीस. तू तुझ्या मैत्रीणींसारखी सगळीकडे भटकत देखील नाहीस याचाही मला आनंद वाटतो. बेटा, तू कुठे बाहेर गेलीस आणि घरी परतण्याच्या वेळेपेक्षा तुला दहा मिनीटेही जास्त वेळ लागला तर मला धस्स होते आणि माझ्या काळजाचे ठोके चुकतात. तुझ्या काळजीपोटी माझे काय होते ते मी तुला सांगूच शकत नाही. परंतू असे काळजीचे प्रसंग तू माझ्यावर आणित नाहीस कारण तू अत्यंत समंजसपणे व आपल्या सुरक्षित चौकटीत राहून वागणारी शहाणी मुलगी आहेस याचा मला सार्थ अभिमान आहे. बेटा, मी सांगितलेल्या मार्गावरुन जाऊन तुझे एक छान व स्वतंत्र अस्तित्व निर्माण होणार आहे ज्यात तू मानसिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली असणार. आता मस्तीमधे आयुष्य घालविणाऱ्या तुझ्या मैत्रीणींनी सध्या ते कळत नाही कारण मनमौजी जीवन जगण्याची त्यांना झिंग चढली आहे. परंतू त्यांच्या त्या झगमगाटी जीवनाला तुझ्या पणतीसारख्या सात्विक जीवनाची सर येणारच नाही. बेटा, तू माझा अभिमान आहेस, माझा गर्व आहेस...माझे सर्वस्व आहेस. तुला या आसमंतात झेपावायचे आहेच परंतू पंखात पूर्ण बळ निर्माण करुनच. जेणे करुन तुझी भरारी लोक बघत राहतील. त्याकरीता आताच्या क्षणांमधील तू ठेवलेला संयम वाखाणण्यासारखा आहे..हे सारे तुला सांगायचे होते परंतू प्रत्यक्ष बोलता येईल की नाही याबाबात शंका होती म्हणून कागदाचा आधार घेतला..
या दोन्हीही भावना आपण सर्वजण कधी ना कधी अनुभवत असतो. परंतू या दोन्ही भावनांचा तटस्थपणे विचार करुन, आदर करुन त्याचा सुवर्णमध्य ज्याला काढता येईल त्याला जीवनाचा खरा अर्थ कळला असे म्हणता येईल. असा सर्वसमावेशक संवाद साधण्याची शक्ती परमेश्वर आपल्या सर्वांना देवो हेच या दीपोत्सवाच्या निमित्ताने मागणे आहे... 





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18