My article published in Hindusthan Daily under थोडा है थोडे की जरूरत है
वैचारिक आंदोलने..
सध्या आपल्या देशात अनेक विषयांवर चर्चा सुरु आहेत. अचानक आपला समाज जागरुक झाला की ही मुळातच असलेली जागरुकता माध्यमांच्या मदतीने प्रत्येकापर्यंत पोहोचायला लागली आहे हा देखील एका वेगळ्या चर्चेचाच विषय असू शकतो. परंतू ही एक चांगली नांदी आहे. जुन्या आणि नव्या विचारांच्या चर्चांमधूनच आपण भविष्यात एका चांगल्या आणि पोषक समाज व्यवस्थेकडे अग्रेसर होऊ. सध्याची मात्र एक फारच वेगळ्या प्रकारची संक्रमणावस्था प्रत्येकजण अनुभवतो आहे. प्रभावी दृक श्राव्य माध्यमांच्या सहाय्याने एखाद्या विषयावरील दोन्ही बाजुचे विचार ऐकायला किंवा वाचायला मिळतात. सध्या हे विचार प्रगटीकरण आपल्याला थोडेसे भडक, अतिरंजीत किंवा आत्मकेंद्री वाटत असले तरी हळूहळू या सर्व विचारमंथनाला एक दर्जा प्राप्त होईल व त्यानंतर विविध चर्चांमधून खरा समाजोपयोगी आधार निर्माण होऊ शकेल. अनेकांना सध्या या सर्व चर्चा वायफळ व वेळ वाया घालविणाऱ्या वाटत असतीलही परंतू त्यांच्याकडे सकारात्मकतेने बघितल्यास आपल्याला जाणवेल की या चर्चा विविध विषयांमधील लोकांचा सहभाग वाढवित आहेत. या सहभागाची व्याप्ती हळूहळू वाढून देशाच्या विविध योजनांमधेही हा सहभाग वाढेल व त्यामुळे या सर्व बाबी समाजातील केवळ बुद्धीवादी गटाच्या विचारकक्षेमधे न राहता सामान्य माणसाचा विचार देखील त्यात अंतर्भूत व्हायला लागेल. त्यामुळे चर्चा व्हायला हव्यात किंबहुना त्या घडवून आणायला हव्यात. एका महत्वाच्या विषयावर एक चर्चा विजयादशमीच्या निमित्ताने कानावर आली.
नवमतवादी तरुण : विजयादशमीच्या आसपास आपण सर्व जण किती मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी करतो. खरे तर हा सण म्हणजे लहानांनी मोठ्यांचे सहजतेने आशिर्वाद प्राप्त करण्याचा दिवस आहे. परंतू परंपरागत व्यवस्थेमधे हा नमस्कार करताना आपट्याच्या झाडाची पाने देण्याचा प्रघात आहे. जुन्या काळी मोठ्या प्रमाणात वृक्ष होते, प्रदुषण अत्यल्प होते त्यामुळे या विजयादशमीच्या सणासाठी आपट्याची पाने तोडणे निसर्गाचा समतोल बिघडवित नव्हते. परंतू आता पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने ही बाब अजिबात परवडणारी नाही. शिवाय सध्या या पानांसाठी अक्षरशः झाडे तोडली जातात कारण काही लोकांसाठी हा व्यवसाय बनला आहे. झाडे तोडल्यावर शासन केले जात नाही किंबहुना थोडेसे पैसे घेऊन वृक्षतोड करु दिली जाते. अश्या स्थितीमधे आता आपणच पुढाकार घेऊन काहीतरी करायला हवे. हाच सण कशाला पण आपल्या संस्कृतीमधे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे निसर्गाचा ऱ्हास होत असेल तेथे तेथे बदल घडायला हवा. असेच काहीसे हरतालिकेच्या सणाला घडते. अनेक झाडांची पाने तोडली जातात. तोच प्रकार श्रावण सोमवारी बेलाच्या झाडाच्या बाबतीत होतो. एका महिलेने एका श्रावण सोमवारी १२१ पाने महादेवाला वाहणे ही छोटी बाब असली तरी अनेक महिलांनी वाहीलेल्या पानांची संख्या फार मोठी होते. ही सारी निसर्गाची नासाडी आता बंद व्हायला हवी. निसर्गाचा असमतोल आपल्याला वारंवार घडत असलेल्या घटनांमधून दिसतो आहे. अचानक येणारा पूर, ढगफुटी, दुष्काळ यासारख्या समस्यांमधे दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. हा असमतोल मानव जमातीच्या ऱ्हासासाठी देखील कारणीभूत ठरु शकतो इतके त्याचे स्वरुप वाढू शकते. असे असताना, ज्यावेळी एका एका झाडाचे कसोशीने संवर्धन करणे गरजेचे आहे अश्यावेळी केवळ परंपरांमधे उल्लेख आहे म्हणून या विविध सणांना केली जाणारी पर्णतोडदेखील परवडणारी नाही. याचा कुठेतरी गांभिर्याने विचार करायला हवा. या सणांच्या साजरे करण्याच्या प्रक्रीयेमधील हा बदल निसर्ग संरक्षणाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. हा बदल केल्याने या सणांमागील भावना कमी होणार नाही कारण ती भावना परंपरेने दृढ झालेली आहे व त्यावर आपला विश्वास असायला हवा. शेवटी निसर्गाचे संरक्षण हे पर्यायाने देवाचेच कार्य आहे कारण निसर्ग अंतिमतः परमेश्वराचेच रुप आहे. त्यामुळे हे छोटे परंतू आवश्यक बदल स्विकारायला हवे व त्यामुळे संस्कृती नष्ट होईल अशी शंका मनात आणू नये.
परंपरावादी गृहस्थ: निसर्ग संरक्षणाचा विचार आम्हाला अमान्य कधीच राहणार नाही. परंतू निसर्ग संरक्षणाच्या प्रत्येक चर्चेमधे केवळ सांस्कृतिकव पारंपारिक प्रक्रीयांमधीलच बाबी ठळकपणे मांडल्या जातात याचे दुःख वाटते. आपले नवे विचार मांडत असताना, सांस्कृतिक प्रक्रीयांमधील विज्ञान समजून न घेता मते मांडणे हा नवमतवादी विचारधारेच्या मंडळींचा आवडता छंद आहे. मुळात या सर्व सणांमधे जे उपचार मांडण्यात आले आहेत त्या मागे आपल्या पूर्वजांनी केलेला वैज्ञानिक विचार समजून घेण्यात आपण कमी पडतोय. अगदी विजया दशमीला दिल्या जात असलेल्या आपट्याच्या पानाचेच उदाहरण घेऊयात. याच झाडाची पाने या सणासाठी का वापरली जात असावी याचा सखोल विचार केला गेला आहे का? आपट्याची पाने प्राणी खात नाहीत हे आपल्याला माहित आहे का? ही पाने तोडल्याने झाडाचे नुकसान होत नाही उलटपक्षी ते झाड आणखी जोमाने वाढायला लागते. हा सर्व विचार करुन तो उपचार रुढ करण्यात आला आहे. विजयादशमीनंतर या पानांचा कचरा होतो ही बाब आपल्या अस्वच्छ रहाण्याच्या सवयींमधील बाब आहे. आपट्याचे पान वडीलधाऱ्यांच्या हाती ठेऊन किंवा डोक्यावर वाहून नमस्कार करणे ही खरी परंपरा आहे जी पाळायला हवी. ही परंपरा आहे म्हणून अन्यथा मोठ्यांचा अश्या प्रकारे आशिर्वाद घेण्याची गरज तरी वाटते का आजकाल? कोणतेही संकट आले की परंपरांना बदला म्हणजे ते दूर होईल असा समज नवमतवादी मंडळींचा झालेला अाहे. गाड्यांचे कर्कश वाजणारे हॉर्नस्, गाड्यांच्या अती वापरामुळे होणारे भयानक प्रदुषण, जोरजोराने वाजणारे डीजे, मोबाईलचा अती वापर, विजेचा व पाण्याचा अपव्यय, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन केल्या जाणाऱ्या दारुच्या पार्ट्या, तेथे दारुच्या नशेत फोडल्या जाणाऱ्या बाटल्या, प्लॅस्टीकचा अपरीमित वापर, नद्यांमधे टाकले जाणारे कारखान्यांमधील केमीकल वेस्ट मटेरीयल या सर्व बाबतीत नवमतवादी फार मोठ्याने बोलत नाहीत. परंतू धार्मिक परंपरांबाबत व त्या बदलविण्याच्या बाबतीत मात्र सर्वांनाच कंठ फुटतो. पुरोगामी हे बिरुद लावून मिरविणारे स्वतः अनेकवेळा पर्यावरणाची हानी करताना दिसतात. मात्र परंपरांना बदला म्हणताना हे सर्वात पुढे असतात. परंपरांमुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास थांबवायला हवा परंतू त्यामागील वैज्ञानिक हेतू लक्षात घेऊनच त्यावर विवेचन करावे. धार्मिक परंपरांबाबत बोलले की लवकर प्रसिद्ध होता येते या स्वरुपाची मनोवृत्ती बाळगून वावरणारे लोक या परंपरांना सॉफ्ट टारगेट मानायला लागले आहेत. पर्यावरणावर बोलावयाचे असल्यास बाकी भयानक पर्यावरण ऱ्हास थांबवून मगच परंपरांचा विचार केला जाऊ शकतो.
सर्वसमावेशवादी मानव: तटस्थपणे या दोन्ही विचारांना समजून घेतल्यास हे दोन्ही विचार आपल्याला पटायला लागतात. एका बाजूने नवमतवाद्यांचा पर्यावरणाबद्दलचा कनवळा जाणवितो तर दुसरीकडे परंपरावादी मंडळींचे म्हणणे देखील योग्य वाटायला लागते. या वैचारिक द्वंद्वामधे आपण अडकलेले असताना या दोन्ही टोकाच्या भूमिका सोडून, समन्वय साधून मधला मार्ग काढता येईल का याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण अश्या प्रकारच्या चर्चांमधूनच आपल्याला भविष्यातील प्रबळ भारत देशाच्या निर्मीतीचे सूत्र गवसणार आहे. या दोन्ही गटात न बसणारा व कशाचेच काही न वाटणारा आणखी एक गट समाजात आढळतो ज्याला कशाचेच घेणे देणे नसते. आपण त्या गटाचे सदस्य नाही याचे समाधान मानावे व या समाजाला खरी व विकासात्मक दिशा प्रदान करणारे वैचारिक मंथन आपापल्या वर्तुळामधे कायम सुरु ठेवावे. त्यामुळेच पुनर्निर्माणाधीन भारतीय समाजाला एक वेगळी व सर्वसमावेशक दिशा प्राप्त होईल.

Comments
Post a Comment