My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

सांगीतिक आनंद प्रवास
मागील आठवड्यात पांढरकवडा या गावी १२३ वर्षे जुन्या गणेशोत्सवामधे व्याख्यानासाठी जाण्याचा योग आला. नेहमीप्रमाणे यवतमाळला मित्र मंडळींच्या भेटी घेऊन एका मित्रा समवेत पांढरकवड्याला जाण्यासाठी गाडीने निघालो. निघण्यापूर्वीच मित्राने सूचना केली की यवतमाळ ते पांढरकवडा हा रस्ता खूप खराब झाला आहे, मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे काळजीपूर्वक गाडी चालव. माझ्या ड्रायव्हींगवर माझा विश्वास असला तरीही मी जरा सावध झालो होतो. यवतमाळ गावातून निघतानाच एका ठिकाणी रस्त्याच्या मधोमध कुणीतरी गाडी पार्क केल्यामुळे निर्माण झालेल्या रहदारीच्या खोळंब्यामुळे प्रवासाची सुरुवात ताणयुक्तच झाली. पण ताण कमी करण्याच्या दृष्टीने गाडी रस्त्याच्या मधोमध पार्क करण्यामागे त्या गाडीवाल्याचे देखील काहीतरी लॉजीक असेल आणि ते लॉजीक समजावून घेण्यासाठी आपण आपले रक्त का जाळून घ्यावे असा विचार आम्ही दोघांनीही केला. पण प्रवासाची ही तर सुरुवात होती. अश्या प्रकारे ताण घेत प्रवास करण्यापेक्षा काहीतरी उपाय करावा हा विचार आम्हा दोघांच्याही मनात येतो न येतो तोच, माझ्या गाडीत नेहमी उपलब्ध असलेल्या सुंदर गाण्यांच्या कलेक्शन मधील लताबाईंचे -आपकी नज़रोंने समझा - हे गाणे लागले. 
मला आणि माझ्या मित्रालाही गाणे ऐकण्याची आणि त्याचा मनसोक्त आस्वाद घेण्याची सवय असल्याने सहजच आम्ही लताबाईंच्या त्या अत्यंत सुमधूर गाण्यात रमून गेलो. प्रेमाची आणि समर्पणाची उत्कट अनुभूती ते गाणे ऐकताना जाणविते. आपल्या प्रियकरावर निस्सीम प्रेम करीत असलेल्या प्रेयसीच्या मनातील सुरेख भाव लताबाईंनी किती समर्पकतेने पोहोचविण्याचा प्रयत्न त्या गाण्यात केलाय या पद्धतीची चर्चा आम्ही गाणे ऐकतानाच करीत होतो. लताबाईंचा लागणारा सूर आणि त्या सुरांमधून जाणविलेल्या भावना या मनात स्थिरावे पर्यंत यवतमाळचे अडथळ्याचे ट्रॅफीक ओलांडून आम्ही गावाच्या बाहेर पडलो होतो. अगदी सुरुवातीला जाणविलेला त्या रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या गाडीमुळे झालेला त्रास नंतर झालाच नाही कारण लताबाई गात होत्या. पुढे निघालो. रस्ता जरा बरा होता परंतू लगेच मित्राने सूचना केली - सावकाश, रस्ता खराब आहे. अचानक रस्त्यावर मधे मधे नुकतेच बनवून लगेच उखडलेले मोठमोठे पॅचेस दिसू लागले. ते चुकवित मी गाडी चालवू लागलो आणि अचानक...
रस्त्यांवरील उखडून गेलेला एक मोठा पॅच चुकवितानाच राहुल देव बर्मन यांच्या संगीताने नटलेले आणि थेट व्हेनीसच्या होडीवर हेलकावे खाल्ल्याचा अनुभव देणारे नितांत सुंदर गीत सुरु झाले - दो लफ्जो की है, दिल की कहानी... माझा मित्र मला म्हणाला, बघ, सुरुवातीचे संगीत संपल्यावर आशाबाईंनी काय सुंदर टेक घेतलाय. त्या सुरांच्या सुंदर टेकची मी वाट बघत राहिलो..आणि मग, ते सुंदर गाणे सुरु झाले. आशा भोसलेंच्या जादुई आवाजाने आम्हा दोघांना थेट व्हेनीसमधे नेऊन ठेवले. त्या गाण्याची ट्युन, त्या गाण्याची सुंदर लय आणि मनाला संपुर्णपणे रीलॅक्स करणारे त्या गाण्याचे शब्द...सगळंच अफलातून.. सहा मिनीटाचे ते गाणे सुरु असे पर्यंत आम्ही दोघेही त्या स्वरानंदाच्या हेलकाव्यावर डोलत होतो. गाणे संपले तेव्हा जाणविले की साधारण चार किलोमीटरचा तो उखडलेल्या पॅचेसचा रस्ता मागे पडला आणि त्यावरुन जातानाची खडबड आम्हाला व्हेनीसच्या सुरमयी वातावरणामुळे जाणविली देखील नाही. जोडमोहा नावाचे गाव ओलांडून आम्ही पुढे निघालो. आता काही वेळ रस्ता चांगला आहे असे मित्राने सांगितले. नवी गाडी असल्याने मी देखील जरा वेग वाढविला. पण वेगाचा आनंद फार काळ टिकला नाही. मित्राची सूचना, आता तू आजपर्यंत अनुभवले नसतील इतके स्पीड ब्रेकर्स लागतील, त्यामुळे स्पीड आवर. आतापर्यंत चांगली ताशी शंभर किमी च्या वेगाने जाणारी गाडी एकदम ताशी वीस किमी च्या वेगावर येऊन पोहोचली. स्पीड ब्रेकर्सही केव्हडे मोठे. पण त्यांचा विचार मनात येण्याआधीच माझ्या मित्राने न ऐकलेले आणि मला फारच आवडणारे एका अगदी नव्या चित्रपटातील गाणे लागले..
नव्या चित्रपटांमधेही काही गाणी खरोखरीच गोड असतात हे विधान सिद्ध करणारे एक गाणे लागले. ते गाणे लागल्यावर मित्राला मी म्हणालो, आता हे गाणे शांतपणे डोळे मिटून ऐक. गाणे सुरु झाले. श्रेया घोषाल या अत्यंत प्रतिभावान गायीकेच्या गोड आवाजातील ते गाणे - ये मोह मोह के धागे, तेरी उंगलीयोंसे जा उलझे, कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरह ये सुलझे... ते अप्रतिम गाणे आम्ही दोघेही शांतपणे ऐकायला लागलो. केवळ ज्या ज्या ठिकाणी श्रेया घोषालने सुंदर जागा घेतल्या त्या ठिकाणी क्या बात है ची दाद एकाच वेळी दिली जात होती. एव्हाना बाहेर अंधार पडला होता. परंतू त्या गाण्यातील सुंदर सुरावटींसोबत रममाण होताना काहीच जाणवित नव्हते. गाणे संपताक्षणी दोघेही एकदम म्हणालो - यार पुन्हा ऐकायचे गाणे? परत एकदा तेच गाणे ऐकून फार आनंद मिळाला... तेव्हड्या वेळात रस्त्यावरील अक्षरशः त्रस्त करुन टाकणारे सर्व स्पीड ब्रेकर्स संपले होते. गाणे ऐकण्यात आम्ही एव्हडे गुंग होतो की स्पीड ब्रेकर्सवर स्पीड कसा कमी होत होता, कसे धक्के बसत होते याकडे आमचे लक्षच राहीले नाही... प्रवास सुरु राहीला..त्रास न जाणविता. पुढे उमरी नावाच्या गावाजवळ मात्र मित्राने तीव्र इशारा दिला. या पुलावरुन अतिशय हळू गाडी घे. येथे रस्ताच नाही. केवळ मोठे मोठे खड्डेच आहेत. समोर साधारण एखादा किलोमीटर सर्वात वाईट रस्ता आहे. तो सर्वात वाईट रस्ता सुरु झाला. मोठमोठे खड्डे चुकविणे अगदिच अशक्य होते, गाडी धडाधड आवाज करु लागली परंतू या आवाजाला दाबून टाकणारा एक आवाज कानी पडला..परत लताबाईंचा.
लताबाईंचा आर्त सूर पण यावेळी सोबतीला गुलज़ारचे शब्द. मग काय बघावे? सिली हवाँ छु गयी, सिला बदन छिल गया, निली नदी के परे, गिला सा चाँद खिल गया - लिबास चित्रपटातील हे गाणे सुरु झाले आणि गुलज़ार भक्त असलेले आम्ही दोघेही वाड़मयाचे अभ्यासक, त्या गाण्यातील काव्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ लागलो. सिली या शब्दाचा नेमका अर्थ काय असावा याबद्दल चर्चा सुरु झाली. गुलज़ार ने हा शब्द लेकीन चित्रपटातील गाण्यातही वापरला आहे. त्याचा नेमका काय अर्थ असावा वगैरे बोलणे सुरु झाले...या गप्पा रंगलेल्या असतानाच मित्र म्हणाला, आपण पांढरकवड्यात पोहोचलो. प्रचंड खड्ड्यांचा रस्ता आणि पुढे सात किलोमिटरचे अंतर कधी संपले ते कळलेच नाही. खरे सांगायचे तर त्या सुरमयी मैफीलीमुळे सत्तर किलोमीटरचा अत्यंत खडबडीत रस्ता कोणताही ताण न येता पार झाला, नव्हे आनंद प्रवासाचे सूख प्राप्त करुन गेला...
आपल्या प्रत्येकाच्या जीवनप्रवासामधे ताण निर्माण करणारे, कधी कधी तर जीवन नकोसे करुन टाकणारे प्रसंग सामोरे येऊन ठाकतात. प्रवास करायचाच असतो आणि त्या प्रसंगांना किंवा परीस्थितींना टाळताही येत नाही. मग उपाय एकच, त्या सर्व प्रसंगांना निदान काही काळ दुर्लक्षित करता येईल इतके सक्षम माध्यम आपल्याकडे उपलब्ध असायला हवे. ज्यांना सुंदर संगीताचा आस्वाद घेता येतो ते भाग्यवान असतात. संगीताच्या शक्तीमुळे व निखळ आस्वादामुळे ताणयुक्त जीवनही सुखकर बनू शकते. संगीताचा निखळ आस्वाद ही एक साधनाच आहे. संगीताचा एक एक सुर आपल्याला आपल्या अस्तित्वाची खरी ओळख करुन देतो आणि एक महत्वाची बाब समजावितो - माणसाच्या आयुष्यातील ताणयुक्त प्रसंग त्रासदायक जरी असले तरी त्यांना एक विशिष्ट मर्यादा आहे परंतू माणसाच्या जीवनात आनंदनिर्मीतीची प्रक्रीया मात्र अमर्याद स्वरुपाची आहे. त्याची केवळ ओळख पटायला हवी... श्रेष्ठ संगीत ती ओळख पटवून देते.



Comments

  1. Sur tech chhedita,
    Geet umatle nave...
    Music definitely gives you a new perspective to look at the mundane or irritable things in life. Very appreciable. I wish you all the best. :-)

    ReplyDelete
  2. Sur tech chhedita,
    Geet umatle nave...
    Music definitely gives you a new perspective to look at the mundane or irritable things in life. Very appreciable. I wish you all the best. :-)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18