My article published in Hindusthan Daily under my column थोडा है थोडे की जरूरत है today

विधात्याच्या न्यायाचे वर्तुळ पूर्ण
मुंबई शहरात २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोटामधील काही गुन्हेगारांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली व काहींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्या दिवशी सर्व वृत्तवाहिन्या ब्रेकींग न्युज म्हणून ही बातमी दाखवित होत्या. शिर्षक सर्वांचे सारखेच होते, मुंबई लोकल बॉम्बस्फोटांच्या पिडीतांना अखेर न्याय मिळाला. साधारण नऊ वर्षांनंतर हा निर्णय करण्यात आला. अर्थात या निर्णयाला पुन्हा वरील कोर्टात आव्हान दिले जाणार आहेच. त्यामुळे शिक्षेवर अंतीम शिक्कामोर्तब केव्हा होईल हे नक्की सांगता येत नाही परंतू सध्या शिक्षा सुनावण्यात आली ही समाधानाची बाब आहे. या सर्व प्रकारात एक बाब आणखी घडली. ती म्हणजे, यापैकी काही गुन्हेगारांना अमरावतीच्या कारागृहात बंदीस्त ठेवण्यासाठी आणण्यात आले. अमरावतीला त्यांना त्यांनी केलेल्या निर्घण कृत्यासाठी बंदीस्त ठेवले जाणार आहे व या कृतीमुळे विध्यात्याच्या न्यायाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. या अमरावतीशी ज्यांचा घनिष्ट संबंध होता, अनेक वर्षे ते अमरावतीकरच होते असे एक गृहस्थ या बॉम्बस्फोटामधे दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले होते. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या नराधमांना अमरावतीच्याच कारागृहात ठेवण्यात आले आहे आणि अश्या प्रकारे हे वर्तुळ पूर्ण झाले आहे. 
एका अतिशय आनंदी परीवारातील मुलगी सीमा माझी महाविद्यालयातील खूप छान मैत्रीण होती. तोंडाला फडके बांधून फिरायला जाणारी ती मैत्री नसल्याने आमचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. सीमाच्या घरी गेल्यावर तिच्या परीवारामधे एकमेकांशी असलेले प्रेमाचे नाते नेहमीच जाणवायचे. मुळचे अमरावतीच्या साबणपुरा या परीसरात राहणारे गोवर्धन शर्मा हे या परीवाराचे प्रमुख व सीमाचे बाबा होते. माझी सीमाशी ओळख होण्याच्या आधीपासूनच ते मुंबईला नोकरी करायचे. सीमाची आई आपली मुलगी व दोन मुलांना घेऊन अमरावतीला कँप परीसरात रहायची. सीमाचे वडीलांशी फार जवळचे नाते होते. जेव्हा तिचे वडील सुट्ट्यांमधे अमरावतीला यायचे तेव्हा त्यांच्या घरी फार आनंदी वातावरण असायचे. सीमाच्या वडीलांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. आपल्या मुलीचा मित्र म्हणून ते माझे खूप मनापासून स्वागत करायचे. सीमाचा विवाह झाल्यानंतर ती राजस्थानला गेली आणि तिचा परीवार मुंबईला स्थानांतरीत झाला. 
मुंबईला देखील त्यांचे आयुष्य अत्यंत आनंदात जात होते. सीमाचा आता अमरावतीशी संपर्क कमी झाला होता. ते स्वाभाविकच होते. मधून मधून तिच्याशी बोलणे व्हायचे. एकदा तिने मोठ्या आनंदात सांगितले की तिच्या लग्नानंतर पहिल्यांदा तिचे वडील तिच्याकडे दहा दिवसांसाठी रहायला जाणार आहे. मुलीकडे जास्त राहू नये असा जुना शिरस्ता पाळणारे तिचे बाबा तिच्याकडे दहा दिवस रहायला तयार झाले याचा तिला फार आनंद झाला होता. बाबा तिच्याकडे आल्यानंतर ती त्यांना कुठे कुठे नेणार आहे, काय काय दाखविणार आहे हे सारे तिने मला मोठ्या उत्साहात सांगितले. अगदी त्यांना पॅलेस ऑन द व्हील या प्रसिद्ध रेल्वे गाडीतून ती राजस्थानची सफर करवून आणणार होती. सीमाचे वडील देखील मुलीकडे जाऊन राहण्यासाठी उत्सुक होते. बाबा आपल्याकडे येणार याची सीमा मनापासून वाट बघत होती. त्यांच्या येण्याचा दिवस जसा जसा जवळ येऊ लागला तसे तसे तिला बोलण्यावाचून रहावेना. मला ती फोन करुन वेगवेगळे प्लॅन्स सांगायची. मी देखील तिला एक दोन गोष्टी सुचविल्या. एकंदरीत सीमाने बाबांच्या वास्तव्याची जय्यत तयारी करुन ठेवली होती... पण अचानक एके दिवशी सायंकाळ सरता सरता मुंबईहून एक फोन आला आणि तिच्यावर अतिशय मोठा आघात झाला..
११ जुलै २००६ रोजी सीमाचे वडील नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात गेले. त्या दिवसांमधे ते देखील फार खुश होते. आपल्या लाडक्या लेकीकडे त्यांना जायचे होते त्यामुळे त्यांना छान वाटत होते. लेकीचा संसार आनंदात सुरु आहे आणि तिच्याकडून ऐकलेले सगळे कौतुक प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी त्यांना मिळणार होती. कार्यालयात देखील त्यांनी सर्वांना त्यांच्या ट्रीपपबाबत सांगितले होते. त्या दिवशी दुपारी त्यांनी आपल्या मुलाला त्यांच्या विमानाच्या तिकीटांच्या झेरॉक्स काढून ठेवायला सांगितल्या. सीमाकडे जाण्याच्या प्रवासाची तयारी सुरु करायला हवी असे कदाचित त्यांच्या मनात असावे. अतिशय शिस्तीत आयुष्य गेले असल्याने त्यांना सर्व गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या आवडायच्या. त्यांच्या या व्यवस्थितपणामुळे घरात बरेचवेळा गंमती व्हायच्या ज्या सीमा मला नेहमी सांगायची. गावाला जाताना त्यांना साधारण एक तास आधी स्टेशनवर पोहोचणे आवडायचे. एकदा त्यांच्या घाईमुळे यांचा परीवार स्टेशनवर लवकर पोहोचला. त्यानंतर गाडी लेट झाली व सकाळचा रेल्वेत खायचा डबा त्यांना स्टेशनवरच खाऊन रात्रीच्या डब्याची वेगळी सोय करावी लागली. असले अनेक किस्से त्यांचे होते. त्यामुळे पोरीकडे दहा दिवसांसाठी जायचे असल्याने त्यांची तयारी सुरु झाली होतीच. त्यांच्या तिच्याकडे जाण्याला केवळ पाच दिवसच शिल्लक होते. त्या दिवसांमधे लोकलमधे फार गर्दी असते म्हणून सीमाच्या भावाने आग्रह करुन त्यांना फर्स्ट क्लासचा पास काढून दिला होता. निदान घरी येताना त्यांना आरामात येता यावे हा त्यामागचा हेतू होता. त्या दिवशीही ते दिवसभराचे काम आटोपून घरी निघाले.. मनात त्यांच्या लेकीकडे जाण्याचे विचार असावे कारण त्या काळात ते कार्यालयात फार खुश होते असे त्यांच्या सहकारी मंडळींनी सीमाच्या आईला सांगितले होते. ५.५४ वाजता चर्चगेटहून ते बोरीवलीला जात असलेल्या लोकलमधे बसले. गाडी चर्चगेटहूनच सुटली असल्याने त्यांना बसायला जागा मिळाली होती. दिवसभराचे काम झाल्यामुळे त्यांचा डोळा लागला होता. गाडी ६.२६ वाजता माहीम जंक्शनला पोहोचली. अचानक....कुणाच्याही लक्षात आले नाही काय झाले ते.... एक मोठ्ठा आवाज झाला...फर्स्ट क्लासच्या डब्यामधे प्रचंड शक्तीचा बॉम्बस्फोट....
राजस्थानच्या उदयपूर या गावी सायंकाळी साडेआठच्या सुमारास सीमाला आलेला तो फोन एका अत्यंत वाईट बातमीचा होता. मुंबई लोकल मधे झालेल्या भिषण बॉम्बस्फोटात सीमाच्या वडीलांचा करुण व दुर्देवी मृत्यू झाला होता... तो आघात सीमासाठी आणि तिच्या परीवारासाठी भयानक आणि उध्वस्त करणारा होता...ज्या बॉम्बस्फोटात अनेक निरपराध लोक मृत्यूमुखी पडले आणि ज्यामधे अमरावतीच्या गोवर्धन शर्मांचा समावेश होता तो बॉम्बस्फोट घडवून आणलेल्या गुन्हेगारांपैकी काही गुन्हेगारांना अमरावतीच्याच कारागृहात शिक्षेसाठी आणले जावे हा विधात्याने पूर्णत्वास नेलेला न्यायच आहे.
याबाबत नुकतेच सीमाशी बोललो...तिने माझे बोलणे ऐकून घेतले.. तिच्या मनात तिच्या बाबांविषयीच्या सगळ्या आठवणी दाटून आल्या असाव्यात. थोडावेळ शांतता होती. तिच्या हुंदक्यांचा आवाज केवळ येत होता.. मी देखील शांत होतो.. एखाद्या मिनीटानंतर सीमा शांतपणे मला म्हणाली - अवि, हे सगळे बरोबर आहे..अखेर न्याय तर झालाच.. पण अशी शिक्षा सुनावल्यानंतर किंवा त्यांना अमरावतीच्याच कारागृहात टाकल्यानंतरही माझे बाबा मात्र त्या दिवशी गेलेच ना! ते कधी परत येतील? सीमाच्या या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे, न्यायव्यवस्थेकडे किंवा कदाचित विधात्याकडेही नव्हते!


Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18