My article published in Hindusthan Daily under the column थोडा है थोडे की जरूरत है

उदो बोला उदो!!
कालपासून अमरावती शहरात अंबामातेचा-एकविरामातेचा -उदो बोला उदो- हा जयघोष सुरु झालाय. शहराच्या या ग्रामदेवतांचा जंगी उत्सव सुरु आहे. आता पुढील आठ-रात्री या शक्तीच्या प्रतीक असलेल्या मातांची मनोभावे पुजा केली जाणार, उपवास केले जाणार, पहाटे उठून अनवाणी मंदीरामधे जाऊन दर्शने घेतली जाणार, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस बोलले जाणार, मातांची पुजा केल्यानंतर हाताला दोरे बांधले जाणार वगैरे वगैरे. एकंदरीत या शक्तीरुपी मातांवरील श्रद्धा जमेल तेव्हड्या तीव्रतेने व्यक्त करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणार. अमरावतीच्या या श्रद्धास्थानांना मनोभावे भेटी देणाऱ्या भक्तांचे निरीक्षण केल्यास आपल्याला एक गोष्ट ठळकपणे जाणविते, ती म्हणजे या ग्रामदेवतांचेच मानवी रुप घेऊन या पृथ्वीतलावर वावरत असलेल्या माता-भगिनींची संख्या या भक्तगणांच्या गर्दीत जास्त असते. विशेषतः शाळा, महाविद्यालयांमधे शिकत असलेल्या मुलींची तर संख्या फारच जास्त आढळते. एरवी पहाटे उठायला कंटाळा करणारी विद्यार्थिनी या नऊ दिवसांमधे पहाटे चार वाजता उठून, शुचिर्भुत होऊन, अनवाणी दोन किलोमीटर अंतर चालून मंदिरांमधे दर्शनाला येते. मनोभावे या शक्तीदेवतांची पुजा करते. त्यांचा हा भक्तीभाव बघून खरोखरीच मनाला फार बरे वाटते कारण आपल्या समाजातील परंपरागत श्रद्धास्थाने टिकणे ही काळाची गरज असल्याने त्या प्रक्रीयेतील या तरुणींचा सहभाग वाखाणण्यासारखा असतो. परंतू त्यांचा हा भक्तीभाव आणि त्यांचे रोजच्या जीवनातील वागणे यामधला विरोधाभास जेव्हा जाणवायला लागतो तेव्हा मात्र त्यांच्या भुमिकेबद्दल मनात प्रश्नचिन्ह निर्माण होते. आपल्या मनाला उभारी देणाऱ्या या शक्तीदेवतांची मनोभावे पुजा करताना जर या तरुणींना जीवन जगण्याची शक्ती प्राप्त करता येत नसेल तर मग त्यांच्या भक्तीभावाबद्दलच शंका उत्पन्न होते. अंबामाता व एकवीरामाता या शक्तीदेवतांचे अधिष्ठान असलेल्या या अमरावती शहरामधे गेल्या दोन आठवड्यात घडलेल्या चार घटनांनी तरुण विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या या शक्तीदेवतांप्रती असलेल्या समर्पणाबद्दल मन साशंक होते. या चारही घटना मन सुन्न करणाऱ्या तर आहेतच परंतू गांभिर्याने विचार करायला लावणाऱ्या आहेत.
नवरात्रीसाठी आणि देवीपुजनासाठी सारी अमरावती नगरी सज्ज होत असताना त्या देवतांचे स्वरुप असलेल्या तीन महाविद्यालयीन तरुणींनी व एका शाळकरी मुलाने गेल्या दोन आठवड्यात वेगवेगळ्या घटनांमधे आत्महत्या करुन आपले बहुमोल जीवन संपविले. वय वर्षे १८ ते २१ या वयोगटातील आपल्या तीन भगिनी व एक छोटा मुलगा आपल्याला सोडून गेला. कदाचित त्या मुली देखील मागील वर्षापर्यंत या दोनही शक्तीदेवतांच्या पूजक असतील, त्यांनीही मागील वर्षापर्यंत मंदीरांमधे अनवाणी जाऊन, उपवास करुन पुजा केली असेल. परंतू या शक्तीदेवतांपासून जीवन जगण्याची शक्ती मात्र त्या प्राप्त करु शकल्या नाही. यामुळे कोणत्यातरी तात्पुरत्या कारणासाठी शक्तीहीन होऊन त्यांनी कायमचे उत्तर प्राप्त केले. स्वतःला फासावर लटकवून घेतले. Suicide is a permanent solution of a temporary problem असे म्हणतात. या चारही घटनांमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. शक्तीदेवतांचा उदो उदो करताना त्यांच्या पासून खरी शक्ती प्राप्त करण्याची मानसिक अवस्था निर्माण करण्यामधे वेगवेगळ्या व्यवस्थांना आलेले हे दारुण अपयश आहे. आपल्या आयुष्यात निर्माण झालेल्या समस्येबाबत मला कुणीही मदत करु शकत नाही हा त्या मुलींच्या मनात निर्माण झालेला अविश्वासच यांना असा आत्महत्येचा चूकीचा निर्णय घेण्यास बाध्य करतो आहे. सामान्यपणे हा विश्वास निर्माण करीत असलेल्या तीन व्यवस्था जसे - समाज, कुटुंब आणि शिक्षण या सपशेल अपयशी ठरल्या असेच म्हणावे लागेल. 
तंत्रज्ञानाच्या आधारे आपण कितीही जोडले असण्याची आव आणित असलो तरीही - मला काय करायचे - ही वृत्ती मोठ्या प्रमाणात बळावताना दिसते. तोंडाला फडके बांधून तरुण तरुणी रस्त्याच्या कडेला तासन तास बोलताना दिसतात, परंतू त्यांना हटकण्याचेही कार्य कुणी करत नाही. कशाला कुणाच्या भानगडीत पडायचे असे म्हणून या सर्व बाबींकडे कानाडोळा केला जातो. या दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे कधीकधी आपल्या घरची मुले देखील तोंडाला फडके बांधून कुठल्यातरी गल्लीमधे उभी असतील आणि आपण आपल्याच कोषात जगत राहू. सामाजिक दृष्टीने आजकाल प्रत्येकाला स्वतंत्र जगायचे आहे आणि ते जगणे आक्षेपार्ह असले तरीदेखील त्याला आडकाठी करायची नाही ही सर्वांचीच भुमिका आहे. कुटुंबामधेही स्थिती फार समाधानकारक नाही. नर्सरी किंवा बालवाडीतील मुलांच्या भवितव्याबद्दल अतिशय जास्त काळजी करणारे पालक मुले उच्चशिक्षण घ्यायला लागल्यावर अनास्था दाखवितात. बालवाडीच्या पालकसभांना बसायला जागा नसते आणि महाविद्यालयांमधे पालक येतच नाहीत. सतत तीन तीन महिने महाविद्यालयामधे एखादी विद्यार्थिनी गैरहजर असते आणि तिच्या पालकांना त्याची दखलही घ्याविशी वाटत नाही. त्या गैरहजेरीबद्दल माहिती देण्यासाठी त्यांना बोलाविल्यावर त्यांची मुले त्यांचे ऐकत नाहीत अशी हतबलता ते व्यक्त करतात. मुलांच्या आणि पालकांच्या विचारामधे तफावत पडत असल्याने दुरावा निर्माण होतोय व त्यामुळे मुलांना व्यक्तिगत आयुष्यात येत असलेल्या अडचणींसाठी त्यांना बाहेरचे आधार जास्त मजबूत वाटायला लागतात. ते आधार देणारे अनेक वेळा कुटील हेतू उराशी बाळगून असतात आणि मग त्यामधूनच मोठ्या समस्या निर्माण होतात. कौटुंबिक पातळीवर मुलांना आवश्यक असलेला आधार मुलांच्या स्वैर वागण्यामुळे व त्यापुढे हतबल बनत चाललेल्या पालकांमुळे हळूहळू नाहिसा होतोय. मुलांना आधार देणारा तिसरा घटक म्हणजे शिक्षण व्यवस्था. तेथील स्थितीदेखील चिंतेत टाकणारी आहे. महाविद्यालयांमधे हजर राहण्यापासूनच याची सुरुवात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांबद्दल विश्वास निर्माण होणे, त्याच्या बळावर त्यांनी आपल्या समस्या त्यांच्याजवळ मांडणे आणि त्या समस्यांवर शिक्षकांनी योग्य पद्धतीने तोडगा काढणे या प्रक्रीया फार दुरापास्त व्हायला लागल्या आहेत. याउलट अभ्यासाची, उपस्थितीची, मोबाईल न वापरण्याची, युनीफॉर्म घालण्याची इत्यादी सक्ती या विद्यार्थ्यांना जाचक अटी वाटायला लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचा शिक्षकांशी मनःस्वी संवाद प्रस्थापित होऊन ते त्यांच्या मनातील खाजगी समस्यांबाबत चर्चा करतील या शक्यता धूसर होत आहेत. 
नाही म्हणायला काही प्रमाणात या तीनही पातळीवर संवाद होऊन काहींच्या बाबतीत फायदा होताना दिसतो. परंतू समस्यांचे प्रमाण फार जास्त आहे आणि म्हणूनच आपल्याला गेल्या दोन आठवड्यात चार विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या मनाला अस्वस्थ करुन टाकणाऱ्या बातम्या ऐकायला मिळाल्या आहेत. आयुष्याला नुकतीच सुरुवात केलेल्या मुला-मुलींनी अश्याप्रकारे आपले आयुष्य संपविलेले बघणे ही किती वेदनादायी बाब असू शकते ही कल्पनाही करवत नाही. आपल्या गावातील चार पालकांनी ते गेल्या दोन आठवड्यात प्रत्यक्ष भोगले आहे. या घटना केवळ हळहळ व्यक्त करुन थांबणाऱ्या नाहीत. यासाठी आपण सर्वांनी एकत्रीतपणे आपापल्या प्रयत्नांनी या व्यवस्था बदलविण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. मुलांच्या विकासात्मक वाटचालीमधे सहभाग, संवाद आणि समजुतदारपणा या त्रयीच्या आधारे मोठे काम करण्याची गरज आहे. जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्याला काम करावे लागणार आहे. अन्यथा असा प्रसंग आपल्यावर ओढावेल आणि इतर लोक केवळ हळहळतील. यापेक्षा कुणावरही असे आयुष्य उध्वस्त करणारे प्रसंग येणार नाहीत याची काळजी आपण सर्वांनी मिळून घेऊया. या नवरात्रीत आपल्या मुलांना आणि आपल्यालाही आपल्या शक्तीदेवता अंबामाता आणि एकविरामाता ही शक्ती प्रदान करो ही मनोकामना. उदो बोला उदो!!







Comments

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. वस्तुस्थिती सर्वांना मान्य असते ...पण वास्तवात खरच सगळे react करू शकतात का ???कारण कधी कधी त्यां फडके बांधनाऱ्या मुलांच्या पालकांना आपण आक्षेप घेतलेला सुद्धा चालत नाही ....पण एकत्रित पण कार्य केल्यास सुधारणेला कमीत कमी सुरुवात तरी होईल ...या आर्टिकल च्या नीम्मीत्ताने सर्व चिंतन करतील अशीच अपेक्षा बाळगूया ...आरती अड्सड देशमुख

    ReplyDelete
  3. वस्तुस्थिती सर्वांना मान्य असते ...पण वास्तवात खरच सगळे react करू शकतात का ???कारण कधी कधी त्यां फडके बांधनाऱ्या मुलांच्या पालकांना आपण आक्षेप घेतलेला सुद्धा चालत नाही ....पण एकत्रित पण कार्य केल्यास सुधारणेला कमीत कमी सुरुवात तरी होईल ...या आर्टिकल च्या नीम्मीत्ताने सर्व चिंतन करतील अशीच अपेक्षा बाळगूया ...आरती अड्सड देशमुख

    ReplyDelete
  4. वस्तुस्थिती सर्वांना मान्य असते ...पण वास्तवात खरच सगळे react करू शकतात का ???कारण कधी कधी त्यां फडके बांधनाऱ्या मुलांच्या पालकांना आपण आक्षेप घेतलेला सुद्धा चालत नाही ....पण एकत्रित पण कार्य केल्यास सुधारणेला कमीत कमी सुरुवात तरी होईल ...या आर्टिकल च्या नीम्मीत्ताने सर्व चिंतन करतील अशीच अपेक्षा बाळगूया ...आरती अड्सड देशमुख

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18