थोडा है थोडे की जरुरत है @28.11.23

अवकाळी

आता लेख लिहीताना देखील पाऊस सुरु आहे. रात्रभर पाऊस कोसळला. सारे काही आलबेल असताना अचानकच पावसाने लावलेली हजेरी त्रासदायकच ठरते. पण त्याचे नावच अवकाळी पाऊस असे आहे तो निमंत्रण दिल्याविनाच येतो होत्याचे नव्हते करून जातो. काही दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रात भरभरून तयार झालेल्या शेतांचा फोटो बघितला. आता त्या पिकांवर या अवकाळी पावसामुळे कीड पडू शकते. मुळात या पावसाचा त्रास होतो नुकसान जास्त सहन करावे लागते कारण यासाठी आपण तयार नसतो. संभाव्य धोक्याची कल्पना असेल तर आपण त्याचे डीफेन्स मेकॅनीझम तयार करु शकतो. परंतू या अवकाळीचे डीफेन्स मेकॅनीझम तयारच करता येत नाही कारण हा धोका कधी समोर ठाकेल ते सांगताच येत नाही. अगदी असेच काही अवकाळी आपल्या ध्यानातही येणार नाहीत असे ताण आपल्या मनावर येत असतात. ते अवकाळी असल्याने त्यांच्याशी सामना करण्याचे डीफेन्स मेकॅनीझम आपल्याकडे तयार नसते. त्यामुळे असे ताण आपल्या मनावर साचत जातात, त्यामुळे आपला स्वभाव चिडका बनतो अंतीमतः कधीकधी त्याचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक देखील होतो. एक घटना सांगतो

महाविद्यालयातून घरी परतताना एका मोठ्या चौकात माझी गाडी सिग्नलजवळ थांबली होती. माझ्या गाडीसमोर एक ट्रक उभा होता. माझ्या गाडीमागे एक लाल रंगाची कार होती. मला आरश्यातून ती कार दिसत होती. सिग्नल सुरु झाला परंतू माझ्या गाडी समोरचा ट्रक काही केल्या पुढे जाईना. काही सेकांदातच त्या ठिकाणी पॅनीक तयार झाला. सर्व गाड्या हॉर्न वाजवू लागल्या. मी शांतपणे बसलो कारण जोवर तो ट्रक हलणार नाही तोवर मी पुढे जाऊ शकत नाही हे मला ठाऊक होते. पण अचानक असे काही घडले ज्यामुळे मला त्या अवकाळी ताणांची आठवण आली. सिग्नल सुरु झाला तरी पुढे जाता येत नाही म्हणून गाडीचा हॉर्न वाजविणे ठीक आहे. अर्थात तो देखील किती वेळा वाजवायचा याला मर्यादा असाव्यात. परंतू ते आपण समजू शकतो. पण त्या लाल रंगाच्या कारमधे बसलेल्या माणसाने जे केले ते अनाकलनीय होते. गाड्या पुढे सरकत नाहीत हे बघून तो एवढा पॅनीक झाला की तो सरळ गाडीतून उतरला. जोरजोरात ट्रकच्या नावाने अर्वाच्य शिव्या देत माझ्या गाडीला ओलांडून पुढे गेला. त्याने बघता बघता त्या ट्रकचे दार उघडून त्या ड्रायव्हरला खाली खेचले त्याला लाथा बुक्क्यांनी तुडविणे सुरु केले. तो प्रकार बघून मी पण गाडीतून उतरलो. तोवर ट्रॅफीक पोलीस इतर काही लोक त्या ठिकाणी पोहोचले होते. त्या माणसाला आवरण्याचा प्रयत्न करीत होते. तो ड्रायव्हर गयावया करून सांगत होता की साहेब माझी गाडी बंद पडली ती सुरुच होत नाहीये. मी काय करू? पण तो माणूस ऐकायला तयार नव्हता. शेवटी त्याला सर्वांनी मिळून बाजूला केले. हा सर्व प्रकार घडण्याच्या वेळात दोन वेळा सिग्नल सुरु होऊन बंद झाला. रांगेतल्या गाड्या ट्रक त्याच्या मागे उभ्या असलेल्या आमच्या गाड्यांना वळसा घालून निघूनही गेल्या. रागारागात तो माणूस परत गाडीत जाऊन बसला. नंतर पुन्हा कर्कश हॉर्न वाजवत वेगात पुढे निघून गेला. त्याचा राग शांत झालेला नव्हताच.

मी देखील पुढे निघालो पण राहून राहून या प्रकाराबद्दल विचार मनात येत होता. एवढा राग कशासाठी? तो ट्रक सुरु झाला असता किंवा काही सेकंदाने त्यांस वळसा घालून पुढे जाता आले असते. परंतू सिग्नलवरच्या त्या काही सेकंदाच्या उशीर होण्यालाही आपले मन सहन करु शकत नाही. एरवी मोबाईल हातात आल्यावर रील्स बघण्यात तासन् तास निघून जातात परंतू सिग्नलवरचा काही सेकंद उशीर देखील संयमाने स्विकारता येत नाही. असे का व्हावे?

याचे उत्तर म्हणजे, अवकाळी ताण. जे ताण आपल्याला माहित आहेत त्यांच्याशी सामना करण्याचे मेकॅनीझम आपल्याजवळ असते. परंतू असे काही ताण आहेत जे अजाणतेपणी आपल्या मनावर साचत आहेत किंवा आपण ते साचवून घेतो आहे, आपल्या स्वभावाच्या चुकीच्या ठेवणीमुळे. हे असे ताण नकळत साठत जातात त्याचा मी वर सांगितल्याप्रमाणे उद्रेक होतो. त्यामुळे जसे नेहेमीच्या पावसासोबत शेतकरी बांधवांनी अवकाळीचाही सामना करण्याची तयारी करावी तसेच आपल्या मनावर अवकाळी साचत जाणाऱ्या ताणांचे नियोजन करण्याचे मेकॅनीझम तयार करावे लागेल. अन्यथा त्याचा उद्रेक चिडचिड करण्यामधे मोठ्या प्रमाणात त्रास करून घेण्यामधे होऊ शकतो. असे डीफेन्स मेकॅनीझम आपण तयार करु शकतो? होय… (क्रमशः)




Comments

  1. खूप सुंदर लेख... प्रसंग आणि त्याला साजेसे रोजच्या जीवनातील उदाहरण देखील खूपच छान... In short stress management is really necessary.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18