थोडा है थोडे की जरुरत है @ 14.11.23

इगो सेटलमेंट

मानसशास्त्राच्या भाषेत बोलायचे झाल्यास इगो हा प्रत्येक मानवाच्या व्यक्तिमत्वाचा एक अभिन्न भाग आहे त्याचा अर्थ शास्त्राच्या दृष्टीने सांगायचा झाल्यास, आपल्या मेंदूमधील तो भाग जो सचेतन अचेतन अवस्थांमधे संवाद घडवतो. हा भाग माणसाच्या सकस मानसिक विकासाच्या दृष्टीने फार उपयोगी असतो. परंतू आपण मात्र व्यावहारिकदृष्टीने इगो या शब्दाला जरा वेगळ्या अर्थाने वापरतो. खरे तर तो अर्थ त्या शब्दाच्या मूळ अर्थाचे ताणलेले रुप आहे. स्वत्वाची जाणीव होणे यांस इगो म्हणतात. परंतू या स्वत्वापलीकडे इतरांचेही स्वत्व असते हे समजूनच घ्यायचे नाही यांस आपल्या व्यावहारिक भाषेमधे त्या व्यक्तीमधे इगो आहे असे आपण म्हणतो. नव्या काळात प्रत्येकाला आपल्या स्वतंत्र विचारांनी जगण्याची मुभा मिळाली आहे त्यासोबत बरेच वेळा हा इगो देखील मोठ्या प्रभावीपणे जोपासलेला आपल्याला दिसतो. जगण्याचे किंवा वागण्याचे स्वातंत्र्य हे एवढ्या जास्त प्रमाणात घेतले जाते की त्यामुळे जगण्याचे सामाजिक भान बरेच वेळा आपल्याला सुटलेले दिसते. यासोबतच आपल्या इगोचे सेटलमेंट कुठेही करायला मंडळी तयार असतात. आपल्या या असल्या इगोला जोपासण्याच्या नादात आपण सामाजिक दृष्टीने चुकीचे ठरतोय हे बरेच वेळा कळतच नाही. याचे कारण त्या इगोची धुंदी एवढी जास्त असते की समाजाचे मला काय देणे घेणे अशी देखील भूमिका घेतली जाते. अश्याच एका इगो सेटलमेंटचा अनुभव मला नुकताच आला. तो सारा प्रकार अनेकांना त्रासदायक होता परंतू त्या क्षणी त्या बाईला मात्र तिचा इगो सेटल करायचा होता. खरे तर तसे केल्यामुळे तिला पारितोषिक मिळाले नाही. परंतू एक वेगळ्या प्रकारचा आनंद तिला मिळाल्याचे जाणविले. हे सारे कुठे? जमिनीपासून सुमारे ३०००० फुटांवर

बंगलोरहून आमचे विमान उडाले ते उडत असतानाच विमानासोबत एक आवाज सारखा येत होता. मी ज्या सीटवर बसलो होतो, त्या सीटच्या अगदी समोरच्या सीटवर एक तीन ते चार वर्षांचा मुलगा होता. तो जीव खाऊन रडत होता. नेमके त्यांस काय झाले होते हे काही कळायला मार्ग नव्हता. त्या मुलाचे वडील त्यांस शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. मधून मधून एयर होस्टेस येऊन चौकशी करत होती. टेक ऑफ करताना मुलाचे कान झाकून ठेवावे जेणेकरून त्यांस त्रास होणार नाही असशी सूचना ती देऊन गेली. परंतू ते बाळ रडण्याचे अजिबात थांबत नव्हते. विमानाच्या टेक ऑफ च्या वेळी खरे तर टर्बो इंजीनचा केवढा आवाज येतो परंतू त्या आवाजातही त्या बाळाचा रडण्याचा आवाज सुरुच होता. विमान सुमारे ३०००० फुटावर जाऊन जेव्हा स्थिरावले तेव्हा एयर होस्टेसने पुन्हा त्या बाळाला काही देता येईल का या बाबत चौकशी केली. ते बाळ  फारच जोरात रडत असल्याने त्याच्या वडीलांना अगदी कानकोंडे होत होते. आता इतर प्रवासी देखील त्यांस वेगवेगळे सल्ले देऊ लागले. त्याला अमूक देऊन बघा, त्याला तमुक देऊन बघा. जरा वेळ ते बाळ शांत रहायचे पुन्हा त्याचा कल्ला सुरु व्हायचा. माझ्यासकट सर्वांना ही खात्री पटली होती की हा माणूस एकटा या बाळाला घेऊन चालला आहे त्यामुळे प्रत्येकालाच सहानुभूती वाटत होती. परंतू काही वेळानंतर बाजूच्या रांगेतील एका बाईशी तो जे बोलला ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर ती बाई जे बोलली ते ऐकून तर आम्ही सर्वच चाट पडलो

ते बाळ रडण्याचे थांबतच नाही म्हणल्यावर, तो बाजूच्या रांगेतील त्या बाईला म्हणाला, किती अंत पाहशील? आपले बाळ किती वेळचे रडतेय आणि तू शांत बसलीय. बापरे!! ती त्या बाळाची आई होती. ती ताडकन उभी राहीली अस्खलीत इंग्रजीमधे तिने त्या माणसाला सुनावले. आता आले लक्षात? मुलांना सांभाळणे म्हणजे गंमत नाही. आता कळली माझी किंमत? अजूनही तुला पटत नसेल तर तू त्याला शांत करून दाखव. वगैरे वगैरे. पाच मिनीटे ती त्या माणसाला अक्षरशः झापत होती. त्यानंतर तिने त्या बाळाला स्वतः जवळ घेतले. जरा वेळातच ते शांत झाले. आम्ही सारेच कदाचित त्या घटनेचा विचार करु लागलो. कदाचित त्या माणसाचे वागणे वाईट असेल, त्याला तिच्या मुलाला सांभाळण्याच्या कामाची किंमत नसेल, परंतू ३०००० फुटावर जेव्हा त्या बाळाच्या रडण्याचा विमानातील प्रत्येकाला त्रास होत होता, ती वेळ होती का स्त्री किंवा पुरुषांच्या कौटुंबिक इगोच्या सेटलमेंटची? निश्चितच नाही. कारण आपल्या वैयक्तिक इगोच्या पलीकडे एक सामाजिक वर्तुळ असते याचे भान कायम राहणे गरजेचे आहे. त्या सामाजिक वर्तुळाचे काही नियम आहेत ते नियम पाळणे नैतिकदृष्ट्या आपल्यापैकी प्रत्येकाला बंधनकारक आहेत

परंतू काही मंडळींना हा फरक समजत नाही त्यामुळे आपल्या इगो सेटलमेंटकरीता त्यांना कोणतीही जागा योग्य वाटते. त्यावेळी या मंडळींना काही वाटत नाही कारण त्या इगोची गुर्मी डोक्यात भिनलेली असते. परंतू असे लोक हळू हळू एकटे पडायला लागतात. सुरुवातीला त्यांना या एकटेपणाचेही काही वाटत नाही परंतू नंतर मात्र तेच खायला उठते त्यावेळी समाजभानाची आठवण येते परंतू वेळ निघून गेलेली असते. इगो सेटलमेंटच्या नादात अनेकांना दुखावलेले असते लोक आपल्याला मागे टाकून पुढे निघून गेलेले असतात.

इगो सेटलमेंटपेक्षा समाजभान कायमच श्रेष्ठ असते त्याचे महत्व जाणून घेणे गरजेचे आहे. होय ना?





Comments