थोडा है थोडे की जरुरत है @ 21.11.23
प्रोफेशनल रीलेशन्स
सध्या सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात लोक एकमेकांबद्दल कॉमेंट करताना दिसतात. फेसबुक किंवा व्हॉट्स ॲपवर एकमेकांवर टीका करतानाही आपण बघतो. कधी जातीवरून तर कधी धर्मावरून. कधी राजकीय पक्षांवरून किंवा कधी कधी थेट व्यक्तिगत पातळीवर टीका केली जाते. काही वेळेला या टीकेचा किंवा कॉमेंट्स चा स्तर एवढा खाली असतो की सरळ शिवीगाळ देखील केली जाते. एकमेकांबद्दलचा तीव्र तिरस्कार त्या लिखाणामधे जाणवतो. लोक एकमेकांना बघून घेण्याची भाषा देखील बोलतात. सोशल मिडीयावरील पोस्ट आणि बोलणे लोक एवढ्या गंभीरतेने घेतात की आयुष्यभराचे संबंध खराब होऊन जातात. हे असे होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपल्याला प्रोफेशनल रीलेशन्स आणि पर्सनल रीलेशन्स मधला फरकच कळत नाही. ही दोन वेगळ्या प्रकारची रीलेशन्स असतात व त्याचा फरक ओळखूनच आपण कायम वागायला हवे ही काळाची गरज आहे. अन्यथा सोशल मिडीयावरील कॉमेंट्स च्या नादी लागून आपण जवळच्या मित्रमंडळींसोबत असलेली नाती देखील बिघडवून टाकू शकतो. विशेषतः ज्या राजकीय मंडळींच्या किंवा पक्षनेत्यांच्या बोलण्यावरून किंवा त्यांच्या विचारधारेचा पुरस्कार म्हणून आपण एकमेकांशी भांडत असतो त्या लोकांची एकमेकांसोबतची पर्सनल नाती अत्यंत सौहार्दतेची असतात. प्रोफेशनली ते वेगवेगळ्या मंचावरून एकमेकांवर प्रचंड टीका करत असले तरी व्यक्तिगत आयुष्यात त्यांनी पर्सनल आणि प्रोफेशनल नाती असा भेद बरोबर जोपासला असतो. आपण मात्र बरेच वेळा त्यांनी मंचावरून केलेल्या वक्तव्यांच्या आधारे सोशल मिडीयावर आपल्याच जवळच्या परंतू वेगळ्या विचारधारेच्या लोकांवर टोकाच्या टीका करून संबंध बिघडवत असतो. प्रोफेशनल नाती कशी जपायची असतात याचे एक उत्तम उदाहरण नुकतेच बघायला मिळाले.
सर्वोच्च न्यायालयामधे सध्या वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी खंडपीठाकडून केली जात आहे. वेगवेगळे विषय तेथे हाताळले जात आहेत. ३७० कलम असेल, किंवा महाराष्ट्रातील राजकीय परीस्थितीवरील खटला असेल किंवा दिल्ली सरकारबद्दल असेल असे विविध प्रकरणे सुरु आहेत. या सर्व महत्वाच्या खटल्यांमधे पक्षकारांतर्फे साधारणपणे ज्येष्ठ विधीज्ञ कपील सिब्बल हे बाजू मांडत आहेत. त्याच खटल्यांमधे सरकारच्या वतीने देशाचे महाअधिवक्ता तुषार मेहता बाजू मांडत आहेत. या सर्व प्रकरणांमधे आपापली बाजू मांडत असताना हे दोघेही एकमेकांविरुद्ध टोकाच्या भुमिका घेऊन भांडत असतात. प्रसंगी एकमेकांच्या बुद्धीमत्तेबद्दलही टीका टिपणी करतात. हा सारा विरोध बरेच वेळा फारच तीव्र असतो. आपापली बाजू मांडण्याकरीता हे दोघेही आपले कसब पणाला तर लावतातच परंतू या सोबत समोरचा कसा चूक आहे हे देखील पटवून देण्याचा प्रयत्न करतात. खरे तर एवढ्या साऱ्या केसेस मधे जवळपास रोजच हे दोघे एकमेकांविरुद्ध उभे असतात व एकमेकांवर टोकाची टीका टीप्पणी करत भांडत असता. त्यांचे ते भांडणे बरेच वेळा सोशल मिडीयावर देखील व्हायरल होते. ते सारे बघून या दोघांचे एकमेकांशी असलेले व्यक्तीगत नाते अतिशय वाईट स्थितीमधे असेल असे आपल्याला वाटते. तिच आपली गल्लत असते. कपील सिब्बल किंवा तुषार मेहता यांच्या वक्तव्यांचा आधार घेऊन एकमेकांवर सोशल मिडीयावर तूटून पडणाऱ्या मंडळींनी पुढे मी देत असलेला प्रसंग जरूर वाचावा व त्यानंतर प्रोफेशनल आणि पर्सनल रीलेशन्स कसे टिकवायचे असतात हे समजून घ्यावे.
त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामधे सुनावणीदरम्यान कपील सिब्बल यांना अचानक प्रकृतीचा त्रास जाणवू लागला. त्यांच्या बाजूने उभे राहून तोवर कडाडून भांडणारे व टिका करणारे तुषार मेहता लगेच त्यांच्या जवळ गेले, त्यांनी सिब्बलांना खाली बसविले. त्यांची चौकशी केली व त्यानंतर खुद्द तुषार मेहतांनी माननीय न्यायमूर्तींना विनंती केली की कपील सिब्बल यांना बरे वाटत नसल्याने त्यांना थोडा वेळ आराम करु द्यावा व त्यानंतरही त्यांना त्यांच्या चेंबरमधे सावकाश बसून ऑनलाईन मोड मधे आपली बाजू मांडण्याची परवानगी देण्यात यावी. ही विनंती तुषार मेहतांनी केली. याला म्हणतात पर्सनल रीलेशन व प्रोफेशनल रीलेशन्स मधे गल्लत न करणे. प्रोफेशनली सुनावणीदरम्यान भांडताना तुषार मेहता किंवा कपील सिब्बल एकमेकांवर वाटेल तशी टिका करतात परंतू व्यक्तिगत पातळीवर त्यांचे एकमेकांशी संबंध सौहार्दपूर्णच असतात व त्या दोघांनीही ते तसेच जपलेले असतात. आपल्यापैकी काही जण मात्र त्यांच्याच वक्तव्याचा आधार घेऊन आपल्याच मित्रमंडळींवर तूटून पडतात व व्यक्तिगत संबंधही खराब करून घेतात.
सध्याच्या काळात जेथे सोशल मीडीया हा आपल्या आयुष्याचा आरसा बनला आहे त्यावेळी त्यावरील गोष्टींना किती सिरीयसली घ्यायचे हे ठरविले पाहीजे. त्यावर टिप्पणी करणे ठीक आहे परंतू त्यापोटी आपले व्यक्तिगत रीलेशन्स जर बिघडत असतील व आपण स्तर सोडून भाषा वापरत असू तर मात्र काहीतरी चुकतंय. नव्या काळात नात्यांचे आयुष्यच तर मुळात फार कमी आहे. त्यातही असे प्रोफेशनल आणि पर्सनल रीलेशन्स एकत्रित करून आपण लोक तोडायला लागलो तर आपल्याजवळ कोण राहील? हा विचार करण्याची गरज आहे. होय ना?
अगदी बरोबर व्यवसायिक, कार्यालयीन, वैयक्तिक हि सगळी नाती वेगवेगळी आहेत व ती त्या प्रमाणे जपली पाहिजे योग्य विचार मांडले आहेत
ReplyDeleteअगदी बरोबर!
ReplyDeleteछान, रोजचा अनुभव 👌👌
ReplyDelete