थोडा है थोडे की जरुरत है @ 05.9.23

संपर्क 

त्या भल्या मोठ्या वास्तुसमोर लागलेली नियमावलींची पाटी मी वाचत होतो. तेथे जाताना त्या संपुर्ण परीसरात काय काय नेता येणार नाही कश्या प्रकारे सुरक्षा तपासणी केली जाईल या सर्व बाबींची एक मोठी यादी तेथे होती. त्यांनी माझ्या जवळची बॅग काढून घेतली. त्यानंतर तपासणीकरीता माझे पैश्याचे पाकीट काढून घेतले. बेल्ट काढून घेतला. खाण्याचे कोणतेही पदार्थ, एवढेच काय पण पाण्याची छोटीशी बाटली देखील त्यांनी आत नेण्यास मनाई केली. आतमधे पिण्याच्या पाण्याची भरपूर व्यवस्था खाण्याकरीता देखील व्यवस्था आहे असे ते सुरक्षाकर्मी सांगत होते. त्यानंतर त्यांनी माझ्या हातातील स्मार्टवॉच देखील काढूत तेथील लॉकरमधे ठेवायला लावले. परंतू सर्वात मोठी समस्या आली जेव्हा त्यांनी मला मोबाईल फोन देखील लॉकरमधे जमा करायला लावला. विमानामधे बसताना मोबाईल फोन स्कॅन करून तो परत देतात. परंतू येथे तो सोबतच न्यायचा नाही म्हणल्यावर मी एक क्षण थबकलो. त्या भव्य परीसराचा फेरफटका मारायला एकूण चार तास लागतात असे मला माझे तेथील सहकारी सांगत होते

चार तास मोबाईल शिवाय मी कसे रहायचे? एवढी भव्य वास्तू, एवढी सारी प्रदर्शनी, असे सारे असताना त्याच्या समोर माझा फोटो किंवा सेल्फी नसेल तर कसे होईल? माझ्या आप्तांना मी कसे तोंड दाखवू की मी या अतिशय प्रसिद्ध ठिकाणी जाऊन आलो माझा एकही फोटो नाही? मी सोशल मिडीयावर फोटो टाकले नाही तर कसे होईल? या सोबतच चार तास माझे व्हॉट्स ॲपच्या मेसेजेस चे काय? मी तेथे नसलो तर कसे होईल? इन्स्टाग्रामवर किंवा फेसबुकवर माझी चार तास उपस्थिती नसेल तर त्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल. केवळ माझ्या पोस्ट चा प्रश्न नाही. माझ्या स्नेही मंडळींनी केलेल्या पोस्टवर मला कॉमेंट देखील करायची असते. अनेक ठिकाणी लाईक करायचे असते. ते जर मी चार तास केले नाही तर त्यांना कसे वाटेल? ते माझ्याबद्द्ल काय गैरसमज करून घेतील असे विचार देखील माझ्या मनात येऊ लागले. यासोबतच मी माझ्या कुटुंबीयांना माझ्या स्नेही मंडळींना सोडून येथे आलोय. त्यांना व्हीडीयो कॉल करून मला हे सारे भव्यदिव्य दाखवायचे असते. त्याचे मी काय करु? शिवाय या चार तासात मला येणारे फोन. एका महाविद्यालयाचा मी प्राचार्य आहे. चार तास माझा फोन बंद राहीला तर त्या महाविद्यालयाचे कसे व्हावे? तेथे असलेली व्यवस्था कोलमडणार तर नाही. मोबाईलवर मी उपलब्ध नाही म्हणल्यावर त्यांनी निर्णय कसे घ्यायचे? काही महत्वाचे कार्यक्रम आहेत ते कसे होतील? या सर्व विचारांसोबत आणखी काही विचार मला सतावू लागले

माझे मित्र मैत्रीणी, माझे कुटुंबीय मला फोन करतात आणि काही इमर्जन्सी आली तर कसे करायचे? या वेगळ्या प्रांतात, नव्या ठिकाणी ते माझ्याशी कसा संपर्क करतील? माझ्या सोबतच्या सहकारी प्राध्यापकांचे देखील फोन बंद असतील तर मग कसे होणार? माझी मुले परगावी राहतात. त्यांना काही अडचण आली तर ते काय करतील? त्यांना माझा फोन बंद आहे असे कळल्यावर ते कुणाकडे मदत मागतील? चार तासात अश्या आपत स्थितीमधे माझ्या स्नेही मंडळींनी काय करायचे? मला येणारे -मेल मला बघता येणार नाही. काही माहिती ही तातडीने पाठवायची असते. मग त्याचे कसे करायचे? असे नानाविध विचार माझ्या मनात काही क्षणात येऊन गेले. मोबाईल लॉकरमधे ठेवण्याच्या रांगेत मी पुढे पुढे सरकत असताना आता माझ्या आयुष्याची जवळपास सर्वात महत्वाची गोष्ट माझ्यापासून चार तास दुरावणार ही हुरहुर मला जाणवू लागली. रांगेत आता माझा नंबर आला. एका क्षणाला वाटले की रांगेतून बाहेर पडावे. हा मोबाईल यांच्याकडे चार तासासाठी देऊन मी जगाशी मी संपर्कच बंद करतोय. किती साऱ्या गोष्टींना मी चार तास मुकणार आहे. पण रांगेत असलेल्या गर्दीमुळे त्या काऊंटरच्या आतील माणसाने माझा मोबाईल पॅक केलेली पिशवी अक्षरशः माझ्या हातून घेतली मला टोकन दिले. हातात टोकन घेऊनचार तासांकरीता माझा सबंध जगाशी संपर्क तोडून मी त्या भव्य वास्तुसमोर उभा होतो. मोठ्ठी पाटी समोर दिसत होती. अक्षरधाम, गांधीनगर… (क्रमशः)






Comments

  1. Ho watate khare ki cell phone Vina rahu shakat nahi pn mala maze baba athawale tr watate Rahu shakato....1984 no land line no cell phone at my home

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23