थोडा है थोडे की जरुरत है @ 22.08.23

सहजताच महत्वाची!!

यावर्षी भारतात झालेल्या आयपीएल या क्रिकेट स्पर्धांच्या अंतिम सामन्यात चेन्नईच्या संघाने अगदी अंतीम टप्प्यावर गुजराथच्या संघाचा पराभव केला यामधे चेन्नईचा धडाकेबाज खेळाडू रविंद्र जडेजा याने अंतिम षटकामधे फारच जोरदार खेळ करून हा विजय खेचून आणला. सामना तर अप्रतिम झाला परंतू वेगवेगळ्या कारणांकरीता या सामन्याच्या अनुषंगाने चर्चा झाल्या. संघाचा कर्णधार धोनीकरीता हा आयपीएल मधील शेवटचा सामना असावा किंवा, शेवटच्या षटकामधे धोनीने डोळे मिटून ठेवले होते वगैरे. परंतू या सोबत आणखी एका गोष्टीवर फार चर्चा झाली त्याबद्दल मग पुढे चर्चांच्या फैरी झडल्या. मॅच संपल्यावर त्या दिवशीचा हिरो, रविंद्र जडेजा याची पत्नी सामना बघायला हजर होती. सामना संपल्यावर ती मैदानावर आली. तिने त्या दिवशी परंपरागत पद्धतीने साडी परीधान केली होती. रविंद्र जडेजा जवळ आली तिने त्याला नमस्कार केला. ही अत्यंत सहजतेने तिने केलेली कृती अनेक लोकांकरीता अनेक दिवसांसाठी चर्चेचा विषय बनली

भारतीय परंपरांचा आदर करणारी, परंपरागत साडी परीधान करून आलेली, पतीचा सन्मान करणारी रविंद्र जडेजाची पत्नी बघा. मग त्या फोटोसोबत इतर एक दोन क्रिकेट खेळाडूंच्या पत्नी तोकड्या वेषामधे असलेले फोटो जोडण्यात आले. मग हे असे वर्णन झाल्याबरोबर स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते पुढे सरसावले. पोषाखावरून महिलेचे चारित्र्य संस्कार ठरविले जाऊ शकत नाही. रविंद्र जडेजाच्या पत्नीने त्याला नमस्कार केला मग तो तिला नमस्कार कधी करेल. तिनेही जर अश्याच पद्धतीचे मोठे काम केले तर तो तिला नमस्कार करेल का? असे प्रश्न निर्माण झाले. अश्या पद्धतीने भारतीय परंपरांचे रक्षणकर्ते परंपरांचे जोखड आता फेकायला हवे असे मांडणारे कार्यकर्ते सोशल मिडीयावर एकमेकांच्या समोर उभे ठाकले. मग इतिहासाचे दाखले, गुगलच्या विकीपिडीयाच्या माध्यमातून शोधलेली माहिती, त्याच्या आधारे पुन्हा आरोप प्रत्यारोप असे सारे बराच काळ सुरु राहीले. अजूनही एखाद्या दिवशी त्या फोटोवर एखादी नवी प्रतिक्रीया आलेली दिसतेच. हा सारा काय प्रकार आहे?

खरे तर तो सामना बघितल्यावर घडलेली घटना ही एक अत्यंत सहजतेने दिल्या गेलेली प्रतिक्रीया होती. अशी प्रतिक्रीया देण्याची आपल्या देशात पारंपारिक पद्धत आहे. काही देशांमधे गळाभेट घेतात. काही ठिकाणी गालाला गाल लावतात तर काही ठिकाणी हॅन्डशेक करतात. एखाद्या व्यक्तीने काहीतरी चांगले, आपल्या मनाला सुखावणारे किंवा अभुतपूर्व काहीतरी केले असेल, यश संपादन केले असेल तर आपण आपल्या भावना व्यक्त करताना त्याच्या पाया पडतो आशिर्वाद घेतो. हा सन्मान करण्याचा प्रकार शक्यतोवर आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तिच्या बाबतीत आपण करतो. नमस्कार करून आदर व्यक्त करण्याची आपल्या देशाची ती परंपरा आहे. कधी कधी तर असा आदर व्यक्त करताना वय देखील आडवे येत नाही. आपल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामधे किर्तन किंवा प्रवचन करणाऱ्या व्यक्तीच्या सर्वच जण माऊली म्हणून पाया पडतात. तेथे वयाचेही बंधन नसते. मला आठवते. यवतमाळ येथे बालाजी मंदीरात डॉ. गोविंदराव देशपांडे श्रावणमास प्रवचन मालिका आयोजित करत. त्यामधे मला बरेच वेळा सेवा देण्याची संधी मिळाली. प्रवचन आटोपल्यावर उपस्थित लहान थोर सारे पाया पडत. सुरुवातीला मला फार अवघडल्यासारखे व्हायचे. परंतू गोविंदराव काकांनी मला सांगितले, अवि, हा नमस्कार तुला नसून तू मांडलेल्या त्या श्रेष्ठ ग्रंथातील विचारांना आहे. आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ दर्जाचे समर्पित कार्य करणारे श्रद्धेय शंकरबाबा पापळकर प्रत्येकवेळी बाबा म्हणून थेट पाया पडतात. आपण अवघडून जातो पण त्यांची ती पद्धत आहे. त्यांचा तो विनय आहे. ती सहजतेने जोपासलेली प्रामाणिक पद्धत आहे. रविंद्र जडेजाची पत्नीच नाही तर त्या मैदानावर आपण देखील हजर असतो तर आपण देखील रविंद्र जडेजाला नमस्कार केला असता कारण त्याचा त्या दिवशीचा खेळ एका पराक्रमासारखाच होता त्याचा आपण त्याच प्रकारे सन्मान केला असता

परंपरांचा खरा अर्थ जीवनाची सहजता आहे हे सर्वात पहिले ध्यानात ठेवायला हवे. सहजतेने प्रामाणिकपणे आपल्या मनातील भावनांचे प्रकटीकरण म्हणजे परंपरा व्यक्त होण्याची पद्धत. मग अश्या पद्धतींना सांभाळायचे असेल तर त्यामधील सहजता सांभाळायला हवी. परंपरांचे रक्षक बनून त्याचा उदोउदो करणारे ते सहन होऊन त्याला कडाडून विरोध कराणारे हे दोन्हीही गट परंपरांच्या संवर्धनाच्या प्रक्रीयेला हानी पोहोचवितात. भारतील मुलभूत परंपरा ज्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत त्या सहजतेने स्विकाराव्या लागतील, सहजतेनेच सांभाळाव्या लागतीलतरच त्या चिरंतन होतील.




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23