थोडा है थोडे की जरुरत है @ 15.08.23

स्वातंत्र्यनव्या विचारांचे

एक थेट प्रश्न विचारतो. आपल्यापैकी किती लोक आपल्या घरातील मोठ्या होत असलेल्या पौगंडावस्थेतील मुला - मुलींशी सेक्स या विषययावर थेट स्पष्टपणे बोलू शकतो? मला उत्तर मिळाले. सेक्स हा शब्द वाचल्याबरोबर आज थोडा है.. मधे हे काय भलतेच लिहीलंय सरांनी असे म्हणून आपण पेपर किंवा मोबाईलवर शेअर केलेला लेख कुणाला दाखवायचा नाही हा विचार केला असणार. हाच प्रश्न पुन्हा एका विशिष्ट गटाला विचारतो. आपल्यापैकी शिक्षकी पेशामधे असणारे किती लोक आपल्या विद्यार्थ्यांशी वर्गामधे सेक्स बद्दल मोकळेपणाने बोलू शकतो? पुन्हा मला उत्तर मिळाले. नेहेमी अविनाश मोहरील यांचा लेख मुलांना पण वाचायला सांगतो पण आज तर यांनी भलतेच काहीतरी लिहीणे सुरु केले आहे असा विचार मनात आला असणार. अविनाश, तुझा मुलांच्या संवेदनशीलतेबद्दलचा लेख मी वर्गात वाचून दाखविला असे सांगणारी माझी शिक्षक मैत्रिण हा लेख कदाचित वाचून दाखविणार नाही कारण  यामधे मी जो विषय मांडतो आहे तो मुलांना कसा सांगायचा किंवा सांगावा कि नाही याबद्दलच एवढा गोंधळ अनेकांच्या मनामधे आहे की त्यामुळे उगाच कशाला असले विषय काढायचे. आजकाल मुले काय नि मुली काय, फार वात्रट झालेत. त्यांना तर असे काही सांगितले तर आयते कोलीतच मिळायचे वात्रटपणा करायला. असा विचार माझ्यासकट जास्तीत जास्त शिक्षक करतात. परंतू हा विषय किती महत्वाचा आहे, योग्य वयामधे पालक किंवा शिक्षकांनी जबाबदारीने या विषयाबद्दल मुला मुलींना मार्गदर्शन करणे कसे आवश्यक आहे मुळात मी पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून जर असे करत नसेन तर मी चूक करतो आहे हे पटवून देणारा एक चित्रपट बघण्यात आला ज्याचे नाव आहे माय गॉड .

याच चित्रपटाचा पहिला भाग परेश रावल अक्षय कुमार यांच्या अभिनयामुळे सर्वांना पटणाऱ्या कथेमुळे प्रचंड गाजला. यावेळी, अक्षय कुमार पंकज त्रिपाठी यांनी मिळून एक अत्यंत उपयुक्त विषय या चित्रपटामधे हाताळला आहे ज्याबद्दल मी वर लिहीले आहे. चित्रपटाबद्दल मी फार लिहीणार नाही कारण सर्वांनी म्हणजे पालकांनी शिक्षकांनी हा चित्रपट बघणे अनिवार्य आहे. चित्रपटाला सर्टीफिकेट असल्याने १८ वर्षावरील मुला मुलींनी तो जरुर बघावा. त्यांच्याकरीता देखील या चित्रपटामधे मोलाचे मार्गदर्शन आहे. परंतू मुळात हा चित्रपट पालक शिक्षकांकरीता आहे. मला देखील अनेक वेळा हा चित्रपट बघताना असे जाणविले की खरोखरीच आपली मुले मोठी झालीत परंतू त्यांच्याशी सेक्स या विषयावर हवा तसा संवाद निर्माण करता आला नाही. कारण एकच होते. अवघडलेपणा. शिक्षक म्हणून तर या सर्व बाबी आम्ही वर्ज्यच मानल्या आहेत. परंतू माझ्या किंवा माझ्या पिढीच्या अनेकांच्या हे लक्षात आले नाही की आपण जरी हा विषय टाळला तरी आता मुलांजवळ माहिती मिळविण्याची अनेक साधने आहेत. त्या माहितीजाळात किती भयानक, अशास्त्रीय, अमानवी, अवैज्ञानिक, सर्रास खोटी व्यापार वाढविणारी माहिती दिली जाते ज्यामुळे आपल्या घरातील शाळा महाविद्यालयातील मुला मुलींचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते याची थेट कल्पना हा चित्रपट आपल्याला देतो. चित्रपटात सेक्स बद्दलच्या चर्चा विनोद निर्माण करतात, अवघडलेपणा दाखवतात पण क्षणात अंतर्मुख करायला देखील लावतात हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. पंकज त्रिपाठीच्या मुलाची समस्या आपल्या घरची किंवा ओळखीतली वाटू लागते. अनेक वर्षांपासून जंजाळ बनलेली विचारांची जळमटे तोडून नव्या विचाराच्या स्वातंत्र्याकडे जायला हवे हा विचार मनात घेऊनच आपण चित्रपटगृहातून बाहेर पडतो. सेक्स एज्युकेशन बद्दल बोलताना चित्रपट सुरु झाल्यावर मनात आलेला अवघडलेपणा चित्रपटच बाहेर काढतो. शेवटी प्रगत समाज म्हणजे सकस विचारांच्या नागरीकांनी तयार केलेला समुहच असतो ना? या सकस विचारांना नव्या वैचारिक स्वातंत्र्याकडे नेणारा हा चित्रपट आहे

विशेषतः पालक शिक्षक यांनी जुन्या विचारांची जळमटे बाजूला सारून मुला मुलींना उपयुक्त ठरेल त्यांचे पौगंडावस्थेतील शारीरिक आरोग्य सुदृढ कसे राहील याबद्दल  हा चित्रपट बघण्याचा त्यावर विचार करण्याचा प्रयत्न आजच्या स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने करणे यापेक्षा वैचारिक स्वातंत्र्य काय असू शकते?





 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23