थोडा है थोडे की जरुरत है @27.06.23

मेट्रीक्स ब्रेकींग ()

गेल्या तीन लेखांमधे आपण आपल्या अवती भोवती घोंगावणाऱ्या एका नव्या धोक्याबद्दल बोलत आहोत. आर्टीफीशीयल इंटेलीजन्सच्या आधारे आपले जग अख्खेच्या अख्खे बदलणार आहे. हे लेख प्रकाशित होत असताना काही जाणकार वाचकांनी मला आर्टीफीशीयल इंटेलीजन्सचे काय काय फायदे होणार आहेत याबाबत काही माहिती पाठविली. त्या संपुर्ण माहितीशी मी सहमत आहेच. उलट काल परवाच गुगलचे प्रमुख सुंदर पिचई यांनी गुगल मेडीकल क्षेत्रामधे आता आर्टीफीशीयल इंटेलीजन्सच्या भरवश्यावर एक क्रांती करणार आहे असे घोषित केले आहे. त्यांनी माणसाच्या रेटीनाचा अभ्यास केला त्याद्वारे असे लक्षात आले आहे की माणसाला जडणाऱ्या विविध व्याधींचा परीणाम हा त्याच्या रेटीनावर होतो भविष्यात जडणाऱ्या व्याधींचे देखील परीणाम रेटीनावर दिसतात. त्यांच्या या संशोधनाद्वारे आता येणाऱ्या काळात एखाद्या व्यक्तीला जर भविष्यात ह्रदयविकार होण्याची शक्यता असेल तर त्याच्या रेटीनावर तसे बदल दिसू शकतात. जेणेकरून तो आजार टाळला जाऊ शकतो किंवा काळजी घेतली जाऊ शकते. सुंदर पिचई यांनी परवा एका मोठ्या समुहासमोर हे सांगितले की यापुढे ह्रदयविकाराच्या तपासणीकरीता एन्जीओग्राफी किंवा इको वगैरे टेस्टची गरज राहणार नाही. गुगल बनवित असलेल्या नव्या आर्टीफीशीयल इंटेलीजन्सवर आधारित तंत्रज्ञानाच्या आधारे डॉक्टर्सना पेशंटच्या रेटीनाच्या रीपोर्ट द्वारेच निदान होऊ शकेल. हे सारे ऐकल्यावर खरोखरीच अश्या प्रकारे सुविधा निर्माण झाल्यास अनेकांचे ह्रदयरोग सांभाळता येतील किंवा योग्य ती काळजी घेता येईल. एकंदरीत आर्टीफीशीयल इंटेलीजन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील संशोधनास एक नवी उंची प्राप्त होणार आहे हे निर्विवाद सत्य आहे. आपण गेले तीन आठवडे जी चर्चा करतो आहे तो मुद्दा मात्र फारच वेगळा आहे.

साधारणपणे त्या मेट्रीक्स चित्रपटात जसे घडताना दाखविले तसे झाले तर मात्र आपल्याला आतापासून हे मेट्रीक्स तोडण्याकरीता तयारी करावी लागणार आहे. यंत्र आपल्या मनावर आरुढ झाले की आपला मानवाच्या बुद्धीमत्तेवरचा विश्वास कमी होतो. अगदी काही संख्यांची आकडेमोड करून बेरीज केली तरी ती एकदा कॅल्क्युलेटरवर आपण तपासून बघतो. कॅल्क्युलेटरची किंमत २०० रुपये आणि माणसाच्या मेंदुची किंमत अनमोल. परंतू २०० रुपयाच्या कॅल्क्युलेटरवर आपला जास्त विश्वास आहे. हा कॅल्क्युलेटर जरी माणसाने बनविला असला तरी त्याचा जनक हा माणसाचा मेंदू आहे हे तो मेंदूच विसरतो. अश्याप्रकारे विलक्षण क्षमता असलेला मानव यंत्राच्या आधारे जगू लागतो. विचार करणे, त्या विचारांना आपल्या अनुभवाची वाचनाची जोड देणे त्यानंतर नवनिर्मिती करणे हे मानवाचे कार्य जर उद्या आर्टीफीशीयल इंटेलीजन्स करायला लागले तर कसे होणार हा विचार आपण करुन ठेवायला हवा. आपले लेख, कविता, विचारप्रवर्तक मुल्ये हे सारे मशीन तयार करेल तर मग आपल्या बुद्धीमत्तेचे काय होणार हा जटील प्रश्न आहे. आपल्याच विचारशक्तीने आपण आर्टीफीशीयल इंटेलीजन्सची व्यवस्था उभी करतोय त्यासोबत त्या व्यवस्थेला स्वतःहून प्रगल्भ होण्याचे शिकवतोय. त्या व्यवस्थेचा शिकण्याचा वेगही आपण वाढवून दिला आहे. आता यामुळे या व्यवस्थेने प्रगल्भ विचारी होण्याची स्वतःची प्रक्रीया तयार केली तर आपल्याला या व्यवस्थेचे गुलाम झाल्याखेरीज पर्याय नाही. असे होऊ नये यासाठी काय करायचे हे मेट्रीक्स चित्रपटात दाखविले आहे.

मेट्रीक्स या चित्रपटात यंत्रमानव हिरोवर धावून येतो त्याला मारु लागते. पण तो हिरो फक्त साधेपणाने हात फिरवितो पण त्याच्या त्या साध्या हालचाली देखील त्या यंत्रमानवाच्या हालचालींना हरवतात अश्याप्रकारे तो यंत्रमानव हरतो कोलमडतो. त्याचवेळी सर्वांच्या लक्षात येते की हा हिरो तो स्पेशल माणूस आहे जो मेट्रीक्स तोडू शकतो कारण त्याचा मानव म्हणून त्याच्याकडे असलेल्या शक्तीवर संपुर्ण भरवसा असतो

आपण आर्टीफीशीयल इंटेलीजन्सचा वापर किंवा प्रभाव थांबवू शकलो नाही तरी एका गोष्टीवर आपले प्रभुत्व ठेवणे गरजेचे आहे. ते म्हणजे भावनिक विचार. आर्टीफीशीयल इंटेलीजन्स विचार करेल परंतू मानवी भावनांचे विविध पदर त्यास कळणार नाहीत. या मानवीय भावना आपण जपणे गरजेचे आहे ते आपले बलस्थान राहणार आहे. या मानवी भावभावनाशी निगडीत सर्व गोष्टी कायम करायला हव्या नव्या पिढीला देखील ते सांगायला हवे. पावसाच्या जलधारांनी चिंब भिजल्यावर कसे छान वाटते हे नव्या पिढीला अनुभवून दिले पाहीजे. या आणि अश्या भावनिक आनंदाच्या गोष्टी सतत करत राहून भावनिकता जर आपण टिकविली तर येणारे आर्टीफीशीयल इंटेलीजन्सचे मेट्रीक्स आपल्याला सहज तोडता येईल. होय ना?


 

Comments

  1. अगदी पटतंय 100%👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18