थोडा है थोडे की जरुरत है @ 13.06.23

मेट्रीक्स रीलोडींग ()

एका मोठ्या घरात राकेश बसलेला असतो. त्याच्या समोरची मोठी भिंत म्हणजे एक हाय डेफीनेशन स्क्रीन असतो. त्याने डोळ्यावर एक व्हीज्युअलायझर नावाचे यंत्र बसविलेले असते. समोरच्या स्क्रीनवर लाटांनी फेसाळलेला समुद्र असतो. त्याच्या व्हिज्युअलायझरमुळे तो जवळपास त्या दृश्यांमधे पोहोचलेला असतो. विस्तीर्ण समुद्रकिनारा, पांढरी शुभ्र वाळू, खळखळत्या लाटांचा आवाज, मधे पक्षांचा किलबीलाट, बॅकग्राऊंडला छान मंद संगीत. हे सारे तो प्रत्यक्ष अनुभवत होता. अचानक त्याला असे वाचले की अश्या सुंदर समुद्रकिनारी हातात शॅम्पेनचा ग्लास हवा. त्याने बोलूनच ऑर्डर दिली, अमल, (त्याच्या व्हर्च्युअल अस्टीटंट चे नाव) माझ्यासाठी एक ग्लास शॅम्पेन पाठव. अमल ने प्रेमाने उत्तर दिले. लगेच पाठवते सर. काही क्षणात राकेशच्या उजव्या बाजुच्या भिंतीचा एक कप्पा उघडला गेला त्यामधून हळूवार सरकत एक शॅम्पेनचा ग्लास त्याच्याकडे आला. त्याचे सीप घेत घेत तो पुन्हा समुद्रकिनारा एन्जॉय करु लागला. पुन्हा त्याने काही वेळाने आवाज दिला, अमल, खोलीतले लाईट जरा डीम कर. अमल ने लाईट डीम केले त्या सोबतच विचारले, सर, तुम्हाला बरे वाटत नाहीये का? राकेश उत्तरला, बरे आहे, परंतू मला आता जरा झोप येतेयअमल उच्चारली, सर, आपल्याला झोप येत आहे परंतू आपण अद्याप जेवण केलेले नाही. शिवाय जेवणा आधीची गोळी घ्यायची आहे. त्याची वेळ टळून गेली आहे. असे करणे बरोबर नाही. राकेश म्हणाला, अमल, ठीक आहे ना एखाद्या दिवशी जरा उशीरा जेवलो तर काय होईल? अमलने पुन्हा अत्यंत प्रेमळ आवाजात उत्तर दिले, सर, गेल्या तीन महिन्यांमधे आपण एकूण ११ वेळा जेवायला उशीर केला त्यामुळे आपल्याला ॲसीडीटीचा त्रास झाला होता, त्यामधून दोनदा आपल्याला ॲसीडीटी करीता आठवडाभर औषधांचा कोर्स करावा लागला होता. त्यामुळे तसे पुन्हा काही होऊ नये याकरीता मी आपल्याला विनंती करते आहे की आपण गोळी घेऊन जेवण करावे. त्यानंतर आपल्याला आराम करता येईल. आपण म्हणत असाल तर मी आपल्या काही ऑनलाईन मिटींग पुढे ढकलते आपण जेवण करून दोन तास आराम करावा. अमल ही राकेशची व्हर्च्युअल असीस्टंट असेत. राकेश एका मोठ्या चॅनलचा हेड असतो. परंतू तो त्याचे सारे व्यवहार या एका डीजीटल रुम मधे बसून, करीत असतो. एका वेबसिरीजमधे नुकतेच मी अश्या पद्धतीचे चित्रण बघितले जे प्रत्यक्षात शक्य होईल का याबाबत माझ्या मनात संभ्रम होता. परंतू काल परवा एक नवे ॲप बाजारात आले आहे जे बघून राकेश सारखी डीजीटल रुम तयार निर्माण व्हायला वेळ लागणार नाही याची खात्री पटली. ते ॲप म्हणजे व्हर्च्युअल गर्ल फ्रेंड तयार करणारे ॲप.

आजकाल गर्ल फ्रेंड बॉयफ्रेंड इत्यादी संकल्पना सर्वदूर प्रस्थापित झाल्या आहेत. परंतू या नात्यांमधे बरेचवेळा समज गैरसमज होत राहतात. वयाच्या अश्या वळणावर ही नाती निर्माण झाली असतात की त्यामधे फार गांभिर्य नसते. त्यामुळेच बरेच वेळा त्रास देखील होतो. त्यापेक्षा व्हर्च्युअल गर्लफ्रेंड तयार करण्याचे ॲप आले आहे. यामधे आपल्याला हवी तशी गर्लफ्रेंड तयार करता येणार आहे. दिसण्यापासून तर तिच्या आवाजापर्यंत सर्व बाबी चॉईस करता येणार आहेत. एकदा ती तयार झाली की मग ती संवाद करणे सुरु करेल. ती राकेशच्या अमल प्रमाणेच, आपली काळजी घेईल, आपल्याला आवडतात ती गाणी गाईल, आपण दुःखी असलो तर आपल्या मनाला बरे वाटेल असेच बोलेल, आपल्याशी चर्चा करेल, आपल्याला दिवसभरातून आपण ठरवू तितके वेळा तितक्या पद्धतीने आय लव्ह यू म्हणेल, वगैरे वगैरे

आपल्या आयुष्यातील गणित सोडविण्याच्या गरजा कॅल्क्युलेटरने भागवल्या, मोठमोठी सूत्रे कॉम्प्युटरने सोडविली, प्रत्यक्ष करण्याच्या अनेक गोष्टी ऑनलाईन व्हायला लागल्या, शिक्षण देखील ऑनलाईन सुरु झाले इथवर सारे ठीक होते परंतू आता आपल्या नभोमंडळात एक नवे वारे घोंघावते आहे. ज्याच्या अस्तित्वाचे नमुने मी आताच वर्णन केले आहेत. ते नमुने प्रत्यक्षात येणे सुरु झाले आहेत. आतापर्यंत माणसाने सारे काही मशीनच्या हवाले केले असले तरी त्याची बुद्धीमत्ता या गोष्टीवर मक्तेदारी होती. इंटेलीजन्स हे त्याचे बलस्थान होते. परंतू आता त्याच्याच या बुद्धीमत्तेतून साकारल्या गेलीय.. आर्टीफिशीयल इंटेलीजन्स ही संकल्पनाही म्हणजे मेट्रीक्स रीलोडींगच आहे.. (क्रमशः)





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18