थोडा है थोडे की जरुरत है @ 06.06.23
पुन्हा एकदा…मेट्रीक्स!!(१)
आजपासून बरोबर २५ वर्षांपूर्वी कियान्यू रीव्हज नावाच्या एका हॉलीवुड अभिनेत्याचा एक मेट्रीक्स नावाचा चित्रपट फार गाजला होता. पुढे त्याचे भाग देखील आले. ते देखील लोकप्रीय ठरले. २५ वर्षांपूर्वी फॅन्टसी वाटणारा तो चित्रपट आज बघितला तर त्याला वास्तववादी म्हणावे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काल परवा एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीवर एक बातमी ऐकली. त्यामधे एका नव्या तंत्रज्ञानामुळे मानवाच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न होईल की काय अशी भिती काही वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. मला ती बातमी ऐकल्यावर १९९९ सालचा तो मेट्रीक्स चित्रपट आठवला ज्यात मानवजातीच्या आपण सध्या करीत असलेल्या चुकांमुळे एक भयावह प्रकार घडलेला दर्शविला आहे.
त्या चित्रपटात असे दाखविण्यात आले आहे की मानवाने तंत्रज्ञानाचा वापर एवढा जास्त वाढविला की तंत्रज्ञानाने स्वतःच्या पद्धतीने विचार करणे सुरु केले. खरे तर यंत्र स्वतःचा विचार करु शकत नाही. परंतू त्याला स्वतःचा विचार करायला लावणारे तंत्रज्ञान मानवाने विकसित केले. तंत्रज्ञानाचा उपयोग तोवर माणसांची कामे करण्यासाठी यंत्रांच्या माध्यमातून केल्या गेला. परंतू मानवाने त्याच्याकडे असलेली सर्वात महत्वाची पुंजी म्हणजे वितार करण्याचे सामर्थ्य… ते देखील यंत्राकडे सोपविले. त्यानंतर जे झाले ते त्या चित्रपटात दर्शविले आहे. यंत्रांनी सबंध जगावर ताबा मिळविला. माणसांवर ताबा मिळविला. माणसे जन्माला आल्यावर त्यांना यंत्रांनी एका मोठ्या ट्युबमधे कैद केले. त्यांच्या मेंदुच्या एनर्जीचा केवळ पाच टक्के भाग हा त्यांना जिवंत ठेवण्यासाठी वापरण्यात आला. त्यानंतर त्या प्रत्येकाच्या डोक्यात एक चीप बसविण्यात आली ज्यामधे वेगवेगळ्या कामकऱ्यांच्या कामाचे प्रोग्राम फिट केले. कुणाच्या डोक्यात ड्रायव्हर, कुणाच्या अधिकारी, कुणाच्या पोस्टमन, तर कुणाच्या टीचर. माणासांच्या सर्व कामांच्या चीप्स बनवून सारे जग व्हर्च्युअली सुरु झाले. प्रत्येक माणसाच्या मेंदुची ९५ टक्के एनर्जी यंत्रे स्वतःसाठी वापरायला लागली. माणसांना त्यांच्या डोक्यात बसविलेल्या चीपमुळे असे वाटायला लागले की सारे जग सुरळीत सुरु आहे परंतू वास्तविकतेमधे सारी मानव जमात वेगवेगळ्या ट्युबमधे बंद केल्या गेली. सबंध जगावर यंत्रांचे म्हणजेच मेट्रीक्स चे अधिपत्य निर्माण झाले.
ही सारी फॅन्टसी १९९९ मधे बघताना फार मजा आली होती. त्यावेळी या चित्रपटाबाबत चर्चा करताना आम्ही मित्रमंडळी या निर्मात्याचे कौतुक देखील करायचो की हे हॉलीवुडवाले अद्भुत व अनाकलनीय असे काहीतरी दाखवतात. परंतू ते दाखवताना त्यांनी लॉजीक एवढे छान वापरले असते की ते सारे खरेच वाटते. त्यांचे सादरीकरण, तर्कशुद्ध मांडणी या साऱ्या गोष्टींमुळे चित्रपटगृहात ते सारे खरेच वाटू लागते. पण शेवटी ती फॅन्टसी. त्या १९९९ च्या सिनेमा नंतर या सिनेमाचे आणखी दोन भाग आले. ते देखील असेच तर्कशुद्ध वाटायचे. या चित्रपटातला नायक या सर्व यंत्रांची मक्तेदारी तोडण्यासाठी म्हणजेच ते मेट्रीक्स छेदण्यासाठी प्रयत्न करतो. काही स्वतःच्या बळावर विचार करणारी मंडळी त्याला सोबत करतात. व प्रयत्नपूर्वक ते सारे ते मेट्रीक्स तोडण्यात यशस्वी होतात. यंत्रांची मक्तेदारी संपते व मानव पुन्हा त्या अधिपत्यातून मुक्त होतो.
आता २०२३ साली परवा एनडीटीव्ही वरील बातमी ऐकल्यावर मला हाच चित्रपट आठवला आणि त्या बातमीनंतर चित्रपटात दाखविलेली फॅन्टसी प्रत्यक्षात येणार की काय अशी भिती निर्माण झाली. त्या बातमीमधे व सध्या आपल्या आजुबाजूने सुरु झालेला एक नवा प्रकार जो आपल्याला हादरवून टाकणारा आहे त्याबद्दल तातडीने विचार करण्याची गरज आहे. आपल्या घरापर्यंत नव्हे आपल्या बुद्धीच्या चौकटीपर्यंत ही गोष्ट पोहोचली आहे व लवकरच ती त्याचा ताबा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः आपल्या घरांमधे मोठ्या होणाऱ्या नव्या पिढीच्या तर बुद्धीच्या चौकटीत ही गोष्ट पोहोचली देखील आहे. त्याला रोखण्याची योजना करायला हवी.. त्यासाठी आपण आपल्या थोडा है… च्या येणाऱ्या काही भागांमधे ही संपुर्ण समस्या समजून घेऊन त्याच्या निराकरणासाठी म्हणजेच हे मेट्रीक्स तयार होण्याआधीच त्याच्यावर मात करण्यासाठी तयार होऊयात. एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे, जातीपातींवरून भांडणे, राजकीय चर्चा करताना तोल सोडून एकमेकांचा उद्धार करणे, एकमेकांची उणी दुणी काढणे या सर्व विनाकारण केल्या जाणाऱ्या गोष्टींपेक्षाही आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या एका भयावह आव्हानाचा सामना करण्यासाठी तयारी करुयात.. (क्रमशः)
छानच 👍
ReplyDelete